'सह-गान' (विदुषी वसुंधरा कोमकली- कलापिनी कोमकली)

चैतन्य दीक्षित's picture
चैतन्य दीक्षित in जनातलं, मनातलं
28 Nov 2011 - 7:24 pm

.... 'चैत्या, अरे तुम्ही चेन्नईत असून किती रे भाग्यवान?' अशा वाक्याने बंगलोरमधली एक मैत्रीण मला पुढे एकही अक्षर उच्चारू न देता फोनवर सुरू झाली ! मागच्याच आठवड्यात शुभा मुद्गलांचं गाणं ऐकायला गेल्याचं मी तिला सांगितलं होतं. आणि तिने मला या आठवड्यात चेन्नईत होणार्या श्रीमती वसुंधरा कोमकली आणि कलापिनी कोमकली यांच्या 'सह-गान' बद्दल सांगायला फोन केला होता.
माझ्या पत्रिकेत त्या दोन आठवड्यात 'संगीत-घबाड' योग असणार खास !
आधीच्या आठवड्यातली शुभा मुद्गलांची चांगली अडीच तास रंगलेली मैफल अजून कानात घुमत होती. मैफलीच्या शेवटी भैरवीत गायलेलं कबीराचं निर्गुणी भजन 'रस गगन गुफा में अजर झरे' हे तर मैफलीनंतर कित्येक दिवस कानात रुंजी घालत होतं आणि त्यात या आठवड्यात हा 'सह-गान' कार्यक्रम !
शास्त्रीय संगीत ऐकायला सुरुवात करायच्याही आधीपासून कुमारांवर नितांत श्रद्धा! अर्थात, त्यांच्या 'उड जायेगा हंस अकेला' मुळे.पूर्वी दूरदर्शनवर रविवारी एक 'यूजीसी' प्रोग्राम लागायचा, त्याच्या आधी एक नाव पाण्यातून चालली आहे आणि तिचं वल्हं पाणी कापतंय असं चलच्चित्र असायचं. पाण्यावर सूर्याचे किरण चमकायचे आणि वल्ह्याचा 'चुबुक' असा आवाज येत असायचा. त्याच्या बरोबर हे 'उड जायेगा हंस अकेला' असायचं. वल्ह्याचा आवाज त्या भजनी ठेक्यात मिसळून असायचा.ह्या सगळ्या दृक्श्राव्य परिणामामुळे असेल, पण 'उड जायेगा हंस अकेला' हे खास आवडीतलं. जसजसं शास्त्रीय संगीत अधिक ऐकलं जाऊ लागलं तसं त्या क्षेत्रातल्या या जादूगाराबद्दल अधिकच आकर्षण निर्माण झालं. कुमारांची राग मांडण्याची पद्धत, रागातल्या स्वरांबरोबरच शब्दांमधलंही सौंदर्य दाखवण्याची तरलता ह्या सगळ्याच गोष्टी श्रोत्यावर गारूड करतात. या बरोबरच कुमारांचा वक्तशीरपणा, मैफलीबद्दलचा काटेकोरपणा इ. बद्दलही ऐकायला वाचायला मिळून कुमारांवर प्रेम जडलं. पु. लं च्याच भाषेत सांगायचं तर कुमारांच्या स्वरांचं हे 'न उतरणारं भूत' आहे!'
"कुमारांचं गाणं प्रत्यक्ष ऐकायला मिळालं नाही ह्याची खंत भरून काढता येईल"अशा विचाराने कार्यक्रमाला गेलो आणि तुडुंब प्रसन्न झालो. तिकिटं कार्यक्रमस्थळीच मिळणार होती म्हणून वेळे आधीच तिथे पोहोचलो. कार्यक्रम अगदी वेळेत सुरू झाला. खास निमंत्रितांसाठीच्या रांगेच्या बरोब्बर मागच्या रांगेत जागा मिळाली. अशा मोठ्या कलाकारांना त्यांची कला सादर करत असताना जवळून बघायला मिळणं ही माझ्या दृष्टीनं नशिबाची गोष्ट आहे. वसुंधराताई आणि कलापिनी यांनी संध्याकाळच्या वेळेला साजेसा 'मारु-बिहाग' निवडला होता. वसुंधराताईंचं वय ८१ आहे, हे त्यांच्या गाण्यात जाणवतही नव्हतं. मारू-बिहागाच्या आलापात वसुंधराताईच बाजी मारत होत्या. 'रसिया हो ना जाओ बिदेस' अशी मारू-बिहागातला विरह अधिक प्रकट करणारी विलंबित एकतालातली रचना त्यांनी सादर केली आणि मग 'सुनो सखी सैय्या जोगिया बन जाय' अशी द्रुत तीनतालातली रचना आणि शेवटी अजून एक द्रुत एकतालातली रचना त्यांनी सादर केली. साधारण तासभर तरी मारूबिहाग रंगला असेल. मैफलीत पुढे त्यांनी 'गौड मल्हार' गायला. यूट्यूबवरती कुमारांनी गायलेली एक गौड मल्हारातली चीज आहे (सह्याद्रीच्या पाऊलखुणा कार्यक्रमातली) तीच कलापिनी कोमकलींनी सादर केली.
'आमरैय्यन के बिरखन के-
-पातन पर पटभेजन बूंदरिया चमके |
तर तर झरना झरवन लागी
नजर पडी ललचैयन के |
ताल पे दादुर डूंगर मुरवा
डार पे कोयल बोले शोकरंग
भूम हरी अरु पात भरी,
रितू बरखा रंग लैयन के |

आहाहा, बरखा रितूचं इतकं सुंदर वर्णन आणि तितकंच गौड मल्हाराच्या स्वरांचं एक वेगळंच रूप डोळ्यासमोर उभं राहिलं. जी गायनशैली कुमारांची, तीच तंतोतंत कलापिनी कोमकलींची. डोळे मिटून ऐकलं तर क्षणभर तरी का होईना, कुमार गातायत असंच वाटतं.
यानंतर त्यांनी एक दादरा गायला.
त्याचेही शब्द सुंदर होते. 'मै तोड लायी राजा, आम तोड लायी राजा' वसुंधराताईंच्या गाण्यावरून असं वाटत होतं की त्या मिटलेल्या डोळ्यांसमोर त्यांचा 'राजा' त्यांना दिसत असेल खास ! तो नक्कीच ऐकतोय, या भावनेनं त्या गाताहेत असंच वाटलं.
कुमारांचं संगीत क्षेत्रातलं कर्तॄत्व पाहता, त्यांनी माळवा प्रांतातल्या लोकसंगीताचा केलेला अभ्यास आणि त्याचा वापर हा दुर्लक्षिला जाऊच शकत नाही. या कार्यक्रमात त्या माळव्याच्या लोकसंगीताची एक झलक म्हणून 'तीज का गीत' ही ऐकायला मिळालं. फार आकर्षक चाल, तितकेच हृदयाचा वेध घेणारे शब्द (शब्द नीट उमगले नाहीत पण अर्थ समजला) एक अतिशय रम्य अनुभव.
'दळ रे बादळ बीज चमक्यो हे तारा
सांझ परे पियू लागे प्यारा |' असे ते शब्द होते.
नायिकेचं नायकाबरोबर काही शाब्दिक भांडण झालं आणि तो रागानं निघून गेलाय. त्यात आभाळ भरून आलं आणि नायिका अजूनच अस्वस्थ झाली. इतक्यात त्या भरून आलेल्या आभाळात तिला एक तारा दिसला आणि तिला आपल्या 'प्रिया'ची अजूनच तीव्रतेनं आठवण आली. मग ती स्वतःलाच कोसत असं म्हणते की (इथे ती नायिका म्हणते की तिच्या सख्या तिला म्हणतात हे ठाऊक नाही)
क्यो रे जबाब करो सजणा संग?
ज्वाबे करोनी तो पापे भरोनी | (तू अशी का भांडलीस त्याच्याबरोबर? आता भोग हे पाप... असा काहीसा अर्थ असावा)
हे गीत संपूच नये असं वाटावं इतका त्याचा ठेका आणि ती चाल वेधक होती. पण शेवटी वेळेची मर्यादा असल्याने कलापिनी कोमकलींनी मैफलीच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात केली; 'निर्गुणी भजन'!!
कुमार=निर्गुणी भजन असं समीकरण व्हावं इतकं अद्वैत कुमारांचे स्वर आणि कबीर, गोरखनाथ आदींच्या शब्दांचं आहे.
भजनी ठेका किंवा कहरवा हा कुमारांनी निर्गुणी भजनासाठी फारच वेगळ्या वजनात वापरला. काही वेळा तो ठेकाच त्या भजनाच्या 'निर्गुणत्वा'ची पूर्ण जाणीव करून देतो.
निर्गुणी भजनात त्यांनी एकूण ३ निर्गुणी भजनं थोडी थोडी गायली.
१- निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा, गाऊंगा
२- गुरुजी मै तो एक निरंजन ध्याऊ जी
३- धुन सुन के मनवा मगन हुवा रे
हे सगळं 'स्वर-कौमार' कानात साठवत घरी गेलो. अतिशयोक्ती वाटेल, पण 'निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा' हे निर्गुणी भजन, 'दळ रे बादळ बीच' हे लोकगीत आणि 'आमरैयन के बिरखन के' हा गौड मल्हार नंतरचे अनेक दिवस कानात घुमत होते. (आजही घुमतायत) इंटरनेटच्या कृपेने कुमारांचं आणि वसुंधराताईंचं एकत्र गायलेलं 'निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा' हे भजन यूट्यूबवर मिळाल. तोही दुवा येथे देईनच. ते ऐकलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे, ज्याच्यासमोर मृत्यू उभा आहे असा एक निस्पॄह योगी. मृत्यू समोर असूनही तो 'निर्भय' आहे. कारण त्याने 'निर्गुण' जाणलंय.
आणि तेच तो मृत्यूसमोरही गाणार आहे! जितका मृत्यू शाश्वत आहे तितकीच त्या योग्याची 'निर्भयता' सत्य आहे.
तितकाच त्याच्या आत्म्यापर्यंत भिनलेला सूर सच्चा आहे!

- चैतन्य.

संगीतअनुभव

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

28 Nov 2011 - 7:51 pm | श्रावण मोडक

बऱ्याच दिवसांनी काही लिहिलेलं दिसलं. लिहित रहा!

पैसा's picture

28 Nov 2011 - 7:52 pm | पैसा

छान वर्णन. कुमारजींचा मुलगा मुकुल शिवपुत्र याची एक कॅसेट फार वर्षांपूर्वी ऐकली होती, तोही प्रतिभावंत गायक असावा असा अंदाज आला. पण नंतर कधीच त्याच्या कॅसेट्स म्हणा, सीडीज ऐकायला मिळाल्या नाहीत. :(

(अवांतर) वसंतोत्सव २०११ ला मुकुल शिवपुत्रांचा खूपच वाईट अनुभव आला... त्यांच्याबद्दल चांगलेही कधी ऐकिवात नहिए.. :-(

वाटाड्या...'s picture

30 Nov 2011 - 3:54 pm | वाटाड्या...

खरं म्हणजे मुकुल शिवपुत्र यांच संगीत ज्ञान अतिशय दुर्मिळ आणि असाधारण मानलं जातं. अनेकोत्तम चिजा त्यांच्याकडे आहेत. मग असं का व्हावं? एक शापित गंधर्व आहे असं म्हणाव लागेल.

वसंतोत्सवाचा अनुभव इथे टंकता आला तर बघा..

- वाट्या

चैतन्य दीक्षित's picture

30 Nov 2011 - 4:34 pm | चैतन्य दीक्षित

मुकुल शिवपुत्रांबद्दल बर्‍याच चर्चा होतात. आणि त्यात खरंच किती तथ्य आहे हे मला तरी ठाऊक नाही.
अजून त्यांचं गाणं प्रत्यक्ष ऐकायचा योग आला नाहिये.
पण एक आठवण सांगतो, जी कुमारांवरच्या 'नक्षत्रांचे देणे' मध्ये खळे काकांनी सांगितली होती.
'कुमारांचं जाहीर कार्यक्रमातलं गाणं होतं आणि गाणं सुरू होण्यापूर्वी खळे काका त्यांच्याशी गप्पा मारत होते.
गाण्याला फारच कमी मंडळी उपस्थित होती.आणि खळे काकांनाच अस्वस्थ वाटायला लागलं. (बहुतेक खळे काका आयोजकांपैकी एक असावेत). त्यांनी ती अस्वस्थता कुमारांना बोलून दाखवली. कुमारांचं उत्तर फार छान होतं.
'आम्ही बाहेर पाहून गाणार्‍यातले नाही. आम्ही आत पाहून गातो'
मला वाटतं, मुकुल शिवपुत्र हे 'तत्त्व' खूप काटेकोरपणे पाळत असावेत.
(वसंतोत्सवाचा ऐकीव अनुभव असा होता की १५-२० मिनिटं त्यांनी 'सा' लावला, किंवा लावायचा प्रयत्न केला. आणि
त्यांचं समाधान होईना, म्हणून ते उठले. खरं खोटं माहिती नाही, पण केवळ दुसर्‍याचं रंजन करण्यासाठी शास्त्रीय संगीत हा विषयच नाही असं माझं स्पष्ट मत. मला तरी देवाच्या किंवा आनंदाच्या सान्निध्यात यायचा हा एक खूप रम्य आणि जवळचा मार्ग वाटतो.)

प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

मोदक's picture

1 Dec 2011 - 6:09 pm | मोदक

विकि वरील माहिती...

Pt. Shivputra has performed infrequently and irregularly in the public, which most attribute to his drug addictions and alcoholism.

Pt. Shivputra is also known for his temperamental antics on the concert stage, from lecturing his accompanists on how to play their instruments, to showing up drunk to his performances

वसंतोत्सवाचा मध्ये १५-२० मिनिटं त्यांनी 'सा' लावायचा प्रयत्न केला.. पण "आज हमारी महफिल नही है!" असे म्हणून थांबले.

नंतर राहूल देशपांडेंनी सर्वांची माफी मागून कार्यक्रम संपला असे जाहीर केले; पण (खास लोकाग्रहात्सव) २ / ३ बन्दिशी सादर केल्या.

असो.... त्यांच्या बद्द्ल चांगले खूप कमी ऐकून आहे.

(अवांतर - भाईकाकांच्या "चित्रमय स्वगत" मध्ये मुकुलजींचा छान फोटो आहे)

मोदक, दिलेल्या लिंक वरिल वाक्य जसे आहे तसे पूर्ण लिहावे असे वाटते. नाहीतर 'ध' चा 'मा' होण्यास वेळ लागत नाही .

Since his wife's passing, Pt. Shivputra has performed infrequently and irregularly in the public, which most attribute to his drug addictions and alcoholism.

Pt. Shivputra lost his wife after the birth of their son, Bhuvanesh Komkali who himself is a vocalist.

वरिल माहीती ही त्याच विकीवर होती .http://en.wikipedia.org/wiki/Mukul_Shivputra

कोणाच्याही वैयक्तीक आयुष्यावर चिखलफेक अगदी सहज होऊ शकते, अगदी सहजपणे त्यामागची कारणे पुसून.. नाही का ? सुज्ञास सांगणे न लगे.

चैतन्य दीक्षित's picture

2 Dec 2011 - 4:26 pm | चैतन्य दीक्षित

वाहिदा,
वरील स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
तुमच्या मताशी सहमत आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Nov 2011 - 1:53 pm | परिकथेतील राजकुमार

मुकुलजींचे सुरेख गायन इथे ऐकता येईल. बहूदा चार राग आहेत.

लेखन एकदम सुरेल.
आवडले :)

रेवती's picture

28 Nov 2011 - 8:39 pm | रेवती

लेखन आवडलं.

क्रान्ति's picture

28 Nov 2011 - 9:35 pm | क्रान्ति

फार सुरेख लिहिलंय.

अन्या दातार's picture

29 Nov 2011 - 8:41 am | अन्या दातार

मस्त लेख. आवडला. त्या काँसर्टचे तुनळीवरचे दुवेही लवकर जोडा.

त्याच्या आधी एक नाव पाण्यातून चालली आहे आणि तिचं वल्हं पाणी कापतंय असं चलच्चित्र असायचं. पाण्यावर सूर्याचे किरण चमकायचे आणि वल्ह्याचा 'चुबुक' असा आवाज येत असायचा. त्याच्या बरोबर हे 'उड जायेगा हंस अकेला' असायचं. वल्ह्याचा आवाज त्या भजनी ठेक्यात मिसळून असायचा.ह्या सगळ्या दृक्श्राव्य परिणामामुळे असेल, पण 'उड जायेगा हंस अकेला' हे खास आवडीतलं.

आपला अनुभव छान शब्दांकीत केलात .. सुंदर !!

चैतन्य दीक्षित's picture

30 Nov 2011 - 4:35 pm | चैतन्य दीक्षित

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार !

मेघवेडा's picture

2 Dec 2011 - 5:22 pm | मेघवेडा

खूप छान रे चैतन्य! वाचूनच प्रसन्न वाटलं अगदी. :)

विसोबा खेचर's picture

10 Feb 2012 - 7:22 pm | विसोबा खेचर

लेख छान आहे आणि मुख्य म्हणजे अगदी मनापासून लिहिल्याचे जाणवत आहे.

वसुंधराताईंचं खूप चांगलं गाणं मी ऐकलं आहे. शिवाय त्यांना कुमारांच्या मागे तानपुर्‍यावरही अनेकदा ऐकायचा योग आला आहे..

जी गायनशैली कुमारांची, तीच तंतोतंत कलापिनी कोमकलींची. डोळे मिटून ऐकलं तर क्षणभर तरी का होईना, कुमार गातायत असंच वाटतं.

असहमत. गायनशैली जरी तीच असली तरी मला तरी कलापिनी गात असताना कुमार गाताहेत असं वाटत नाही. याचं ढोबळ कारण द्यायचं झालं तर ते म्हणजे कुमारांच्या गाण्यातलं स्वरालयीचं तेज. कुमारांच्या अत्यंत तेजस्वी अशा १०-१५ मैफली तरी ऐकण्याचा मला योग आला त्यावेळेस हे तेज अनुभवायला मिळालं. त्यांच्या एका भन्नाट रंगलेल्या खाजगी मैफलीलाही मी हजर होतो त्यावेळचं माझ्याकडे ध्वनिचित्रमुद्रण आहे. त्याच्या क्लीपस् जालावर चढवून त्याबाबत इथे लिहायचा विचार आहे. तूर्तास मात्र सवड नाही.

मुकुलबद्दल इथे काही बोलणार नाही. मुकुल हा माझ्या स्वतंत्र लेखाचा/व्यक्तिचित्राचा विषय आहे.

भजनी ठेका किंवा कहरवा हा कुमारांनी निर्गुणी भजनासाठी फारच वेगळ्या वजनात वापरला.

कुमारांनी अधिक करून केहरवा हाच ताल त्यांच्या निगुणी भजनात वापरला. त्याचा ठेका असा असायचा -

धाग् तीन ताक् धीन, धाग् तीन ताक् धीन, धाग् तीन ताक् धीन,...

कुमार केहेरव्यातल्या या ठेक्याला 'सतवा' असं म्हणत असत. जसा

धा धीं धींधाधीं धींधातीं तींधाधीं धींधा धीं..

हा नारायणरावांचा गंधर्व ठेका. याच ठेक्याला इकवाई असंही म्हणतात..

असो..

चैतन्यराव, लेख मात्र छान. अजूनही अगदी भरपूर संगीतविषयक लेखन करा हीच विनंती..

कुमारांविषयीच्या या लेखाने मात्र आज बर्‍याच वर्षांनी देवासला कुमारांच्या घरी गेलो होतोती आठवण जागी झाली..

(कुमारप्रेमी) तात्या.

चैतन्य दीक्षित's picture

11 Feb 2012 - 10:42 am | चैतन्य दीक्षित

तात्यांनी प्रतिसाद दिला... भरून पावलो.
कुमारांचं गाणं प्रत्यक्ष ऐकायला मिळावं इतकं भाग्य नाही आणि मुळात गाण्यातलं तुमच्याइतकं तर कळत नाहीच. थोडाफार प्रयत्न असतो गाणं समजून घेण्याचा इतकंच :)
त्यामुळे तात्या, ती ध्वनीचित्रमुद्रणं जालावर चढवून लेख लिहायचं मनावर घ्याच. अगदी कळकळीची विनंती.
सतवा/इकवाई ही नावे नव्याने कळली. धन्यवाद