एखादं धरण बांधून अडवितात नदीला... तेव्हा कसं वाटत असेल तिला ?
अंतिम मिलनाची प्रचंड आस घेऊन लहरत जाता जाता अचानक आडवं आलेले धरण ...
आणि त्याच्या उभ्या आडव्या विस्तारापुढे आपल्या सारया भावना, जाणिवा, आशा आकांक्षा अश्या थिजून राहिलेल्या एका जागी...
उत्कट असोशीची सळसळती शलाका एका ठिकाणी येऊन अशी अबोल झालेली ...
वाहणे हा जगण्याचा आदिम स्वभाव विसरून धरणाच्या दगडी छातीवर धडका देणारी ...
मनात निराश.. हतबल झालेली ???
खरेच का ??? हतबल???
तसाच "ती" चा प्रवास...
"मनस्वी ... "
नुकत्याच उघडलेल्या डोळ्यांनी जग पाहताना... कौतुकाचे तुषार झेलताना ..
शिस्तीचा अन परंपरेचा हात धरून आखून दिलेल्या मार्गावर चालताना..
नकळत कधी तरी सहेला रे च्या तानेत गुंग होताना... गिरकी मारून समेवर अल्लद परत येताना ...
सह्याद्रीच्या अवाढव्य विस्तारापुढे नतमस्तक होताना .. शिवाजी महाराजांची दमदार ललकारी ऐकून थरारून जाताना..
समुद्राच्या अगणित लाटा पावलावर लपेटताना .. क्षितिजाचे सारे रंग मनात मिसळताना ...
जिभेवर पाणीपुरीची अख्खी पुरी चाखताना...
असे जगण्याचे सगळे धागे घेऊन उभे आडवे महावस्त्र विणता विणता ... साऱ्याचा भावनांचा एक झुला करून त्यावर मनसोक्त झोके घेताना ...
हे विसरून जाते ती...
की तो झुला एक क्षण असाच आभाळात उंच उंच जाईल.... त्या झुल्याला झोका देणारा मायाळू हात अलवार निसटेल.. अन आपण आभाळात...
कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या प्रमाणे चौकट का ही???
आधाराचे सगळेच बंध सुटल्याची ... अधांतरी... कुठे पोहोचणार... कसे पोहोचणार... आधार असेल का त्या .. "त्या"च क्षणाला... कुणाचा आधार... कसा असेल... समजून उमजून घेईल का तो... की नाकावर आपटणार आपण... एका अनोळखी नात्याची...सप्तपदीची.. अशी जीवघेणी पहिली ओळख...
पण "ती".. मनस्वीच ती ...
या गदारोळात... त्याच झुल्यावर अजून ही हसतेय... त्याच आभाळाला अजून खुणावतेय... स्वप्ने समोर दड्लीयेत तिची...
अन साथीला शिदोरी ...
त्या सगळ्या जगण्यावर आसुसून प्रेम करण्याची... स्वतःचे १००% प्रयत्न देण्याची ...
पडलो धडपडलो तरी परत उठून चालू पडण्याची उभारी मनाला देण्याची... नात्यांच्या बंधांवर विश्वास ठेवण्याची ...
त्याच शिदोरीवर अल्लड आयुष्याची एक पाऊलवाट अलगद उतरेल निळ्या आभाळात... तिला हव्या असलेल्या स्वच्छ आभाळात... स्वप्नांच्या रंगीबेरंगी क्षितिजावर...!!
ताजा कलम :
ही कहाणी सुफळ संपूर्ण का ??
नाही... अश्या कहाण्या सुरूच राहतात न...
"ती" चा प्रवास असाच सुरु निरंतर !!!
भक्ती आजगावकर
http://swarnim-sakhi.blogspot.com/
प्रतिक्रिया
18 Oct 2011 - 6:12 pm | वपाडाव
मस्त !!
आडौले....
18 Oct 2011 - 6:17 pm | दादा कोंडके
हे असलं मुक्तक काय किंवा शेवटचं वाक्य, "...डोळ्यात पाणी आलं" असं असलेले ले़ख काय, वाचुन हल्ली काहीच वाटेनासं झालंय.
हे असंवेदनशील होण्याचं लक्षण तर नव्हे?
19 Oct 2011 - 12:04 am | भक्ति
धन्यवाद वपाडाव ...
अन दादा
काही वाटेनासे झालेय ... हे अजुन वाटते हे कमी नाही.. नाही का...
19 Oct 2011 - 12:09 am | ५० फक्त
छान लिहिलंय, आवडलं पण कधीतरी याच शैलित धरणाचं मनोगत लिहा ना, उगाच त्याला सुद्धा अपराधी नको वाटायला.
तुमचा ब्लॉग पाहिला, मस्त आहे.
19 Oct 2011 - 11:26 pm | ५० फक्त
हा उतारा तुमच्या खवमध्ये पण टाकला आहे, तुम्हाला राग येणार नाही ही अपेक्षा.
---
एखादं धरण बांधून अडवितात नदीला... तेव्हा कसं वाटत असेल तिला ?
एखादं धरण बांधताना खरंतर मागंच अडवलेलं असतं नदीला,
आणि तिथुनच दिसत असतो तिला हळुहळु आकाराला येत असलेला
तो प्रचंड बंधारा
सागराच्या अंतिम मिलनाची आस तर तिच्या मनात जन्मापासुन असतेच
पण आता तिची स्वप्नं पण वेग़ळा आकार घेउ लागतात
लांब कुठंतरी न दिसणा-या सागराच्या लाटांमध्ये तर एकदा जायचं असतंच
त्याआधी एकदा या विराट सौंदर्याला भेटायचं असतं
आणि एकदा का हे मिलन झालं कि तिला असंच वाटतं की,
ही भव्यता आपल्या आशा,आकांक्षा अन भावना तिच्या पायातच बांधुन ठेवेल ,
काही काळ जातो असा की तिचि निराशा त्या धरणाच्या भिंतीवर उगवणा-या शेवाळ्यातुन दिसायला लागते,
तिचं वाहणं संपतं का तिचा वाहण्याचा स्वभाव विसरते ति,
पण एक मात्र खरं तो विराट बांधच तिला थांबवत असतो, रक्षण करतं असतो, तिच्या पुढ्च्या वाटेतल्या खाचा खळग्यापासुन
अगदि त्याला माहित असुनही की तिचं हे त्याच्या बरोबर असणं, फार काळासाठी नाहिय,
त्याला दिसत असतो तो त्याच्या पलिकडं पसरलेला उजाड वैराण माळ,
तिची वाट पाहणारा, उभं राहण्यासाठि, या आलम दुनियेला उभं करण्यासाठी..
19 Oct 2011 - 12:26 am | गणेशा
मुक्तक मनाचे ठाव घेणारे आहे ..
19 Oct 2011 - 4:00 am | पिवळा डांबिस
छान आहे, छान आहे!
एक शंका...
शिवाजी महाराजांची दमदार ललकारी ऐकून थरारून जाताना..
शिवाजी महाराज ललकार्या मारत फिरायचे? :)
मला वाटतं ललकार्या मारण्यासाठी त्यांनी वेगळे भालदार-चोपदार हायर केलेले होते...
मिपावरच्या शिवाजी महाराज पेशालिश्ट जाणकारांच्या खुलाश्याच्या अपेक्षेत...
19 Oct 2011 - 11:10 am | michmadhura
छान लिहिलंय, आवडलं. आपलंच प्रतिबिंब पाहतोय का? असं वाटलं.
19 Oct 2011 - 11:13 am | मदनबाण
छान...
19 Oct 2011 - 11:25 am | किसन शिंदे
सुंदर मुक्तक लिहलयं!!
19 Oct 2011 - 5:56 pm | भक्ति
५० फक्त ,गणेशा, michmadhura, मदनबाण, किसन शिंदे
धन्यवाद...
ब्लोग च्या कौतुका बद्दल आभार ...
पिवळा डांबिस :
नाव बरोबर घेतलेत तुम्ही ... :)
19 Oct 2011 - 9:28 pm | पिवळा डांबिस
पिवळा डांबिस :
नाव बरोबर घेतलेत तुम्ही ...
सगळेजणं अस्संच म्हणतात!!!!
ठेंक्यू, ठेंक्यू!!!
:)