आमची प्रेरणा: मीही कवि होणार.
अलिकडे 'आव आव, झटपट जिलब्या पाडके हलवाई बन जाव' असली काही मोहीम चालू असलेली दिसते. इथं असं नव्हे एकूणच सगळीकडे. तेंव्हा म्हटलं त्याच भूमिकेत शिरून त्याच भूमिकेचा जरा समाचार घ्यावा!
हे अतिटुकार विडंबन करताना स्पा यांची खूपच मदत झाली त्यांचे आभार.
डिस्क्लेमरः खालील कविता पूर्णपणे काल्पनिक असून श्री मेवे यांच्या कवितेचे विडंबन आहे. काही मिपाकरांच्या लिखाणाशी या कवितेचे काही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा किंवा हे विडंबन सार्वत्रिक असल्याचा पुरावा.
होणार, मीही हलवाई होणार,
लाडू नको मज, नकोत पेढे
सोनपापड्या त्या असतात भलत्या
साच्यामध्ये पीठ भरूनी
जिलब्या मी पाडणार, . मीही हलवाई होणार!
बेसन तेवढे ठाऊक मजला
तितके पुरते हलवाई व्हायला
पीठ मळुनी, बाकिचा
साचा मी भरणार.. मीही हलवाई होणार
जिलेबीबाई हवीच मिठी
पण साखरेच भाव सदाच चित्ती
वर वर जुनाटमेवा पेरून
तुमचे पोट भरणार.. मीही हलवाई होणार!
तुकडा जेव्हा घेतला हाती,
लिबलीबत तो पडता खाली
मठ्ठ्याची वाटी देऊन हाती
तुमच्या गळी उतरवणार, मीही हलवाई होणार!
जिलबीसह जर इम्रती असली,
डब्बल स्वादाची खात्री जाहली
काळ्या कळकट तेलावरती
तळुनी मी घेणार.. मीही हलवाई होणार!
रोज अनेक या फ्रीक्वेन्सीने
जिलब्या पाडीन जलदगतीने
संपलेली ताटे बघुनी
आनंदित मी होणार .. मीही हलवाई होणार!
जिलब्या माझ्या नसतील भारी
लोकांना ना आवडल्या तरी
बेसनाचा मुबलक कच्चा
माल मी पुरविणार.. मीही हलवाई होणार!
प्रतिक्रिया
3 Dec 2011 - 12:03 pm | अन्या दातार
वावा.
वल्लीशेठनी हलवाई बाजाराचे चांगलेच निरीक्षण केलेले आहे याची आज पुनःप्रचिती आली. ;)
3 Dec 2011 - 3:20 pm | इंटरनेटस्नेही
काहीतरी सक्षम उपाय व्हायला हवा नाहीतर लवकरच ग्राहक कंटाळतील!
3 Dec 2011 - 5:00 pm | अत्रुप्त आत्मा
वाहव्वा..असं काही चित्र उतरलय,की आंम्हाला साक्षात वल्ली महाराज गोल पंचा लाऊन हतात तांब्या घेउन उभे आहेत,स्पावड्या तत्परतेनी तांब्यात पिठ घालतोय...पुढे---मंजे कढैत ;-) जिलब्या पडतायत,आणी कधी मिळेल,म्हणुन वैतागलेलं गिह्राइक लायनीत उभ आहे... असं कगळ चित्र येकदम दिसल... मुळ कल्पनाच मजेशीर आहे...त्यामुळे इडंबन बी चांगला 'भाव' मिळवणार हे नक्की ,,, :-)
3 Dec 2011 - 5:44 pm | अजितजी
लाईक चा बटन ठेवा कि राव ---अजितजी
3 Dec 2011 - 8:20 pm | पैसा
विडंबन आवडलं. यावेळेला स्पा ने जिलब्यांचं चित्र नाही दिलं ते?
3 Dec 2011 - 10:27 pm | ५० फक्त
आज दुपारी वाचली नव्ह्ती ही कविता नाहीतर,उत्तमवाल्याकडं लई भारी जॉब व्हेकेन्सी आहे सध्या.
असो, विडंबन एकदम भारी जमलंय.
या खास शिंदेशाही तोड्यासारख्या जिलेब्या घ्या.
4 Dec 2011 - 11:31 am | धन्या
जबरा विडंबन !!!
5 Dec 2011 - 10:34 am | स्पा
हॅ हॅ
भारी विडंबन रे...
बाकी ५० ने जिलब्यांचा फोटू देऊन माझे काम हलके केले, त्याबद्दल त्याचे धन्यवाद :)
काळ्या कळकट तेलावरती
तळुनी मी घेणार.. मीही हलवाई होणार!
म्हंजे असे का रे? ;)
5 Dec 2011 - 10:57 am | ५० फक्त
@ स्पा, धन्यवादाबद्दल धन्यवाद,
अवांतर - अजुन कसले फोटो दिले असते तर अजुन हलके झाला असतात तुम्ही म्हणुन नाही टाकले.