|| श्री गुरवे नम: ||
दिवाळीची धामधूम संपली, डिसेंबर महिना सुरु होऊन मुंबईत हळूहळू थंडी जाणवायला लागली, की मुंबईतल्या पक्षीप्रेमींची एकमेकांकडे चौकशी सुरु होते : आले का रे ? अजून का नाही आले ? केव्हा येणार ? आले, की मला नक्की सांग... BNHSमधे फोन करून बघूया...
शेवटी ते येतात. हजारोंच्या संख्येने. एखाद्या दैनिकात बातमीसह त्यांचं छायाचित्र (लोकासत्ता, बुधवार, दि. ११ जानेवारी २०१२, मुंबई वृत्तांत पुरवणी, इथे पहा) झळकतं, एकमेकांना व्यनि जातात आणि सोयिस्कर वेळ बघून पक्षीप्रेमींची पावलं (गाड्या) शिवडीला वळतात. शिवडी खाडीच्या तिवरांच्या अनाघ्रात, सुरक्षित अशा परिसरात हे पाहुणे मुक्काम करतात. पुढचे तीन-चार महिने इथला पाहुणचार झोडून मार्च–एप्रिल मधे परतीच्या प्रवासाला निघतात. या दरम्यान निदान आठ-दहा वेळा तरी आमची भेट ठरलेली.
दरवर्षी थंडीच्या दिवसांत हजारोंच्या संख्येने मुंबईला हमखास भेट देणारे हे पाहुणे म्हणजे रोहित (फ्लेमिंगो), सुरय (टर्न), कुरव (सी-गल), चिखली तुतारी (लिट्ल स्टिंट), गॉडविट, देशी तुतारी (कॉमन सँडपायपर), क्वचित कधीतरी कंठेरी चिलखा (लिट्ल रिंग्ड् प्लॉवर) हे पक्षीगण. कच्छचं रण, युरोप, सैबेरिया अशा दूरदेशांतून हे पक्षी येतात.
शिवडी खाडीजवळचा भूभाग हा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीचा आहे. इथे विविध (इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, इ.) तेल कंपन्यांचे तेलसाठे असल्यामुळे, टॉवर्स, मॉल्स असल्या बांधकामांना परवानगी नाही. जुना कोळीवाडा हीच काय ती विरळ मनुष्यवस्ती. तर, खाडीच्या पलीकडच्या माहुलच्या किनाऱ्यावर याच कंपन्यांचे तेलशुद्धीकरण कारखाने (रिफायनरी) असल्यामुळे हे सर्व क्षेत्र प्रतिबंधित आहे. त्यामुळे इथल्या तिवरांची (खारफुटीची) तोड फारशी झालेली नाही. इथल्या पर्यावरणामध्ये माणसाचा हस्तक्षेप नाही, पाणी-हवा-आवाजाचं प्रदूषण फारच कमी, परिणामी समुद्रपक्ष्यांना इथे मुबलक खाद्य उपलब्ध. विविध जातींचे एकूण जवळजवळ २५-३०००० पक्षी गुण्यागोविंदाने इथे नांदतात, ते यामुळेच.
या प्रत्येक जातीच्या पक्ष्यांची अन्न गोळा करण्याची पद्धत वेगवेगळी, अन्नही वेगवेगळं. त्यामुळे एकमेकांशी स्पर्धा सहजच टाळली जाते. कुरव आणि सुरय पाण्यावर उडत असतात. पाण्यात मासा दिसल्यावर त्याला पाण्याच्या पृष्ठभागावरून हलकेच वरच्यावर उचलतात. चिलखे, तुताऱ्या चिखलात तुरुतुरु चालत आपलं अन्न शोधतात, गॉडविटची चोच जास्त लांब असल्यामुळे तो चिखलातून खोलवरचं अन्न शोधू शकतो. बगळे उथळ पाण्यात एका जागी निश्चल राहून मासा दिसताक्षणी तो उचलतात. चिखलात अन्न शोधणार्याप पक्ष्यांना ‘चिखलपायटे’ असं म्हणतात.
अन्नग्रहण करण्याची रोहितची तऱ्हा तर अगदी जगावेगळी, एकमात्र अशी. चिखलातले मृदू प्राणी, गोगलीसारखे प्राणी, गांडुळांसारखे कृमी हे त्यांचं अन्न. त्यांची चोच जाड आणि वाकडी असते, तिचा वरचा भाग आखूड, छोटा, तर खालचा भाग रुंद, ओंजळीसारख्या आकाराचा असतो. खालच्या भागाला गाळणीसारख्या खाचा असतात. उथळ पाण्यात चरताना रोहित आपलं संपूर्ण डोकं पाण्याखाली बुडवतो. त्यामुळे चोचीचा वरचा आखूड छोटा भाग खाली जातो, तर खालचा ओंजळीसारखा भाग वर येतो. मग छोट्या भागाचा फावड्यासारखा वापर करून तळाचा गाळ उकरून तो ओंजळीसारख्या भागात ढकलतो आणि सरळ उभा राहतो. आता सगळं अन्न ओंजळीसारख्या भागात आल्यामुळे त्यातला चिखल गाळणीतून गळून पडतो आणि अन्न गिळलं जातं.
(रोहितच्या चोचींची दोन्ही छायाचित्रं महाजालावरून.)
शिवडीला रोहितच्या दोन जाती दिसतात : मोठा, गुलाबी चोचवाला ‘थोरला रोहित’ आणि छोट्या चणीचा, जास्त गुलाबी रंगाचा ‘धाकला रोहित’. या दोन्ही जातींचे मिळून एकूण १२-१५००० पक्षी दिसतात. आकाशातून खाली पाहिलं तर पाण्यात नक्कीच गुलाबाचं शेत फुलल्यासारखं दिसत असेल (ही माझी एक कवीकल्पना.) रोहित उडताना त्यांच्या पंखाला आग लागल्यासारखा रंग दिसतो. म्हणूनच त्यांना संस्कृतमधे ‘अग्निपंख’ असं सुंदर चपखल नाव आहे.
छोट्याशा तुताऱ्याही हजारोंच्या संख्येत दिसतात. त्यांचा मोठासा थवा अचानक उडतो तेव्हा जणू चांदीचे रुपये चमचम करत उधळल्यासारखं दिसतं. गॉडविट संख्येने थोडे असले तरी आकाराने मोठे, लांब चोचवाले असल्यामुळे ते नजरेत भरतात. उडताना आणि जमिनीवर उतरताना ते लढाऊ जेट विमानासारखे दिसतात.
या सर्व पाहुण्यांबरोबरच इथले स्थानिक पक्षीही बघायला मिळतात. छोटा हिरवा बगळा, ब्राह्मणी घार, शराटी (इबिस) आणि कैकर (ऑस्प्रे - खाडीपरिसरातली घार) कधीतरी दिसतात, तर दोन जातींचे खंड्या, राखी बगळा, भुरा बगळा, पिसाळ बगळा हे नेहमी दिसतात. आपल्या बिळातून बाहेर आलेले सारंगी खेकडे आपली एक लांब नांगी हलवताना किनाऱ्याजवळ दिसतात, त्यांची दुसरी नांगी छोटीशी असते. (आपण माणसं या जातीचे खेकडे खात नाही, असा माझा समज आहे, नाहीतर त्याच्या एखाद्या पाककृतीचा धागा मिपावर एव्हाना टाकला गेला असता.)
मात्र भविष्यात हे दृष्य बघायला मिळेल की नाही अशी परिस्थिती येणार आहे. बहुचर्चित ‘शिवडी-उरण’ सागरसेतू याच ठिकाणाहून उभारला जाणार आहे. त्यामुळे समुद्रपक्ष्यांचा हा संपन्न अधिवास नष्ट होण्याची शक्यता आहे. असं होणार नाही, अशी अशा करु या.
टीप : १) पक्ष्यांची छायाचित्रं मुद्दाम टाकली नाहीयेत.
२) हे पक्षी बघायला शिवडीला जायचं असेल, तर :
कधी जायचं ? (योग्य वेळ) : पूर्ण भरतीच्या वेळेच्या ४ तास आधी शिवडीला पोहोचावं. (मटा / इतर काही वर्तमानपत्रात पूर्ण भरतीची वेळ दररोज दिलेली असते.)
कुठे जायचं ? : शिवडी रेल्वे स्टेशनवर पूर्व बाजूला उतरून शिवडी जेटीकडे जाणारा रस्ता विचारायचा. चालत १०-१२ मिनिटात जाता येतं.
३) सोबत एखादं संदर्भपुस्तक (डॉ. सालीम अली / रिप्ले / मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेलं), चांगली दुर्बिण, कॅमेरा असल्यास सोन्याहून पिवळं.
प्रतिक्रिया
21 Jan 2012 - 2:33 pm | विसुनाना
रोचक लेख. पक्षीप्रेमींसाठी पर्वणी. (शिवडी- न्हावा शेवा समुद्र उड्डाणपूल आणि मुंबईचा नवा विमानतळ झाल्यावर या शिवडीच्या पक्षीतीर्थाला काही धोका पोचेल त्याबद्दल अधिक सांगावे.)
अवांतरः पण पक्ष्यांची चित्रे द्यायची हो. आम्ही कुठे कधी जाणार शिवडीला?
21 Jan 2012 - 7:28 pm | सुधांशुनूलकर
विसुनाना, अमोल, पैसा, स्वाती दिनेश
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
लेखामध्ये छायाचित्र टाकली नाहीत, कारण सध्या माझ्याकडे कॅमेरा नाही.
मुंबईत रहाण्यार्यांनी मला त्यांचे मोबाइल क्र. व्यनि केले, तर मी एखाद्या रविवारी जाणार असेन तेव्हा सर्वांना कळवीन.
शिवडी-उरण समुद्रसेतू तयार झाल्यावर हे पक्षी इथे येतील की नाही, ते आत्ताच सांगता येणार नाही. इथे रहदारी वाढेल, ध्वनी-वायूप्रदूषण वाढेल हे नक्की. अधिवास (habitat) नष्ट झाल्यावर पक्षी / प्राणी स्थलांतराची जागा बदलतात, असा अनुभव इतरत्र आलेला आहे. उदा., उरणला ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत अनेक जातीची बदकं, शेकाटे, दलदल ससाणा अशा विविध जातींचे पक्षी दिसत असत. आम्ही मुंबई-उरण-मुंबई या ३-४ तासाच्या फेरफटक्यात ४५ जातींचे पक्षी बघितले आहेत. पण तिथल्या पाणथळींवर इमारत-बांधकामाचा कचरा टाकल्यामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला, आता तिथे कोणत्याही जातींचे स्थलांतरित पक्षी दिसत नाहीत. हीच कथा आहे पनवेल, अलिबाग इथल्या नैसर्गिक तळ्यांची.
सुधांशु
21 Jan 2012 - 7:29 pm | विलासराव
लेख आवडला.
शिवडीला येउच.
मो.नं. तुमच्याकडे आहेच.
21 Jan 2012 - 6:08 pm | अमोल केळकर
मस्त लेख :)
अमोल केळकर
21 Jan 2012 - 6:47 pm | पैसा
पण +१ विसूनाना. बरीच नावं माहिती नाहीत. चित्रं पाहिली तर कळेल हा कोणता पक्षी म्हणून.
21 Jan 2012 - 7:27 pm | स्वाती दिनेश
माहिती आवडली,
स्वाती
21 Jan 2012 - 10:31 pm | कौशी
लेख आवडला
21 Jan 2012 - 10:59 pm | यकु
मस्त माहिती.
फोटोंची कमी जाणवली.
22 Jan 2012 - 4:55 pm | अत्रुप्त आत्मा
छान माहिती आहे...
22 Jan 2012 - 5:32 pm | जयंत कुलकर्णी
मी काढलेली काही छायाचित्रे ! श्री. नुलकर यांची हरकत नसेल असे गृहीत धरून टाकली आहेत.
आपण जाणार असाल तेव्हा मला जरूर कळवा. मी येण्याचा निश्चितच प्रयत्न करेन.
किंवा पुण्याहून कसे यायचे ते कळवलेत तरी चालेल.
रोहित
ब्राह्मणी बदक
इबीस
ग्रे हेरॉन
22 Jan 2012 - 5:55 pm | स्मिता.
लेख छान आहे... मस्त माहिती मिळाली. फोटोंची कमतरता जाणवत होती ती जयंत काकांनी भरून काढली.
23 Jan 2012 - 11:38 am | प्रभाकर पेठकर
फार सुंदर आणि माहितीपुर्ण लेख. पक्षीप्रेमी तसेच छायाचित्रण कलेत रस असलेल्यांना ही पर्वणीच आहे.
फेब्रूवारीत मुंबईत येतो आहे तेंव्हा नक्कीच भेट देईन. त्या सुमारास आपणास सोयिस्कर असेल तर बरोबर जाऊ.
श्री. जयंत कुलकर्णींची छायाचित्रे अत्यंत जीवंत आहेत. अभिनंदन.