नव्या वर्षात खर्‍या शुभेच्छा, आपण द्याव्या आपल्याला!

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
2 Jan 2012 - 9:58 pm

नववर्ष (मग ते एक जानेवारी पासून सुरू होणारं विदेशी असो वा बिहु, उगादी, बैसाखी, वा गुढीपाडव्यासारख्या दिवसांपासून सुरू होणारं भारतीय असो) म्हणजे आप्तेष्टांना शुभेच्छा देण्याची एक संधी. ती बर्‍याच प्रकारे साधली जाते. याच सुमाराला नित्याच्या शुभेच्छादर्शक निरोपां/विरोपांसह काही चांगलं, अनपेक्षितपणे वेगळं असं लिखाणही पहायला मिळतं. असंच एक लिखाण माझ्या एका बहुश्रुत मेव्हण्याने (अमितने) मला पाठवलं. त्या विल्फ्रेड पीटरसेन या लेखकाच्या गद्य स्फुटाचा हा मुक्तकाव्यातला भावानुवाद इथल्या मित्रमैत्रिणींसाठी:

नव्या वर्षात खर्‍या शुभेच्छा, आपण द्याव्या आपल्याला!

नव्या वर्षाला आपण असं भेटतो आताशा
जणू नववर्ष घडतंय आपल्याबाहेर अगदी
अवचित पूर्ण होतील जादूने जणू कुठल्याशा
आपल्या हृदयेच्छा, आणि आपण होऊ आनंदी

जेंव्हा आनंदाची अपेक्षा बाह्यातून असते
तेंव्हा बहुधा निराशाच पदरात येते
आनंद म्हणजे नवं वाहन, मस्त हवा किंवा पगारवाढ नसते
अशा बाह्य, अस्थिर गोष्टींचे मालक आनंदीच असतात कुठे?

नव्या वर्षातून नाही येत आनंद
तो येतो मुला-माणसांतून
मध्यरात्रीच्या प्रहरातून दिनदर्शिकेत नाही येत आनंद
आयुष्य बदलतं उसळत्या नसांतून

आसपास घडतं ते आनंदाचा स्त्रोत नव्हे
खरा आनंद मनाचा, समाधानाचा, अंतरातला
बाह्यजगी ताबा नाही, पण विचार आपल्या हाती हवे
यंदा 'नववर्षा'ला नव्हे, तर शुभेच्छा द्या 'नव्या स्वतः'ला

जर वाटतं स्मरणीय असावं आयुष्यात या वर्षाने
इतरांना, स्वतःला आनंदी करा, दिवस असो कुठलाही
घटका, पळे व्यापून टाका आनंदाच्या ओघाने
'नव्या स्वतः'चा ध्यास घ्या, आज, उद्या, प्रत्यही

सामोरं जा एका सत्याला, 'काळ' तोवर निश्चल आहे
जोवर प्रतिक्षणात तुम्ही भरीत नाही प्राणाला
स्वास्थ्य, आनंद, तुमचं सुख, मग मात्र नक्की आहे
नव्या वर्षात खर्‍या शुभेच्छा, आपण द्याव्या आपल्याला!

मुक्तकभाषांतर

प्रतिक्रिया

विलासराव's picture

2 Jan 2012 - 10:17 pm | विलासराव

सामोरं जा एका सत्याला, 'काळ' तोवर निश्चल आहे
जोवर प्रतिक्षणात तुम्ही भरीत नाही प्राणाला

आवडले.

गणेशा's picture

2 Jan 2012 - 10:32 pm | गणेशा

आसपास घडतं ते आनंदाचा स्त्रोत नव्हे
खरा आनंद मनाचा, समाधानाचा, अंतरातला
बाह्यजगी ताबा नाही, पण विचार आपल्या हाती हवे
यंदा 'नववर्षा'ला नव्हे, तर शुभेच्छा द्या 'नव्या स्वतः'ला

निश's picture

3 Jan 2012 - 11:43 am | निश

अप्रतिम मस्त सुंदर

काय सुरेख!
मूळ स्फुटही फार आवडलं.

कवितानागेश's picture

7 Jan 2012 - 7:03 pm | कवितानागेश

:)

पैसा's picture

7 Jan 2012 - 8:59 pm | पैसा

भावानुवाद आवडला.