मेंदी भरले पाऊल घेऊन
पहाट अवतरली..
अलगद नाजूक, धरतीवरती
चाहूल थरथरली..
जागी झाली सृष्टी सारी
ऐकून भूपाळी
निळेजांभळे क्षितिज तेव्हा
झाले सोनसळी
क्षितिजावरती डोकावुनीया
हळूच तो हसला
आळसावल्या चराचराला
सूरही गवसला
लगबग झाली दहादिशांतुन
तया पाहण्याला
ओलेत्याने सज्ज जाहल्या
जणू स्वागताला
धरतीवरती शिंपण झाले
सडा रांगोळ्यांचे
मनी मानसी दीप उजळले
नविन आशांचे
काळोखाची संपून जाईल
मुजोर बळजोरी
आकांक्षांची किरणे येतील
हसून सामोरी
नविन आशा आकांक्षांनी
भरु दे ही झोळी
मांगल्याचे औक्षण करूनी
हसेल दिवाळी..
- प्राजु
प्रतिक्रिया
25 Oct 2011 - 10:49 pm | जाई.
मस्त प्राजुतै
दिवाळीला सुंदर काव्याचा फराळ दिलास
25 Oct 2011 - 10:53 pm | प्रचेतस
सुंदर, मंगलमयी कविता.
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
25 Oct 2011 - 11:03 pm | इंटरनेटस्नेही
कविता आवडली!
26 Oct 2011 - 12:01 am | पैसा
तुला पण दिवाळी शुभेच्छा!
26 Oct 2011 - 12:26 am | प्रभो
मस्त कविता
26 Oct 2011 - 12:28 am | रेवती
काव्यमय शुभेच्छा!
कविता आवडली.
26 Oct 2011 - 12:56 am | चित्रा
दिवाळीच्या प्रसन्न पहाटेचे वर्णन आवडले.
26 Oct 2011 - 9:24 am | प्रकाश१११
आवडली कविता.सुरेख ..!!
26 Oct 2011 - 9:24 am | प्रकाश१११
आवडली कविता.सुरेख ..!!
28 Oct 2011 - 3:45 pm | दत्ता काळे
कविता आवडली.
28 Oct 2011 - 5:56 pm | मदनबाण
कविता आवडली... :)