पर्जन्याष्टक
१.
खूप पाऊस आला आणि गारा पडायला लागल्या
तसा मी खिडकी बंद करायला धावलो...
तू दार उघडून थेट अंगणात गारा वेचायला!
दोन चार हळव्या गारा माझ्यासाठी ओंजळीत घेऊन तू आलीस.
पावसात भिजलेली तू
तुझी आर्जवी ओंजळ
ओंजळीत विरघळणार्या गारा...
मी पहातच राहिलो-
पावसात भिजल्यावर कविता कशी दिसते ते!
२.
मी एकदाच तुला विचारलं_
“पावसाचं आणि तुझं नातं काय?”
तू माझ्या मिठीत शिरत म्हणालीस,
“बघ ना माझ्या डोळ्यात!”
तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस
आणि श्वासात मृदगंध...
३.
बाहेर खूप पाऊस कोसळत होता रात्री
आणि मी आपला तुला पावसाच्या कविता वाचून दाखवत होतो.
अचानक दिवे गेले, अंधार झाला.
एक वीज लखलखत मोठ्यानं कडाडली
तू उगीच घाबरल्यासारखं दाखवत माझ्या मिठीत शिरलीस.
दिवे आल्यावर मी आपला ती अर्धी राहिलेली कविता पुढं वाचू लागलो
तेव्हा तू म्हणालीस_
“ही कविता पूर्ण झालीय...आता पुढची वाच!”
४.
पाऊस आला की मी खिडकी लावायला धावायचो
आणि तू मला नेहमी हसायचीस.
एकदा म्हणालीस,
`कसला रे कवी तू?
काचेआडून पाऊस बघतोस आणि पावसाच्या कविता लिहितोस.
एकदा तरी पावसात मनमुराद, चिंब भिजून कविता लिही ना!’
तसा मी तुझ्या कुशीत शिरलो...
...
...
मग तूच म्हणालीस_
`आता लिही ना एक पावसाची कविता'
५.
बाहेर पाऊस आणि मी आत पावसाची गझल लिहित बसलेला.
माझा भलताच विचारमग्न चेहरा पाहून तू विचारलंस, 'काय प्रॉब्लेम?'
मी मात्रा मोजत म्हणालो,
`या शेवटच्या ओळीत तीन मात्रा कमी पडताहेत गं!'
तशी तू धो धो हसलीस आणि म्हणालीस_
`वेडाच आहेस..'
वेधशाळेतली लोकं पाऊस मोजतात.
कवींनी कशाला मोजायचा पाऊस
त्यात भिजायचं सोडून?'
त्यानंतर मी कधीच पावसावर गझल लिहिली नाही.
६.
अंगणात मोर यावेत असं तुला नेहमीच वाटायचं.
मोर येत नाहीत म्हणून तू नेहमीच उदास असायचीस.
एकदा मात्र पावसाळ्यात तू हातातलं मोरपीस मिरवत मला म्हणालीस_
`बघ हे अंगणात सापडलं!
नक्कीच मोर आले होते.
तुझ्या कवितेच्या वहीत एक मोरपीस आहे ना, तिथंच हे दुसरं ठेवूया!'
तुझा विलक्षण आनंद मी डोळे भरुन पहात होतो...
तू मात्र वहीत ते मोरपीस शोधत होतीस
कधीच न सापडणारं...
७.
एकदा मी अवेळीच लिहिलेली पावसाची कविता
तुला खूप उत्साहाने वाचून दाखवली.
कविता संपवून मी तुझाकडं पाहिलं
तर तू छत्री उघडून बसलेली, माझ्याकडे खट्याळपणानं पहात.
तेव्हा मला समजलं...
पाऊस नसतानाही कविता कशा वाहून जातात ते.
८.
'कविता खूप लोकांपर्यंत पोचण्यासाठी काय करावं?'
मी तुला गंभीरपणानं विचारलं.
तू ही तितक्याच गंभीरपणानं म्हणालीस...
'सोप्पं आहे!
कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात
आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!'
-अविनाश ओगले
प्रतिक्रिया
8 Jun 2008 - 1:30 pm | विवेक काजरेकर
पूर्ण अष्टक आवडलं. एकदम रोमॅंटिक आहे
8 Jun 2008 - 2:56 pm | शेखस्पिअर
'आठवे' तर ...कळसाला नेऊन पोहोचवते...
कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात
आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!'
आता खरा, पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटलं...
8 Jun 2008 - 4:28 pm | नारदाचार्य
माफ करा... मी समीक्षक नाही. पण राहवत नाही म्हणून सांगतो...
या कवितांमधून तुमचा खरा परिचय झाला. पहिली रचना वाचता-वाचताच मी मनाने एका सभागृहात पोचलो. तुम्ही या कविता सादर करताहात असं मनानं घेतलं आणि पुढच्या रचना वाचल्या गेल्या. मनातूनच. आधी वाचल्या होत्या तुमच्या त्या चारोळ्या. एन्जॉय केल्या होत्या, पण तुमची खरी ताकद इथं दिसून आली. एक ऋतू झालाय. पुढं काही असंच एक सूत्र घेऊन होऊ शकेल.
अवांतर : 'गारवा'ची आठवण झालीच...
9 Jun 2008 - 12:26 am | बेसनलाडू
मस्तच पर्जन्याष्टक!!! खूप मजा आली.
(आस्वादक)बेसनलाडू
9 Jun 2008 - 12:38 am | इनोबा म्हणे
पर्जन्याष्टक आवडले!
कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात
आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!'
हे खासच...
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
9 Jun 2008 - 12:47 am | मुक्तसुनीत
फारच सुरेख ! कवितेतून भेटणारी "ती" खुद्द कविताच असते हे तुमच्या कविता वाचताना जाणवत होते :-)
क्या बात है ! कविता जगणे म्हणजे काय याची एक झलक मिळाली ! नारदाचार्यांनी जे म्हण्टले त्याशी १००% सहमत. ही आतापर्यंत वाचलेली तुमची सर्वोत्कृष्ट कृती ! आणि यंदाच्या पावसावरच्या कवितांमधली सगळ्यात सुंदर !
तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस
आणि श्वासात मृदगंध...
कवी चिरतरुण असतात याचे प्रत्यंतर देणारी कविता. आज तुमच्यामुळे मान्सून आम्हाला भेटला. तुम्हाला सलाम !
9 Jun 2008 - 1:01 am | मनिष
कविता फार आवडल्या...
9 Jun 2008 - 12:53 am | पिवळा डांबिस
लगे रहो.
विशेषतः,
तुझा विलक्षण आनंद मी डोळे भरुन पहात होतो...
तू मात्र वहीत ते मोरपीस शोधत होतीस
कधीच न सापडणारं...
डोकेबाज आहांत! :)
कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात
आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!'
क्या बात है!! वा!!
9 Jun 2008 - 1:26 am | लिखाळ
सर्वच मस्त कवीता...
२, मोरपिस आणि ८ फारच सुंदर..
-- लिखाळ.
9 Jun 2008 - 1:54 am | चतुरंग
ओगलेसाहेब, आपल्यातला नितांत तरल कवी अनुभवायला मिळाला!
तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस
आणि श्वासात मृदगंध...
तुझा विलक्षण आनंद मी डोळे भरुन पहात होतो...
तू मात्र वहीत ते मोरपीस शोधत होतीस
कधीच न सापडणारं...
हे सुंदरच!
चतुरंग
9 Jun 2008 - 7:41 am | विसोबा खेचर
ओगलेसाहेब, आपल्यातला नितांत तरल कवी अनुभवायला मिळाला!
हेच म्हणतो!
खूपच सुंदर, वाचून समाधान वाटले!
ओगले साहेब, जियो...! :)
तात्या.
10 Jun 2008 - 9:22 am | चित्रा
खूपच सुंदर, वाचून समाधान वाटले!
छान कविता. खूप आवडली.
10 Jun 2008 - 11:17 am | भाग्यश्री
अगदी सहमत!! फार मस्त अन रोमँटीक आहे!!
http://bhagyashreee.blogspot.com/
10 Jun 2008 - 11:17 am | भाग्यश्री
अगदी सहमत!! फार मस्त अन रोमँटीक आहे!!
http://bhagyashreee.blogspot.com/
9 Jun 2008 - 12:17 pm | अजय जोशी
व्वा! व्वा!! पण ....
पाण्यात तुम्ही सोडलीत नाव
लिहून त्यावर तिचेच नाव
काही बघतील तिला ... काही नावेला ...
काही आणतील उगाच .. न येणा-या शिंकेला
काही भिजतील पावसात गात तुमचे गाणे
रहा सदैव तुम्ही खणखणीत नाणे
सर्वच आवडले.
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी
9 Jun 2008 - 4:47 pm | यतेश
कविता अतिसुंदर आहे. मनापासून आवडली.
अशाच सूंदर कविता करणे.
तुला शुभेच्छा.
आपला यतेश
9 Jun 2008 - 4:54 pm | मदनबाण
फारच छान लिहल आहेत तुम्ही.....
मी एकदाच तुला विचारलं_
पावसाचं आणि तुझं नातं काय?
तू माझ्या मिठीत शिरत म्हणालीस,
“बघ ना माझ्या डोळ्यात!”
तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस
आणि श्वासात मृदगंध...
व्वा क्या बात है.....
(मृदगंधाने धुंद झालेला)
मदनबाण.....
9 Jun 2008 - 4:55 pm | शरुबाबा
कविता फार आवडल्या...
9 Jun 2008 - 5:02 pm | विजुभाऊ
तुमचे हे गद्य लिखाण चांगले आहे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
9 Jun 2008 - 6:28 pm | शितल
मी एकदाच तुला विचारलं_
पावसाचं आणि तुझं नातं काय?
तू माझ्या मिठीत शिरत म्हणालीस,
“बघ ना माझ्या डोळ्यात!”
तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस
आणि श्वासात मृदगंध...
मस्त रचना झाली आहे.
9 Jun 2008 - 7:43 pm | अविनाश ओगले
मनापासून दिलेल्या या अभिप्रायांबद्दल मनापासून आभारी...
10 Jun 2008 - 3:23 am | नंदन
अष्टकातल्या सार्याच कविता सुरेख. शेवटची कविता विशेष आवडली.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
10 Jun 2008 - 7:21 am | धोंडोपंत
वा वा वा वा पंत,
अतिशय सुंदर पर्जन्याष्टक. अप्रतिम. क्या बात है.
आपला,
(ओलाचिंब) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
10 Jun 2008 - 8:19 am | यशोधरा
एकदम सुरेख.... सगळं अष्टक सुरेख!
10 Jun 2008 - 8:26 am | धनंजय
वाहावा!
10 Jun 2008 - 3:39 am | रामराजे
क्या बात है!
10 Jun 2008 - 5:32 pm | प्रभाकर पेठकर
पर्जन्याष्टकात 'मंगलाष्टकांची' चाहूल आहे. हार्दीक शुभेच्छा....!
11 Jun 2008 - 5:07 pm | जयवी
अविनाश जी..... जियो !! बहोत खूब :)
तुम्ही पावसात अगदी चिंब भिजवलं .....!!
11 Jun 2008 - 9:05 pm | स्वाती दिनेश
जयश्री म्हणते तसे तुम्ही पावसात चिंब भिजवलेत.
कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात
आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!
:) आवडले.
स्वाती
11 Jun 2008 - 9:47 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम कविता...
कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात
आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!'
व्वा!!! कोणाला आवडल्या तरी ठीक, नाही आवडल्या तरी ठीक, तुमचा कविता जन्माला घालायचा आनंद तुमचाच, केवळ तुमचाच.
बिपिन.
11 Jun 2008 - 9:49 pm | तळीराम
आम्ही आपले तुम्हाला विडंबने वगैरेच करणारे समजत होतो. आणि तुम्हाला जरा लाईटलीच घेत होतो. तुम्ही तर भलतेच तरल कवी निघालात. छान. तुमच्यातले हे कॉकटेल लै भारी. आणि दुर्मिळपण. मजा आली.
11 Jun 2008 - 10:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा !!! ओगले साहेब, काय सुंदर पर्जन्याष्टक आहे !!!
'कविता खूप लोकांपर्यंत पोचण्यासाठी काय करावं?'
मी तुला गंभीरपणानं विचारलं.
तू ही तितक्याच गंभीरपणानं म्हणालीस...
'सोप्पं आहे!
कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात
आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!'
किती सुंदर !!!