मी चार्ली चॅप्लीन !

भाग्यश्री's picture
भाग्यश्री in जनातलं, मनातलं
5 Jun 2008 - 10:20 am

हे पुस्तक(आत्मचरीत्र) वाचून हा लेख माझ्या ब्लॉग वर लिहीला होता.. तो इथे डकवावासा वाटला.. बघा कसा वाटतोय!

charlie

काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!)
२ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्‍याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्‍या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे..
सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. "तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!" :( इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे! पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध 'ट्रॅंप' कसा जन्माला आला, याची कहाणी आहे.. हळुहळु चॅपलीन प्रसिद्ध आणि श्रीमंत होत गेला.. यात त्याच्याकाही महत्वाच्या चित्रपटांची जन्मकथा आहे. त्याला घेतलेले त्यानी कष्ट आहेत.. संघर्ष आहे.. थोडंफार चित्रपट तयार करण्याच्या तंत्राबद्दल देखील माहीती आहे..
पण सगळ्यात उत्कंठेचा भाग आहे तो म्हणजे, जेव्हा बोलपटांचे आगमन झाले आणि दुसर्‍या महायुद्धाच्या काळानंतरचे.. ज्या कलाकारानी सगळ्या जगाला हसवत ठेवले (आणि हसवता हसवता रडवले देखील) त्या कलाकाराशी अमेरीका नंतर फारच वाईट वागली.. त्याला कम्युनीस्ट ठरवले गेले, बरेच खटले झाले.. आणि सरतेशेवटी अमेरीकेतून हकालपट्टी करण्यात आली! मग तो स्वित्झर्लंड इथे स्थायिक झाला...
या पुस्तकातून चॅपलीनचे इतके पैलू दिसतात! त्याची कॉमेडी थोडी करूणच होती.. मुळात त्याची मनोवृत्ती जरा करूण अशीच असावी.. कुठलीही सुंदर कलाकृती पाहीली किंवा आनंद झाला की चॅपलीनचे डोळे पाण्याने भरून जायचे.. या पुस्तकातले त्याची काही स्वगतं, किंवा महायुद्धाच्या काळात त्याने केलेली भाषणे, 'द ग्रेट डिक्टेटर' मधील त्याचे भाषण अतिशय सुंदर आहेत! या पुस्तकात, त्याचे, त्याच्या कुटुंबाचे, चित्रपटसृष्टीतील लोकांचे खूप सुंदर फोटोज आहेत..नाहीतर चार्ली चॅपलीन ला कायम त्या ट्रॅंपच्या भुमिकेतच पाहायची सवय आपल्याला!
हे पुस्तक वाचल्यावर चार्ली चॅपलीन किती थोर होता हे कळतं आपल्याला.. केवळ तो ईंग्लीश होता आणि त्याने कधीच अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले नाही म्हणून आणि अशाच कारणांमूळे अमेरीका सोडायला लागली तरी त्याने कधी कटूता नाही ठेवली मनात.. तो स्वतः थोर होताच, परंतू अनेक थोर लोकांना तो प्रत्यक्ष भेटला.. आईनस्टाईन, म. गांधी, नेहरू, रुझवेल्ट, हुवर,पिकासो आणि अशीच अनेक व्यक्तीमत्वं!
एकंदरीत पुस्तक खूपच छान झालंय.. ओघवतं झालंय.. कुठेही रटाळ नाही आहे.. पुस्तक जरूर वाचण्यासारखे आहे, परंतू अनुवादकाचे नावच न कळल्यामुळे नक्की तपशील नाही सांगता येत आहे.. पण मिळालंच तर जरूर वाचा!

- भाग्यश्री

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

5 Jun 2008 - 10:50 am | अभिज्ञ

भाग्यश्री,
चार्ली चॅप्लीन च्या आत्मच्रित्राची छान ओळख करून दिली आहेस.
समीक्षा आवडली.
मुळ पुस्तकाचे नाव कळू शकेल का?

अभिज्ञ.

भाग्यश्री's picture

5 Jun 2008 - 10:52 am | भाग्यश्री

नाही हो.. आता काही आठवत पण नाही, आणि ते माहीती वालं पान फाटलं होतं ना..तीच तर गोची.. असो, प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

भाग्यश्री's picture

5 Jun 2008 - 11:19 am | भाग्यश्री

थॅंक्स अलॉट मनिष !! ऍमेझॉन वर पण सापडलं पुस्तक.. आता ओरीजनल वाचता येईल...!

वेदश्री's picture

5 Jun 2008 - 11:36 am | वेदश्री

चार्ली तर ग्रेट माणूस आहेच.. पण त्याच्याहुन जास्त त्याच्यावर सदैव निस्सीम प्रेम करणारा त्याचा भाऊ सिडने मनात अगदी घरच करुन बसलेला आहे. हसरे दु:ख वाचत होते तेव्हा कितीदातरी उगाच काळजी वाटायची की या भावांमधल्या इतक्या सुरेख प्रेमाला कोणा दुष्टाची नजर तर लागणार नाही ना? पण नाही लागली शेवटपर्यंत तेच त्यांच्या प्रेमाचे यश होते असे वाटले आणि मी मनोमन जबरदस्त सुखावले ! स्वतः इतका अप्रतिम कलाकार आणि त्यातून प्रसिद्ध असुनही माझ्या पोरांना मात्र माझे नाही तर लॉरेलहार्डीचे शो जास्त हसवतात आणि आवडतात हे दिलखुलासपणे सांगणारा त्याच्यातला बाप अत्यंत आवडला. अजुनही भरपुर गोष्टी आहेत पण तुर्तास इतकेच.

मी 'हसरे दु:ख' वाचले होते काही वर्षांपुर्वी पण 'मी चार्ली चॅप्लिन' नाही वाचले अजुन. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि नविन पुस्तकाची खास ओळखही झाली.. धमाल काम केलंयस, भाग्यश्री. धन्यवाद. आता लवकरच मिळवते ओरिजिनल पुस्तक आणि वाचून काढते.

अवांतर : ऍमेझॉनवर डेबिट कार्डसुद्धा चालते का पुस्तकांची खरेदी करायला की क्रेडीट कार्डच लागते?

भाग्यश्री's picture

5 Jun 2008 - 11:40 am | भाग्यश्री

मला हसरे दुख्ख वाचायचंय अजुन.. कधी वाचणार कुणास ठाऊक.. :(
अग, मी ट्राय नाही केलं कधी, रादर मी ऍमेझॉन वर पुस्तकाची माहीती पाहायला गेले होते.. विकत कसली घेतीय.. :( काश..
एनीवेज, मी लायब्ररीत शोधणार आता..

आपण ना, आवडलेल्या पुस्तकांवर लिहीत जाऊया.. कुठली वाचायची वगैरे कळते.. ना?

वेदश्री's picture

5 Jun 2008 - 11:50 am | वेदश्री

भाग्यश्री,

>आपण ना, आवडलेल्या पुस्तकांवर लिहीत जाऊया.. कुठली वाचायची वगैरे कळते.. ना?

सूचना तर अत्यंत स्वागतार्ह आहे पण मला नाही जमत आताशा इतकं मनापासून लिहायला. असो. जमेल तसा खारीचा वाटा मीही उचलायचा प्रयत्न करेनच.

चार्लीबद्दल आणिक सांगायचं तर तोही डावखुराच ! डावखुर्यांना वाजवायला जमावे अशा रीतीने त्याने व्हायोलीनची पुनर्रचना केली होती.. हे वाचून माझ्यासारखी (अर्ध)डावखुरी त्याच्या या उपद्व्यापावर फिदा झाली नाही तरच नवल ! :)

बाय द वे, हसरे दु:ख नक्की वाचशील. ( माझ्या आईची छोटीशी घरगुती लायब्ररी इथे असती तर तिला सांगून सरळ पुस्तकच ऑफर केले असते तुला पण... असो. )

भाग्यश्री's picture

5 Jun 2008 - 11:59 am | भाग्यश्री

व्वा ! चार्ली पण का डावखोरा? मी पण बरका.. क्म्प्लीट डावखोरी..
डावखोरी लोकं असतातच कलाकार न गुणी ! हेहे.. :)

वेदश्री's picture

5 Jun 2008 - 12:03 pm | वेदश्री

>व्वा ! चार्ली पण का डावखोरा? मी पण बरका.. क्म्प्लीट डावखोरी..

वॉव.. खत्तरनाक ! बरी भेटलीस. इसी बातपे हाथ मिलाओ.. अरे, दाया नहीं बाया ! :)

भाग्यश्री's picture

5 Jun 2008 - 12:05 pm | भाग्यश्री

लो मिलाया ! =;
आय मिन, मिलाया है ऐसे समझो..

असो.. टीपी फार झाला.. आपण गप्पाच मारत बसलो की !!

विसोबा खेचर's picture

5 Jun 2008 - 12:32 pm | विसोबा खेचर

भाग्यश्री,

सुंदर परिक्षण!

चार्ली या जगावेगळ्या अवलिया कलावंताला माझा सलाम...

आपला,
(चार्लीप्रेमी) तात्या.

स्वाती दिनेश's picture

5 Jun 2008 - 12:38 pm | स्वाती दिनेश

भाग्यश्री,परिक्षण आवडले.
पुलंनी लिहिलं आहे,त्यांनी जेव्हा चार्लीला प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा तो एका उंचावरील गॅलरीतून भक्तांना दर्शन देत होता आणि त्या गर्दीत पुलही होते. त्याला पाहिले आणि पंढरीच्या विठोबाला ज्या भक्तीने वारकरी हात जोडतो तसे हात जोडले गेले आणि डोळ्यात कृतार्थतेचं पाणी!
त्याची आठवण झाली.
स्वाती

भाग्यश्री's picture

5 Jun 2008 - 12:45 pm | भाग्यश्री

वा, सुंदर आठवण आहे..
सगळ्याना धन्यवाद ! :)

प्राजु's picture

5 Jun 2008 - 12:44 pm | प्राजु

परिक्षण छान दिलं आहेस. मलाही हसरे दु:ख आणि मी चार्ली चाप्लिन हे वाचायचं आहे.
तू छान ओळ्ख करून दिली आहेस.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सविस्तर हवी होती पण तरिही हरकत नाही प्रयत्न स्तुत्य!

(अवांतर - वर डकवलेल्या 'द किड' ह्या प्रसिद्ध चित्रपटातल्या फोटोतला चार्ली बरोबरच बालक हा पुढे प्रसिद्ध झालेला अमेरिकन अभिनेता जॅकी कूगन आहे.)

चतुरंग

ईश्वरी's picture

5 Jun 2008 - 10:56 pm | ईश्वरी

चांगलं लिहिलयं परिक्षण. आवडलं. मी लहानपणी चार्लीचे बरेच सिनेमे पाहीले होते. तुझा लेख वाचल्यावर ते आठवले. चार्ली खरोखर एक महान कलाकार होता.

>>(अवांतर - वर डकवलेल्या 'द किड' ह्या प्रसिद्ध चित्रपटातल्या फोटोतला चार्ली बरोबरच बालक हा पुढे प्रसिद्ध झालेला अमेरिकन अभिनेता जॅकी कूगन आहे.)
चतुरंगजी चांगली माहिती दिलीत. धन्यवाद.
ईश्वरी

भाग्यश्री's picture

5 Jun 2008 - 11:59 pm | भाग्यश्री

हो अजुन ओळख हवी होती.. पण तेव्हा जेव्हढं लिहीले तेव्हढेच पोस्ट केले.. आता ते पुस्तक पण नाही मिळणार मला.. नाहीतर एखादा प्रसंग , किंवा जनरलच अजुन वाढवता आले असते..
असो.. धन्यवाद सगळ्यांना..!

http://bhagyashreee.blogspot.com/

शितल's picture

6 Jun 2008 - 12:34 am | शितल

छान सा॑गितलेस आता वाचते ते पुस्तक.
असेच चा॑गल्या पुस्तका॑ बद्दल एकमेका॑ना सा॑गु.