प्रथमच मी बेळगावात गेलो. एका खानावळीत (फारशी वळवळ नव्हती.तशी ती रिकामीच होती) गेलो.
बाके नव्हती. कसाबसा खाली बसलो. ओथंबलेला (चारी बाजूने) आचारी एकदम म्हणाला, "मांडेऽऽ".
मला कळेचना. नेमकी काय चूक झाली.
पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ".
"असं होय..", म्हणून मी मांडी घालून बसलो.
तो पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ ए ऽऽऽऽ".
मला वाटले बेळगावात सेल्फ सर्विस असावी. म्हणून मी स्वतःच उठून ताट-वाटी वगैरे घेतले.
तो पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ ए ऽऽऽऽ". यावेळी इतक्या जोरात म्हणाला की,
मी घाबरून काहीतरी अर्थ लावून ताट वगैरे सर्व मांडीवर ठेवले. (अर्थातच स्वतःच्या)
त्याचे आपले चालूच होते.
खूप वेळाने मला समजले की,
'मांडे' हा एक खाण्याचा पदार्थ आहे आणि ज्याला मी डोसा समजत होतो त्यालाच मांडे म्हणतात.
मी स्वतःशीच हसलो आणि मनाशी म्हणालो
'सीमा प्रश्न का सुटत नसेल ते आत्ता कळाले.'
प्रतिक्रिया
9 Jun 2008 - 1:07 pm | यशोधरा
ते मांडे चविष्ट असतात की हो अगदी, म्हणते मी!! आवडले की नाही तुम्हांला??
9 Jun 2008 - 1:08 pm | लडदू
>> सीमा प्रश्न का सुटत नसेल ते आत्ता कळाले
तुम्हाला एका खाद्यपदार्थाचे नाव माहीत नाही हे सीमा प्रश्न न सुटण्याचे कारण ?!
असो.
================================
खरंतर लिहायचा कंटाळा आलाय तरी पण लिहिले. लडदू आहे ना मी!
9 Jun 2008 - 1:43 pm | अभिरत भिरभि-या
म्हणजे मुक्ताईने ज्ञानदेवांच्या पाठीवर डोसे भाजले होते ??
9 Jun 2008 - 5:00 pm | मधु मलुष्टे
मांडे म्हणजे डोसे नाही, कोणत्याही अर्थाने..
मांडे हा खास (?) बेळगावचा पदार्थ चवीने गोड आणी दिसायला रुमाली रोटीसारखे, ते पालथ्या घड्यावर भाजतात,दुधाबरोबर खातात. बाकी पाकक्रीया इतर मंड्ळी देतीलच...
(माझ्या माहीती प्रमाणे) मुक्ताईने ज्ञानदेवांच्या पाठीवर भाजले होते ते हेच..
कोण तो बेळगावचा आहे ..माहीती द्या हो जरा..
नक्की करायचे असेल तर विसोबा खेचर आहेतच (ह्.घ्या.)
(१२,)१३
10 Jun 2008 - 2:15 am | ईश्वरी
माझ्या माहितीतली पाकक्रिया इथे देते. (बेळ्गावी मांडे असेच असतात का ह्याचा जाणकारांनी उलगडा करावा.)
मळण्यासाठी साहित्यः ३ कप मैदा, पाऊण कप दूध, २ चमचे तूप
सारणाचे साहित्यः २ कप पिठीसाखर , अर्धा ते पाऊण कप पोह्याची पूड , १/२ कप भाजलेले तीळ , १२-१४ वेलची ...पूड केलेली
तळ्ण्यासाठी : तूप (तेल ही चालेल.)
कृती : मैदा, दूध, तूप एकत्र करा आणि घट्ट मळून घ्या. सारणाचे साहित्य एकत्र मिसळून घ्या.
मैद्याच्या पात़ळ पुर्या लाटून घ्या. (साधारण १२ सेमी व्यासाच्या.. पुर्या खूप मोठ्या लाटल्यास तळ्ण्यासाठी मोठी कढई घ्यावी लागेल आणि मग तेल / तूप हि जास्त घालावे लागेल. पुर्या पातळ च लाटाव्यात.)
तूप गरम झाल्यावर पुर्या तळून घ्या. पुर्या फार कुरकुरीत आणि लाल तपकीरी नकोत. मऊ आणि पांढर्याच राहिल्या पाहिजेत. त्यांमुळे जास्त वेळ तळू नये. कढईतून पटकन बाहेर काढून गरम असतानाच पीठीसाखरेचे सारण २ चमचे त्यावर पसरवा. सारण अर्ध्या भागावरच पसरावे. मग पुरीची अर्धी घडी घालावी. आता परत अर्ध्या भागावर १/२ ते १ चमचा सारण पसरावे आणि परत अर्धी घडी घालावी. असे त्रिकोणी आकारातील मांडे थाळीत एकावर एक न ठेवता वेगवेगळे मांडून ठेवावेत. खायला खूप चविष्ट लागतात.
टीपः सारण गरम गरम पुरीवरच पसरावे. म्हणजे पीठीसाखर व्यवस्थित पुर्याना चिकटते.
पोह्याची पूड करण्यासाठी पोहे थोडेसे भा़जून घेऊन गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडीभरडी पूड करा.
मांडे गार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवल्यास ७-८ दिवस छान रहातात.
ईश्वरी