"मराठी रंगभूमीच्या तीस रात्री" - मकरंद साठे

yeda's picture
yeda in जनातलं, मनातलं
19 Oct 2011 - 2:29 am

आधुनिक मराठी रंगभूमीला साधारणपणे गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षांचा अत्यंत समृद्ध असा इतिहास आहे. या कालखंडात महाराष्ट्रातील -आणि भारतातील - सामाजिक राजकीय वास्तवात जेवढे मूलभूत बदल झाले तेवढे त्याआधीच्या काही हजार वर्षांत झाले नव्हते. मराठी रंगभूमी या बदलांची साक्षी होती आणि आपल्या परीने त्यांचे अर्थ लावत- कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणता- तिने काही सक्रीय भूमिकाही निभावली. 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' हा अशा रंगभूमीचा विलक्षण इतिहास तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन, एका प्रकारे तो या कालखंडातील सामाजिक वास्तवाचाच मांडलेला एक लेखाजोगा आहे.

या ग्रंथात एक प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. या ग्रंथातील मांडणी, एका विदुषकाने एका नाटककाराला सांगितलेल्या तीस कथा अशा स्वरूपात मुद्दाम करण्यात आली आहे. या मांडणीत इतिहास अभ्यासाच्या शिस्तीबाबत कोणतीही तडजोड केलेली नसली, अशा स्वरूपामुळे हा ग्रंथ, या विषयाचा काही खास अभ्यास नसणार्‍या सामान्य वाचकासही एखाद्या कादंबरीप्रमाणे 'सहज' गुंतवून ठेवेल. या ग्रंथाच्या आशयाइतकीच त्याची शैलीही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

लेखकाविषयी -
नाटककार आणि कादंबरीकार म्हणून मकरंद साठे यांनी साहित्यविश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाट्य-लेखनासोबतच नेपथ्यरचना, नाट्यदिग्दर्शन अशा नाट्यक्षेत्राशी जोडलेल्या गोष्टींमध्येही त्यांनी यश मिळवले आहे. 'चारशे कोटी विसरभोळे', 'रोमन साम्राज्याची पडझड', 'सापत्नेकराचे मूल', 'ऐसपैस सोईने बैस', 'ठोंब्या', 'सूर्य पाहिलेला माणूस', 'www.गोळायुग.com
', 'चौक' या नाटकांबरोबरच, 'घर' आणि 'वाढदिवस' या दोन एकांकिकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांपैकी सॉक्रेटिसच्या जीवनावरील 'सूर्य पाहिलेला माणूस', माणसाच्या जीवनावरचे भाष्य असलेले 'चौक' ही त्यांची गाजलेली नाटके. 'अच्युत आठवले आणि आठवण' ही त्यांची पहिली प्रकाशित कादंबरी. त्यानंतर 'ऑपरेशन यमू' ही कादंबरी प्रकाशित झाली. या दोन्ही कादंबर्‍या वेगळ्या वाटा निर्माण करणार्‍या ठरल्या.

दोन वर्षांपूर्वी बंगळुरूच्या 'इंडिया फौंडेशन फॉर द आर्टस' या फौंडेशनतर्फे मिळालेल्या अभ्यासवृत्तीचा भाग म्हणून 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' हा मराठी रंगभूमीचा त्रिखंडात्मक राजकीय सामाजिक इतिहास त्यांनी नुकताच लिहून पूर्ण केला आहे व पॉप्युलरतर्फे तो लवकरच प्रकाशित होत आहे.

माणसाचे जगणे, त्यातील व्यथांचे सूक्ष्म रेखाटन करणारे सुप्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या तीस चित्रांचा समावेश या ग्रंथात करण्यात आला आहे. प्रत्येक रात्रीच्या गोष्टीशी सुसंगत एक चित्र स्वत: मकरंद साठे यांनीच निवडले आहे. त्यामुळे एकूणच कलाप्रेमी रसिकांसाठी 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' एक मेजवानी ठरणार आहे.
१७५० पृष्ठे असलेल्या या ग्रंथातील तीस रात्रींचे एकूण तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात पंधरा रात्री आहेत. त्यांपैकी पहिल्या रात्रीची ही थोडक्यात ओळख.

रात्र एक ची अनुक्रमणिका आणि सुरुवातीचा काही भाग :

रात्र एक
१. झाले ते असे १
२. पहिला कालखंड, १८४३ ते १८८० प्रास्ताविक ९
३. पहिली नाटके - (अ) विष्णुदास भावे - सीता स्वयंवर २५
४. पहिली नाटके - (ब) म. जोतिबा फुले - तृतीय रत्न ३६
५. पहिली नाटके - (क) बुकिश/ऐतिहासिक नाटके,
वि. ज. कीर्तने - थोरले माधवराव पेशवे ४८

रात्र एक
झाले ते असे
मी निघालो होतो वेताळ टेकडीवर. रात्रीची वेळ होती. अकरा साडेअकराची. म्हणजे नाटकाचे प्रयोग संपायला काहीसा अवकाश होता. थंडी संपत आली होती. तरी होती. टेकडीचा पहिला चढ कधीच चढून झाला होता. मधलं पठार संपवून मी दुसर्‍या चढाला लागलो होतो. इथंपासून खालच्या शहराचा आवाज आणि उजेड दोन्हींचा त्रास कमीकमी होत जातो, तसा तो व्हायला लागला होता. या जागी यावेळी फारसं कुणी भेटत नाही. वरच्या चढावावर तर नाहीच. टेकडीच्या पायथ्याशी असणार्‍या वस्तीतले दोनचार दारुडेही खालच्या चढावावर असतात, तेही इथंपर्यंत येत नाहीत. आणि कधी आलेच तर या वेळेपर्यंत टिकतही नाहीत. गेल्या कित्येक वर्षांत मला इथं माझ्यासारखं नित्यनेमानं येणारं कोणी भेटलेलं नाही. तसं म्हटलं तर खूपच वर्षांपूर्वी भालचंद्र नेमाडे नावाचे, मराठी साहित्यात नंतर फार मोठं काम केलेले गृहस्थ भेटायचे. तेव्हा ते तरुण होते. कॉलेजात होते. आणि भेटायचे म्हणजे काय तर दिसायचे. माझ्याकडं त्यांनी ढुंकूनसुद्धा कधी पाहिलं नाही. तेव्हासुद्धा नाही. मरे ना का. नसतो एकेकाला नाटकातल्या विदूषकात इंटरेस्ट. तसा मी अगदी पूर्ण लोकशाहीवादी माणूस आहे.
**********

आता आपण मुद्द्याशी आलो. पुरेशी वातावरणनिर्मितीही झाली. तर झालं असं, आणि हा कळीचा मुद्दा हा, की त्या रात्री, अचानक मला त्या चढावावर एक माणूस दिसला. इतका अचानक की मी जागीच थबकलो. माझ्या हातावरचे केस ताठ उभे राहिले. ते खालीच येईनात, कारण तो मला ओळखीचाही वाटू लागला. मग मी चारही बाजूंनी फेर्‍या घालून, अंधारात आपले डोळे आपल्याला फसवत तर नाहीयेत याची खात्री करून घेतली. माझी खात्री झाली की हा तर आपल्या ओळखीचा, नात्यातलाच जवळजवळ. हा तर आजच्या काळातला, म्हणजे पोस्ट नायंटीज म्हणतात ना, म्हणजे उदारीकरण वगैरे झालं त्यानंतरच्या काळातला, मराठी प्रायोगिक नाटकाचा लेखक. तर मग मला साहिजकच चौकशी करावीशी वाटली आणि मी त्याच्याजवळ गेलो, त्यातून जे घडलं ते मी आज आपणापुढे मांडणार आहे.

http://www.facebook.com/#!/pages/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0...

संस्कृतीप्रतिभा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

19 Oct 2011 - 2:36 am | मुक्तसुनीत

आताच हा धागा वाचला. प्रस्तुत प्रकाराला फेसबुकात सबस्क्राईब केलेले होतेच.
इथे सविस्तर माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. प्रस्तुत पुस्तकाचे काही फोटो फेसबुकावर पाहिले होते. येथेही काही अन्य फोटो टाकले तर आनंद होईल.

प्राजु's picture

19 Oct 2011 - 5:51 am | प्राजु

क्वाइट इंटरेस्टिंग!!!
या पुस्तकाबद्दल आणखी वाचायला आवडेल. अजून फेबु वर लिंक नाही पाहिली.. पण आता बघावी लागेल.
इथे दिल्याबद्दल मनापासून आभार.

मदनबाण's picture

19 Oct 2011 - 10:38 am | मदनबाण

चांगली माहिती. :)

सुहास झेले's picture

19 Oct 2011 - 10:48 am | सुहास झेले

धन्यवाद... चांगली माहिती !!