आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?

मनिष's picture
मनिष in जनातलं, मनातलं
6 Jun 2008 - 5:39 pm

भडकमकर मास्तरांनी 'साठेचं काय करायच?' ह्या नाटकाच्या परिक्षणात मांडलेला 'राजीव नाईक' ह्यांचा हा विचार मनात रेंगाळत, खर तर वादळासारखा घोंघावत राहिला...

आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?

खरच, का छळत, होरपळत असावा हा विचार एवढा? विचार करत राहिलो, आणि जे सुचले ते इथे मांडायचा प्रयत्न करतो आहे....

मला वाटते, स्वतःची मीडिओक्रिटी जरी ओळखता आली तरी स्वीकारता, पचवता येत नाही. तो पचवण हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार होतो कारण त्यात मीडिओक्रिटी नाकारण्याची (denial) स्टेज संपतच नाही. तिचा 'acceptance' ही सगळ्यात अवघड गोष्ट. मग त्यातूनच अपरिहार्यपणे येणारी कौतुकाची, टाळ्यांची लाचारी आणि त्या(च)साठीचे केविलवाणे प्रयत्न... किंवा त्यातूनच निर्माण होणारे असूया/मत्सर्/द्वेष जे ह्या नाटकात दाखवले आहे. ह्या भावना सर्वसामान्य आणि त्यावरील प्रतिक्रियाही लेखकाने म्ह्टल्याप्रमाणे रिपीटिटीव्ह...त्याच, त्याच आवर्तात, भोवर्‍यात पुन्हा, पुन्हा अडकल्यासारख्या....अगदी अनुभवलेली, वास्तववादी script!

जरा दूर जाऊन, दूरस्थ (त्रयस्थ नाही, पण भावनावेगापासून दूर ह्या अर्थाने - दूरस्थ) राहून विचार करत होतो तेंव्हा वाटले, खरच मीडिओक्रिटी हे एक perception (नेमकं काय म्हणू याला?) शिवाय दुसरं काय आहे? म्हणजे तसे बघितले तर "बेस्ट" हे कोणाच्या तुलनेत? आपल्या वर्तुळातील सहकारी, मित्र-मैत्रिणींच्या की आपल्या गावात, राज्यात, देशात, परदेशात्/विश्वात??? कुठल्या तुलनेत म्हणायचे हे "बेटर" आणि "बेस्ट" आणि मग ही स्पर्धा कोणाशी, कोणा-कोणाशी किंवा कोणा-कोणाच्यात? आणि वेळेचे अजून एक डायमेंशन धरायचे की नाही? म्हणजे सचिन तेंडुलकर हा "बेस्ट" बॅटसमन - हा समकालीन खेळाडुंमधे की त्याची तुलना मग डॉन ब्रॅडमन शी किंवा अजूनही कोणाशी? बर मग सचिन जर "बेस्ट" तर मग बाकिच्यांनी बॅटिंग करुच नये का? अगदी ज्ञानेश्वरीतच (दस्तुरखुद्द ज्ञानेश्वरांनी) म्हटले आहे - सगळ्यात सुंदर चाल राजहंसाची असली तरी इतरांनी चालुच नये का? सुप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट डॉ. अल्बर्ट एलिस हेच REBT मधे सांगतो!

विचार केला की पटते की आपल्यालाही...अरे असेल लता मंगेशकरचा आवाज स्वर्गीय; पण म्हणून कोणी गायचेच नाही का? का म्हणून तिचे कुठलेही गाणे "बेस्टच"? मी तर आशाच्या 'कतरा, कतरा..." वर जीव ओवाळून टाकायला तयार आहे. एवढेच नाही तर 'स्वानंद किरकिरे' च्या 'बावरा मन..." वर हजारो गाणी कुर्बान....काय वेडावून टाकते ते गाणे!! असेल आंबा फळांचा राजा, पण संत्र्याला स्वतःची चव आहे, उसाच्या रसाला आगळेच माधुर्य आहे. अरे, असेल सचिन बेस्ट, पण युवराजचा लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह लाजवाब, त्याचा माज पैसा वसूल (२०-२० चे सहा सिक्स? आणि आठवा फ्लिंटऑफ चा चेहरा) आणि गांगुलीचे ऑफ-साईड चे फटके....अफलातून! :)

मग ह्या मीडिओक्रिटी च्या perception चे दुसरे टोक, शिखर म्हणू हवे तर - ते "पर्फेक्शन"..ते काय? जर ते 'पर्फेक्ट' असेल तर ते नेहमीच 'बेस्ट' हवं...मग पुन्हा तो प्रश्न, की तुलना करायची तर कशाशी आणि कोणा-कोणाशी? एक परिघ वाढवले की हे सगळेच किती फोल आहे, हास्यास्पद आहे हे जाणवू लागते...आणि मीडिओक्रिटी हे फक्त perception च आहे हेही जाणवते...पर्फेक्शनचा, परिपुर्णतेचा ध्यास, विलोभनीय आहे पण परिपुर्णतेचा अट्ट्हास??? विचार करण्यासारखा प्रश्न आहे....ध्यासात भर आहे तो आपल्या कर्तुत्वावर (प्रोसेसवर), तर अट्ट्हासात अवाजवी भर आहे त्याच्या अनुकुल परिणामांवर (रिसल्ट्सवर)...शिवाय perfection is not a certain/fix set of XYZ items or formulae. Otherwise perfection would be stagnation.

Hugh Prather म्हणतो, "There is no such thing as 'the best' in the world of individuals!" सही आहे!!!

किंबहुना, ह्यातुनच वाटले की जर खरोखरच जे करतो ते मनापासून आवडत असेल, ते करण्यात मजा येत असेल (process satisfaction) तर इतका त्रास होईल का? नैसर्गिक हेवा वाटेल कदाचित, पण चढत्या भाजणीने हे असूया/मत्सर्/द्वेष मनस्वास्थ खराब करतील? ह्या गळाकापू स्पर्धेत खरच आपण process satisfaction विसरत आहोत का? End goal satisfaction हेच एकमेव ध्येय झाले आहे? कॉर्पोरेट जगात हे नेहमीच दिसते पण कलेच्या, सर्जनशील जगात जेव्हा राजीव नाईक ह्यांनी असे लिहिले, तेंव्हा अंगावर सरसरून काटा आला...पण शेवटी कॉर्पोरेट जगात किंवा सर्जनशील जगात, कुठेही असला तरी माणूस हा माणूसच - त्याच्या सगळ्या गुणावगुणांसह!

जर ह्या संदर्भात - बेस्ट/पर्फेक्शन त्याची कॅलिडोस्कोप प्रमाणे दिसणारी विविध रूपं, त्याची relativity (आता मला आवडते आशा जास्त, लताचा आवाज स्वर्गीय आहे मान्य करून सुद्धा!), त्याप्रमाणे स्वतःचे स्वतःच्या मीडिओक्रिटी चे perception आणि process satisfaction; ह्या संदर्भात विचार केला तर मीडिओक्रिटी स्विकारायला, पचवायाला जमेल; इतकेच नाही तर त्याच्यावर मात करायलाही जमेल असे वाटते.

आपण सुरु करावे जे आपल्याला मनापासून करावेसे वाटते ते....जमेल तसे....आपल्या तथाकथित मीडिओक्रिटी सकट....परिपुर्णतेचा ध्यासाने, पण अट्टहासाने नाही...आणि मागे वळून, तृप्त होऊन बघावे स्वतःच्याच प्रगतीकडे... बघावी कालच्या अडखळणार्‍या, मीडिओकर पावलांची आजची डौलदार लय...कोणी पळत असेल शेजारी तर त्याची धाव, त्याची गती त्याला मुबारक....आपण करत रहावा आपला प्रवास आपल्या पायांनी, आपल्याच गतीने...स्वांतसुखाय! :)

हे एकदा आतून उमगले की नाही कलह होत स्वत:शी, स्वतःच्या मीडिओक्रिटीशी...अर्थात, हे सगळे माहित असले तरी 'माहित असणे' आणि 'उमगणे' ह्यात खूप अंतर असते...अंतर असते कदाचित कित्येक वर्षांचे, कधी कधी कित्येक आयुष्यांचे....आणि आयुष्य संपले तरीही न उमगणे ही पण एक दुर्दैवी शक्यता...आणि त्यात 'राजीव नाईक' म्हणतात तसा तो 'भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार' आणि त्याचे ते 'रिपीटिटीव्ह' अविष्कार! भयानकच पण सत्य!! नाटक बघणार नक्की...जमले तर पुस्तक मिळवतो आधी.

असो!! फार वाहवत गेलो....एकातून एक...लाऊड थिंकींग म्हणा! तुम्न्हाला काय वाटते, बर्‍या-वाईट प्रतिक्रिया जरूर लिहा!

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

विदुषक's picture

6 Jun 2008 - 6:19 pm | विदुषक

मी करतो आहे ते माझ्या आनन्दा साठी हा तथाकथीत 'माज' जर असेल तर मग मीडिओक्रिटी हे फक्त perception च आहे

आठवा ती sir Vivian Richards ची चाल ....... त्याला नही कधी मीडिओक्रिटी चा गन्ड आला
शेवटी 'स्वान्तसू़खाय' जर असेल तर सगळे च प्रश्न गळून पडतात आणी रहतो तो निखळ आनन्द .. निव्वळ आनन्द !!!!

मजेदार विदुषक

भडकमकर मास्तर's picture

6 Jun 2008 - 6:24 pm | भडकमकर मास्तर

लेख वाचला..सविस्तर नंतर लिहितो... मस्त झालाय...

आपण सुरु करावे जे आपल्याला मनापासून करावेसे वाटते ते....जमेल तसे....आपल्या तथाकथित मीडिओक्रिटी सकट....परिपुर्णतेचा ध्यासाने, पण अट्टहासाने नाही...आणि मागे वळून, तृप्त होऊन बघावे स्वतःच्याच प्रगतीकडे... बघावी कालच्या अडखळणार्‍या, मीडिओकर पावलांची आजची डौलदार लय...कोणी पळत असेल शेजारी तर त्याची धाव, त्याची गती त्याला मुबारक....आपण करत रहावा आपला प्रवास आपल्या पायांनी, आपल्याच गतीने...स्वांतसुखाय!

हेच म्हणतो....
फारच सुंदर मनीष...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विजुभाऊ's picture

6 Jun 2008 - 6:43 pm | विजुभाऊ

सहमत
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मुक्तसुनीत's picture

6 Jun 2008 - 8:06 pm | मुक्तसुनीत

इतके प्रामाणिक लिखाण क्वचित पहायला मिळते. भडकमकर यांच्या लेखाचे हे यश मानायला हवे की, तो वाचून ग्वाही "सत्य-असत्याशी मन केले ग्वाही" या भावनेतून इतके प्रामणिक लेखन करावेसे वाटले !

मनिष यांनी या नाटकाच्या निमित्ताने अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला आहे. हे सर्व मुद्दे एकमेकांमधे गुंतलेले आहेत, एकमेकांशी फार जवळचे नाते सांगणारे आहेत. अशा गुंतागुंतीच्या गोष्टींशी झुंजायचे म्हणजे एकेक मुद्द्याला वेगळे काढून पहायचा विश्लेषणात्मक मार्ग कधीकधी पत्करावा लागतो.

बर्‍याचदा रुचिभिन्नता या कारणामुळे आपण आपल्याला आपल्या रुचिशी मिळतीजुळती नसलेली माणसे निरर्थक वाटतात. गोविंदाचे चित्रपट याचे एक सहज आठवणारे उदाहरण म्हणून सांगतो. "राजा बाबू" सारखे चित्रपट मी पहायला जायचो तेव्हा मला छद्मीपणे हसणारे लोक आठवतात. "वन मॅन्स फूड इज समवन एल्सेस पॉइझन " असे म्हण्टले आहे ते या अर्थानेच. आणि मग जे आवडत नाही त्याला आपण सुमार असे म्हणून मोकळे होतोच.

सुमारपणा (मीडिओक्रिटी ) - मग तो स्वतःचा असो, की इतरांचा , ही एक सब्जेक्टिव्ह बाब आहे. एखाद्या स्वच्छ लखलखीत दिवशी आपण स्वतःला आपापल्या जगातले व्यास-ब्रॅडमन्-डा विंची-आइन्स्टाईन समजतो. (सुदैवाने , बहुतांश लोकांचा भ्रमनिरास लगेच - बहुदा त्याच दिवशी - होतो. ज्यांचा कधी होत नाही त्यांची अवस्था काय वर्णावी !) आणि काही इतर दिवशी नैराश्याचे झटके येतात ? "स्वत:ची किंमत काय ?" याची उत्तरे फार काळीकुट्ट यायला लागतात. हेच तर्कशास्त्र मग आपण दुसर्‍यांच्या बाबतीत लागू करू शकतो. इट इज व्हेरी मच अ पर्सेप्टीव नोशन !

असे जर का असेल तर मग आपण नक्की जोखावे कसे स्वतःला ? हा एक यक्षप्रश्नच आहे. "माझ्यापुढे नित्य आत्मानुभूती, पटावे दुजे तर्क आता कसे ? पुरे जाणतो मीच माझे बल !" या रे. टिळकांच्या ओळी अतिशय सुंदर खर्‍याच. पण असा अनुभव ज्याला आला (आणि जो त्या ठिकाणी टिकू शकला !) त्या माणसाला नक्की काहीतरी महत्त्वाचे गावले आहे. दुर्दैवाने , जेव्हा माणसे आपल्या या दिव्यानुभूती इतरांपर्यंत पोचविण्याचा दावा करतात तेव्हा त्याला बुवाबाजीचे स्वरूप आलेले असते ! तेव्हा आपल्या नशीबी बर्‍याचदा भिरभिरणे येते - सततचा आत्मशोध.

मी ज्या व्यक्तीला माझे मेंटॉर मानले त्याबाबतचा एक अनुभव देतो. ती व्यक्ती एक संशोधक होती. कामाबद्दल बोलताना ते एकदा असं म्हणाले "आपल्या कामांच्या कित्येक वर्षात आपल्याला हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच वेळा खरी अनुभूती येते, एखादाच विचार मनात चमकून जातो, एखादेच स्फुल्लिंग चमचमते आणि त्यातून शोध लागतो, नवा विचार सापडतो, वेगळी वाट दिसते. मग बाकी वेळेला आपण काय करत असतो?
रिकामटेकडे असतो का? मिडिऑकर असतो का? तसे जर असलो तर मग 'वेगळी वाट' कशी दिसते? ती दिसते त्या क्षणी आपण कोण असतो?
तर आपण तेच असतो. त्या क्षणाच्या अवस्थेतून जाताना आधीच्या अनुभवांचे सार एका विचाराच्या थेंबातून आपल्या पदरी पडते आणि पुन्हा एकदा नव्याने जमिनीची मशागत सुरु होते!"

माझा मुलगा माँटेसरी शाळेत जातो. त्या शाळेचे तत्त्व हे मुलांना शिकवणे हे नसून ती त्यांची त्यांचीच शिकत जातात त्यांना फक्त मदत करणे हे आहे.
त्यांच्यातली मिडिऑक्रसी सृजनात कशी परिवर्तित होत जाते हे अनुभवणे. हा विचार चटकन पटत नाही. पण आपण थोडा पेशन्स दाखवला तर आपली मुले काही महिन्यात किती वेगवेगळे पैलू आपल्यासमोर दाखवतात हे पाहून आपण अचंबित होतो. त्यांच्यात कॉंपिटिशन नसते. तर स्वतःलाच शोधणे असते. एकाने एक गोष्ट अशी केली म्हणून दुसर्‍याने तशीच करायला हवी असे अजिबात नाही. आउट ऑफ बॉक्स विचार हा यशस्वी केला की तो शोध असतो आणि अयशस्वी झाला तर तो शोधाकडे जाण्याची पायरी ठरतो! पण रिझल्टला महत्त्व न देता तो तसा आधी करणे हे महत्त्वाचे! ;)

चतुरंग

मनिष's picture

6 Jun 2008 - 9:10 pm | मनिष

@चतुरंग - कुठली शाळा आहे ही? आणि कुठे आहे?
('समरहिल' एक मला माहित आहे - पण ती इंग्लंड ला आहे)

चतुरंग's picture

6 Jun 2008 - 9:44 pm | चतुरंग

व्य. नि. पाठवलाय!

चतुरंग

सुमारपणा (मीडिओक्रिटी ) - मग तो स्वतःचा असो, की इतरांचा , ही एक सब्जेक्टिव्ह बाब आहे. एखाद्या स्वच्छ लखलखीत दिवशी आपण स्वतःला आपापल्या जगातले व्यास-ब्रॅडमन्-डा विंची-आइन्स्टाईन समजतो. (सुदैवाने , बहुतांश लोकांचा भ्रमनिरास लगेच - बहुदा त्याच दिवशी - होतो. ज्यांचा कधी होत नाही त्यांची अवस्था काय वर्णावी !) आणि काही इतर दिवशी नैराश्याचे झटके येतात ? "स्वत:ची किंमत काय ?" याची उत्तरे फार काळीकुट्ट यायला लागतात. हेच तर्कशास्त्र मग आपण दुसर्‍यांच्या बाबतीत लागू करू शकतो. इट इज व्हेरी मच अ पर्सेप्टीव नोशन !

egggggggjactly!!!!

असे जर का असेल तर मग आपण नक्की जोखावे कसे स्वतःला ? हा एक यक्षप्रश्नच आहे. "माझ्यापुढे नित्य आत्मानुभूती, पटावे दुजे तर्क आता कसे ? पुरे जाणतो मीच माझे बल !" या रे. टिळकांच्या ओळी अतिशय सुंदर खर्‍याच. पण असा अनुभव ज्याला आला (आणि जो त्या ठिकाणी टिकू शकला !) त्या माणसाला नक्की काहीतरी महत्त्वाचे गावले आहे.

अगदी खरे आहे....दोन्ही गोष्टी - असा अनुभव येणे, आणि तो त्या ठिकाणी टि़कून रहाणे...बर्‍याच वेळा एका वेगळ्याच उर्मीत, तंद्रीत असा संतुलीत अनुभव येतो, 'I am, what I am" वाला....पण मग इतर वेळी आपण दोलायमान होत राहतो लंबकाप्रमाणे आत्मतृप्ती आणि आत्मनिर्भत्सना ह्या दोघात.

तेव्हा आपल्या नशीबी बर्‍याचदा भिरभिरणे येते - सततचा आत्मशोध.

खरं तर आत्मशोध असेल तर शोधले ते सापडल्यावर भटकणे थांबले पाहिजे, पण असे होत नाही...कदाचित इतके सहज नसेलही आत्मशोध...पण मला वाटते आपण बरेच जण (विशेषतः अंर्तमुख व्यक्ती) करत असतो ते आत्मपरिक्षण...खर तर मुल्यमापन.....आणि त्यातूनच येते ते एखाद्या/काही गुणांवर/कलाकृतीवर लुब्ध होऊन येणारी आत्मतृप्ती किंवा अहंगंड किंवा अवगुणांच्या/अपयशाच्या नैराश्यातून येणारा न्यूनगंड.

खरच फार गुंतलेल्या आहेत ह्या गोष्टी एकमेकात...आणि त्यांना गुंतवणारा, किंबहुना ती गुंतागुंत वाढवणारा धागा असतो तो आपल्याच 'इगो' चा....त्यामुळे हे सगळे फारच अवघड होऊन बसते!

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Jun 2008 - 10:09 pm | llपुण्याचे पेशवेll

वरील सर्व लिखाण वाचल्यावर मला पण काही मांडावेसे वाटते.(जरी इतके चिंतन नसले तरी)
जसे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहेच की 'राजहंसाचे चालणे| जगि या जाहले शहाणे| म्हणोन काय कवणे| चालोचि नये|' (वरील ओवी पु.लं.च्या असा मी असामी मधून उचलली आहे त्याच दिगंबरकाका स्टाईल मधे)

आत्मशोधः पण जे पाहीजे ते सापडते का या शोधातून? जे पाहीजे ते सापडत नाही म्हणून तर हा न्यूनगंड येत असावा. किंवा जे पाहीजे तेस गवसले म्हणून कदाचित स्वतःचीच जाणता अजाणता दिशाभूल झाली तर हा अहंगंड येत असेल. पण हा न्यूनगंड किंवा अहंगंड दोन्हीही सृजनशीलतेला मारक असे मला वाटते. जर एखाद्याला आपल्यातील तृटीची जाणीव होऊन परत पूर्णत्वाकडे झेप घेण्याची उर्मी वाटत राहीली तर हा आत्मशोध सृजनशीलतेत परीवर्तीत झाला असे म्हणता येईल.

पूर्णत्व कोणास लाभलेले दिसत नाही. जो तो पूर्णत्वाच्या शोधातच दिसतो. मग कदाचित ही पूर्णत्वाकडे जाणारी वाटच जास्त स्वारस्यपूर्ण आहे का? म्हणजे कदाचित एखादी गोष्ट मिळण्यात आनंद असेलही पण जास्त आनंद आहे तो ती गोष्ट मिळवण्यात. म्हणूनच एक गोष्ट मिळाली की दुसरी गोष्ट मिळवण्याकडे लगेच माणूस वळतो. म्हणजे मुक्कामाला पोचण्यात कदाचित मजा कमी असेल पण प्रवास करण्यात मात्र फार मजा आहे. परत हे दोन्ही आनंद व्यक्तीसापेक्ष आहेत. कदाचित म्हणूनच भगवंताने म्हटले असेल 'कर्मण्येवाधिकारस्ते | मां फलेषु कदाचनः |'. त्यालाही तेच सांगायचे असेल की कर्म करत रहा फलाची चिंता करु नकोस कारण खरी मजा कर्म करण्यातच आहे.
कदाचित माझ्यातल्या मिडिओक्रीटिची जाणिवच मला परफेक्शनच्या दिशेने उद्युक्त करते का हे महत्वाचे. म्हणजे हरलो तरी चालेल पण हार मानणार नाही असा विचार ही मिडिओक्रीटि देत असेल तर उत्तमच नाही का?

(पूर्ण गोंधळलेला 'अपूर्ण')
पुण्याचे पेशवे

मनिष's picture

6 Jun 2008 - 10:53 pm | मनिष

पूर्णत्व कोणास लाभलेले दिसत नाही. जो तो पूर्णत्वाच्या शोधातच दिसतो. मग कदाचित ही पूर्णत्वाकडे जाणारी वाटच जास्त स्वारस्यपूर्ण आहे का? म्हणजे कदाचित एखादी गोष्ट मिळण्यात आनंद असेलही पण जास्त आनंद आहे तो ती गोष्ट मिळवण्यात. म्हणूनच एक गोष्ट मिळाली की दुसरी गोष्ट मिळवण्याकडे लगेच माणूस वळतो. म्हणजे मुक्कामाला पोचण्यात कदाचित मजा कमी असेल पण प्रवास करण्यात मात्र फार मजा आहे. परत हे दोन्ही आनंद व्यक्तीसापेक्ष आहेत. कदाचित म्हणूनच भगवंताने म्हटले असेल 'कर्मण्येवाधिकारस्ते | मां फलेषु कदाचनः |'. त्यालाही तेच सांगायचे असेल की कर्म करत रहा फलाची चिंता करु नकोस कारण खरी मजा कर्म करण्यातच आहे.

हा छान विचार आहे, ह्याच अर्थाने मला process satisfaction म्हणायचे होते!

अभिज्ञ's picture

7 Jun 2008 - 1:17 am | अभिज्ञ

मुख्यत: "सुमारपणा" हा विषयच खुप मोठ्या आवाक्याचा आहे.त्याला बरेच पैलु आहेत.
"सुमारपणा" हि पुर्णत: सापेक्ष अशि संकल्पना वाटते.
जेव्हा एखादा प्रकार आपल्याला "सुमार" असा वाटु लागतो म्हणजे नक्कि काय होत असावे?
जेव्हा जास्त खोलात जाउन विचार केला तर तरतमभाव ह्यात एक प्रमुख भुमिकेत असतो असे मला तरी वाटते.
इंग्रजीत ह्याला "comparison" असा शब्द आहे.सततची तुलनाहि म्हणता येइल.

एखाद्या गोष्टि बाबत निर्माण होणारा "आत्मविश्वास" तो पर्यंत चालणारी हि प्रक्रिया मानता येइल का?
सतत आजुबाजुला ,मागे पाहण्य़ाची माणसाचि प्रव्रुत्ती.त्या गोष्टींशी स्वत:ची तुलना हे सुध्दा ह्याला कारणिभुत धरता येइल
का सततची स्पर्धा?

मला माहितितील "सुमारपणाचे" एक उदाहरणॆ देतो.
माझा एक मित्र शाळॆत असताना दहावी पर्यंत अत्यंत हुशार विद्यार्थी होता.दहाविला उत्तम अशा गुणांनी उत्तीर्ण होऊन
११ वी करिता पुण्य़ातील एका उत्तम अशा महाविद्यालयात प्रवेश करता झाला. दहावी पर्यंत शाळेत अतिशय नावाजलेला
मुलगा.त्याला तीच सवय लागलेली.प्रत्येक ठीकाणि होणारे त्याचे कौतुक,त्याला प्रत्येक गोष्टित मिळणारे महत्व वगैरे
गोष्टि त्याचा आत्मविश्वास वाढवत होत्या.त्या गोष्टिचि त्याला इतकी सवय लागलेली. परंतु हाच जेव्हा महाविद्यालयात आला तेंव्हा
चित्र पुर्ण पालटलेले होते. इथे सगळॆच त्याच्यासारखे हुशार होते.शाळॆत असताना १००-२०० मुलांमध्ये ह्याची स्पर्धा असायची.त्यातहि
हुशार म्हणाल तर १० ते १५ जणच. त्याच्या मनात आपोआपच कंपॆरिजन सुरु झाले.कोण physics madhye कसा expert आहे,
कोणी गणितात आपल्यापेक्षाही हुशार आहे,ह्याला तर दहावीला आपल्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत....वगैरे.
त्यातुनच आपण फ़ारच सुमार आहोत अशी भावना त्याच्यात काहिहि कारण नसताना वाढीस लागली.अकरावी कसाबसा पास झाला.
परंतु बाराविचा ताण त्याला झेपला नाहि.शेवटी त्याने बारावीत "drop" घेतला.ह्या एका वर्षात त्याने जोरदार मेहनत घेऊन त्याने त्याचा
हरवलेला आत्मविश्वास परत मिळवला,व मुख्य म्हणजे आहे ते वास्तव तो स्विकारायला शिकला. पुढे बारावीत त्याला चांगले मार्क्स तर मिळालेच
परंतु तो IIT मध्येही निवडला गेला.,असो..

मुळात माणुस हा आपला दर्जा सतत पडताळुन पहात असतो.आपल्या कळ्तनकळतच आपल्या मनाशी मापदंड ठरवले जातात.
इथे एखादा लेखच लिहायचा झाला तर आपण मनात केवढे विचार करतो.
मी जे काहि लिहिणार आहे ते लोकांना आवडेल का? आधि कोण्या अमुक अमुक लेखकाने असाच लेख किति सुंदर लिहिला होता.
तसा माझा होइल का? किंबहुना ब-याच वेळॆला एखादा लेख/कथा/कविता लिहुन झाल्यावर का कॊण जाणॆ ते अचानक आपल्याला सुमार
वाटू लागते. इथे कुठेतरी हे "मापदंड" आडवे येत असावेत.
त्याउपरहि आत्मविश्वास हा सुध्द्दा मुद्दा आहेच. एकदा तो आला कि हि सुमारपणाची जाणिवही कमी कमी होत जाते.
पण ह्या दोन्हि प्रक्रिया ह्या अव्यातहतपणॆ सुरुच असाव्या लागतात.त्यातुनच निर्मितीक्षमतेची प्रत वाढीस लागते.
थोडक्यात सकारात्मक द्रॄष्टीकोन हा सतत असणॆ हे आवश्यकच आहे,त्याचबरोबर आपल्या क्षमतांची जाणिवही.

आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?

हा परिच्छेद मुळातच निगेटीव्ह आहे.दरिकडे तोंड करून डोंगर चढण्य़ाचा प्रकार वाटतो.

असो,ब-याच दिवसांनी चांगली चर्चा वाचायला मिळाली.

अभिज्ञ.

भडकमकर मास्तर's picture

7 Jun 2008 - 4:10 am | भडकमकर मास्तर

अभिज्ञा छान प्रतिक्रिया...
पण ह्या दोन्हि प्रक्रिया ह्या अव्यातहतपणॆ सुरुच असाव्या लागतात.त्यातुनच निर्मितीक्षमतेची प्रत वाढीस लागते.
सहमत...
दरिकडे तोंड करून डोंगर चढण्य़ाचा प्रकार वाटतो.
हे वाक्य गंमतशीर आहे... :).... ते मीडिऑक्रिटी पचवण्याचं वाक्य नकारात्मक निगेटिव्ह असेल, पण सत्य आहेच.... :)
कितीही पॉझिटिव्ह थिन्किन्ग करून बॅटिंग केली तरी मी ब्रॅडमन होणार नाही... का होईन? :?
ठीक आहे हा हा विनोद झाला...
पण हा अनुभव होरपळवून टाकणारा का आहे तर जिथे मला माहित असतं की मी कोणीतरी आहे, अजून कोणीतरी हो ऊ शकतो , असा आत्मविश्वास असतो , एक आशा असते आणि अशा वेळी जर मला माझ्या कमीपणाची जाणीव झाली तर मात्र जीवाला त्रास होतो....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

कारण मिडिओक्रीटी पचवणे खरच फार अवघड असते. मिडिओक्रीटीमुळे येणारे डिप्रेशन कायम नकारात्मक विचारांमुळे नसते.
जसे तुमचा मित्र शाळेत खूप हुशार होता पण महाविद्यालयात येऊन काही कारणामुळे मागे पडला.
पण मी शाळेपासून कायम हुशार मुलांच्या तुकडीत शेवटून पहीला येत असे. कदाचित मी पहीले यायचे ठरवून जिवाचे रान केले असते तरी पहीला येईन याची शाश्वती नव्हती कारण वर्गातील इतर हुषार मुले मी पाहीली होती. असो. कदाचित यातूनच मिडिओक्रीटीची जाणीव येते असे मला वाटते.

मला तरी ते नकारात्मक नाही वाटले.

पुण्याचे पेशवे

मनिष's picture

7 Jun 2008 - 10:17 am | मनिष

छान प्रतिसाद, मला वाटते आपण "आत्म्विश्वास" शब्द एक "अंब्रेला टर्म" म्हणून वापरतो....खरी गोची होते आत्मप्रतिमा आणि आत्मस्वीकार (self acceptance, comfort with self) ह्यात. ह्यात अनकंडिशनल आत्मस्वीकार असा सहसा होत नाही...(त्यात पुन्हा पुरुषी इगो हा कंडीशनल असतो असे सायकोलॉजी सांगते). जर मी जसा आहे तसे पुर्णपणे स्वतःला स्वीकारले, तर हा कलह होणार नाही.

एखादा ५०-६० टक्केवाल्याला ६७% हुरळून टाकतील तर ८५-९० ची अपेक्षा असलेल्याला ७०-७२ पडले तर त्याला ते "सुमार" वाटेल, ५०-६० ला तो कोलमडून पडेल. तू सांगितलेल्या मित्राच्या मनात त्याची आत्मप्रतिमा "हुशार" विद्यार्थी अशी होती, त्याला ११ वीत कुठेतरी तडा गेला, खर तर तडा गेल्यापेक्षा त्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह आले ...त्यातुन निर्माण झालेली जिद्द त्याने सकारत्मकतेने वापरली. तडा गेलेले लोक बरेचसे डिप्रेशन मधे जाऊ शकतात. विचार कर, हाच झटका 12 वीत बसला असता तर? आपल्याकडे खूप गोष्टी ह्या निकालावर ठरतात. माझ्या अगदी निकट परिचयातील एकाला असाच अनुभव आला आणि १२ वी नंतर बी. एससी. ला तो डिप्रेशन मधे गेला.

एक महत्वाचा फरक म्हणजे आपण बर्‍याच वेळा सुमार परफॉर्मन्स आणि सुमार व्यक्ती ह्यात फरक करू शकत नाही. कित्येकवेळा सहजपणे "तो अगदी सुमार आहे" असे म्हणतो..त्याच्या क्षमतांचा पुर्ण परिचय नसतांनाही. 'सुमार परफॉर्मन्स' असा दृष्टीकोन निदान प्रयत्नांवर लक्ष केंद्रीत करू शकतो....पण सुमार व्यक्ती म्हटले की लेबल लावून मोकळे.....आणि हे स्वतःच्याही बाबतीत होते. 'साठेच काय करायचं" मधे (माझ्या मते) अभय स्वतःच्या कामाच्या पलिकडे स्वतःचे (आणि साठेचेही) मुल्यमापन करतो..त्यातुनच निर्माण होणारे वैफल्य आणि डिप्रेशन.

चर्चा खूपच छान आणि आशयपुर्ण होते आहे, सगळ्यांचेच आभार! :)

- मनिष
creative discontent/दिस्सतिस्फच्तिओन, त्यातुन निर्माण होणारा परिपुर्णतेचा ध्यास आणि त्याला लागणारे मोटिव्हएशन ह्यावर जे. कृष्णमुर्तींनी खूप छान लिहिले आहे , ते पुस्तक वाचून खूप दिवस झाले....ते संदर्भ सापडल्यास लिहिन इथे.

विसोबा खेचर's picture

7 Jun 2008 - 12:02 pm | विसोबा खेचर

मनिषराव,

आपला लेख आणि त्यावर इतरांनी लिहिलेले प्रतिसाद यातले मला फारसे काहीच कळले नाही आणि बर्‍याचश्या गोष्टी डोक्यावरून गेल्या! नक्की कुणाला काय म्हणायचं आहे तेच मुळी कळलं नाही! कुठल्यातरी गहन आणि किचकट विषयावर चर्चा सुरू आहे इतकाच अंदाज आला!

असो, आपलं चालू द्या.

आपला लेख आणि प्रतिक्रिया पुन्हा एकदा वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीन नायतर तो नाद सोडून देईन..

पुलेशु...

आपलाच,
तात्या.

मनिष's picture

7 Jun 2008 - 12:32 pm | मनिष

एवढा भयानक किचकट झाला का गोंधळ?? :D

अरुण मनोहर's picture

7 Jun 2008 - 12:45 pm | अरुण मनोहर

आधीच गहन विषय. त्यात प्रतिसाद टॅन्जन्ट्ने जाणारे. त्यात भर म्हणून तुम्ही जे. कृष्णमुर्तींचे नाव घेतले. मग काय नीट लक्ष देऊन वाचण्याचा प्रयत्नच केला नाही. जे. कृष्णमुर्तींना आपण सॉलीड घाबरतो. मागे एकदा "जे. कृष्णमुर्तीं म्हणतात तरी काय?" हे पुस्तक नुसते चाळण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी निष्कर्श काढला होता की ते काय म्हणतात हे लेखकाला तर कळलेच नाही, पण त्यांना स्वतःला तरी कळले असावे का, ह्याचा विचार व्हायला हवा आहे. I)

मनीषजी, वरील विषयाचे साध्या भाषेत काही सिनॉप्सीस (व असल्यास निष्कर्श) वाचायला मिळाले तर तमभरे नभ उजळले अशी पावन कंडीशन प्राप्त होईल. ;)

ह.घ्या..... @)

विसोबा खेचर's picture

7 Jun 2008 - 12:57 pm | विसोबा खेचर

मनीषजी, वरील विषयाचे साध्या भाषेत काही सिनॉप्सीस (व असल्यास निष्कर्श) वाचायला मिळाले तर तमभरे नभ उजळले अशी पावन कंडीशन प्राप्त होईल.

हेच म्हणतो!

आणि कृपया ह घेऊ नका! आय ऍम सिरियस!

च्यामारी तुम्ही सगळी स्कालर मंडळी नक्की कुठल्या विषयावर, कुठल्या मुद्द्यावर इतक्या गंभीरपणे चर्चा करताय हे आम्हालाही कळलं पाहिजे हो! च्यामारी आम्हालाही घ्या की तुमच्यात! आम्हालाही काही वैचारिक अभिव्यक्ति कराविशी वाटते आहे पण च्यामारी तुमच्या चर्चेचा नेमका प्वाईंटच कळायला मागत नाही! अगदी गळाशप्पथ आयच्यान बघा! :)

तात्या.

आंबोळी's picture

7 Jun 2008 - 1:25 pm | आंबोळी

च्यामारी तुम्ही सगळी स्कालर मंडळी नक्की कुठल्या विषयावर, कुठल्या मुद्द्यावर इतक्या गंभीरपणे चर्चा करताय हे आम्हालाही कळलं पाहिजे हो! च्यामारी आम्हालाही घ्या की तुमच्यात! आम्हालाही काही वैचारिक अभिव्यक्ति कराविशी वाटते आहे पण च्यामारी तुमच्या चर्चेचा नेमका प्वाईंटच कळायला मागत नाही!
सहमत!
स्वगत : यालाच आमचे सुमारपण म्हणायचे का?
आम्हाला आमच्या सुमारपणाची अशी अनुभूती देण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही. श्या.... फार म्हणजे फारच डिप्रेशन आल राव्....मनिष , अभिज्ञ आणि इतरानी त्याना जे म्हणायचे आहे त्याचे लगेच सोप्या भाषेत निरूपण करावे अशी मी मागणी करतो.

अन्जलि's picture

7 Jun 2008 - 12:51 pm | अन्जलि

मनिश खुप छान लेख. एकन्दरित आपल्या सिमा आपल्याला कळ्ल्या कि आयुश्य खुप सोपे होते असे वाटते नाहि का? मग अमुक एक गोश्ट मला येत नाहि ह्याचि फार खन्त वाट्त नाहि. जरुरि थोडी आहे कि प्रत्येकालाच सर्व गोश्टी करता आल्या पहिजेत. कोणी कशात हुशार असेल तर कोणी कशात. शेवटि सर्व आप्ल्या मनावर असते.

अरुण मनोहर's picture

7 Jun 2008 - 1:12 pm | अरुण मनोहर

>>>जरुरि थोडी आहे कि प्रत्येकालाच सर्व गोश्टी करता आल्या पहिजेत. कोणी कशात हुशार असेल तर कोणी कशात.

असे जर असेल तर एका टीम मधे वेगवेगळे स्कील्स असलेले खेळाडू घेतात, ते सर्वांनी मिळून एक्संध चांगले प्रदरशन क्ररावे म्हनून. मग एकाच टीम मढील खेलांडू मधे स्परधा का होते? व ते एक्मेकांच्या विरुध का वाग्तात?

अरुण मनोहर's picture

7 Jun 2008 - 1:13 pm | अरुण मनोहर

>>>जरुरि थोडी आहे कि प्रत्येकालाच सर्व गोश्टी करता आल्या पहिजेत. कोणी कशात हुशार असेल तर कोणी कशात.

असे जर असेल तर एका टीम मधे वेगवेगळे स्कील्स असलेले खेळाडू घेतात, ते सर्वांनी मिळून एक्संध चांगले प्रदरशन क्ररावे म्हनून. मग एकाच टीम मढील खेलांडू मधे स्परधा का होते? व ते एक्मेकांच्या विरुध का वाग्तात?

विसोबा खेचर's picture

7 Jun 2008 - 1:15 pm | विसोबा खेचर

एकन्दरित आपल्या सिमा आपल्याला कळ्ल्या कि आयुश्य खुप सोपे होते असे वाटते नाहि का? मग अमुक एक गोश्ट मला येत नाहि ह्याचि फार खन्त वाट्त नाहि. जरुरि थोडी आहे कि प्रत्येकालाच सर्व गोश्टी करता आल्या पहिजेत. कोणी कशात हुशार असेल तर कोणी कशात. शेवटि सर्व आप्ल्या मनावर असते.

अहो हो, हे अगदी खरं आहे. परंतु,

मग अमुक एक गोश्ट मला येत नाहि ह्याचि फार खन्त वाट्त नाहि.

हे लिहून ही खंतच कुठेतरी बाहेर पडते आहे असं वाटत नाही का? मग "खंत वाटत नाही" असं म्हणण्यात काय अर्थ आहे? नायतर "आपल्याला खंत वाटत नाही बॉ!" अशी स्वत:च्याच मनाची समजूत घालणार्‍या वरील ओळी कशाकरता? :)

काय मनिषराव, माझा प्वाईंट बरोबर आहे ना? :)

आपला,
(वैचारिक!) तात्या.

जे. कृष्णमुर्ती खरच फार अवघड जातात वाचायला आणि समजायला...पण अतिशय विद्वान माणूस आहे, इतका सखोल विचार केला आहे त्याने...अफलातून! त्याला नक्कीच कळते तो काय बोलतो आहे...फक्त आपल्याल फार अवघड जाते त्याच्या शब्दांच्या विविध छटा कळायला आणि त्यांचे वेगवेगळे अर्थ उमगायला...

पण ते जाऊ दे, हा लेख इतका किचकट व्हावा अशी अजिबात इच्छा नव्हती. :(
तात्या म्हणाले तसा प्रयत्न करतो साधारण सारांश द्यायचा....

मुद्दा आहे की कधी-कधी स्वत:च्या (निर्मीतिच्या/कलाकृतीच्या) सुमारपणाची/सामान्यपणाची जाणीव होऊन खूप वैफल्य येते..निराशा येते. तर मी असे म्हणत होतो की दुसरयाची निर्मिती कितीही सरस असल तरी आपण आपल्यल अमेल तशी निर्मिती जरूर करत रहावी...आणि त्यात जमेल तितकी सुधारणा करण्याचे प्रयत्न जरूर करावे. आपल्या (तथाकथित) सामान्यपणामुळे निराश न होता आपल्याच गतीचा, आपल्याच लयीचा, निर्मितीचा आनंद घ्यावा. सामान्यपणा/सुमारपणा व्यक्तीला (किंवा स्वतःला) न जोडता की त्याच्या कामापुरता मर्यादीत ठेवावा असे मला वाटते...

परिपुर्णतेचा ध्यास -- ह्यात मला असे म्हणायचे होते की प्रयत्नांवर किंवा निर्मितेच्या प्रोसेस वर जास्त भर असतो, ती अधिकाधिक चांगली व्हावी ह्यावर भर असतो. तर
परिपुर्णतेचा अट्ट्हास - ह्यात ती गोष्ट/निर्मिती 'अशीच' (इथे ज्याची त्याची परिपुर्णतची व्याख्या) व्हावी हा हट्ट जास्त असतो, भर असतो तो 'रिसल्ट्स' मिळाले पाहिजे ह्याच्यावर, आणि इथेच नेमका घोळ होतो.

तसेच सामान्यपणा/सुमारपणा हा सापेक्ष/तौलनिक असतो असे सगळ्यांनाच वाटले/पटले...तर मग तुलना किती कराव्यात आणि स्वतःला किती खिन्न करावे...कारण शाळेतला सर्वात हुशार विद्यार्थी कॉलेजातील अनेकांपैकी एक असू शकतो (परिघ वाढवले म्हटले ते ह्या अर्थाने)...

अर्थात 'सामान्यपणामुळे निराश न होता आपल्याच गतीचा, आपल्याच लयीचा, निर्मितीचा आनंद घ्यावा' हे वैचारिकदृष्टया कितीही पटले, तरी आपणही माणूसच आहोत, आपल्या सगळ्यांनाच थोडी खंत, थोडा हेवा...कधी असूया हि जाणवणारच...फक्त त्याचे रुपांतर द्वेष, मत्सर किंवा उदासीनता (डिप्रेशन) ह्यांत होऊ नये अशी काळजी घ्यावी, असे वाटते.....शब्द तसे 'हेवा' ला समानार्थी वाटतात, पण त्यातल्या भावना थोड्या वेगळ्या प्रकारच्या आणि खूप तीव्र असतात. असो!

फारच 'abstract' होत असेल तर माफ करा...लिहितांना मला जमत नाही आहे नेमकेपणे मांडायला...आणि लिहायला वेळही लागतो आहे खूप. :(

- मनिष

विसोबा खेचर's picture

7 Jun 2008 - 5:20 pm | विसोबा खेचर

आम्हाला समजेल अश्या साध्या सोप्या शब्दात लिहिलंत त्याबद्दल धन्यवाद मनिषराव :)

तर मी असे म्हणत होतो की दुसरयाची निर्मिती कितीही सरस असल तरी आपण आपल्यल अमेल तशी निर्मिती जरूर करत रहावी...

अगदी सहमत आहे! अहो नायतर मराठी आंतरजालावर एवढ्या सगळ्या मंडळींचं उत्तमोत्तम लेखन वाचून आम्हाला तर कीबोर्डला हातच लावायला नको होता! :)

तर परिपुर्णतेचा अट्ट्हास - ह्यात ती गोष्ट/निर्मिती 'अशीच' (इथे ज्याची त्याची परिपुर्णतची व्याख्या) व्हावी हा हट्ट जास्त असतो, भर असतो तो 'रिसल्ट्स' मिळालेच पाहिजे ह्याच्यावर, आणि इथेच नेमका घोळ होतो.

काहिसा असहमत! कुठला घोळ होतो ते सांगा बरं?!

माझ्या मते काही वेळेला परिपूर्णतेचा अट्टाहास हा असावाच लागतो, त्यामुळेच एखादी गोष्ट अधिकाधिक उत्तम रुपात आपल्यासमोर येते! मी जेव्हा १०० वेळा प्रयत्न करून पाहीन तेव्हाच कधितरी मला माझ्या आईच्या जवळपास जाणारी पुरणपोळी करता येईल! :)

तरी आपणही माणूसच आहोत, आपल्या सगळ्यांनाच थोडी खंत, थोडा हेवा...कधी असूया हि जाणवणारच...फक्त त्याचे रुपांतर द्वेष, मत्सर किंवा उदासीनता (डिप्रेशन) ह्यांत होऊ नये अशी काळजी घ्यावी, असे वाटते.....

हम्म, खरं आहे! नुकत्याच माझ्या काही जुन्या मराठी आंतरजालीय मित्रांना डिप्रेशन, द्वेष इत्यादींचा प्रादुर्भाव झाल्याचे मला कळले! ;)

फारच 'abstract' होत असेल तर माफ करा...लिहितांना मला जमत नाही आहे नेमकेपणे मांडायला...आणि लिहायला वेळही लागतो आहे खूप.

अहो त्यात माफी कसली? आता तुम्ही पुष्कळच समजेल असं लिहिलं आहे. मगाशी मात्र तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे याचा काहीच उलगडा होईना! वास्तविक आमच्यासारख्यांना समजावं म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा थोड्या सोप्या शब्दात लिहिण्याचे कष्ट पडले याबद्दल मीच दिलगिरी व्यक्त करतो! :)

जे. कृष्णमुर्ती खरच फार अवघड जातात वाचायला आणि समजायला...पण अतिशय विद्वान माणूस आहे, इतका सखोल विचार केला आहे त्याने...अफलातून! त्याला नक्कीच कळते तो काय बोलतो आहे...फक्त आपल्याल फार अवघड जाते त्याच्या शब्दांच्या विविध छटा कळायला आणि त्यांचे वेगवेगळे अर्थ उमगायला...

हम्म! हे मात्र खरं! अहो आम्हाला अजून 'मनिष' नाही पचला तर जळ्ळा कृष्णमूर्ती कुठला पचणार?! :)

असो,

मनिषराव, पुन्हा एकवार धन्यवाद...

तात्या.

नरेंद्र गोळे's picture

7 Jun 2008 - 5:25 pm | नरेंद्र गोळे

आपण सुरु करावे जे आपल्याला मनापासून करावेसे वाटते ते....जमेल तसे....आपल्या तथाकथित मीडिओक्रिटी सकट....परिपुर्णतेचा ध्यासाने, पण अट्टहासाने नाही...आणि मागे वळून, तृप्त होऊन बघावे स्वतःच्याच प्रगतीकडे... बघावी कालच्या अडखळणार्‍या, मीडिओकर पावलांची आजची डौलदार लय...कोणी पळत असेल शेजारी तर त्याची धाव, त्याची गती त्याला मुबारक....आपण करत रहावा आपला प्रवास आपल्या पायांनी, आपल्याच गतीने...स्वांतसुखाय! >>>>>

मनिष फारच प्रगल्भ विचार आहेत हे.

आपण जे साध्य करू शकू असे आपल्याला वाटते, नेमके तेच दुसर्‍याने साध्य करावे, पण आपल्याला साधू नये,
ह्यात आपल्या सुमारतेची जाण येते. असूया वाटते.

मात्र स्वाध्याय, सातत्य आणि स्वानंद यांच्या प्रत्ययातून साध्य होणारी हर एक क्षमता 'परिपूर्ण'तेचा आनंद निश्चितच देऊ शकते.

आपल्या संस्कृतीत, म्हणूनच ह्या तीन गुणांचे महत्त्व
स्थल, काल, व्यक्ती निरपेक्षतेने आपल्या सगळ्यांनाच 'परिपूर्ण'तेचा आनंद देऊ शकते.
आठवा सारेगमप मधे गाणारा ज्ञानेश्वर मेश्राम. त्याच्या स्वाध्यायाच्या, सातत्याच्या आणि स्वानंदाच्या
-अभंगांच्या जगात- तो अभंगच राहीला होता. परिपूर्ण. मग इतर कसेही असोत. कुठेही असोत. कधीही असोत.

इतर प्रतिसादकांचे प्रतिसादही अभ्यासपूर्ण आहेत.

मनिष's picture

9 Jun 2008 - 11:57 am | मनिष

मात्र स्वाध्याय, सातत्य आणि स्वानंद यांच्या प्रत्ययातून साध्य होणारी हर एक क्षमता 'परिपूर्ण'तेचा आनंद निश्चितच देऊ शकते.

हे आवडले...हा स्वाध्याय म्हनजे 'रियाज/प्रॅक्टीस' ह्या अर्थाने का?
"ज्ञानेश्वर मेश्राम" माहित नाही - सध्या घरी टि. व्ही. नाही, त्यामुळे ह्या सर्वांपासून दूर आहे! :)

आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचेच आभार!

मनीष! बुल्स आय!
आता कसं जीग सॉ पझलचे तुकडे जागच्या जागी फीट्ट बसल्यासारखे वाटले!
तू सोपे विवेचन केलेच आहे. त्यामधून मी माझ्यासाठी काही पराग कण उचलतो.----->

दुसरयाची निर्मिती कितीही सरस असल तरी आपण आपल्यला जमेल तशी निर्मिती जरूर करत रहावी...आणि त्यात जमेल तितकी सुधारणा करण्याचे प्रयत्न जरूर करावे.

परिपुर्णतेचा ध्यास आणि परिपुर्णतेचा अट्ट्हास ह्यातला फरक ओळखणे.

तुलना किती कराव्यात? आणि स्वतःला किती खिन्न करावे?......

वाहवा! मन तृप्त झाले. मनीष, अन्ज्ली तै नी म्हटल्याप्रमाणे "कोणी कशात हुशार असेल तर कोणी कशात."
हा विवेचन एपिसोड तुला जे कॄष्णमूर्तींच्या रस्त्यावर जायला खुणावतो आहे की काय?

मनिष's picture

8 Jun 2008 - 2:10 pm | मनिष

जे. कृष्णमुर्ती मी खर तर फार वाचले नाहीत, त्यची ३ पुस्तकांची सिरीज आणली होती, पण जरा अवघड/जड व्हायला लागले, म्हणून ठेवून दिले, त्यालाही आता कित्येक वर्ष झालेत. पण त्यांचे काही विचार, quotes लक्षात राहिलीत...जमल्यास लिहीन त्यातल्या एखाद्यावर.

मराठी_माणूस's picture

9 Jun 2008 - 1:42 pm | मराठी_माणूस

जे. कृष्णमुर्ती मी खर तर फार वाचले नाहीत, त्यची ३ पुस्तकांची सिरीज आणली होती, पण जरा अवघड/जड व्हायला लागले, म्हणून ठेवून दिले, त्यालाही आता कित्येक वर्ष झालेत. पण त्यांचे काही विचार, quotes लक्षात राहिलीत...जमल्यास लिहीन त्यातल्या एखाद्यावर.

लवकर येउ द्या , खुप उत्सूकता आहे

मन's picture

9 Jun 2008 - 8:08 pm | मन

"दुसरा एखादा फार मोठा कलाकार आहे, आणि आपल्याला त्याच्याइतकी कला येत नाही म्हणुन आपल्या पोटात
जो पोटशुळ उठतो, त्याचं काय करायचं?" असा सगळ्या चर्चेचा सोप्या भाषेत अर्थ सांगता यील.
काय? बरोबर का नाय?
.
..
...
मी काय म्हणतो, दिसला समोर थोर कलाकार, तर करा ना सलाम त्याच्या कलेला,,आणि
माना ना भगवंताचे आभार इतकी सुंदर कला पाह्यला मिळाली ह्याबद्दल.
अहो, नुस्ता कलाकार होउन कसं चालेल?
जरा रसिक बनुन घ्या ना आनंद्.तुम्ही विनोदी लेखक असाल, तरीसुद्धा दुस्सर्‍याच्या विनोदावर जरा हसुन पहा.
त्याच्यासाठी नाही, तर तुमच्या स्वतःसाठी,बघा.तुम्हालाच कसं प्रसन्न वाटतं ते.

(आता तुम्ही स्वतः दोन्-पाच एकांकीका लिहिल्यात म्हणुन काय भाइ कातुजपाशी "तुझे आहे तुजपाशी"
किंवा "चाळ" वगैरेंच्या प्रयोगाला जाउन त्यांच्या नावानं(किंवा स्वतःच्या अकलेच्या नावानं)बोटं मोडत बसणार,
की त्यातला खुमासदार शैलीचा मनमुराद आनंद लुटणार? सांगा पाहु? )
आणि स्वतः तुमच्या कडे कला असेल तर प्रश्नच नाही, योग्य मार्गानं वापरा.
लोकांचं प्रेम मिळवा.
आणखी हवं तरी काय असतं हो आयुष्याकडुन.

(ता.क. :- आत्ताच प्रथम मानांकित दिग्गज टेनिस खेळाडु फेडरर ला हरवुन राफेल नादाल ह्यानं
पुनश्च फ्रेंच ओपन जिंकली. जिंकल्याबरोब्बर त्याचं हसमुखानं कुणी अभिनंदन केलं असेल, तर स्वतः फेडररनं.
(तो काही विक्षिप्त खेळाडुंप्रमाणे ब्याट फेकुन पाय आपटीत नाही ग्येला.) आणि त्याचं अभिनंदन स्वीकारताना नादाल हळुच
त्याला म्हणला "सॉरी(कारण मी ही तुझा फ्यान आहे,आणि मीच तुला हरवुन विजेतेपदापासुन वंचित ठिवलय.)"
आता विचार करा, हे नादाल आणि फेडरर पुन्हा निवृतीनंतर वगैरे हीच म्याच पाहतील, तर त्यांना काय वाटेल?
आपल्या दोस्तीचा/खेळाडुवृत्तीचा अभिमान. काय? बरोबर ना?
)
बास......
इतकच बोलायचं होतं.
कारण इतकच आम्हाला कळालेलं होतं.

आपलाच,
मनोबा

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jun 2008 - 9:19 pm | प्रकाश घाटपांडे


"दुसरा एखादा फार मोठा कलाकार आहे, आणि आपल्याला त्याच्याइतकी कला येत नाही म्हणुन आपल्या पोटात
जो पोटशुळ उठतो, त्याचं काय करायचं?" असा सगळ्या चर्चेचा सोप्या भाषेत अर्थ सांगता यील.
काय? बरोबर का नाय?


हा पोटशूळ हा रेहमानी किड्या सारखा असतो. याच वास्तव्याच ठीकाण मिपाकरांना माहितच आहे. या किड्याच काय करायचं?
प्रकाश घाटपांडे

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jun 2008 - 10:33 pm | llपुण्याचे पेशवेll

काय आहे, या सुमारतेचा मी शाळेपासूनचा शिकार आहे. कारण वर्गातल्या नं. १ प्रमाणे मी अभ्यासही करू शकत नव्हतो आणि खालच्या तुकडीतल्या मुलांप्रमाणे खुलेआम टगेगिरी पण करू शकत नव्हतो(कारण तथाकखित वरची तुकडी). :(
म्हणजे काय अतिशय हुशार आणि अतिशय टग्या दोन्ही प्रकारच्या मुलांची कामगिरी पाहून पोटशूळच उठयचा रे. कला बिला राहीली दूर इथे तर साध्या साध्या गोष्टीतही पोटशूळ उठत होता. यावर उपाय म्हणजे प्राप्तपरीस्थितीचा स्विकार करणे. त्यामुळे मी वर्गात जमेल तेवढा टगेपणा करत असे. :)
पुण्याचे पेशवे

आंबोळी's picture

9 Jun 2008 - 9:22 pm | आंबोळी

"दुसरा एखादा फार मोठा कलाकार आहे, आणि आपल्याला त्याच्याइतकी कला येत नाही म्हणुन आपल्या पोटात
जो पोटशुळ उठतो, त्याचं काय करायचं?" असा सगळ्या चर्चेचा सोप्या भाषेत अर्थ सांगता यील.
काय? बरोबर का नाय?

श्या....
मनोबा , तुम्ही तर विषयच संपवलात राव. इतक सोप्या भाषेत सांगीतलेत की आता आम्हाला चर्चा करायला काही शिल्लकच ठेवले नाहित.

(धारी)आंबोळी

विसोबा खेचर's picture

9 Jun 2008 - 10:20 pm | विसोबा खेचर

आंबोळी,

कंदीलाचं चित्र मस्तच आहे रे. आपण घाबरतो बॉ तुझ्या कंदिलाला!

बाकी तू देखील अंमळ वेडझवाच दिसतोस! :)

आपला,
तात्या मतकरी.

प्रभाकर पेठकर's picture

9 Jun 2008 - 10:51 pm | प्रभाकर पेठकर

'सुमारपणा' ह्या शब्दाला बरीचशी नकारात्मक (निगेटीव्ह) छटा आहे. 'मिडिऑकर' म्हणजे 'मध्यम कुवतीचा' असे मला वाटते.
प्रत्येकाची 'कुवत' वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी असते. गणित न जमणार्‍या एखाद्याला चित्रकला चांगली जमते, व्यवहारात दुर्बल असणारा एखादा फार सुंदर सुंदर कविता करू शकतो. म्हणजेच माणूस कुठे निम्न कुवतीचा, कुठे 'मध्यम कुवतीचा' तर कुठे उच्च कुवतीचा असू शकतो/असतो.

स्वतःची मीडिओक्रिटी जरी ओळखता आली तरी स्वीकारता, पचवता येत नाही. तो पचवण हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार होतो

मला नाही वाटत असे. माझी 'मध्यम कुवत' ओळखणं आणि स्वीकारणं मला (आणि माझ्या ओळखितल्या बर्‍याच जणांना) कधीच कठीण गेले नाही. पण जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे 'कुवत' वाढविण्याचा मी प्रयत्न जरूर करतो. म्हणजेच काय? मिळेल तिथून मिळेल ते ज्ञान मिळविण्याचा सतत प्रयत्न करतो. (आपण सर्वच जणं हे करीत असतो) पण म्हणजे माझ्या 'मध्यम कुवतीची' मला खंत वाटते असे अजिबात नाही. सतत गुण आत्मसात करीत राहावे आणि दुर्गूण सोडून देत राहावे. असो.

अभिता's picture

9 Jun 2008 - 11:02 pm | अभिता

:\ अरे! आता मला कळले आमच्या संकुलातील लोकाचा पोटशूळ का उठतो ते (आमच्याकडे पाहुन) 8>

मेघना भुस्कुटे's picture

10 Jun 2008 - 6:31 am | मेघना भुस्कुटे

"आपण सुरु करावे जे आपल्याला मनापासून करावेसे वाटते ते....जमेल तसे....आपल्या तथाकथित मीडिओक्रिटी सकट....परिपुर्णतेचा ध्यासाने, पण अट्टहासाने नाही...आणि मागे वळून, तृप्त होऊन बघावे स्वतःच्याच प्रगतीकडे... बघावी कालच्या अडखळणार्‍या, मीडिओकर पावलांची आजची डौलदार लय...कोणी पळत असेल शेजारी तर त्याची धाव, त्याची गती त्याला मुबारक....आपण करत रहावा आपला प्रवास आपल्या पायांनी, आपल्याच गतीने...स्वांतसुखाय.""

खरं आहे. पण माझा अनुभव असा -

आपल्याच सुमारपणामुळे निराश-हताश होण्याच्या वेळा येतात. दर वेळी ही समजावणी सुचतेच असं नाही. सुचलीच, तरीही हट्टी डोकं ती मानतंच असंही नाही. मूड स्विंग्समधे जात राहते मी. अशा शहाण्या समजावण्या पटतात, तेव्हा जग सुंदर असतं. आणि जेव्हा हट्टीपणा डोकं वर काढतो, तेव्हा अनिल अवचट वा आनंद नाडकर्णींसारखे चॅम्पियनही सगळ्याचं सोपेकरण करून टाकताहेत, असा खवचटपणा करायलाही डोकं मागेपुढे पाहत नाही.

यावरचा कायमस्वरूपी हमखास उपाय मलातरी अजून सापडलेला नाही. :(

नाही म्हणायला कधीकधी स्वतःचं समर्थन करताना 'शेक्सपिअरचा काय मूड जात नव्हता की काय? की त्याच्या हातून कधी काही ट्रॅश लिहिलं गेलं नव्हतं?' असले आचरट प्रश्न मात्र सुचतात. आणि बाकी काही नाही, तरी त्यातल्या निखळ आणि बेसलेस उद्धटपणामुळे मला तात्पुरतं हसायला तरी नक्की येतं!

'स्वांतसुखाय' हा शब्द बाकी अगदी लाखात एक. अगदी खणखणीत खरा. त्याचसाठी हे सगळे उपद्व्याप...

मनिष's picture

10 Jun 2008 - 9:44 am | मनिष

आपल्याच सुमारपणामुळे निराश-हताश होण्याच्या वेळा येतात. दर वेळी ही समजावणी सुचतेच असं नाही. सुचलीच, तरीही हट्टी डोकं ती मानतंच असंही नाही. मूड स्विंग्समधे जात राहते मी. अशा शहाण्या समजावण्या पटतात, तेव्हा जग सुंदर असतं. आणि जेव्हा हट्टीपणा डोकं वर काढतो, तेव्हा अनिल अवचट वा आनंद नाडकर्णींसारखे चॅम्पियनही सगळ्याचं सोपेकरण करून टाकताहेत, असा खवचटपणा करायलाही डोकं मागेपुढे पाहत नाही.

खरं आहे...अगदी १०१% निखळ सत्य!!!

आपल्याला मुड स्विंग्स असणारच...विचारांच्या पातळीवर (cognitively), विवेकाने हे पटले तरी आचरतांना (behaviour) ते आपल्या हट्टी भावनांना पटेल असे नाही....म्हणून मुड स्विंग्स असणारच...फक्त तोच एक विचार/भावना (वैषम्य,द्वेष) कायम मनात वास्तव्य करून राह्त नाही ना हे बघायचे... Otherwise, every rational person does exercise his quota of irrationality! :)

मेघना भुस्कुटे's picture

10 Jun 2008 - 6:44 am | मेघना भुस्कुटे

कायमस्वरूपी उपाय नाही असं म्हटलं खरं. पण अशा काळ्या मूडमधून बाहेर पडताना एक गोष्ट मात्र मला नेहमी आठवते.

मेघना पेठेची एक मुलाखत ऐकली होती. तिच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी तिला प्रकाशकांनी विचारलं, की पुस्तकाला प्रस्तावना कुणाची घेऊ या? त्यावरचं तिचं स्वच्छ उत्तर - "ते 'आदर-बिदर' सगळं ठीक आहे. पण निव्वळ ज्येष्ठता या एका निकषावर जर कुणी मला 'असं लिही वा तसं लिही' असं सांगणार असेल, तर सॉरी. आपल्याला प्रस्तावना नको. इथे दुसर्‍या कुणाचा अनुभव माझ्या काहीच कामाचा नाही. गांधीजी, शिवाजी आणि ज्ञानेश्वर आणि शेक्सपिअर जगून गेले, म्हणून आता आपण जगायलाच नको, असं म्हणतो का आपण? प्रत्येकाला आपलं-आपलं स्वतंत्र जगावंच लागतं ना? तसंच लिहिण्याचंही आहे. माझ्याआधी कुणीही काहीही कितीही थोर लिहून गेलं असलं, तरी मला दिसलेलं माझं मी लिहिलंच पाहिजे. त्याला पर्यायच नाही."

शब्द कदाचित इकडे तिकडे असतील, पण आशय हाच होता. या तिच्या उत्तराची मात्र मदत होते. :)

मनिष's picture

10 Jun 2008 - 9:46 am | मनिष

गांधीजी, शिवाजी आणि ज्ञानेश्वर आणि शेक्सपिअर जगून गेले, म्हणून आता आपण जगायलाच नको, असं म्हणतो का आपण? प्रत्येकाला आपलं-आपलं स्वतंत्र जगावंच लागतं ना? तसंच लिहिण्याचंही आहे. माझ्याआधी कुणीही काहीही कितीही थोर लिहून गेलं असलं, तरी मला दिसलेलं माझं मी लिहिलंच पाहिजे. त्याला पर्यायच नाही.

सलाम ह्या विचारांना!!

अन्जलि's picture

10 Jun 2008 - 3:40 am | अन्जलि

मला जे म्हना य चे होते तेच पेटकर सहेबानि स्पश्ट केले धन्य्वाद. प्रत्येकामधे कहितरि गुण असतातच फक्त ते आपल्याला ओळ ख ता आले पहिजेत.

काय बोलू. विचारांना चालना देणारा इतका चांगला लेख वाचून मनात बरेच विचार येऊन गेले पण जवळजवळ सगळेच्या सगळे एकाच शेडमधले (छटा) होते. अन ती छटा ही की - आपल्याला जे काही वेडेवाकडे चालता येते, बोबडे बोलता येत त्याची ध्येयपूर्ती एकाच गोष्टीने होते ती म्हणजे दुसर्‍याला मदत करणे किंवा आनंद देणे. स्व विसरुन केलेली कोणतीही क्रिया ९९% उत्तम घडून जाते. तो श्लोकही शोधायचा खूप प्रयत्न केला "त्वमेव सर्वं गोविंदम, तुभ्यं समर्पयामि" का काहीसा.

मुख्य म्हणजे दुसर्‍याच्या हितासाठी काहीना काही करत रहाणे बेस्ट असे वाटते. कदाचित मीन राशी १० व्या घरात (Medium Coel) पडल्याने अन ६ व्या घरात stallium असल्याने असेल (असो! ज्योतिषावर चर्चा नको)पण माझी खात्री आहे की आपल्याला मिळालेले गुण हे अन्य लोकांच्या उपयोगी पडल्यानेच उजळतात. अतिशय उत्तम (बियॉन्ड युअर एक्स्पेक्टेशन) कारायचे असेल तर दुसर्‍याची सेवा करा , त्याच्या आत्म्याचे दुवे घ्या. जे कराल ते हातून अत्युत्तमच घडेल
_________________
अवांतर झाले असल्यास क्षमस्व.

मुख्य म्हणजे दुसर्‍याच्या हितासाठी काहीना काही करत रहाणे बेस्ट असे वाटते. कदाचित मीन राशी १० व्या घरात (Medium Coel) पडल्याने अन ६ व्या घरात stallium असल्याने असेल (असो! ज्योतिषावर चर्चा नको)पण माझी खात्री आहे की आपल्याला मिळालेले गुण हे अन्य लोकांच्या उपयोगी पडल्यानेच उजळतात. अतिशय उत्तम (बियॉन्ड युअर एक्स्पेक्टेशन) कारायचे असेल तर दुसर्‍याची सेवा करा , त्याच्या आत्म्याचे दुवे घ्या. जे कराल ते हातून अत्युत्तमच घडेल

मला हे फारसे नाही पटले. मला वाटते, ज्या गोष्टीत काम करतांना भान हरपून जाते, मनापसून आनंद मिळतो (flow ह्या अर्थाने) ती गोष्ट करावी. आणि आधी लिहिले तसेच, स्वांतसुखाय, process satisfaction हे मनात ठेवून करत जावे. त्या मार्गातच कुठेतरी मग 'doing' पासून ' being' कडे जाता येईल असे वाटते!

मदिरालय जाने को घर से चलता है पीनेवला,
'किस पथ से जाऊँ?' असमंजस में है वह भोलाभाला,
अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ -
'राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला।'। ६।

आयुर्हित's picture

10 Apr 2014 - 12:23 am | आयुर्हित

अतिशय उत्तम (बियॉन्ड युअर एक्स्पेक्टेशन) करायचे असेल तर दुसर्‍याची सेवा करा, त्याच्या आत्म्याचे दुवे घ्या.
जे कराल ते हातून अत्युत्तमच घडेल.

अगदी मनासारखे बोललात.१००% सहमत. उत्तम सारांश!

उत्तम चिंतनशील लेख; मजा आली वाचताना.
मला वाटतं आपण सगळीच माणसं काही बाबतीत सुमार असतो, काही विषयांत/व्यवहारांत ठीकठाक असतो आणि काहींत उत्तम असतो. ज्या गोष्टी आपल्याला नीट जमत नाहीत त्या करण्याची सक्ती झाली (जगण्यात अशी सक्ती अनेकदा होते; प्रत्येक वेळी 'दरवाजे बंद करण्याचा' पर्याय असतोच असं नाही) की आपल्याला नैराश्य येतं, चांगल्या करता येणा-या गोष्टीही त्यामुळे झाकोळून जातात.
आपल्यापुरतं 'सोडून देता येण्याजोगं काय आणि अपरिहार्य काय' याची जाण आली की (कदाचित) अपरिहार्यतेने निराश होण्याचे प्रसंग कमी येतात..स्वतःकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या नाहीत की गोष्टी सोप्या होतात. आता तरीही मला चित्र काढता येत असतं; मला चांगलं लिहिता येत असतं; मला अमुक करता आलं असतं तर... अशा त-हेची क्षणिक खंत राहते .... पण तो मानवी स्वभाव आहे!

मनिष's picture

10 Apr 2014 - 3:04 pm | मनिष

छान प्रतिसाद!

मितान's picture

10 Apr 2014 - 4:57 pm | मितान

तुझ्या या लेखाने आर इ बी टी ची काही प्रमाणात उजळणी झाली.

यावर अजून थोडं विस्ताराने लिही. सहा वर्षांनी हाच लेख वाचून तुला आज काय वाटते ते वाचायला आवडेल :)

मनिष's picture

10 Apr 2014 - 5:36 pm | मनिष

काल शुचि ह्यांना लिहिलेल्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे -

मला वाटते, ज्या गोष्टीत काम करतांना भान हरपून जाते, मनापसून आनंद मिळतो (flow ह्या अर्थाने) ती गोष्ट करावी. आणि आधी लिहिले तसेच, स्वांतसुखाय, process satisfaction हे मनात ठेवून करत जावे. त्या मार्गातच कुठेतरी मग 'doing' पासून ' being' कडे जाता येईल असे वाटते! म्हणजे, मग काही (आवडते) 'करण्यापेक्षा', मी ते (आवडते काम) करतांना काय 'असतो' ते समजून घ्यायचा प्रयत्न करतोय....म्हणजे समजा, एखाद्याला लिहायला खूप आवडते, तर मग 'व्यक्त होणे' हेच आपले 'असणे' आहे का हा शोध घ्यावा. "लिहिणे" ही एक क्रिया/करणे झाले...पण 'व्यक्त होणे' ही त्यामागची प्रेरणा असू शकते. 'व्यक्त होणे' अर्थातच अभिनयातून होऊ शकते, चित्रांमधून होऊ शकते....तशा अनेक शक्यता आहेत. पण मुळात उत्तरे ही स्वतःला 'आतूनच' मिळतात (असे मला वाटते).

मग फक्त तसे 'असणे' हेच आपले प्रयोजन (पर्पज) किंवा जगणे का असू नये? असा विचार मी सध्या करतोय...खूप प्रश्न आहेत, आणि उत्तरांची घाई नाही. मला फारसे नीट मांडता येत नाही आहे आत्ता, कारण माझाच विचारांमधे अजूनही थोडा गोंधळ आहे. पण मी जे करतोय, तेच जर मनापासून माझे inner calling असे आहे, तर मग ते करण्याची मजा हेच तर साधनही आहे आणि साध्यही. हे साधारपणे आधी म्हटल्याप्रमाणे 'process oriented instead of result oriented' अशा दृष्टीकोनाबद्दलच आहे. मला ह्या काळात प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे, आपले प्रयोजन (पर्पज) काय हेच बर्‍याच वेळा कळत नाही. मग हे केले तर ते मिळेल/मिळते अशा ठोकताळ्यांनी आपण आयुष्य, करीअर आखत राहतो....मग ती अपरिहार्य स्पर्धा, असुया, मत्सर वगैरे! काही भाग्यवंत स्वतःच्या आतल्या नादबरोबर एकतान होऊन आयुष्य सुरेल करतात....आणि इतरांबरोबरही बेसूर होऊ देत नाही. तसे आपल्याला जमेल का असा शोध घेतोय....

मला अजून स्पष्टपणे आणी सरळपणे हे सांगता आल्यास इथे येऊन नक्की लिहीन.