न्यूयॉर्कच्या अतिप्रगत रस्त्यांवर
सिंगापूरच्या अदृष्य गल्ल्यांमध्ये
रोमच्या ऐतिहासिक चौकाचौकात
आणि मुंबईच्या प्रत्येक फुटपाथवर
निवांत लोळत पडून असते मी
तुमच्या दिशादर्शक नाकाखाली
गाडीच्या पारदर्शक काचेबाहेर
हवं तेच पाहणार्या डोळ्यांसमोर
आणि तुमच्या घरामागच्या बोळीत
सुखेनैव विहरत असते मी
उंची मखमली बैठकींवर बसून
सिंगल मॉल्टच्या घुटक्यांबरोबर
कबाबसोबत तोंडी लावायला
मला हटवायच्या गप्पा करतात
तेव्हा पांढर्या गणवेशात 'सर्व्ह' करते मी
अॅपलपासून बर्गरपर्यंत
आणि केकपासून पिझ्झ्यापर्यंत
ठासून भरलेल्या फ्रीजसमोर
आमचा बबडू काही खातच नाही म्हणतात
तिथेच अर्धपोटी भांडी घासते मी
कचरा काढायला, गाड्या धुवायला
मेहनत करायला न् ओझी वाहायला
माणसं असणं अत्यावश्यकच असतं
म्हणूनच घरात नको असले तरी
बाहेर सगळ्यांना हवीच असते मी.
प्रतिक्रिया
15 Jan 2012 - 7:31 pm | अगोचर
बरोबर जमली आहे !
15 Jan 2012 - 8:14 pm | पैसा
ती नसली तर सगळ्या राजकारण्यांची दुकानं कशी चालायची? "गरिबी हटाओ"च्या मोठ्यामोठ्या घोषणा देऊन लोकांना स्वप्नं कशी दाखवणार ते मग? आणि आमच्यासारख्याना कष्टाची कामं आयती कोण करून देणार?
16 Jan 2012 - 11:27 am | मिसळलेला काव्यप्रेमी
छान जमलीये.
16 Jan 2012 - 11:46 pm | गणेशा
अप्रतिम ..
एकदम मस्त झकास काव्य..
आवडेश
16 Jan 2012 - 11:48 pm | मेघवेडा
:(
सुंदर जमलीये कविता. अत्यंत सूचक.
17 Jan 2012 - 12:13 am | चतुरंग
जियो!
-रंगा
17 Jan 2012 - 10:25 am | sneharani
मस्त जमलीये!!
:)
17 Jan 2012 - 11:15 am | गवि
वाह.. .जियो ननि..