तिची आणि माझी पहिली भेट अगदी अलीकडेच झाली. त्या आधी ती कोण, काय मला माहितीही नव्हते. काही कारणाने मी तिच्या वडीलांना फोन केला होता. तो तिने उचलला.
"हॅलो, कोण बोलतंय?...." ती इतक्या जोरात म्हणाली की मला माझा फोन कानापासून जरा लांब न्यावा लागला. आवाज एकदम खणखणीत. भाषेला थोडासा हेल . थोडासा कोल्हापुरी, थोडासा अमराठीही.
"हॅलो... बाबा.... आहेत का?" मी चाचरत विचारले.
"ह्हो..." पुन्हा तसाच ठसकेबाज आवाज."बाबा, तुझा फोन आहे."
मग मी तिच्या वडीलांशी वगैरे बोललो. नंतर लवकरच त्या कुटुंबाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. त्यावेळी मी तिला पहिल्यांदा बघीतले. तिच्याकडे बघताना अगदी प्रथम जाणवला आला तो तिच्या चेहर्यावरचा आत्मविश्वास. सहा-सात वर्षे वय, लहानसर चण, गोरा म्हणता येईल असा वर्ण, सोनेरी छटा असलेले मोकळे सोडलेले सुळसुळीत केस, पांढरेशुभ्र, लहानसे, एकसारखे रेखीव दात, चमकदार भिरभिरते डोळे आणि चेहर्यावर आत्मविश्वास. नुकतेच सगळे जग जिंकले आहे असा आत्मविश्वास. ही मुलगी मला प्रथमदर्शनीच आवडून गेली.
"ये इकडे" मी तिला जवळ बोलावले. या वयाच्या मुली साधारण असे कुणी जवळ बोलावले की लाज लाज लाजतात. आपल्या आई बाबांच्या अंगावर लोळण घेतात , पळून जातात आणि काही म्हणजे काही केले तरी जवळ येत नाहीत. इथे या मुलीने पहिला धक्का दिला. ती चक्क माझ्या व माझ्या पत्नीच्या शेजारी येऊन बसली. नावगाव विचारले तर तिने ते अगदी स्पष्ट शब्दांत न लाजता सांगितले आणि मी तिला देऊ केलेले चॉकलेट माझ्या हातातून जवळजवळ हिसकावूनच घेतले. मी हसलो. "राहतेस का आमच्याबरोबर इथेच हॉटेलात?" मी तिला विचारले. "च्क्क..." ती म्हणाली. "माझी मॅथ्सची टेस्ट आहे उद्या.." मग बघता बघता तिच्याशी गट्टी जमली. तिने मग तिच्या वर्गातील सगळ्या मुला-मुलींची एक ते एकोणचाळीस अशा वर्गक्रमांकानुसार नावे म्हणून दाखवली (हे या वयातल्या मुला-मुलींच्या लक्षात कसे राहाते कुणास ठाऊक!), मांडीवर उलटा-सुलटा हात आपटत ती शिकत असलेल्या कर्नाटक संगीतातले एक गाणे म्हणून दाखवले (तिचे वडील मागून 'आता पुरे... हं, आता बास...अशा खाणाखुणा करत होते!), माझ्या मुलाचा मोबाईल फोन हातात घेऊन त्यातल्या कायकाय गंमतीजंमती बघीतल्या आणि उरलेला वेळ कधी एका पायावर तर कधी दोन्ही पायावर नाचत मस्त धुडगूस घातला.
मग एकदोन दिवसांत आम्हाला त्यांच्या घरी एक दिवस राहायला जायचा योग आला. तो दिवसभर ही मुलगी भिंगरीसारखी भिरभिरत होती. दुपारच्या जड जेवणानंतर तिने कुणाच्या डोळ्याला डोळाही लागू दिला नाही. सतत तिची काही ना काही बडबड, कधी आपली चित्रे दाखवणे, आपल्या शाळेबद्दल काही सांगणे असे काहीकाही सुरु होते. दुपारी आम्ही बाहेर गेलो. गाडीत जरा गर्दी होत होती, म्हणून मी तिला पुढच्या सीटवर माझ्याजवळ बोलावले. माझ्या मांडीवर बसून ती मला त्या शहरातल्या वेगवेगळ्या जागांविषयी, ठिकाणांविषयी सांगत होती. तिची स्कूल बस कुठे येते, किती वाजता येते, शाळेत पहिली सुट्टी किती वाजता होते, मग लंच ब्रेकमध्ये ती डब्यातून नेलेले कायकाय खाते हे सगळे सगळे तिने सांगून घेतले. मध्येच गाडी पार्क करताना गाडीच्या मागच्या बाजूला एक कुत्रे आले तर ती अस्सल कोल्हापुरी हेल काढून म्हणाली,"कुत्रं मरतंय आता.." आणि पुन्हा खळखळून हसली. मला हसू आवरेना. महाराष्ट्राबाहेर जन्मलेली, वाढलेली ही एवढीएवढी मुलगी - घर सोडले तर आसपास मराठी बोलणारेही कुणी नसावे- तिच्यात हे कृष्णेचे-पंचगंगेचे पाणी कुठून आले? कॉलेजात असताना शिकलेल्या जेनेटिक्स या विषयाला परत एकदा सलाम करावासा वाटला.
त्याच दिवशी आम्हाला परत यायला निघायचे होते. आमच्या त्या स्नेह्यांच्या पत्नीने त्या मुलीच्या हातात आम्हाला देण्यासाठी काही भेटवस्तू दिल्या. त्या मुलीने मग "दादा , हे तुला, काकू, हे तुला.." असे म्हणून त्या आमच्या हातात दिल्या. त्या कुटुंबाच्या आदरातिथ्याने आधीच संकोचलेलो आम्ही अधिकच संकोचलो. "आवडलं का तुम्हाला?" त्या मुलीने धीटपणे आम्हाला विचारले. तिला तिच्या आईने तसे विचारायला सांगितले असावे.
त्या छोट्या मुलीला मी जवळ घेतले. "हो, खूप खूप आवडलं" मी म्हणालो. "पण सगळ्यात जास्त आम्हाला तू आवडलीस..."
आमचे स्नेही आम्हाला स्टेशनपर्यंत सोडायला येणार होते. त्या मुलीला व तिच्या आईला वेगळीकडे जायचे होते. त्या दोघींना रिक्षा स्टँडवर सोडून आम्ही पुढे निघालो तेंव्हा तिच्या आईबरोबर तिनेही तिचा छोटासा पंजा हलवून आम्हाला निरोप दिला. रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात तिचे सुळसुळीत केस चमकत होते आणि तिच्या लहानशा चेहर्यावर तेच आत्मविश्वासपूर्ण हसू होते.
प्रतिक्रिया
3 Nov 2011 - 9:20 am | ऋषिकेश
चांगले लेखन.. मात्र जरा आटोपते घेतल्यासारखे वाटले
प्रत्येक पुढल्या (की पिकल्या ;) ) पिढीला 'हल्लीची पिढी' ही जास्त आत्मविश्वासपूर्ण वाटते का?
3 Nov 2011 - 9:37 am | किसन शिंदे
त्या छोट्या चुणचूणीत मुलीचं वर्णन छान केलयं!!
काही दिवसांपुर्वी चेपुवर पाहिलेल्या एका चित्रफितीची आठवण या निमित्ताने झाली.
3 Nov 2011 - 10:05 am | कच्ची कैरी
मस्त आवडले!
3 Nov 2011 - 10:36 am | मन१
उत्साही आहे गोड पोरगी.
3 Nov 2011 - 11:31 am | ५० फक्त
मस्त लिखाण आवडलं, एकदम सहज आणि सकस आहे.
3 Nov 2011 - 11:44 am | रामदास
एक नन्ही परी हे गाणं आठवलं.
3 Nov 2011 - 12:35 pm | विसुनाना
लेखनाच्या दर्जाबद्दल वादच नाही. विषयानुरूप लेखकाची भाषा बदलते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
अत्यंत सहज-सोप्या मराठीत लिहिलेला हा लेख - त्या अमराठी मुलखात वाढणार्या मुलीलाही आवडून जावा असा.
प्रत्येक पुढल्या पिढीला 'हल्लीची पिढी' ही जास्त आत्मविश्वासपूर्ण नुसतीच वाटते असे नाही तर ती तशी होत जाते! :) उदाहरणार्थ, पाच-सहा वर्षांचे असताना आम्हाला मोबाईलच काय पण साध्या फिरत्या तबकडीच्या फोनवर कधी बोलून माहित नव्हते. आता काय, दोन वर्षांची पोरेही सहजपणे मोबाईलवर तासनतास बोलतात.
- साधु. या नद्यांचा जिथे संगम होतो तिथे श्रीकृष्ण डेअरीची बासुंदी खाल्ली की ती डॉर्मंट जीन्स लगेच अॅक्टिव्हेट होत असावीत.
3 Nov 2011 - 1:57 pm | पैसा
एका लहनग्या मुलीचं वर्णन करताना रावांची भाषासुद्धा तशीच निरागस झाली आहे. खूपच आवडलं!!
3 Nov 2011 - 3:37 pm | नीलकांत
तीला भेटल्यावर असंच काहीसं मनात आलं होतं. विशेषत: आत्मविश्वास आणि गाण्याचा उत्साह सोबतच तिच्या वडीलांचा पुरे आता.. चा घोष :)
पण एवढं सही पानावर उतरवता आलं नाही.
- नीलकांत
3 Nov 2011 - 5:03 pm | चित्रा
ती एकदम तेजस्वी दिसते आहे!
व्यक्तिचित्रण खूप आवडले.
व्यक्तिचित्र वाचताना शांता शेळकेंच्या "मॅडम" ची आठवण झाली. फरक आहेत अर्थातच. मॅडम ही शांता शेळकेंची भाची - घरातच वाढलेली - रोजची पाहण्यातली, तर "ती" ची ही भेट लहानशीच पण लक्षात राहील अशी.
ती परत भेटली तर तशीच निर्भर, आत्मविश्वासपूर्ण असो अशी इच्छा आहे. अर्थात हे तिच्या आईवडिलांवर आहे, पण बहुदा काळजीचे कारण नाही असा समज आहे:)
3 Nov 2011 - 5:31 pm | वपाडाव
3 Nov 2011 - 8:17 pm | रेवती
छान वाटलं वाचून.
काही दिवसांपूर्वी एक २ वर्षांची मुलगी आमच्याकडे आल्यावर सेंटर टेबलला अडखळून थोडी धडपडली. दोन सेकंदाने टेबलाकडे रागाने पाहून त्याला मारत "हात रे!" म्हणाली आणि आमची हसून पुरेवाट झाले. तिला मात्र समाधान वाटत होते.
3 Nov 2011 - 8:32 pm | विकास
वरील अनेक प्रतिसादांशी सहमत! वाचताना छान वाटले.
रामदासांप्रमाणेच , "मेरे घर आयी एक नन्ही परी" आठवले...
4 Nov 2011 - 5:14 pm | दत्ता काळे
सुरेख लिखाण. तंतोतंत चित्र आणि प्रसंग डोळ्यासमोर पहातोय असं वाटलं.
4 Nov 2011 - 5:30 pm | नगरीनिरंजन
व्यक्तिचित्रण आवडले. दूर देशात आपली भाषा, तिच्या लहेजासकट मुलांपर्यंत पोचवणार्या पालकांचे विशेष कौतुक केले पहिजे.
4 Nov 2011 - 6:25 pm | चतुरंग
अतिशय साध्या शब्दातलं ओघवतं लिखाण.
मुलं खरंच मुक्त आणि निरागस असतात. मनात येईल ते लगेच बोलून टाकणे हा स्थायिभाव असतो.
धिटुकल्या 'ती' चं चित्र आवडलं. भाषेचा लहेजा हा मुख्यतः आई-वडिलांच्या बोलण्यातूनच मुलांपर्यंत पोचत असतो. कानावर पडणार्या भाषेतील बारकावे नकळत उचलले जातात जे आपल्याही लक्षात येत नाही.
पण भाषेचा आणि तुमचा ऋणानुबंध मात्र कायम असतो हे खरे.
माझं आजोळ मिरजेचं असल्याने आजही कोणी कृष्णा-पंचगंगेच्या परिसरातली व्यक्ती फक्त बोलण्यातून कान चटकन टिपतात. काहीतरी फार ओळखीचं असं वाटून जातं. जेनेटिक्सचा संबंध इथे असावा असं वाटतं खरं!
-रंगा
6 Nov 2011 - 11:38 am | तिमा
चुणचुणीत मुलीचे चित्र चांगले रेखाटले आहे. हा निरागसपणाच सर्वात जास्त मोहवून टाकतो. तो एकदा सोडून गेला की संपतं सारं!