त्रिशंकू

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
13 Jan 2012 - 11:18 am

त्रिशंकू !

“जाऊ का नको, जाऊ का नको” असे मनाशी म्हणत मी अखेरीस डॉ. प्रणव यांच्या दवाखान्यात पोहोचलो. आता यांचे आडनाव काय आणि त्यांची कन्सल्टींग रूम कूठे आहे हे विचारू नका. कारण जास्त माहिती द्यायची नाही हे आम्हाला शिकवलेले असते. अर्थात यात विशेष काही नाही पण सवयीचा परिणाम. डॉ. प्रणव यांच्याकडे यायचे कारण म्हणजे आम्ही आता चांगले मित्र झालो होतो. आमची क्लबमधे झालेली पहिली भेट मला अजूनही चांगली आठवते. त्यानंतर आठवड्यातून एकदा तरी भेटल्याशिवाय आम्हाला चैन पडायची नाही. खरे तर आमच्या दोघांचेही व्यवसाय पूर्णपणे भिन्न. ते अहमदाबादमधील एक निष्णात मानसरोग तज्ञ तर मी इस्रोमधून नुकताच निवृत्त झालेला एक शास्त्रज्ञ. पण क्लबमधे कॉफीचा आनंद घेत असताना आम्ही भरपूर गप्पा मारतो. डॉ. प्रणव यांना सॅटेलाईट्मधे फारच रस बुवा. माझ्याशी गप्पा मारताना ते आता जवळजवळ अर्धे शास्त्रज्ञ झाले होते असे म्हणायला हरकत नाही. मुळचा फार बुद्धीमान गृहस्थ.
तर अशा माणसाच्या दवाखान्याची पायरी मला माझ्यासाठी चढावी लागेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते.
पण जेव्हा माझ्या स्वप्नांनी मला हिसका दाखवला तेव्हा मला डॉ. प्रणव यांच्याखेरीज कोणाचे नाव आठवणार ? माझी स्वप्ने त्यांनाच समजू शकणार होती कारण ती जरा विज्ञानविषयक होती.
मी त्यांच्या खोलीत प्रवेश केला आणि त्यांच्या चेहर्‍यावर त्यांचे नेहमीचे आश्वासक हसू उमटले.
“अरे व्वा, कोठारीसाहेब आज इकडे कोणीकडे ?”
“डॉ. मला सध्या विचित्र स्वप्ने पडताएत. नुसती स्वप्ने असती तर ठीक होते. पण.............”
“काळजी करू नका. रिलॅक्स ! आणि मला सगळे विनासंकोच, सविस्तर सांगा”.
“गेले काही रात्री मला दररोज एकच स्वप्नं पडतय”
“आहो त्यात काही विशेष नाही. नैसर्गिकच आहे ते” त्यांची अहोला आहो म्हणायची लकब मला नेहमीच मजेशीर वाटते.
“ऐका तर ! माझ्या स्वप्नात मी एक पृथीभोवती फिरणारा सॅटेलाईत असतो. सगळ्या लंबवर्तूळाकार कक्षेतून फिरताना मला पृथ्वीचे तेच तेच भाग परत परत दिसतात. डाव्याबाजूला डोळ्यात खुपणारा सूर्य तर उजव्या बाजूला एक अनामिक रंगाचे अवकाश, आणि त्यात चमकणारे तेजस्वी तारे. असे दृष्य़ कुठल्याही त्रिमीती सॅटेलाईट्ला दिसेल तसेच मलाही दिसते.”
“तुमचे आयुष्यच सॅटेलाईटवर काम करण्यात गेले आहे तर हेही स्वाभाविकच म्हणायला पाहिजे नाही का ?”
“डॉ. मलाही पहिल्यांदा असेच वाटले होते, आणि मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता नाही. परवा रात्री पडलेल्या स्वप्नात दररोज पडणार्‍या स्वप्नात एक बदल झाला. त्या सॅटेलाईटचा संदेशवहनाचा ट्रान्सपॉंडर बंद पडला”
“असे दोन भारतीय सॅटेलाईटच्या बाबतीत घडले होते ना ? तुम्हीच सांगितले होते मला एकदा.”
“हो ! बरोबर ! पण या स्वप्नानंतर मला माझ्य़ा वास्तव जीवनात परस्परसंबंधात अडचणी येऊ लागल्यात, त्याचे काय ? परवाच माझा एक मित्र मला म्हणाला देखील ’काय रे आजकाल तू पुर्वीसारखा मोकळेपणाने बोलत नाहीस ?’ मला तर वाटते की माझी स्वप्ने मला कशापासूनतरी सावध करताएत. कशापासून हे मला शोधून काढायचे आहे !”
“हंऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ! डॉक्टरांनी एक मोठा सुस्कारा सोडला.
“कोठारीसाहेब या वयात बर्‍याच जणांना घरातील माणसांशी,शेजार्‍यांशी संवाद साधण्यास अडचण येते खरी. कदाचित ते कौशल्य तुमच्याकडे पहिल्यापासूनही नसेल, कामाच्या व्यापात तुमच्या व घरच्यांच्या किंवा शेजार्‍यांच्या लक्षात ते आले नसेल, अशीही शक्यता आहे. आणि एक लक्षात घ्या, तुमच्याशी ते आणि तुम्ही त्यांच्याशी बोलणार तरी कुठल्या विषयावर ? सॅटेलाईट आणि त्यात वापरल्या जाणार्‍या अतिउच्च तंत्रज्ञानावर ? त्यांना काय समजणार या विचाराने तुम्ही त्यांच्याशी बोलला नसणार आणि त्यांनाही ते खरेच कळत नसणार मग संवाद होणार कसा ? त्यांना फक्त एकच माहीत असणार की हा माणूस काहीतरी भारी काम करतो” असे म्हणून ते हसले.
“मला वाटते आता निवृत्तीनंतर तुम्हाला वेळ आहे आणि तो राहिलेला संवाद साधायचा आहे. पण ज्यांच्याशी तो साधायचा आहे, ते एकदम कसे बदलणार ? त्यांना थोडा वेळ द्या. तो पर्यंत तुम्ही तुमच्या स्वप्नांची मजा घ्या. हे सगळे स्वाभाविक आहे.” डॉक्टर समजुतीने म्हणाले.

माझा उदास चेहरा आणि पडलेला आवाज बघून बहुतेक त्यांना माझी दया आली असावी.

“ठीक आहे, काळजी करू नका. मी तुम्हाला काही औषधे लिहून देतो. पण अगोदरच सांगतो की ही औषधे म्हणजे साधी टॉनिक्स आहेत. तुमच्या समाधानासाठी दिलेली आहेत. मला खात्री आहे थोड्याच दिवसात तुम्हाला बरे वाटायला लागेल. आणि त्या स्वप्नांवर जास्त विचार करू नका. तो सॅटेलाईट काही इतक्या लवकर पडत नाही...... “ असे म्हणून डॉक्टर हसायला लागले.
“एका महिन्यानंतर परत भेटा. अर्थात क्लबमधे भेटूच पण तेथे हा विषय नको” डॉक्टरांनी मला जवळ जवळ जायलाच सांगितले म्हणाना ! मी ही त्यांचे आभार मानून बाहेर पडलो.

त्या नंतर पुण्याला गेलो. म्हटले जागा बदलून काही होतंय का ते बघूया. पण नाही. महिन्यानंतर मी जेव्हा परत डॉ.प्रणव यांच्या केबीनमधे प्रवेश केला तेव्हा मला पाहून त्यांनी एखादे भूत पाहिल्यासारखा चेहरा केला. खुर्चीतून ताडकन उठून ते म्हणाले
“ अरे ! काय अवस्था करून घेतली आहे तुम्ही स्वत:ची ? तुम्ही कित्येक दिवसात दाढीही केलेली दिसत नाही आणि हे असली कपडे ? तब्येत खालावलेली दिसतेय तुमची. माफ करा, पण अगोदर बसा तरी.”
त्यांनी माझ्या हातात पाण्याचा ग्लास दिला आणि ते माझ्या बोलण्याची वाट पाहू लागले.
“मला वाटते माझा खेळ संपत आला आहे. !”
“अरेच्चा ! शांत व्हा आणि सांगा बरं जरा मला काय झाले ते ?”
मी एक खोल श्वास घेतला आणि माझी कर्मकहाणी सांगायला सुरवात केली.
“मी तुम्ही दिलेली औषधे घेतली पण ती स्वप्ने काही थांबली नाहीत. मग बायकोच्या सांगण्यावरून काही देवधर्मही करून बघितला. पण दिवसेंदिवस ती स्वप्ने वाईटच होत चालली आहेत. त्या कम्युनिकेशन ट्रान्स्पाँडरचे सांगितले ना मी तुम्हाला मागे ? आता वीज निर्माण करणार्‍या त्याच्या दोन सोलर पॅनेलपैकी एक बंद पडले आहे. यामुळे आम्ही सगळ्यात घाबरतो अशा घटनांची साखळीच चालू झाली आहे आता. जोपर्यंत हा उरलेला पॅनेल काम करतोय तो पर्यंत तशी काळजी नाही म्हणा. आम्ही त्याचा अगोदरच विचार केलेला असतो. पण सूर्य ग्रहणाच्या वेळी मात्र वीजपुरवठा बॅटरीवर गेला आणि मला धक्काच बसला. एकच पॅनेल काम करत असल्यामुळे बॅटरी चार्जच झाली नव्हती. आता एक एक करत सगळ्या यंत्रणा बंद पडायला लागल्या आहेत. काही दिवसापूर्वी तापमान यंत्रणा बंद पडली आणि इकडे मला एकदम थंडी तर दुसर्‍या क्षणी उकडायला लागले. थंडी वाजते म्हणून मी पांघरूण ओढले तर मला घामाच्या धारा लागल्या होत्या आणि मी दचकून जागा झालो. त्यानंतर मेमरी बॅंक बंद पडली आणि इकडे मला विस्मरणाचा त्रास चालू झाला आहे. तुमच्याकडे यायला निघालो आणि मला तुमचे नावच आठवेना. शेवटी प्रिस्क्रिप्शन शोधले तेव्हा ते कळाले. तिकडे सॅटेलाईटची कक्षा ठरवणारी यंत्रणा बंद पडली आणि डॉक्टर खरंच सांगतो गेले काही दिवस मी माझाच माझ्यावर ताबा नसल्याप्रमाणे उगचच भरकटतोय. मला आता माझ्या हातापायातील शक्ती गेल्यासारखे वाटते आहे. माझे वजन तर तुम्ही बघितलेच !” एवढे बोलून मी धापा टाकायला लागलो.
“अशा सॅटेलाईटचा काय उपयोग ? तो तसाच त्रिशंकू सारखा अवकाशात लटकून रहातो. अशा सॅटेलाईटचे काय करतात हे मला चांगले माहीत आहे डॉक्टर !. त्याचा अकाली मॄत्यू करतात........ जे वाचलेले इंधन आहे त्याने त्याची मोटर चालू करतात आणि त्याला सगळ्यात शेवटच्या कक्षेत ढकलतात. एकदा का तो या परवलयीन कक्षेत गेला की खेळ खलास तो परत येत नाही. आम्ही त्याला गमतीने भडाग्नीची कक्षा म्हणतो.
“आणि जर त्यात पुरेसे इंधन नसेल तर ?” डॉक्टरांनी विचारले.
“तर काय, मग तो भरकटतो आणि शेवटी पृथ्वीच्या कक्षेत ओढला जाऊन जळून नष्ट होतो. डॉक्टर मी आता भरकटतो आहे. पूढे काय होणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. मला माझी स्वप्ने हेच सांगत आहेत. मी मूर्ख, मला समजलेच नाही” पुढच्या कल्पनेनेच माझ्या घशाला कोरड पडली. ग्लासातले उरलेले पाणी मी घटाघटा पिऊन टाकले आणि डोळे मिटले. माझ्या कपाळावर जमा झालेले घामाच्या थेंबांचा स्पर्श मला आता जाणवू लागला होता आणि पाठीवरून वाहणारे घामाचे ओघळही.

समोरून काही प्रतिक्रिया आली नाही तेव्हा मी डोळे उघडले. डॉक्टर माझ्याकडेच रोखून बघत होते. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला.
“हे बघा कोठारीसाहेब, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले की हा तुमच्या मनाचा खेळ आहे. त्या स्वप्नांचा आणि तुमच्या वास्तव जीवनाचा काहीही संबंध नाही. आम्ही त्याला भास म्हणतो. इंग्रजीमधे हॅल्युसिनेशन्स. निवृत्तीने तुम्हाला जरा हळवे केले आहे. सगळ्यांना आयुष्यात यातून जावेच लागते. तुम्हाला आता जगाला आपली गरज नाही असे वाटते आहे, तेही स्वाभाविक आहे. तुमच्या ज्ञानाचा आता इस्रोला काही उपयोग नाही, आत्तापर्यंत जे काही मिळवले ते सगळे व्यर्थ आहे असे तुम्हाला वाटत असणार. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला पडणारी स्वप्ने ही या विचारांच्या प्रक्रियांची परिणीती आहे. थोडक्यात तुम्ही सध्या डिप्रेशनमधे आहात. पण त्यात काळजी करण्यासारखे काही नाही. मी काही यावरच्या गोळ्या लिहून देतो. १० दिवस त्या घ्या आणि निवांत रहा ! तुमच्या अवकाशासंबंधी कसलाही विचार करू नका. विसरून जा की तुम्ही एक वैज्ञानिक आहात ”

डॉ. प्रणवांचा जर माझ्या स्वप्नांवर विश्वास बसत नसेल तर अजून कोणाकडे जायचा प्रश्नच नव्हता. बायकोला तर हे सगळे सांगण्यात काही अर्थच नाही. मी गुपचूप त्यांनी दिलेल्या गोळ्या विकत घेतल्या आणि घरी आलो.

त्या गोळ्यांनी मात्र कमाल केली.
बघा ना ! मागच्याच आठवडयात माझा मुलाने मला हाक मारली “ बाबा लवकर या ! टीव्हीवर जी एस एल व्ही चे प्रक्षेपण दाखवताएत. या लवकर तुम्हाला बघायचे असेल तर !’
“नको रे बाबा ! त्यांना त्यांचे काम करू देत. हुशार मंडळी आहेत ती.

मी आता ’चलती का नाम गाडी बघतोय’ !”

मूळ लेखक : श्री दिलीप सुभेदार
भाषांतर : जयंत कुलकर्णी.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

मन१'s picture

13 Jan 2012 - 11:31 am | मन१

शेवट काही समजला नाही ब्वा.

जयंत कुलकर्णी's picture

13 Jan 2012 - 11:36 am | जयंत कुलकर्णी

शेवट :
आयुष्यभर ज्याच्यात काम केले ते डोक्यावरून उतरवले की त्याचा निवृत्तीनंतरचा मानसिक प्रॉब्लेम सुटला असे सुचवायचे असेल कदाचित.

sagarpdy's picture

13 Jan 2012 - 11:41 am | sagarpdy

+१

गणेशा's picture

13 Jan 2012 - 11:40 am | गणेशा

आवडेश ..

कथा आवडली.
शेवटपर्यंत उत्सुकता ताणली होती.
सतत करवादत असणार्‍या वृद्धांकडे पाहून कसेसे वाटते.
ऑफिसच्या रस्त्यावर एक बाबा बसतात. ते नेहमी विचारतात - ''किती वाजले?''
कितीही वाजलेले सांगितले तरी त्यांना काही घेणेदेणे नसते.
तेवढंच कुणी जवळ येऊन बोलतंय का एवढं त्यांना हवं असतं.

जयनीत's picture

13 Jan 2012 - 12:00 pm | जयनीत

आवडली , शेवट तर फारच सुंदर ....

मोदक's picture

13 Jan 2012 - 1:25 pm | मोदक

शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी सुंदर कथा..

मोदक.

कथा छान आहे. निवृत्तीनंतर सुद्धा कामाचे भूत डोक्यावरुन उतरवणे जड जाते हेच खरे.

- (जयंतकाकांचा पंखा) पिंगू

नितिन थत्ते's picture

14 Jan 2012 - 1:28 pm | नितिन थत्ते

छान कथा.

आपल्यामुळेच इस्रो चालत आहे/होती. आपल्यानंतर काहीच नीट चालणार नाही अश्या काहीशा समजुतीत असल्यामुळे हे प्रॉब्लेम होत असावे. ती समजूत डोक्यावरून उतरवल्यावर सगळे ठीक झाले.

पैसा's picture

14 Jan 2012 - 4:20 pm | पैसा

भाषांतर चांगलं जमलंय. स्त्रिया नोकरीतून रिटायर झाल्या तर त्याना घरात बरीच कामं गुंतवून ठेवणारी असतात. पण पुरुष लोकाना असेच प्रॉब्लेम्स येतात कारण आयुष्यभर नोकरी सोडून काही केलेलं नसतं आणि अचानक आलेलं रिकामपण अंगावर येतं. बायकोमुलं आपाआपल्या कामात बिझी असतात आणि हे नवनिवृत्त असे काहीतरी काल्पनिक भुतं तयार करतात, नाहीतर वेळ कसा जाणार?

जयंत कुलकर्णी's picture

16 Jan 2012 - 9:31 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना मनापासून धन्यवाद !

सुनील's picture

16 Jan 2012 - 9:42 am | सुनील

शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा आवडली.

मी-सौरभ's picture

25 Jan 2012 - 1:22 pm | मी-सौरभ

सुंदर अनुवाद

आधी कशी काय मिस झाली कळत नाही :(