घे बाबाच्या कुशीत सोन्या..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
22 Dec 2011 - 8:59 pm

मराठी कविता समुहाच्या 'लिहा प्रसंगावर गीत' या उपक्रमासाठी मझा सहभाग...

बाबाची अंगाई

पापण्यांवर नीज येऊन जडावले डोळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे

धावधावतो बाबा जणू की पायाला भिंगरी
शिणतो, धडपड करतो येण्या लवकर माघारी
व्याकुळते मन बाल्य स्मरुनी होते बघना खुळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे

बाबालाही आस सतावे तुझ्याच बोलांची
चिऊ-काऊची गोष्ट बोबडी लाख मोलांची
समजुत काढू कशी तुझी मी मलाच हे ना कळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे

घरट्यामध्ये पक्षी निजले रात खूप झाली
चांदोमामा झोपी गेला त्याच्या मेघ महाली
नीज माझ्या राजा आता थांबव ना चाळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे

आई भवती तुझे छोटुले विश्व गुंफ़लेले
कर्तव्याने बाबाचे बघ हात बांधलेले
इवले इवले स्मरशील ना रे अपुले क्षण आगळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे

-प्राजु

शांतरसकविता

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

22 Dec 2011 - 9:15 pm | इंटरनेटस्नेही

कविता आवडली. एकदम तरल आणि हदयस्पर्शी.

लीलाधर's picture

23 Dec 2011 - 8:51 am | लीलाधर

दमलेल्या बाबाची कहाणी आठवली. खरंच अप्रतिम १ नंबर झाली आहे. :)

पियुशा's picture

23 Dec 2011 - 12:25 pm | पियुशा

मस्त ,भावस्पर्शी कविता !
:)

मन१'s picture

23 Dec 2011 - 9:53 am | मन१

अगदि हृदयस्पर्शी का काय म्हणतात तशी वाटली.

दिपक's picture

23 Dec 2011 - 10:07 am | दिपक

छान कविता प्राजुतै. खुप आवडली.

बाबालाही आस सतावे तुझ्याच बोलांची
चिऊ-काऊची गोष्ट बोबडी लाख मोलांची
समजुत काढू कशी तुझी मी मलाच हे ना कळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे

प्रभाकर पेठकर's picture

23 Dec 2011 - 10:28 am | प्रभाकर पेठकर

'दमलेल्या बाबांच्या कविते'वरून प्रेरणा घेतलेली जाणवते आहे. ती मुळ सशक्त कविता मनातून दूर करता येत नसल्याने मनातल्यामनात तुलना होत राहिली आणि 'घे बाबाच्या कुशीत सोन्या..'ने म्हणावे तितुके बाळसे धरले नाही असे जाणवले. कदाचित असे म्हणणे म्हणजे कवियित्री वर अन्याय होईल पण तो दोष माझ्या दुबळ्या रसिकतेचाही असू शकतो.

प्रयत्न चांगला आहे, अभिनंदन.

कविता अतिशय सुंदर आहे हे प्रथमच म्हणतो.. अतिशय टचिंग.. पण कविता या सदरात.. अंगाई नव्हे.

हे म्हणतानाच माझ्या मनात फार लहानपणापासून असलेली एक शंका इथे विचारतो.

अंगाईगीत असं नाव दिलंय म्हणून हे म्हणतोयः

मुलांना झोपवायला करुण आणि आवंढा दाटणारी गाणी का गातात?

तशी गाऊ नयेत असं माझं स्पष्ट मत आहे..

एकवार पंखांवरुनि फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, ही अंगाई नसली तरी माझ्या लहानपणी कधीकधी संथ चालीचं गाणं म्हणून झोपवताना म्हटली जायची. मी आईला स्पष्ट सांगितलं की रडवणारी गाणी गाऊ नको..

अरे लहान पोरांना काही समजत नाही असं वाटतं का?

बरं दु:खी शब्द नसलेली गाणी असली तरी चाली अशा काही करुण असतात की ज्याचे नाव ते..

अरे मजेत हसत हसत झोपूदेत ना पोरांना.. शांत पण आनंदी चाली नसतात का?

ही कविता पोराला / पोरीला जागेपणी ऐकवावी असं माझं मत आहे.. तुमच्या गिल्टस पोराला झोपण्याच्या क्षणी कशाला ऐकवायच्या..??

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Dec 2011 - 10:48 am | मिसळलेला काव्यप्रेमी

प्रतिसाद मनापासून पटला.
कविता तर अतिशय सुंदर झाली आहे.

गवि's picture

23 Dec 2011 - 11:46 am | गवि

असं काहीसं:

..........

झोप आता माझ्या बाळा वाजले रे बारा..
दुधासाठी पिशवी लावून येतो दारा..

पाहू नको शिनचॅन, फार वांड झालाय..
झोपवण्या तुला बघ डोरेमॉन आलाय..

बाबाच्या ढेरीवर टाक तुझे पाय..
बापाचाच माल तुझ्या, पर्वा तुला काय?

गळा माझ्या मिठी मारुन झोप ढाराढूर..
उद्या मला सुट्टी, उद्या जाऊ दोघे भूर..

लपवून ठेवू उद्या आजोबांची सिगरेट
कोणालाच ठावे नाही, तुझं माझं सिक्रेट..

प्रचेतस's picture

23 Dec 2011 - 11:57 am | प्रचेतस

जबरा.

अन्या दातार's picture

23 Dec 2011 - 11:58 am | अन्या दातार

सलाम तुमच्या प्रतिभेला. :) :)

यशोधरा's picture

23 Dec 2011 - 12:39 pm | यशोधरा

बाबाच्या ढेरीवर टाक तुझे पाय..
बापाचाच माल तुझ्या, पर्वा तुला काय?

गळा माझ्या मिठी मारुन झोप ढाराढूर..
उद्या मला सुट्टी, उद्या जाऊ दोघे भूर..

हे लई लई आवडले! बाबाची आठवण झाली! :) त्याने अगदी असेच म्हटले असते.
धन्यवाद गवि.

सुहास..'s picture

23 Dec 2011 - 12:41 pm | सुहास..

गवि हल्ली कवि झाले आहेत ;)

आणि

सुहास झेले's picture

23 Dec 2011 - 12:45 pm | सुहास झेले

व्वा व्वा... !!!

बाबाच्या ढेरीवर टाक तुझे पाय..
बापाचाच माल तुझ्या, पर्वा तुला काय?

गळा माझ्या मिठी मारुन झोप ढाराढूर..
उद्या मला सुट्टी, उद्या जाऊ दोघे भूर..

अगदी अगदी.... :)

मन१'s picture

23 Dec 2011 - 6:51 pm | मन१

एक नादमयता आहे हरेक कडव्यात.
जाम आवडलं.

स्मिता.'s picture

23 Dec 2011 - 8:00 pm | स्मिता.

हे हे हे... ही हलकी-फुलकी अंगाई आवडली :)

मुळ कविता आणि गविंनी लिहिलेली कविता
दोन्हीही आवडल्या ....

दीप्स's picture

23 Dec 2011 - 12:49 pm | दीप्स

मस्तच आहे कविता.

प्राजु,

तुमची कविता निर्विवाद छान आहे पण वरती पेठकर म्हणतात तशी मूळ दमलेल्या बाबाची सावट काही दूर करता येत नाही. कदाचित त्या कवितेच्या प्रसिद्धीचा परिणाम असावा.

बाकी. गविंनी मांडलेला मुद्दा विचार करण्यासारखा आहे. त्याबद्दल मी माझं अनुमोदनाचं मत नोंदवतो. त्यांनी लिहिलेली अंगाईची कविता आवडली तरी ती म्हंटल्यानंतर मूल झोपेल याबद्दलही शंकाच आहे.

हा हा हा.. खरंय. झोपेल की नाही शंकाच आहे..

अर्थात चाल कशी लावतो त्यावर अवलंबून आहे. बाकी करुण उदास कडू भावना गाऊनही पोरं निवांत कशी झोपू शकतील ही शंका आहेच.

गणपा's picture

23 Dec 2011 - 6:47 pm | गणपा

:(

भाग्यश्री कुलकर्णी's picture

23 Dec 2011 - 8:10 pm | भाग्यश्री कुलकर्णी

गवी मस्तच.(हे अय्या मस्तच ह्या चालीत वाचावे):)

दोन्ही कविता एकदम मस्त, आणि गवि ज्या समस्यांशी झगडत आहेत पोराच्या बाबतीत त्याच परिस्थितितुन मी जात असल्यानं १०००००००% अनुमोदन..

मदनबाण's picture

27 Dec 2011 - 8:30 pm | मदनबाण

दोन्ही कविता आवडल्या... :)