थेंब टपोरे टपोरे
खाली आसुसली माती
मातीच्या गं अंगावर
लक्ष रोमांच फुलती
थेंब टपोरे टपोरे
पानापानात वाजती
फुलांच्या गं पाकळ्यात
मोती टपोरे झुलती
थेंब टपोरे टपोरे
गंध देहात, मनात
श्वास पुरता पुरेना
किती साठवू उरांत
थेंब टपोरे टपोरे
माझी तहान भागेना
तुझ्या स्मृती जागतात
डोळा डोळ्यास लागेना
-अविनाश ओगले
प्रतिक्रिया
8 Jun 2008 - 1:35 pm | विवेक काजरेकर
पहिल्या दोन कडव्यातला "गं" हा शब्द जरा भरीचा वाटतोय. तो टाळता आला असता तर बरं झालं असतं. बाकी सुंदर
8 Jun 2008 - 4:26 pm | नारदाचार्य
रचना हीही...
विवेक यांच्याशी असहमत. गं नसेल तर वाचताना पंचाईत होतेय.
8 Jun 2008 - 5:02 pm | विवेक काजरेकर
माझ्या मताशी सहमत न होण्याचं कारण माझ्या त्रोटक प्रतिसादातून निर्माण झालेल्या गैरसमजामुळे असेल त्याबद्दल प्रथम क्षमा मागतो.
मी जेंव्हा "गं" हा शब्द भरीचा वाटतोय असं मत दिलं त्या वेळी तो काढून टाकून ही कविता जशीच्या तशी वाचून पहावी असं मला सुचवायचं नव्हतं. (कारण तसं केलं तर ८ अक्षरातलं एक अक्षर कमी होऊन लयीत वाचायला बाधा येणारंच). तिथे पर्यायी शब्दयोजना पाहिजे असं मला म्हणायचं होतं
"भरीचा" हा शब्द मी जो शब्द अनावश्यक आहे, ज्याने अर्थात काही भर पडत नाही, किंवा जो कधीकधी केवळ मीटर सांभाळण्यासाठी घातला जातो अशा अर्थाने वापरला होता.
यावर ओगले साहेबांचं मत ऐकायला आवडेल
8 Jun 2008 - 9:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यावर ओगले साहेबांचं मत ऐकायला आवडेल
आता कवी महोदय थेट भेटतील पुढील कवितेच्या वेळेस. :)
आम्हालाही त्या 'ग' ची अडचणच वाटली. पण मात्रा बित्रांचा तोल ढळू नये म्हणुन कवींनी तसे केले असेल असे वाटते.
अर्थात आपण जाणकार आहात तालासुरांची आपणास एक पारखी नजर आहे. आपल्या मताशी आम्ही सहमत आहोतच,पण कवी पेक्षा एक वाचक म्हणून आम्हाला 'ग' ची बाधा मात्र नक्कीच झाली. ;) ( ह. घ्या कवी साहेब )
-दिलीप बिरुटे
(लेखन टाकून पसार होणा-या लेखकांची वाट पाहणारा एक वाचक आणि चातक )
8 Jun 2008 - 6:41 pm | अरुण मनोहर
कविता आवडली.
"गं" काढून वाचून पाहिली. मला वाटते, "गं" काढलेलाही चालेल. तालात अडचण येत नाही. कारण असे की---
मातीच्या अंगावर
लक्ष रोमांच फुलती
आणि
फुलांच्या पाकळ्यात
मोती टपोरे झुलती
ह्यामधे, जोडाक्षरे (मातीच्या , फुलांच्या ) असल्याने आठ अक्षरांचा आभास होतो.
8 Jun 2008 - 10:49 pm | विसोबा खेचर
वा ओगले साहेब!
सुंदर कविता! वाचून प्रसन्न वाटलं! :)
आपला,
(थेंबाथेंबातला) तात्या.
8 Jun 2008 - 10:59 pm | बेसनलाडू
पहिल्या तीन कडव्यांतून प्रसन्न निसर्गचित्र रंगवणार्या कवितेस शेवटच्या कडव्यात मिळालेली कलाटणी आवडून गेली.
(प्रसन्न)बेसनलाडू
9 Jun 2008 - 2:57 am | चतुरंग
चतुरंग
11 Jun 2008 - 8:12 pm | अविनाश ओगले
'ग' बद्दल छान चर्चा! ग ग ग ग ग ग....
असो. हे सारे कवितेबद्दलचे तुम्हा मंडळींचे प्रेम आणि जाणकारी व्यक्त करणारे आहे.
कविता खूप जुनी. 'कवितेचा छंद आहे, पण कवितेच्या छंदांचा अभ्यास नाही' अशा काळातली. अष्टाक्षरी वगैरे शब्दही माहित नसल्याच्या काळातली. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा वाचली.
तुझ्या स्मृती जागतात
डोळा डोळ्यास लागेना
या ओळींशी 'ग' संबंध असावा असे आज जाणवते. तेव्हा मात्र सहजच लिहून गेलो.
बिरूटे साहेब, लेखन टाकून पसार वगैरे झालो नाही. इथंच आहे. पण मराठी भाषा, कविता, कवितेचं व्याकरण या विषयावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. वाणिज्य पदवीधर आणि बँकेतील नोकरी. काय बोलणार? तुमच्या चर्चेतूनच काहीतरी शिकत राहतो.
सर्वाना धन्यवाद!
11 Jun 2008 - 11:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरूटे साहेब, लेखन टाकून पसार वगैरे झालो नाही. इथंच आहे. पण मराठी भाषा, कविता, कवितेचं व्याकरण या विषयावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही.
आम्हालाही तो अधिकार नाही. पण, आपल्या कवितेवर चर्चा चाललेली आहे तर, आपण त्यावर बोलावे अशी एक ढोबळ अपेक्षेने आम्ही तसे लिहिले. रागावला असाल तर क्षमा असावी. कविता,कवीतेच्या व्याकरणाचा आम्हाला अभ्यास असता तर आम्हीही आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रभर काव्यरसिकांना आमच्या कविता ऐकवल्या असत्या !!! :)
'ग' च्या खुलाशाबद्दल आभारी आहे !!!