"सर, टु हिंजवडी ऑर टु कोथरुड फस्ट ?"
असे ड्रायव्हरने विचारताच मांडीवरचा ल्यापटॉप बाजुला ठेउन त्याने समोर नजर टाकली, जवळ जवळ येणारा वाकडचा फ्लायओव्हर ओळखीचा वाटला पण आजुबाजुचा भाग मात्र आधी होता तसा मोकळा मोकळा अजिबात राहिला नव्हता. चकचकीत इमारती अन सुसाट जाणार्या गाड्या त्या फ्लायओव्हरची ओळख पुसट करत होत्या. विसएक वर्षात पुणे बरेच बदलले होते.
"लेट्स हॅव ब्रेकफास्ट इन कोथरुड फस्ट !", तो कोरडेपणे उत्तरला. गाडी उजवीकडे न वळता सरळ चांदणी चौकाकडे धावायला लागली.
त्याची भिरभिरती नजर आजुबाजुच्या परिसरात ओळखीच्या खुणा शोधत होती,
हा भास म्हणु की आहे तुझाच गाव ..
बघ श्वासही घेती माझे तुझेच नाव ..
तो गुणगुणला. डाव्या बाजुला बरेचसे ओळखीचे एक तळे अन त्यासमोरचे शिवमंदिर दिसले, हो बहुदा शिवमंदिरच होते ते, आणी तेच मंदिर होते ते. ऑफिसमधुन घरी जातांना हमखास गाडी वळायची त्यांची तिकडे. गारेग्गार एसी मधल्या मुर्दाड हवेपेक्षा तळ्याकाठच्या बाकावरचा तो उधाण मोकळा वारा त्यांना मोहवायचा. दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी अगदी "आज चहा मेला अगदीच फुळ्ळुक होता" पासुन ते अप्राईजल मीटींगमधे बॉस्स ने कसे पिडले इथपर्यंतच्या गुजगोष्टी बहरायच्या. किती सांगु किती नको असे व्हायचे तिला, चिवचिवाट एकुन आजुबाजुची रोज भेटणारी एकदोन म्हातारी खोडं गालातल्या गालात हसायची अन हळुच तिच्या डोक्यावर टपली मारुन तिला भानावर आणायची. प्रमोशनच्या खुशीपासुन ते तिच्या आईने दिलेल्या होकारापर्यंतचे जवळपास सगळे आनंद त्या शिवशंभोच्या साक्षीने साजरे व्हायचे.
आभास असे की जीव खुळावुन जाई..
मन बासरी होवुनी तुझीच गीते गाई..
त्याकाळातली त्यांची ती छोटीमोठी स्वप्ने त्या नंदीला आठवत असतील का ? रोज तिला बबडी म्हणुन हाक मारणारा म्हातारा नंतर कितीतरी दिवस आपल्याला शोधत असेल ! अन मग एका क्षणात वेदनेचा चित्रपट झरझर त्याच्या डोळ्यासमोरुन निघुन गेला.
दुपारी २ वाजता हलका लंच करुन ठरलेल्या शेड्युल प्रमाणे तो मीटिंग रुम कडे वळाला. काही क्षणातच टकटक वाजवुन दार उघडले गेले. पुर्णतः बिझनेस फॉर्मल्स मधली एक साधारण चाळीशीची स्त्री लगबगीने आत शिरली. थक्क होउन तो पहातच राहिला. उठुन अभिवादन वैगेरे करायचे सगळे एटिकेट्स विसरुन तो अवाक होउन बघत होता.
वादळात हलते झुम्बर दाही दिशांचे..
ये पाउस होवुनी झिरपत आर्त मनाचे..
अंगातले ब्लेझर बाजुला टाकुन त्याने कारचे दार ओढुन घेतले अन काच खाली केली, ती लांबुन हात हलवुन त्याला बाय म्हणाली असावी, यांत्रिकपणे त्याचा हात हलला. टायची क्नॉट थोडी मोकळी करुन त्याने डोके मागे टेकवले अन डोळे मिटुन जरासा विसावला. थोड्या वेळाने त्याने मागे वळुन बघितले, वाकडचा फ्लायओव्हर मागे पडला होता अन धुराळा उडवत त्याची गाडी पुन्हा मुंबईकडे धावु लागली होती.
वार्यावर अवचित उठे धुळीचा लोट..
अन हरवुन जाई तुझ्या गावची वाट..
हा भास म्हणु की आहे तुझाच गाव ..
बघ श्वासही घेती माझे तुझेच नाव ..
(वरील लेखात उल्लेखलेल्या काव्यपंक्ती मिपा सदस्या फुलवा यांच्या एका कवितेतील आहेत.)
प्रतिक्रिया
2 Jun 2008 - 6:06 pm | राजे (not verified)
छान !
बाकी... काही वर्षाने आपल्याच जुन्या आठवणी मध्ये जाणे व गुंग होणे ..... ही काहीतरी वेगळीच नशा असते.
बाकी कविता जी मध्ये मध्ये पेरली आहे... छान आशय व लेखनासोबत धावणारी आहे..
एक म्हणणे ... आवडले :)
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
2 Jun 2008 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आनंदा,
काय मस्त लिहिलं रे , माणसाचं हरवलेपण शोधणं म्हणतात ते हेच.
त्यांची ती छोटीमोठी स्वप्ने त्या नंदीला आठवत असतील का ? रोज तिला बबडी म्हणुन हाक मारणारा म्हातारा नंतर कितीतरी दिवस आपल्याला शोधत असेल ! अन मग एका क्षणात वेदनेचा चित्रपट झरझर त्याच्या डोळ्यासमोरुन निघुन गेला
हे, मस्त वाटलं....प्रत्येकाला आपापल्या स्वप्नांची आठवण व्हावी, अशाच या दोन ओळी. हळुवार पणे आपल्या डोळ्यासमोर चलचित्र रिव्हर्स ,फॉरवर्ड होतंय असे वाटले.
कमी शब्दात अधिक भावना व्यक्त होतात त्या अशाच शब्दातून. अस्सेच लेखन येऊ दे !!!
वरील आठवणींवर एका कवीच्या दोन ओळी -
आज पुन्हा आसवांची जुनीच धार आली.
अश्रुंना तुझीच पुन्हा आठवण फार झाली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
2 Jun 2008 - 7:21 pm | मन
मनापासुन.
भावना अगदि चपखल शब्दात बसवल्यात.
त्या कवितेच्या ओळी पण अगदि सूट होतात, त्या स्थितीमध्ये.
मस्त लिखाण एकदम.
आपलाच,
मनोबा
2 Jun 2008 - 10:10 pm | यशोधरा
सही लिहिलय, खूप आवडलं.
फुलवा, तुमच्या ओळी पण सुरेखच आहेत.
3 Jun 2008 - 1:05 am | फटू
जुन्या आठवणींना उजाळा देताना मनाची होणारी कातर अवस्था खुप छान व्यक्त केली आहे...
आणि फुलवाच्या हळूवार काव्याचा वापर तर अगदी सुंदर केला आहे...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
3 Jun 2008 - 1:11 pm | धमाल मुलगा
आनंदयात्री साहेब.....
जियो रे :)
अरे फुलवा ह्यांची कविता घेऊन त्यां ओळींवर इतकी छान चपखल बसणारी लघुकथा लिहिलीस, मस्तच.
:) आवडलं . एकदम भिडलं हे!
अजुनही येऊ दे :)
पु.ले.शु.
-ध मा ल.
3 Jun 2008 - 4:16 pm | इनोबा म्हणे
अरे फुलवा ह्यांची कविता घेऊन त्यां ओळींवर इतकी छान चपखल बसणारी लघुकथा लिहिलीस, मस्तच.
हेच म्हणतो...
आंद्या,लेका. येऊ दे अजून.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
3 Jun 2008 - 6:23 pm | प्रभाकर पेठकर
आनंदयात्री,
कथेचा नवा बाज मनापासून आवडला. कथा आणि कविता हातात हात घालून वाटचाल करताहेत ही कल्पनाच रोमँटीक आहे.
कथेत भरपूर प्रणय लपलेला असला तरी भावनांची तीव्रता जरा हरवल्या सारखी वाटली. विस वर्षांनंतर होणारी प्रियकर आणि प्रेयसीची भेट भावनिकदृष्ट्या (जरी कॉर्पोरेटच्या वेगळ्या आंगणात असली तरी..) अजून हूरहूर निर्माण करणारी हवी होती, असे वाटते.
'आँधी' चित्रपटाची आठवण झाली. 'तेरे बिना जिंदगीसे कोई, शिकवा तो नही' मधील विरही आर्तता मनाला पिळून काढते.
तसेच,
'तुमने मुँछे रखी....'
'हाँऽऽ !.... तुम्हे पसंद नही थी न?'
'इसलिए रखी?'
वगैरे संवादातील मिशांचा संदर्भ दुय्यम आहे पण व्यक्तिमत्त्वात होणारे बदल, तरूणपणच्या आठवणी, एकमेकांच्या आवडी-निवडींसंबंधी अजूनही असणारी जाण... अनेक पूर्व गोष्टींना उजाळा देते. त्यात फक्त पोक्त प्रेम दिसते. असो.
हा भास म्हणु की आहे तुझाच गाव ..
बघ श्वासही घेती माझे तुझेच नाव ..
आभास असे की जीव खुळावुन जाई..
मन बासरी होवुनी तुझीच गीते गाई..
वादळात हलते झुम्बर दाही दिशांचे..
ये पाउस होवुनी झिरपत आर्त मनाचे..
वार्यावर अवचित उठे धुळीचा लोट..
अन हरवुन जाई तुझ्या गावची वाट..
हा भास म्हणु की आहे तुझाच गाव ..
बघ श्वासही घेती माझे तुझेच नाव ..
फुलवा ह्यांची कविताही सुंदर, भावपूर्ण आहे.
दोघांचेही अभिनंदन.
3 Jun 2008 - 6:29 pm | मनस्वी
एकाच वाक्यात किती संदर्भ लपलेत.. सह्हीचे वाक्य पेठकरकाका!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
3 Jun 2008 - 6:42 pm | स्वाती दिनेश
पेठकरांसारखीच मलाही आँधीची आठवण झाली,
फुलवाची कविताही तरल आहे..दोन्हीचे एकत्रीकरण छान जमले आहे.
स्वाती
4 Jun 2008 - 12:11 am | विसोबा खेचर
त्याकाळातली त्यांची ती छोटीमोठी स्वप्ने त्या नंदीला आठवत असतील का ? रोज तिला बबडी म्हणुन हाक मारणारा म्हातारा नंतर कितीतरी दिवस आपल्याला शोधत असेल ! अन मग एका क्षणात वेदनेचा चित्रपट झरझर त्याच्या डोळ्यासमोरुन निघुन गेला.
वा! सुंदर लिहिलं आहेस रे यात्री!
तुझं आणि फुलवाचं, दोघांचंही अभिनंदन...
औरभी आने दो बॉस!
तात्या.
4 Jun 2008 - 12:54 am | शितल
तु फुलवा॑ची कविता योग्य तिथे पेरून छान लिखाण बनवल आहेस,
मला फक्त ती ४० व. स्त्री पटकन कळली नाही.
पण मा॑डणी आणि आशय छानच.
मनाला हळवे करणारे लिखाणात तुझा हातख॑ड आहे बॉ.
4 Jun 2008 - 11:49 am | पद्मश्री चित्रे
माझ्या कवितेचं हे इतकं छान रुप बघुन खुप बर वाटल.. कविते सोबत कथा अगदी हातात हात घालुन जात आहेत.. मला पण हेच मनात होत लिहिताना .
तुझ्या कथेत जास्त काय आवडल असेल तर त्यांच्यातील अबोल संवाद्.-"शब्देविण संवादु" यालाच म्हणत अस्तील ..
माझी कविता अशी छान , अलंकृत करुन इथे आणल्याबद्दल धन्यवाद.
तुला जितकी माझी कविता आवडली आहे, तितकीच मला तुझी कथा आवडली आहे...
4 Jun 2008 - 12:05 pm | आनंदयात्री
>>तुझ्या कथेत जास्त काय आवडल असेल तर त्यांच्यातील अबोल संवाद्.-"शब्देविण संवादु" यालाच म्हणत अस्तील ..
अगदी हेच अपेक्षित होते मला ... खरे तर निटसे उतरवता आले नाहिये मला पण "शब्देविण संवादु" दाखवायचा प्रयत्न करायचा होता म्हणुन दोघातले संवाद टाळलेत. बघु पुढल्या वेळेस अजुन चांगले लिहण्याचा प्रयत्न करेन. पेठकर काकांनी इथे तसेच व्यक्तिगत माध्यमातुन काही छान टिप्स दिल्यात, लिहतांना वाचकाच्या दृष्टीने विचार करायचोच पण त्या टेक्निकल्स मधे थोडा अजुन सुधारायला हवे असे त्यांच्या मुळे कळाले, शतशः धन्यवाद काका.
>>तुला जितकी माझी कविता आवडली आहे, तितकीच मला तुझी कथा आवडली आहे...
धन्यवाद फुलवा, दरवेळेस ती कविता वाचतांना अश्या हजार कल्पना येतात, अश्या सतत वाचत रहाव्या वाटणार्या कविता विरळाच.
असो, सगळ्यांनी दिलेल्या दादेबद्दल, केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे.
धन्यवाद.