आणि अनंतकालाची माता असते

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
30 Jan 2012 - 11:01 am

...आणि अनंतकालाची माता असते.

उपगुप्त हा नगरश्रेष्टीचा मुलगा. गजांत लक्ष्मी घरांत वास करत होती. उधळावयाला, छानछोकी करावयाला कशाचीच ददात नव्हती. तो तरुणपणीच वासवदत्तेच्या सहवासात आला. ही शहरातील यौवनसंपन्न, लावण्यखनी, कलांचतुर गणिका. दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले. गोष्टीचा सुखांत शेवट व्हावयास काहीच अडचण नव्हती. नव्हती, पण एक अघटित घडले.
शहरात गौतम नावाचा एक मुनी आला. त्याने बोधीवृक्षाखाली तपश्चर्या करून जीवनाचा "अर्थ" शोधून काढला होता. त्याच्या प्रवचनांना अलोट गर्दी लोटत होती. गंमत म्हणून उपगुप्तही एक दिवस प्रवचनाला गेला. आणि त्यांतच अडकला. रोज संध्याकाळी तो त्या गर्दीत स्वत:ला गमावून बसे. आणि हळूहळू त्याच्या आसक्तीचे रूपांतर विरक्तीत झाले. त्याने शेवटी निर्णय घेतला व वासवदत्तेला सांगितले की तो आता हे शहर सोडून निर्वाणाच्या शोधाकरिता वनात जाणार आहे. वासवदत्तेवर हा वज्राघातच होता. तिच्या आक्रोशाला, अश्रुपाताला, विनवणींना दाद न देता उपगुप्त वनात निघून गेला. .... तीन तपे लोटली. आणि एके दिवशी

अनुतप्त परतला संन्यासी उपगुप्त,
चवताळुन उठल्या सर्व वासना सुप्त
आजन्म ठेवले ठाणबंद जे अश्व
ते आज उधळले वृद्धपणी संतप्त

एकान्ततपस्या तीन तपांची सरली,
जडशीळ पावले मग माघारी फिरली
तारुण्य होमुनी जगला जगीं निष्प्रेम
निर्वाण कशाचे ! केवळ तगमग उरली

पेटल्या अरण्याऐशा नगरी आला
तो भ्रांत मनाने बिदीबिदीतुन फिरला
फिरफिरून मांडला हिशेब आयुष्याचा
बाकी न उरे हे पाहून तो बावरला

"अनुकरणशरण मी उगा भटकलो वाया,
मी समिधेसम का व्यर्थ सुकवली काया ?
अस्वस्थ मनाला शांति कशी लाभावी ?
मज कुठे मिळाली बोधितरूची छाया ?"

तो मंजुळ पैंजण थिरकथिरकले दूर,
अन् तरळत आले मधुगीतापरि सूर
"हे सन्यासिन् ! रे सुयोग्य घटिका आली !"
तनुवरी कोसळे स्पर्शसुखाचा पूर !

" हे उपगुप्ता ! मी आले वासवदत्ता
तुजसाठी झुरली ती मी यौवनमत्ता
मी रूपगर्विता गणिका उरले नाही
किति कठोर तप मी आचरिले तुजकरिता

मज होते माहित, कधीतरी येशील
तू अंती आश्रय मजपाशी घेशील
ही निर्वाणाची माझी घटिका आली :
तुज कुशीत घेता "आई" मज म्हणशील ?"

( कवी ..सांगितले पाहिजे ? त्याची ओळख करून दिलीच आहे.)

शरद

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

प्रास's picture

30 Jan 2012 - 2:00 pm | प्रास

गोष्ट आवडली, गोष्टीतली कविताही आवडली.

अनेकदा भावनेच्या भरात किंवा स्वतःच्या प्रवृत्तीची जाणीव न ठेवता पुरुषाने घेतलेले निर्णय उपगुप्तासारखेच अंगाशी येतात असं वाटतं. 'स्त्री'च्या निर्णयामागे वेगळा विचार असतो असं लक्षात येतं.

'स्त्री'तल्या प्रेमाच्या अभिव्यक्तीबद्दल मात्र तुम्ही फार मार्मिक भाष्य केलंय. गोष्टीमध्ये माधुर्य रसातलं वासवदत्तेचं प्रेम परिपक्व वयात उपगुप्तासाठी केलेल्या कठोर तपाने वात्सल्यामध्ये परिवर्तित झाल्यासारखं दिसतंय. असं परिवर्तन नक्की शक्य आहे.

बाकी ओळख करून दिलीय असं म्हणताय तरी तो कवि काही आम्हाला उमगेना ब्वॉ! व्य. नि. कराल का? ;-)

किचेन's picture

30 Jan 2012 - 2:57 pm | किचेन

बाकी ओळख करून दिलीय असं म्हणताय तरी तो कवि काही आम्हाला उमगेना ब्वॉ! व्य. नि. कराल का?
सहमत.

मला पण कोण कवि ते कळले नाहि. जाहिर सांगितले तरी चलेंगा.

शरदकाका कविता प्रचंड आवडली.
असे क्लासिक्स तुकडे आणखी दाखवा अशी विनंती.

कवि कळाला नाहीच.

स्वप्न वासवदत्तामधल्या कथेचं हे काव्यमय रुपांतर असेल तर माहित नाही.

बहुगुणी's picture

31 Jan 2012 - 10:38 am | बहुगुणी

मला ज्ञात असलेल्या भासाच्या स्वप्नवासवदत्ता या नाटकात वासवदत्ता, उदयन, पद्मावती (आणि सूत्रधार यौगंधारायण) ही पात्रं आठवतायत, उपगुप्त म्हणजेच उदयन का? आणि कवी भास असेल तरी ती संस्कृत रचना होती ना, मग या मराठी काव्यपंक्ति कुणाच्या ते कळलं नाही.

नाही म्हणायला ओशो रजनीश यांची एक प्रवचनात्मक कथा आहे, त्यात उपगुप्त आहे पण त्या कथेचा शेवट वेगळा आहे.

रेवती's picture

30 Jan 2012 - 9:52 pm | रेवती

कविता सुंदर आहे.
कवी कोण बुवा? गौतम की काय?

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2012 - 10:05 pm | बिपिन कार्यकर्ते

खूपच सुंदर!

अर्धवटराव's picture

30 Jan 2012 - 10:06 pm | अर्धवटराव

धन्यवाद शरदराव.
कोण आहेत हे कविराज??

अर्धवटराव

रघु सावंत's picture

30 Jan 2012 - 11:34 pm | रघु सावंत

मस्त जम्लै तुम्हाला

शुचि's picture

30 Jan 2012 - 11:53 pm | शुचि

बापरे!! आयुष्य काय काय रंग दाखविते. नियती खरच अजब चीज आहे.

कॉमन मॅन's picture

31 Jan 2012 - 2:05 pm | कॉमन मॅन

कविराज बहुधा शरदराव स्वत:च असतील. चूभूदेघे.

शरद's picture

31 Jan 2012 - 4:55 pm | शरद

कविता वसंत बापट यांची असून "राजसी" या संग्रहात 'उपगुप्त" या नावाखाली आहे. यावेळी रसग्रहण वगैरे काही न लिहता बॅकग्राउंड म्हणून स्वरचित कथा दिली. भासाच्या स्वप्नवासवदत्ता या नाटकाशी याचा काही संबंध नाही. कवीचे नाव न देण्यासंबंधी माझे विचार एका स्वतंत्र लेखात देणार आहे.
शरद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2012 - 5:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुपच सुरेख.........! धन्यवाद सर.........!

-दिलीप बिरुटे

फार सुरेख शब्दरचना,
धन्यवाद शरद्जी !

अशाच प्रकारे कवितेची ओळख करून देणार्‍या लेखाची, आणि कवीचे नाव का सांगू नये, ते स्पष्ट करणार्‍या लेखाचीही...
(माहीत असूनही कवीचे नाव न सांगणे मला ठीक वाटत नाही. कवीला श्रेय मिळाले तर बरे वाटते.)