काही दिवसच असे असतात
विस्कटलेल्या घरात
गोंगाटाच्या घेरात
उधाणलेल्या भरात
तरीही सुरात
आपण म्हणतो दिवसभरात काहीच नाही झाल सरळ
त्याला मात्र पडत राहते अशाच अनवट क्षणांची भुरळ
आपण त्याला बसवत राहतो वेळापत्रकाच्या चौकटीत
त्याला मात्र नसत अडकायचं रोजच्या घोटीव कटकटीत
धावत राहतो आपण त्याच्या मागे,
हातात ताट आणि बोटात घास घेवून, कातावत
तो मात्र पळतो अंगणात
अर्ध्या चड्डीत, बरबटलेल्या तोंडाने
खट्याळ हसत , वेडावत
त्याला असत भिडायचं आभाळाच्या गाण्याला
आपल्या मुठीत भरायचं चांदोबाच्या नाण्याला
डोळ्या पुढचं धुक आपल्या सरतच नाही
निरागस आर्जव त्याचं दिसतच नाही
झपाटलेल्या क्षणांनी विणलेला दिवस
दिवसभर उनाडून शिणलेला दिवस
हवेसारख्या भासणा-या वेढलेल्या धुरात
किरणांचे श्वास मात्र सतारीच्या तारांत
काही दिवसच असे असतात...सुरात.
प्रतिक्रिया
7 Nov 2011 - 2:51 pm | पियुशा
व्वा !
मस्त जमलिय :)
7 Nov 2011 - 2:58 pm | गवि
सोनल, बर्याच दिवसांनी दिसलीस इथे..
आवडली रचना...
7 Nov 2011 - 3:24 pm | कच्चा पापड पक्क...
मस्तच......!
7 Nov 2011 - 5:57 pm | दत्ता काळे
छान जमलीये.
7 Nov 2011 - 8:03 pm | गणेशा
अप्रतिम
खुप आवडली कविता
7 Nov 2011 - 9:09 pm | पैसा
मुलं लहान असतानाचे दिवस आठवले. आता घर विस्कटलेलं नसतं पण काहीतरी कमी आहे असं वाटतं!
7 Nov 2011 - 10:42 pm | जाई.
छान जमलिये कविता
8 Nov 2011 - 9:11 am | नगरीनिरंजन
कविता आवडली!
8 Nov 2011 - 10:17 am | सोनल कर्णिक वायकुळ
प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार. लोभ असु द्या.
सोनल
9 Nov 2011 - 7:20 pm | चित्रा
कविता आवडली.
आईचे (किंवा बाबांचे) आणि बाळाचे विश्व एकमेकाबरोबर विस्तारते, आक्रसते आहे असे काहीसे वाटले. आईला बाळासोबतचे दिवस सुरात असण्याचे वाटते आहे हेच एक नवल. आई-बाळाकडे पाहणार्या त्रयस्थ व्यक्तीला कदाचित त्यांचे हे दिवसही सुरात आहेत असे जाणवेल, आईच्या डोळ्यापुढचे धुके मात्र पटून जाण्यासारखे.