मंतरलेली शीळ कुठुनशी
चित्तसदन मन होते मंथर
अंदोलत उलगडते प्रतिमा
झुळुक मिटविते पुरते अंतर
कोष रेशमी लय कांचनमय
रात्र झुलविते रास निशाचर
गोत्र मिरविते मोरपिसांचे
अमानवी संस्कार शिरावर
मिटल्या डोळ्यां-आंत सरोवर
झुरते काजळ उभय तिरांवर
जाग मत्सरी येते अवचित
अर्धसत्य मग होते गोचर
..............अज्ञात
प्रतिक्रिया
6 Jan 2012 - 4:22 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
__/\__
6 Jan 2012 - 4:28 pm | स्पा
छान
6 Jan 2012 - 4:54 pm | निश
मस्त कविता
6 Jan 2012 - 9:59 pm | इन्दुसुता
जाग मत्सरी येते अवचित
अर्धसत्य मग होते गोचर
हे कळाले नाही :( त्यामुळे कवितेचा आशय साधारणपणे समजला तरी पूर्ण कविता अॅप्रिशियेट करता आली नाही...
कविनी येथे समजावून सांगावे अशी विनंती करते.
7 Jan 2012 - 1:06 am | अज्ञातकुल
आपल्या विनंतीवरून रसग्रहणाचा एक अल्पमती प्रयत्न...................
शान्त एकांत. तो स्वतःत मग्न. श्वासांवर लक्ष. सभोवताल नीरव; जगृतीच्या प्रतीक्षेत. अर्धस्फुट पहाट. उजाडू पहातंय.
दूर कुठून कुण्या पक्षाची; नाजुक-हलकी-मायावी शीळ ऐकू येते आणि "एकाग्रतेचं माहेरघर मन" विचलित होतं. हळव्या अंदोलनांमधून अंतर्मनातील सुप्त प्रतिमा उलगडू लागते. दरवळणारी मंद झुळुक; "काल आणि आज" मधलं अंतर मिटवून त्याला गतकाळात घेऊन जाते.
सुवर्णमयी तंतूंनी विणलेली तलम रेशमी क्षणांची लय आणि रात्र झुलविणारी निशाचर रास आठवून; मोरपिसाचं ईश्वरी (अमानवी) गोत्र (कृष्णलीला) शिरावर मिरवू लागतं.
अशा भारावलेल्या अवस्थेत, मिटल्या डोळ्यांत ओथंबलेलं सरोवर; काठांचं काजळ झिजवू लागतं. इतक्यात नियतीचा मत्सर त्याला ह्या अमृतसमाधीतून जागा करतो आणि चरितार्थासाठी जगणारं वास्तव, "दुसरं अर्धसत्य", कर्यान्वित (गोचर) होतं.
........................अज्ञात
7 Jan 2012 - 8:33 am | अत्रुप्त आत्मा
@रसग्रहणाचा एक अल्पमती प्रयत्न...>>> व्वाहवा कुल...! रसग्रहणालाही सलाम आपला... :-)
7 Jan 2012 - 12:57 am | अत्रुप्त आत्मा
जाग मत्सरी येते अवचित
अर्धसत्य मग होते गोचर ......... व्वा व्वा..! इस की तो कुछ बात ही और है..! मंत्रमुग्ध की कायसं म्हणतात ना,ते व्हायला झालं....! :-)
7 Jan 2012 - 8:15 pm | अभिजीत राजवाडे
लयदार काव्य, अचुक शब्द रचना. वाचतानाच तालमय अनुभव येतो.
कविता सादर केल्याबद्दल आभार.