मेच्या पहिल्या आठवड्यातला शुक्रवार. भडभुंज्यांच्या कढईत तापवल्यासारख्या गरम मातीतून सायकल मारत घरी आलो. माणसं सगळी घरांच्या सावलीत गुमान पडलेली. गल्लीतली कुत्रीसुद्धा हातपंपाच्या आजूबाजूला गारवा शोधत वीतभर जिभा काढून धपापत बसलेली. अधूनमधून छोट्याशा झुळकींचे भोवरे धुळीची चादर विस्कटत असले तरी त्यात हवेपेक्षा उन्हाच्या झळाच जाणवत होत्या. पाठीला घामाने शर्ट चिकटलेला असला आणि उन्हाने चेहरा रापला असला तरी मला आतून गार गार वाटत होतं. इंजिनिअरिंगची शेवटची परीक्षा संपली होती आणि चांगली गेली होती.
सराईतपणे सर्रकन उघड्या फाटकातून सायकल आत नेली आणि तसाच मागच्या मागे उतरून अलगद भिंतीला जाऊन टेकू दिली. धडधडत व्हरांड्यात जाऊन आईला हाक मारणार तोच भानावर आलो आणि मग आवाज न करता हलक्या पायांनी घरात शिरलो. घरात शांतता होती आणि आतल्या अंधाराला डोळे सरावायला थोडा वेळ लागला. हळू हळू दबक्या पावलांनी पुढच्या खोलीतून मधल्या खोलीत गेलो. आई अपेक्षेप्रमाणे जराशी पडली होती आणि तिचा डोळा लागला होता. तिची झोपमोड न होऊ देता तिथून स्वयंपाकघरात आणि तिथून मागच्या दारात आलो. माझ्या चाहुलीने दाराशेजारच्या नळावर बसलेल्या दोन चिमण्या भुर्रकन उडाल्या आणि पारिजातकावर जाऊन बसल्या. धुण्याच्या दगडावर पोट टेकवून पहुडलेल्या मांजरीने एक डोळा उघडून पाहिलं आणि कुंपणाच्या भिंतीवर बसलेला कावळा उडून गेला. कडुनिंबाखाली टाकलेल्या झोपाळ्यावर बसलेल्या चिमी-ठमीला मात्र काहीच पत्ता लागला नाही. वेण्यांचे लांब-जाड शेपटे पाठीवरून मागे टाकून दोघी हळुवारपणे झोके घेत पुस्तकांच्या आडून खुसपुसत होत्या. काय एवढ्या गप्पा रंगल्या होत्या कोण जाणे?
पाय न वाजवता थोडासा झुकुन पुढे गेलो आणि बैलांच्या वेसणी धराव्या तशा त्यांच्या वेण्या दोन हातात दोन धरून खेचल्या.
"आऊच..आईगं",नाजूकपणे दोघी कळवळल्या आणि मी वेण्या सोडून हसत उभा राहिलो.
"दादिटल्या खादिटल्या," चिमी ओरडली आणि पुस्तक घेऊन मारायला मागं आली. झोपाळ्याभोवती दोन-तीनदा तिला हुलकावण्या दिल्यावर रागाने फुसफुसत पुन्हा झोपाळ्यावर धपकन बसली.
"जा चिमे, मला जेवायला वाढ", मी म्हणालो.
"अडलंय माझं खेटर. स्वतःच्या हाताने वाढून घेता येत नाही का?", चिमी नाक उडवत म्हणाली.
"जा नाहीतर मी आईला उठवीन हां."
दोन सेकंद माझ्याकडे मारक्या म्हशीसारखं बघून चिमी उठली. "चल गं ठमे", असं म्हणून दाणदाण पाय आपटत आत गेली. ठमी गेली नाही. खाली बघत मंद हसत हातातल्या मिटलेल्या पुस्तकावर बोट फिरवत बसली.
मी कडुनिंबाला टेकून उभा राहिलो. तिच्या सावळ्या गोल चेहर्याकडे, खाली झुकलेल्या लांब लांब पापण्यांकडे आणि आता खांद्यावरून पुढे घेतलेल्या वेणीकडे पाहात राहिलो.
"बन्या म्हणाला तुला बघायला येताहेत उद्या?", मी विचारलं.
तिने पापण्या उचलून वर पाहिलं. मी नजर चुकवून जांभळीच्या पानांमध्ये मोहोर शोधू लागलो.
"हो येताहेत ना. श्रीरामपूरचे लोक आहेत."
मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. ती पुन्हा खाली बघून मंद हसत पुस्तकावर बोट फिरवत होती.
"मोठी तालेवार पार्टी आहे म्हणे?", मी मिश्कीलपणे म्हणालो.
"हो, आहेच्च मुळी," तिने तिरप्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. तिचं हसू आता रुंदावलं होतं, " ट्रान्सपोर्टचा बिझीनेस आहे. पंचवीस ट्रक आहेत म्हणे."
का कोण जाणे, पण मला कशाचातरी खूप राग आला. मी नजर पुन्हा जांभळीच्या पानांमध्ये खुपसली.
"असेना का. आम्हाला काय फरक पडतो?", तिच्याकडे न पाहताच मी म्हणालो, " आम्ही काय, तुझ्या लग्नात जेवणावर उभा-आडवा हात मारणार आणि तुझा नवरा तुला ट्रकमध्ये घालून न्यायला लागला की खाली उभं राहून तुला टाटा करणार. अर्थात तू आम्हाला लग्नाला बोलावलं तर... बोलावणार ना?"
काही उत्तर आलं नाही म्हणून मी मान वळवून तिच्याकडे पाहिलं. तिची नजर खालीच झुकलेली राहिली. चेहर्यावरचं हसू मात्र मावळलं होतं. मला बरं वाटलं.
पुस्तक सोडून आता ओढणीशी वेगाने चाळा करणार्या तिच्या नाजूक, लांब बोटांकडे पाहून मी आणखी चेव आल्यागत म्हणालो,"ठमेऽऽ, काय म्हणतोय मी? बोलावणार ना लग्नाला?"
तिने झटकन वर पाहिलं. इतकावेळ हसणार्या तिच्या टपोर्या काळ्या डोळ्यांमध्ये पाणी डबडबलं होतं आणि डोळ्यांच्या गुलाबी कडा लालसर होऊन पापण्या भिजल्या होत्या.
"ठमे...", मी चरकलो.
ती तटकन् उठून उभी राहिली आणि माझ्याकडे न पाहता, काहीही न बोलता तरातरा चालू लागली.
"ठमे....मेहरुन्निसा..", माझ्या घशातून अस्पष्ट शब्द उमटले.
मला मोठ्याने हाक मारून तिला थांबवायचं होतं, पण घशात इतका मोठा आवंढा आला की डोळ्यातून पाणीच आलं.
प्रतिक्रिया
25 Oct 2011 - 9:27 am | प्रचेतस
ननि, एकदम सुरेख लिहिलेय. प्रसंग मस्तच जमलाय.
सुरुवातीच्या उन्हाळ्याचं वर्णन तर एकदम जिवंत.
25 Oct 2011 - 9:39 am | मदनबाण
अप्रतिम लिहलयं...क्लासच ! लयं आवडेश. :)
25 Oct 2011 - 9:40 am | पैसा
कथा खूप आवडली. परिसराचं आणि व्यक्तिरेखांच्या भावभावनांचं चित्रण फार सुंदर आलंय. न बोलून खूप काही सांगितलेलं...
25 Oct 2011 - 9:50 am | बहुगुणी
प्रत्येक बारकाव्यानिशी जिवंत चित्रण, कथानायकाच्या मागोमाग घरात शिरून प्रसंग पहातोय असं वाटलं.
25 Oct 2011 - 9:51 am | गवि
धागा उघडण्याआधीच माहीत होतं की उत्कृष्ट असणार..
तसंच झालं.
फार सुंदर.. हाडाचा लेखक आहेस तू..त्या जागी घेऊन जातोस. अगदी प्रकाश, अंधार, वास, थंडावा सगळ्या फीलिंग्ज होतील इतकं जबरी..
25 Oct 2011 - 10:04 am | मन१
मनाला भिडले.
25 Oct 2011 - 10:07 am | विलासराव
लिहिलेय ननि.
25 Oct 2011 - 10:26 am | किसन शिंदे
अतिशय सुरेख.
उन्हाळ्याचं वर्णन, मागच्या दारातून बाहेर पडल्यानंतरच वर्णन झक्कास लिहलयं, वाचताना असं वाटत होतं जसं कथानायकासोबत आम्हीही तिथे आहोत.
25 Oct 2011 - 10:41 am | मैत्र
केवळ अप्रतिम वर्णन...
शेवट थोडा अधिक स्पष्ट असता तर जास्त आवडला असता.
25 Oct 2011 - 11:22 am | यशोधरा
सुरेख.
25 Oct 2011 - 11:59 am | गणेशा
नगरीनिरंजन म्हंटले की छानच लिहिलेले असणार हे मनात धरुनच वाचायला सुरुवात केली..
मस्त झाली आहे कथा... आवडली ...
"मेहरुन्निसा " हा माझ्या साठी तरी नविन शब्द आहे .. काय अर्थ आहे याचा ?
असेच लिहित रहा... वाचत आहे ...
-
25 Oct 2011 - 12:05 pm | प्रास
लई भारी लिवलंय हो...
कथेतली प्रत्येक बारीक सारीक बाब काटेकोरपणे आणि तपशीलवारपणे स्पष्ट करण्याची हातोटी वाखाणण्यासारखीच आहे. इतकं पर्फेक्ट उतरलेल्या वर्णनानंतर केलेला शेवट पर्फेक्टली परिणामकारक वाटला.
लगे रहो ननिशेठ!
:-)
25 Oct 2011 - 12:07 pm | ऋषिकेश
वा ननि वा!
अगदी नेमके वर्णन आणि लाघवी, हुरहुर लावणारी कथा! मस्तच!
25 Oct 2011 - 1:06 pm | दादा कोंडके
ही कथा वाचून "कातरवेळ" नावाचा धडा आठवला. बहुतेक नववीत असताना होता मराठीच्या पुस्तकात.
26 Oct 2011 - 10:26 pm | निनाद मुक्काम प...
@
दादा
हा धडा ११वीच्य मराठीत पुस्तकात होता .माझा अत्यंत आवडता .( कातरवेळ ह्या शब्दाने मनात घर केले )
ननी ह्यांनी एक चित्रच डोळ्यासमोर उभे केले ह्याला म्हणतात शब्दाची ताकद .
कथा एका चांगल्या वळणावर संपली पण ह्यांचा पुढचा भाग करता येईन असे वाटते
( आशाळभूत वाचक )
25 Oct 2011 - 1:58 pm | पियुशा
मस्त , आवडेश :)
25 Oct 2011 - 3:57 pm | धनुअमिता
उत्तम लेखन. असे वाटले प्रत्यक्ष तिथेच आहोत.
"मेहरुन्निसा " काय अर्थ आहे याचा ?
25 Oct 2011 - 6:01 pm | रेवती
कथा आवडली.
दुपारचे वर्णन चांगले केले आहे.
25 Oct 2011 - 6:25 pm | बहुगुणी
मेहेरुन्निसा हे माझ्या आठवणीप्रमाणे जहांगिराची २० वी (आणि सर्वात आवडती) पत्नी नूर जहान हिचं मूळ नाव होतं (तिला जहांगीरने आपलं मूळ नाव - [नुर-उद्-दिन-महंमद] आणि आपला किताब [जहान-गिर] यांचा संयोग करून नूर-जहान हे नाव दिलं होतं.)
पण या कथेत त्याच अर्थाने मेहेरुन्निसा नाव वापरलं आहे का? असेल तर संदर्भ नीटसा कळला नाही.
25 Oct 2011 - 8:30 pm | यकु
व्वा!!!
25 Oct 2011 - 9:15 pm | नगरीनिरंजन
हे ठमीचं खरं नाव आहे. अर्थातच ठमी हे तिचं टोपणनाव.
मेहरुन्निसा या शब्दाचा शब्दश: अर्थ आहे स्त्रियांमधला सूर्य. ग्रहांमध्ये जसा सूर्य तेजस्वी दिसतो तशी इतर स्त्रियांमध्ये तेजस्वी दिसणारी स्त्री म्हणजे मेहरुन्निसा.
डबडबलेल्या डोळ्यांनी ती निघून जाताना तिला खर्या नावाने हाक मारून थांबवण्याचा प्रयत्न करताना कथानायकाच्या मनातल्या अव्यक्त भावनांबरोबरच त्यांच्या दोघांच्या नात्याचे भवितव्यही या हाकेतून प्रतीत होते असे मला वाटते.
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचनमात्रांचे हार्दिक आभार!
26 Oct 2011 - 10:11 am | तिमा
लेखन एकदम सकस. वर म्हटल्याप्रमाणे रखरखीत दुपारचे वर्णन म्हणजे शब्दचित्रच! आवडले. असेच लेखन आणखी येऊ द्या.
26 Oct 2011 - 10:34 am | चेतन सुभाष गुगळे
प्रेमरोग चित्रपटातील यह गलीया यह चौबारा यहां आना न दुबारा या गाण्याची आठवण झाली.
26 Oct 2011 - 11:05 am | शिल्पा ब
कथा आवडली. भिन्न धर्मिय प्रेमिक वगैरे ...पण अगदी मुलायम पद्धतिने सांगितलंय. छान.
26 Oct 2011 - 11:20 am | मृत्युन्जय
एक अतिशय सहज सुंदर कथा. आणि खुपच प्रभावी चित्रण. अव्यक्त भावना दोन व्यक्तींना त्यांच्यामधल्या ट्युनिंग प्रमाणे समजु शकतात पण त्या वाचकांपर्यंत एवढ्या सशक्त पणे पोचवायला त्याच ताकदीचा लेखक लागतो ते या कथेत उत्तम जमले आहे.
26 Oct 2011 - 11:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कथा आवडली. वर्णन तर एक लंबर.
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
26 Oct 2011 - 6:07 pm | धमाल मुलगा
नि:शब्द झालोय लेका!
काय लिहिलंयस, काय लिहिलंयस... साला दिल हलवून गेली रे कथा.
26 Oct 2011 - 7:41 pm | रेवती
नि:शब्द झालोय
चलाऽऽ, बरं झालं. आता तरी जरा शांत वाटेल.;)
26 Oct 2011 - 11:51 pm | चतुरंग
चित्रदर्शी वर्णन. एकेक प्रसंग डोळ्यांसमोर उभा करण्याची हातोटी वाखाणण्याजोगी. मे महिन्यातल्या दुपारचे वर्णन तर मला माझ्या नगरच्या जुन्या वाड्यात घेऊन गेले. मनातल्या मनात चोरपावलांनी दबकत दबकत जात हौदाशेजारच्या थंड खोलीत दुपारची पडी कधी टाकली ते समजलं देखील नाही.
कथानायक आणि ठमी यांच्यातल्या नाजूक भावनांचे मोजक्या शब्दात केलेले वर्णन जास्त चटका लावून गेले.
-रंगा
27 Oct 2011 - 12:30 am | सोत्रि
सुरुवातीचे वर्णन अतिशय सुंदर. नायकाच्या जागी मीच तीथे आहे असे वाटायला लावण्याची ताकद असणारे _/\_
नंतरचा भाग (ठमीबद्दलचा) हेलावुन टाकणारा.
- ( कातरवेळीच्या हुरहुरीची आठवण झालेला ) सोकाजी
27 Oct 2011 - 12:39 am | आळश्यांचा राजा
क्लास!