कोणत्याही मिपा-इव्हेन्टच्या वेळचे नारायण (किसन शिंदे) यांच्या पुढाकाराने आणि 'मु. पो. ब्राझील' फेम विलासरावांच्या सहकार्याने गेल्या रविवारी म्हणजे दिनांक २२ जानेवारी २०१२ रोजी मिपा सदस्यांची पहिली ओरिगामी कार्यशाळा देनावाडी गिरगाव इथे संपन्न झाली. कार्यशाळेमध्ये मिपावर ओरिगामीकलेचा ध्वज फडकत ठेवणार्या सदस्य सुधांशू नूलकर यांनी मार्गदर्शन केलं. सुधांशू नूलकरांनी आपल्या भूमिकेला साजेसा ओरिगामी मित्र असं लिहिलेला टी-शर्ट परिधान केलेला. तसले टी-शर्टस् पुढच्या वेळी कार्यशाळेमध्ये भाग घेणार्यांसाठी उपलब्ध करून देण्याची (तेव्हा न केलेली) विनंती आम्ही इथे करून ठेवत आहोत. या पहिल्या कार्यशाळेमध्ये उपरोल्लेखित तीन सदस्यांव्यतिरिक्त श्री. विश्वनाथ मेहेंदळेकाका आपला पेटंट झब्बा-लेंगा-शबनम पिशवीचा युनिफॉर्म न घालता जीन्स-टीशर्टाच्या बॅचलरी कपड्यात (इस अधोरेखित शब्दसे निर्माण होनेवाले पॉइन्टको नोट किया जाय, मिलॉर्ड!) हजर होते. शिवाय ठाणेकर जोशी'ले', प्रास यांच्यासह सदेह उपस्थित होते. सदेह येवढ्यासाठी की आधी कार्यशाळेला येणार असं घोषित केलेले दुसरे ठाणेकर रामदासकाका विदेहावस्थेत उपस्थित आहेत असं तिसरा ठाणेकर असलेल्या किसनद्येवांचं म्हणणं होतं.
नमनाला घडाभर तेल पुरे करून आता प्रत्यक्ष कार्यशाळेच्या वृत्तांतावर येतो. सुधांशु गुरूजींनी ओरिगामी कलेची पार्श्वभूमी थोडक्यात सांगून प्रत्यक्ष शिकवण्यास सुरूवात केली. त्यांनी शिकवल्याप्रमाणे घातलेल्या पहिल्या काही घड्यांचा असा काही परिणाम झाला की त्यातून अनपेक्षितपणे कागदी कप तयार झाला. असा कप की ज्यातून पाणी, चहा, कॉफीही सहज पिता येईल. (अर्थात त्यासाठी वापरलेला कागदही दर्जेदार होता.) पहिल्याच प्रयत्नात कार्यशाळेतील विद्यार्थी यशस्वी झाल्यामुळे उत्साहाला उधाण आलं. मग ते कोणतेही चिकटवण्याची साधन न वापरता कागदातंच सेल्फ लॉकिंग पद्धत वापरून करता येणारे कागदी फूल आणि आपल्या ए-फोर कागदावर लिहिलेल्या पत्राचंच इन्व्हलप बनवायला शिकले. यानंतरचा क्रमांक जमिनीवर सोडताच कोलांटी घेणार्या कागदी खेळण्याचा आला. कार्यशाळेतील प्रत्येकाच्या खेळण्याने कोलांटी मारून शाबासकी मिळवली. याच खेळण्याचा मोठा भाऊ मानावा, असा उडी मारणारा बेडूक बनवून मिपाकर विद्यार्थ्यांनी आपापल्या बेडकाला भरपूर उड्या मारायला लावल्या.
आपापल्या बेडकांना उड्या मारण्यास लाऊन दमलेल्या मिपाकरांच्या श्रमपरिहारासाठी विलासरावांनी ब्रेक घ्यायला लावला आणि समोर सामोसे, फरसाण आणि पेढ्यांच्या न्याहरीची व्यवस्था केली. दरम्यान मिपाकरांनी मिपावरच्या विविध सदस्यांचा, धाग्यांचा आणि घटनांचा मागोवा घेऊन आपला 'अभ्यास वाढवला'.
ब्रेकनंतर गुरूजींनी बेसिक ओरिगामी तंत्राची माहिती दिली. यामध्ये सुरूवातीच्या दोन प्रकारच्या घड्यांची माहिती करून देण्यात आली. मग त्यापैकी एका घडीने सुरूवात करून विद्यार्थ्यांनी फूल बनवलं तर दुसर्या घडीने सुरूवात करून (चुकत माकत का होईना पण चक्क) क्रेन पक्षी बनवला. कागदापासून क्रेन पक्षी निर्माण होणं हा आमच्या ओरिगामी कार्यशाळेचा हायपॉईन्ट होता. यानंतर मात्र वेळेच्या अनुपलब्धीमुळे कार्यशाळा आवरती घेण्यात आली.
कार्यशाळेदरम्यान नेहमीप्रमाणेच मिपाकरांनी विलासरावांचं ऑफिस तथा अख्खी देनावाडीच दणाणून सोडली होती कारण सुधांशू गुरूजींनी अगोदरच मुभा दिलेली की गप्पा करा कारण हाताने ओरिगामी सुरू असताना त्यात कसलीही अडचण येत नाही. हे सांगण्यात आपण फार घाई केली असंच त्यांना नंतर वाटलं असेल इतका दंगा मोजक्या लोकांनी घातला. एकूणच ओरिगामी हा प्रकार इतका मस्त आहे की जाता जाता (इतरांना चुकवून) किसनद्येव आणि विमेकाका सुधांशू गुरूजींकडून गुपचूप कागदाचा बॉक्स बनवायला शिकले (हे इथे नोंदवून ठेवत आहे).
एरवी श्री समर्थ होतेच तरीही वेळात वेळ काढून ओरिगामी कार्यशाळेच्या सिद्धीसाठी आलेले सुधांशू गुरूजी, कार्यशाळेचे प्रणेते (नारायणराव) किसनद्येव, कार्यशाळेसाठी जागा आणि न्याहरी उपलब्ध करणारे विलासराव आणि दोन वेळा वाफाळत्या चहाची व्यवस्था करणारे त्यांचे पुतणे पंडितराव यांच्या एकत्रित श्रमाचा परिणाम म्हणून पहिल्या मिपाकर ओरिगामी कार्यशाळेची सुफळ आणि यशस्वी सांगता झाली असं म्हणण्यात काहीही प्रत्यवाय नाही.
पहिल्या मिपा-ओरिगामी कार्यशाळेतले विद्यार्थी आणि त्यांचे काही कलाविष्कार
मिपा-ओरिगामी कार्यशाळेत शिकवताना डाव्या हाताला सुधांशू गुरूजी आणि त्यांच्यासमोर बसून शिकत असलेले मिपाकर (डाव्या बाजूने) प्रास, किसनद्येव, जोशी'ले', विमेकाका आणि विलासराव.
कार्यशाळेत मार्गदर्शक सुधांशू गुरूजी (ओरिगामी मित्र लिहिलेला टी-शर्ट नोट करावा) आणि पण्डितराव.
कागदी कप
सेल्फ लॉकिंग पद्धतीने बनवलेली कागदी फुलं
वेगळ्या प्रकारची रंगीत कागदी फुलं
उड्या मारून दमलेला (कागदी) बेडूक
विमेकाका आणि किसनद्येवांनी गुपचुप शिकून घेतलेला कागदी बॉक्स, विमेंच्या कलाकृती पोटात घेतल्या अवस्थेत
कार्यशाळेचा हायपॉइण्ट - उडते क्रेन पक्षी
पण्डितरावांच्या वाफाळत्या चहाचा आस्वाद घेताना (डावीकडून) प्रास, विलासराव, विमे आणि जोशी'ले'
अशाप्रकारे संपन्न झालेल्या पहिल्या मिपा-ओरिगामी कार्यशाळेमध्ये पुढच्या तशाच कार्यशाळेच्या आयोजनाची बीजे रोवली गेली हे नक्की!
प्रतिक्रिया
24 Jan 2012 - 2:46 pm | यकु
वृत्तांत तर जबराट गुरुप्रास!
मजा आली.
इंटरनेटवरचे फोटो दिसले तर मनावर वाईट परिणाम होईल असे हपिसवाल्यांना वाटते.. त्यामुळे फोटोचा आनंद घरी गेल्यावर.
24 Jan 2012 - 3:15 pm | मेघवेडा
मजा आली!
25 Jan 2012 - 10:14 am | बिपिन कार्यकर्ते
+१
24 Jan 2012 - 3:18 pm | पिंगू
ही एक संधी हुकली तरी दुसर्या संधीसाठी मी वाट पाहत आहे. म्हणजेच दुसर्या कार्यशाळेसाठी आगाऊ नावनोंदणी करुन ठेवतो.
- (ओरिगामीकार) पिंगू
24 Jan 2012 - 3:22 pm | पियुशा
अरे व्वा !
आता मिपाकर ईथेही आपली घोड्दॉड चालु ठॅवतील तर :)
24 Jan 2012 - 3:30 pm | गणपा
आमेन.
एका वेगळ्या कट्टा / कार्यशाळेचा वृतांत इथे दिल्या बद्दल आभार. :)
24 Jan 2012 - 3:32 pm | मोदक
झकास वृत्तांत..
24 Jan 2012 - 3:38 pm | मी-सौरभ
सहमत..
अवांतरः सोकाजींच्या कार्यशाळेत आम्ही भाग घेऊ ईच्छीतो तर ते कार्यशाला घेतील का???
26 Jan 2012 - 10:36 am | सोत्रि
कोणी कार्यशाळेचे आयोजन केल्यास, प्रात्यक्षिक देण्यास आणि बौद्धिक घेण्यास आम्ही एका पायावर तयार आहोत. तस्मात, कळविण्याचे करावे ही विनंती :)
- ('तयार') सोकाजी
24 Jan 2012 - 4:24 pm | गणेशा
मस्त रे ...
24 Jan 2012 - 4:52 pm | उदय के'सागर
व्वा, क्या बात! :)
असं काही पुण्यात करण्याचा विचार आहे का? असल्यास जरुर कळवणे...
24 Jan 2012 - 6:06 pm | ५० फक्त
मस्त रे, बाकी सगळे विद्यार्थी शोभुन दिसत आहेत.
अवांतर - विमेकाका, एकदा तरी बॅचलरी आयुष्याता झब्बा पायजमा घालुन याच कट्ट्याला, मग तो तुमच्या केळवणाचा कट्टा असला तरी चालेल.
25 Jan 2012 - 1:10 am | विश्वनाथ मेहेंदळे
येतोच बघा एकदा. आणि नुसता झब्बा पायजमा नाही, भाजीची पिशवी घेऊन पण येणार. ;-)
केळवणाला वेळ आहे हो. लग्नाचा पत्ता नाही आणि केळवणाची तयारी म्हणजे "गाव बसा नाही, लुटेरे आ गये" अशातला प्रकार. ;-)
24 Jan 2012 - 6:49 pm | पैसा
विद्यार्थ्यांनी खरोखरच कलाकृती बनवल्या हे पाहून गुरुजी नक्कीच चांगल्या प्रकारे शिकवतात हे लक्षात आलं. पुढच्या कट्ट्याना शुभेच्छा!
24 Jan 2012 - 6:50 pm | सूड
मस्तच !! बरंच काही केलेलं दिसतंय ओरिगामीच्या वर्गात. काही अपरिहार्य कारणास्तव हजर राहता आले नाही.
24 Jan 2012 - 7:14 pm | विश्वनाथ मेहेंदळे
म्हणजे तुझा स्पा झाला तर ;-)
24 Jan 2012 - 7:20 pm | सूड
>>म्हणजे तुझा स्पा झाला तर
कसं शक्यै, तेवढं कौशल्य नाही ब्वॉ माझ्यात. त्या उंचीला पोहोचणं निव्वळ अशक्य. ;) बहुत काय बोलणे सुज्ञांस सांगणे न लगे.
25 Jan 2012 - 4:09 pm | ५० फक्त
हो मग तर काय, पाठिवर काचा पाडुन घ्याव्या लागतात, स्टुलावर उभे राहुन फोटो काढावे लागतात, तरी बरं सुडनं अजुन अॅडजेस्ट करायला सुरुवात नाही केली.
25 Jan 2012 - 4:58 pm | सूड
तर हो !! सत्त्व थोडे परीक्षाच फार .......भारी कठीण. सुदैवाने अॅडजेस्ट करण्याची वेळ आली नाही.
26 Jan 2012 - 12:49 am | कवितानागेश
सत्त्व थोडे परीक्षाच फार .......>>
हे आवडले! :)
24 Jan 2012 - 7:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे
कार्यशाळेला खूप मज्जा आली. सुधांशू नुलकरांचे आभार तेव्हा मानले होते. परत औपचारिक रित्या मानतो. आयोजक किसनदेव आणि यजमान विलासराव (आणि पंडित) यांचे पण आभार मानलेच पाहिजेत.
नूलकरकाका ओरीगामिचे इतके प्रेमी की त्यांनी आम्हाला त्यांचे पैशाचे पाकीट दाखवले. ते चक्क डॉमिनो च्या फ्लायर चे बनवले होते. त्यामुळे ओरिगामी हा केवळ टाईमपास नसून त्यातून उपयोगी वस्तू बनू शकतात याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळाले. त्यांनी एक कागदी फुल बनवून आणले होते (त्याचा फोटो पण टाका की हो). ते इतके भारी होते की ते पाहून प्रास भाऊंनी लगेच ते शिकवा अशी मागणी केली. मग पहिलीत असताना दहावीची गणिते सोडवू नका असे उत्तर इतरांनी परस्पर दिले (म्हणजे मीच, दुसरा कोण आहे इतका आगाऊ). असो, तूर्तास ते फुल बनवणे हे प्रास भाऊंचे ध्येय आहे. कुणाला देणार आहेत ते आम्ही विचारले नाही आणि त्यांनी सांगितले नाही.
असो, पण प्रास भाऊ, तो डब्बा एकदम हिट आयटेम आहे. घरी गेल्यावर एक बनवून दाखवला. तर लगेच अजून एकाची ऑर्डर मिळाली. मग एका डब्ब्यात सगळे कंगवे आणि दुसऱ्यात केसांचे चाप अशी व्यवस्था झाली. हापिसात सहकाऱ्यांना बनवून दाखवला तर सगळ्यांना तो आवडला आणि त्यात पेन ठेवण्याची घोषणा सहकाऱ्यांनी केली. पण मुळात कुणीच पेन आणत नसल्याने सध्या तो रिकामा पडला आहे. :-) त्या डब्ब्याच्या मालकी हक्कावरून सध्या वाद चालू आहे तो वेगळा. ;-)
सगळ्यांना डब्बा बनवून दाखवण्याचे कारण म्हणजे एकतर त्याला चौरस कागद लागत नाही, A४ कुठेही मिळतो. उपयुक्त वस्तू बनते. पटकन बनतो आणि मुख्य म्हणजे चुकांची शक्यता कमी. नाही तर आम्ही क्रेन बनवायला जायचो आणि एक घडी चुकली की बेडूक बनायचा, तसा घोळ नाही होणार.
असो, तर यंदाच्या गणपतीची आरास ओरीगामितून करण्याची आज्ञा घरातून सुटली आहे. त्यामुळे नूलकर पुढील कार्यशाळा कधी घेतात याची वाट बघतो आहे.
अवांतर :- उशीर झाल्याने आणि विलासरावांनी मजबूत पाहुणचार केल्याने गिरगावातील खादाडीची स्थळे पाहण्याची मोहीम आखता आली नाही. ती आखण्यासाठी परत दौरा काढण्याचे ठरले आहे.
24 Jan 2012 - 7:29 pm | विलासराव
मला डब्बा बनवायला शिकवणार असाल तर मग कधीही या. नाहीतर............
बाकी मुळ लेख आनी तुमची सवीस्तर प्रतिक्रिया लई भारी.
खरंतर मलाच लेख लिहायचा होता पण माझा तो आनंद आपण दोघांनी हिरावुन घेतला त्याबद्दल निषेध.
24 Jan 2012 - 7:38 pm | यकु
>>>खरंतर मलाच लेख लिहायचा होता पण माझा तो आनंद आपण दोघांनी हिरावुन घेतला त्याबद्दल निषेध.
--- विलासरावचा आनंद हिरावून घेतल्याबद्दल प्रास आणि विमेंचे अभिनंदन ! ;-)
25 Jan 2012 - 1:26 am | विश्वनाथ मेहेंदळे
डब्बा सोप्पा आहे एकदम. जरूर शिकवेन.
आणि वृत्तान्ताचे काय आहे, पुढील कट्ट्याचा तुम्हीच लिहा की....
24 Jan 2012 - 7:52 pm | जोशी 'ले'
प्रास आणि विमे यांनी मस्तच व्रुतांत लिहलाय..यात माझे चार आणे :) ..खरच खुप मजा आली ओरीगामी कट्यात, खुप दिवसांन नंतर विद्यार्थ्याच्या भुमिकेत शिरायला मजा आली...अर्थात गुरुजींची शिकवायची पध्दत तसेच यजमान विलासराव यांचे आयोजन मस्तच होते, शेवटी वेळ कमी पडल्याने एक राहीलं (1 च्या ऎवजी 3 वाजल्यामुळे) पुढच्या कट्या विषयी काहि चर्चा न होता कट्टा संपला, तरी पुढील कट्टयाची लवकरात लवकर करावी अशी नम्र विनंती एक नवोदीत कट्टाकर म्हणुन करु इच्छितो :)
24 Jan 2012 - 8:45 pm | सूड
पुढील कट्ट्याची लवकरात लवकर करावी ? काय करावी ? :D
24 Jan 2012 - 10:18 pm | जोशी 'ले'
कसला सुड घेताय . .. .घोषणा :)
24 Jan 2012 - 8:57 pm | रामदास
ऐन वेळेवर काही काम आल्याने येऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगीर आहे. पण वृतांत वाचून आनंद झाला. कागज के फूल च्या पुढच्या शो ला नक्की येईन. धन्यवाद.
24 Jan 2012 - 9:02 pm | रेवती
प्रासजी, कार्यशाळेचा वृत्तांत छानच लिहिला आहे.
सुधांशू नूलकरांचे आभार.
विलासरावांनी जागा उपलब्ध करून दिली म्हणून त्यांचेही आभार.
मला कार्यशाळेचे आमंत्रण होते पण येऊ शकले नाही.
आले असते तर सेल्फ लॉकिंग फुले शिकायला आवडले असते.
24 Jan 2012 - 9:14 pm | स्मिता.
कट्ट्याचा वृत्तांत मस्तच... तो सांगण्याची स्टाईलही भारीच!
असे आणखी कट्टे करा आणि सर्व विद्यार्थी किमान दहावी तरी पास करा ;)
24 Jan 2012 - 9:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्रे वा.........!!! सुंधाशु गुरुजी मला भावले. बाकी, वृत्तात माहितीपूर्ण आणि झकास आहे.
धन्स, दोस्त हो...................!!!
-दिलीप बिरुटे
24 Jan 2012 - 9:55 pm | प्रचेतस
एकदम खुसखुशित वृत्तांत. मजा आली वाचून.
ओरीगामी कलाकृती झकासच.
प्रासभाऊ अगदी शहाण्या मुलासारखे एका कोपर्यात बसून ओरीगामीचे धडे मनःपूर्वक घेत आहेत हे बघून गंमत वाटली.
25 Jan 2012 - 10:18 am | प्यारे१
त्यांची 'व्यंकूची शिकवणी' सुरु होईल बघा थोड्याच दिवसात.... ;)
24 Jan 2012 - 11:47 pm | कवितानागेश
:(
माझी शाळा बुडली....
25 Jan 2012 - 7:02 pm | पिंगू
उगी उगी आपण पार्ट टाईम क्लासची सोय करु.. :D
- पिंगू
25 Jan 2012 - 6:43 am | शिल्पा ब
मस्त. सगळेच प्रकार आवडले. तो बॉक्स कसा बनवायचा ?
25 Jan 2012 - 11:26 am | विश्वनाथ मेहेंदळे
तुम्ही प्रास भाऊंच्या पण वरच्या निघालात... त्यांनी निदान पहिलीत बसून दहावीचे गणित सोडवायचा विचार केला होता. तुम्ही शाळेतच न येता परीक्षा द्यायला निघालात ??? ;-)
नूलकर काकांना विचारावे लागेल याचे काही online रिसोर्स आहे का ते. यु-ट्यूब वर बघा काही मिळते का ते.
25 Jan 2012 - 7:03 pm | पिंगू
विमे घ्या ही लिंक
26 Jan 2012 - 9:58 am | शिल्पा ब
मग काय!! रजनीनंतर मीच!!
25 Jan 2012 - 10:07 am | कुंदन
लैच भारी झालेलाय मुंबईकरांचा क्रिएटिव्ह कट्टा.
26 Jan 2012 - 12:28 am | शुचि
फारच खुसखुशीत वर्णन. खूप छान वाटलं वाचून.
26 Jan 2012 - 8:41 am | चित्रा
छानच. अभिनंदन!
26 Jan 2012 - 9:28 am | चिंतामणी
पुण्यातसुद्धा होउन जाउ द्या कार्यशाळा.
26 Jan 2012 - 11:17 am | मस्त कलंदर
ही शाळा चुकवल्याबद्दल वाईट वाटतंय. पुढच्या वेळेस नक्कीच असेन असे म्हणते
26 Jan 2012 - 12:25 pm | सुहास झेले
ओह्ह्ह... मस्तच झालीय शाळा. वृत्तांत आवडला.
पुढल्यावेळी नक्की येण्याचा प्रयत्न करेन :) :)
26 Jan 2012 - 3:15 pm | ऋषिकेश
वा वा वा!
अशी एखादी कार्यशाळा कट्टा पुण्यात करता येइल का?
27 Jan 2012 - 9:15 pm | प्राजु
चला...! खाण्यापिण्याचे कट्टे सोडून काहीतरी वेगळं वाचायला आणि पहायला मिळालं या वेळी.
अभिनंदन! अशाच भरपूर कार्यशाळा होउदेत.
28 Jan 2012 - 10:49 pm | निवेदिता-ताई
सुंदर
19 Feb 2012 - 12:56 am | जयवी
अतिशय खुसखुशीत आहे वर्णन.
कार्यशाळा हुकल्याचं खरंच वाईट वाटलं.
कलाकृती एकदम सही !!