आकाशातल्या ठोम्ब्या बद्दल ....!

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
6 Sep 2011 - 7:36 pm

काल जिम मधून खाली उतरलो. साडे आठ वाजले होते. गाडी जवळ पोचताना जिम कडे जाणारा मित्र भेटला. हा बहुदा माझ्या बरोबर असतो, सातच्या सुमारास. आज इतक्या उशिरा येतोय म्हटल्यावर गुड मॉर्निंग ऐवजी साहजिकच माझ्या कडून त्याच्यावर प्रश्न आपटला गेला, "अरे, आज इतका उशीर का ?" त्याचे स्पष्टीकरण चालु झाले. " काल श्रावण संपला ना. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत 'बसलो' होतो. श्रावणाच्या म्हैना भरात सॉलिड तहान लागली होती. मित्र ही होते बरेच. दहा दिवस आधीच ठरवून ठेवले होते. फार मजा केली. एकदम आउट ! पार कल्ला केला. आता आणि दहा दिवस बंद ना. गणपती आहे, बाप्पा. आपण नाही गणपतीत घेत. त्यामुळे आज जरा उशीर झाला." मी " ओके, गुड डे." एवढंच म्हणालो. मित्राच्या निवेदनाला लॉग आउट केलं आणि गाडी कडे सटकलो.

गाडीत नेमका गुलाम अली ' हंगामा है क्यो बरपा, थोडीसी जो पीली है ..' ची अर्धवट राहिलेली गझल संपवत होता. त्यामुळे मित्राच्या काल पर्यंत दाटून आलेल्या कंठाची पुन्हा एकदा आठवण झाली. प्यायची तर बिनधास्त प्यायची ना. श्रावण किंवा गणपती साठी स्वत:वर बलात्कार कशाला ? दहा दिवस आधी प्लानिंग म्हंजे त्याही वेळी इच्छा झालीच असेल ना. प्यावेसे वाटले असेलच ना. आणि गणपती यायच्या आधी एकच दिवसाचा चान्स मिळाल्यावर आधीच्या महिना भराची आणि नंतरच्या दहा दिवसांची एकत्र पिऊन घ्यायची हा केव्हढा त्रास ? आणि कशासाठी ? आणि त्या दिवसांमध्ये इच्छा होऊन प्यायची का नाही ? तो एकच दिवस जो मध्ये होता त्या दिवशीच का चालते ? माझा मान्सीक त्रास असा होता की त्या महिन्यात आणि नंतरच्या दहा दिवसात असा काय फरक असतो ज्यामुळे आपल्या इच्छांचे दमन माझ्या मित्रांना करावे लागते? या श्रद्धाळू लोकांची गणितं मला कधीच कळत नाहीत. वर्ष भर कुणाचा ना कुणाचा असा त्रास असतोच. परवा पार्टी करू असं ठरवायचं असेल तर एकजण तरी म्हणतोच ' मित्रा परवा गुरुवार आहे बरं का, दत्ताचा वार आहे. दुसरा दिवस निवडा.' श्रद्धेचा आणि या बलात्काराचा नैतिक सबंध काय ?

गणपतीच्या आदल्या दिवशी काय नसतं जे त्या दहा दिवसात असतं ? म्हंजे आदल्या दिवशी गणपती पिताना बघत नाई का ? तो आलेला नसतो म्हणुन त्याला चालतं की तो आलेलाच नाही त्यामुळे त्याला विचारायचा संबंधच काय ? किंवा तो आलेला नसल्यामुळे तो बघू शकत नाही, त्याला समजतच नाही. या पिण्याच्या पार्श्वभूमीवर तर एक भारी किस्सा आहे माझ्या कडे. आमच्या गावात म्हंजे निपाणीला एक देवी असते. बहुतेक ग्राम देवता वगैरे असते. कारण ती एका किल्ल्यात असते. जुना भुईकोट किल्ला असतो. नवरात्रतात मोठा उत्सव असतो. असणारच. देवी आहे. दसऱ्याच्या पूजेला देवीला चक्क दारूचा नैवेद्य दाखवतात. आणि नैवेद्य म्हंजे असं छोट्याश्या वाटीत चमचाभर वाढून नाई देत. डायरेक्ट बाटली - म्हंजे क्वार्टर - उघडतात आणि देवीच्या नाकाला लावतात. तशी पद्धतच आहे. आणि मग तिचा चेहरा भक्तांना दाखवतात. पुण्यवान लोकांना म्हणे तिचा झिंगता चेहरा आरशात दिसतो. खूप लहान असताना मला खूप टेन्शन यायचं. कारण मला ती झिंग कधीच दिसली नाही. आता बोला. देवाला हवी की नको ? त्याच्या समोर चालते की नाही ?
माझा त्याचा फारसा सबंध भर यौवना पासुन नाहीच. म्हंजे त्यांच्या पैकी - गणपतीआदी - कुणाचाच संपर्क नाही, फारसा परिचय ही नाही. त्यामुळे त्यांच्या संदर्भात पाळायची पथ्ये ही फारशी माहिती नाहीत. पण वाचना मुळे त्यांच्या - म्हंजे दिवाबिवाच्या - काही खास बाबी माहिती आहेत. म्हंजे परमेश्वराने चराचर व्यापलेले आहे. आणि तो सगळीकडे असतो.आणि आपण जे जे करतो त्याची म्हणे तो नोंद ठेवतो. आणि त्या नोंदींचा रेफरन्स घेऊन मेल्यावर आपल्या पाप पुण्याचा म्हणे हिशोब तो मांडतो. आणि मग आपले डीपार्टमेंट ठरवतो. म्हंजे नरक की स्वर्ग वगैरे. आता एव्हढी लांबलचक श्रद्धा ठेवणा-यांना हे माहिती नसतं का ? एखादे पाप करताना आपल्याला तो पाहतोय ? गुप्तपणे ! त्यामुळे तो घरी आला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. त्याचा वार असला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. कारण तो चराचर व्यापुन राहिलाय ना. भक्त प्रह्लादाने नाई का त्याच्या उद्दाम बापाला, हिरण्यकश्यपुला सांगितलं होतं की माझा नारायण सगळी कडे आहे. या खाम्बामध्येही आहे. त्याच्या बापाने मग खांबाला लाथ मारली. लाथ लागल्यामुळे रागावून त्यातून नरसिंह नामक नारायणाचा अवतार बाहेर आला .त्याने हिरण्यकश्यपुला मारून टाकलं. हे सगळ्यांना मीहिती असेलच ना. म्हंजे श्रद्धाळूना तरी. पण तरीही हेच श्रद्धाळू " चोरून" एखादी गोष्ट कशी करू शकतात ? चोरून म्हंजे इकडे तिकडे कुणी बघत नाही असं बघून. वा समजून. हो, म्हंजे डोळे मिटून दुध पिणाऱ्या मांजरी सारखं.

शिर्डीच्या एका भक्ताने कमाल केली. एक सोन्याने मढवलेली शाल बनवली. किमती हिऱ्यांचा भराव असलेली.एकदम महागडी. तशी सगळी कडे बातमी फुटली. टीवी वर, पेपरात, इमेल वर दणका चालु झाला. करोडो रुपयाची शाल. भल्या भल्या भक्तांना फ़्रस्ट्रेट करून टाकलं. त्याना वाटलं हा सगळ्यात जवळ जाणार बाबांच्या. आपल्या पुढे. आपण तर फक्त चांदीचा मुकुटच चढवलाय. पण थोड्याच दिवसात गम्मत झाली.ती सोन्याची शाल खोटी असल्याची देवस्थानाला कुणीतरी सांगितलं. तो हिरो हे 'प्रामाणिक' पणे कबुल करून रिकामा झाला. मला तेच म्हणायचंय. देवावर आहे ना तुमचा विश्वास? मग तो सगळी कडे आहे हे कसं काय बुवा ही जनता विसरू शकते ? कित्येक चोरांच्या बातम्या टीवी वर वगैरे असतात ना. अमकी चादर चढवली. तमकी पूजा बांधली. या जनतेवर भ्रष्टाचाराचे, धमकी दिल्याचे वा अन्य कसले तरी हमखास आरोप कसे असतात? त्या जेडे च्या मारेक-या चा कुठल्यातरी देवावर विश्वास होता. खून केल्यावर तो पहिल्यांदा त्या देवाला गेला असे कुठेतरी वाचलं. म्हंजे येडं कोण आहे ? जनता की देव ?

भक्ती बरोबर येणारी नैतिकता मला कधी दिसत नाही त्यामुळे ही त्याचे आणि आपलं कधी जमलंच नाही. तो एकतर नसावाच किंवा असला तर अत्यंत अकार्यक्षम म्हंजे ढिम्म असावा. कुठे दिसला नाही त्यामुळे आपण नाई त्याच्या मागे धावणार असे म्हटलं तर हमखास एक टोमणा कानावर येतो की तो पापी लोकांना दिसत नाही. हो पण माझे जाऊ द्या हो. तो असेल तर काही ठिकाणी त्याने त्याचा प्रताप दाखवायलाच हवा होता. पंधरा वीस दिवसापूर्वी असेल, एका कार्यालयात वाट बघत मुंबईत बसलो होतो. वेळ घालवायला समोर टेबलावर पडलेला टाइम्स ऑफ इंडिया चाळायला घेतला. ती बातमी वाचायची नव्हती पण परत परत तिकडे डोळे जात होते. शेवटी डोळ्यांनी माझ्या मनाला घट्ट पकडलं आणि त्या बातमीवर घेऊन गेले. घटना मुंबईतली. एक चिमुरडी सुमारे आठ नऊ वर्षाची. बिस्कीट आणायला घराजवळच्या दुकानाकडे उड्या मारत चाललेली. वाटेत तिचा बाप भेटला. तो हल्ली फारसा घरी नसतो. बाबा भेटल्यावर चिमुरडीला आनंद झाला. तो म्हणाला चल माझ्याबरोबर. तश्याच उड्या मारत ती बाबा बरोबर गेली. एक २० - २१ वर्षाच्या पोराकडे तो बाप तिला घून गेला. त्याला म्हणाला ही घे तुला. हिचे काय करायचं ते कर. त्या हरामखोर बापाला आई ने घराबाहेर काढलं होतं. कारण आपल्याच तीस वर्षाच्या पोरीबरोबर त्याला झोपायचं होतं. घराबाहेर काढलं म्हणुन तो बायकोवर चिडला होता. तिचा बदला घ्यायचा होता. तो २० - २१ वर्षाचा गुंड तिला एका स्टेशन वर घेऊन गेला. वारंवार तिच्यावर बलात्कार त्याने केला. काम झाल्यावर रुळा शेजारच्या एका नाल्यात तिला फेकून दिली. वेदनेनं बेजार झालेली चिमुरडी आक्रोश करत त्या दलदली मध्ये गटांगळ्या खाऊन मेली. मला वाचुन दरदरून घाम फुटलेला. शरीर प्रचंड थरथरत होतं. पळत फ्रेश रूम मध्ये जाऊन उलटी होते का पाहिलं. जमलं नाई. धावत गाडी कडे गेलो. बसलो. सुरु केली. लांबवर गेलो. काचा बंद केल्या जोरजोरात पाच मिनिटं. किंचाळलो. थोडा मोकळा झालो. ....... मला आकाशातला मायबाप दिसत नाही. हे मान्य. पण त्या चिमुरडीचा काय हो दोष? पाप आणि पुण्याच्या चक्रात अजुन अडकलेलाही नव्हता तो जीव. मग तिच्या वर एव्हढा भीषण अत्याचार होताना चराचर व्यापलेला तो परमेश्वर करत काय होता, शेजारी उभा राहुन? तो असेल वा नसेल. मी दखल घेण्याच्या लायकीचा तो नक्की नाही, माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच.
sudhirmutalik@gmail.com

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Sep 2011 - 7:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काहीतरी गैरसमज होत असावा.

हे तर मी ही म्हटलं पाहिजे. पूर्वजन्मीची पापं वगैरे म्हणणार्‍यांना हा प्रश्न होता.

असो. विरामचिन्हांचा उपयोग, लिखाणातल्या खाचाखोचा, उपरोध समजणं, सुस्पष्ट बोलणं खरोखरच एवढं कठीण का असावं?

स्पंदना's picture

14 Sep 2011 - 7:56 am | स्पंदना

>>बाहेरचा आधार, तोही अस्तित्त्वात नसणारा हवाच कशाला? बुडत्याला काडीचा आधार म्हण म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात आधार मिळत नाहीच>>

_ देव ही संकल्पना पुर्वी पासुन चिंतना साठी, आत्म चिंतना साठी वापरली जाते. पुजारी पुजतो तो देव नव्हे, त्या सर्वाच्या वर तुम्हा आम्हा धर्म पाळकांच्याही वर जी एक सर्वात्मक अशी काही संकल्पना आहे त्या संकल्पनेला मी देव माणते. अन ही संकल्पना मनात असते कुठच्या देवळात तर अगदी १००% नसते. अन मला तिचा आधार वाटतो. बर्‍याचदा चिडुन जाउन बदला घेण्यासाठी अगदी साध्या साध्या गोष्टीतही, आपण खालच्या पातळी वर उतरु शकतो, जस की भाजीवाला फार दर लावतो, चुकुन तो एखादी भाजी मोजायला विसरला, चला मिळाली फुकट, नाही तरी तो लुटतोच आपल्याला, हे एक साध उदाहरण झाल. पण अश्या वेळी मी माझ्या मनाच्या आरश्यात मला निर्भेळ पाहु शकते का? हा विचार मनात येण अन परत फिरुन त्याला पैसे देण हा मी देवाचा आधार मानते. अर्थात हे साध उदाहरण आहे, अगदी हाच प्रसंग असेल अस नाही. पण जे दु:ख आपल्याला झालय तेच दु:ख दुसर्‍या कुणावर येत असेल तर त्या ठिकाणी उभ रहाण वा आपल्या कडुन तसा प्रसंग अगदी शत्रुवरही न येउ देण याला, या आधारा साठी मी माझ्या आंतरिक शक्तीला देव माणते. तुम्हा आम्हाला असतिल हो आधारवड, पण ज्यांना नसतील त्यांच काय? कशान समाधान? या कोणत्या तरी संकल्पनेचच ना?
>>>आब म्हणजे?
लहान मुलीवर झालेल्या या अन्यायाचं समर्थन देण्याची एवढी का गरज भासावी? (चित्राताई आणि तिच्यासारख्या प्रतिसादकांना हा प्रश्न नाही.) ही मुलगी तुमच्या घरातली, नात्यातली, ओळखीतली असती तर अशीच स्पष्टीकरणं दिली असतीत का?>>

खुप वे वर्ड विचार. एक आई म्हणुन या अपराधाला माझ्या कडुन जन्मभर आगिचे चटके देण सुद्धा कमीच. असल्याच काय पण रस्त्यावर धक्के मारणार्‍या हलकटांना सुद्धा तिथल्या तिथ फटके उडवण्याची क्षमता मी बाळगुन आहे. इतर स्त्रियांनी ही बाळगावी असा माझा आग्रह असतो. अन हे बाळ माझ असण नसण नगण्य , एका लहान मुलीची जी अवस्था वर वर्णिली आहे, ते वाचण हाच एक कस्ला अनुभव मी वर्णु नाही शकत इतका त्रागा होतो माझा, अन अश्या वेळी; जेंव्हा आपल मन रोजच्या कामातुनही उडत , तेंव्हा एक क्षणभर त्या पणती समोर उभारण हा आधार असतो माझा.

>>मांसाहार, धूम्रपान, मद्यपान याला नंगानाच म्हणण्याएवढं वाईट काय आहे*? नंगानाच हा शब्दही थोडा विचित्रच वाटतो; जसं काही नाचणं हे वाईटच असं काही सुचवल्यासारखं वाटतं. तांडवनृत्य करणार्‍या शंकराच्या बर्‍याचशा प्रतिमा अर्धनग्नच दिसतात. आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं तर पॅरिसचा सुप्रसिद्ध कॅबरे वगैरे आठवले की "ज्याची त्याची जाण, समज" वगैरे गोष्टीच आठवतात. भारतातली आणि जगातलीही बहुसंख्य जनता ज्या ज्या गोष्टी अगदी सहजपणे करते त्याला नंगानाच म्हणणं हा शुद्ध स्नॉबिशपणा (मराठी शब्द?) आह>>>>

प्रत्येक संस्कृतीच एक स्व्तःच अस आचरणपद्धती सांगणार दंडक असत. आता आपण आई वडिलांना, गुरु जनांना नमस्कार करतो. पाश्च्यात्त नाहीत करत. मग ते करत नाहीत म्हणुन मी माझ्या आई वडिलांना आदर दाखवणार नाही अस म्हणन योग्य ठरेल का? अन आब हा शब्द दुहेरी आहे. आज मी अन माझा नवरा, दोघे ही, कितीही मजा करावीशी वाटली तरी , मद्यपान वा जे थोडे ऑफ द वे असे इथले प्रकार असतात, ते कधीही मुलांसमोर करत नाही. का? कारण त्यांचा आदर > मुलांचा त्यांच्या वयानुसार आपण धक्कादायक अस वागत नाही हा आब, उद्या माझी मुल, माझे आई वडेल अस वागत नाहीत , त्या मुळ आपण अस वागाव का? हा विचार अगदी एक क्षण भर ही करतील तरी माझी ही धडपड फळास आली म्हणेन मी. अन ही धडपड आपण करावी अस वाटायला लावणारी मानसिक शक्ती हा माझा आधार ! आता पाश्च्यात्त मुल होण हे काही फारस मोठ्ठी गोष्ट मानत नाहीत, एक शरीराचा व्यवहार मानला जातो तो. कारण मुळात संभोग हाच मुळी अगदी फारसा विचार न करण्याची गोष्ट आहे त्यांच्या साठी. आपण असा विचार करु का? मैथुन हे गरजेच्या पलिकडे एक विषेश अस काही तरी मानल जात आपल्यात, आज मी जेंव्हा भोग भोगुन रिकाम्या झालेल्या स्त्री अन पुरुषांना पहाते, त्यांच्या बदलत्या रिलेशनसह सोडुन दिलेली मुल पहाते, अन ती आयुष्यात सुरवाती पासुन्च अस्तित्वाची लढाई लढणारी मुळ पहाते, तेंव्हा आपण आपल्या तरुणपणी अस पाश्च्यात्त्त वातावरणात मोठ्ठे नाही झालो याच एक समाधानच वाटत मला. अन हा स्नॉबीश पणा मला तर आवडतो ब्वा ! जेंव्हा तरुण पण उतरत अन तरीही शरिराच्या भुका, मनाच्या भुका जाग्या असतात तेंव्हा पाश्च्यात्त पद्धतिन एकाकी होउन नको त्या गोष्टींच्या आहारी जाण्या पेक्षा माझा माझ्या भारतिय संस्कृतीन दिलेला साता जन्माचा साथिदार माझ्या सोबत असेल हा आधार वाटतो मला.अर्थात त्यांच्यात ही लग्न धर्म नाही अस नाही पण त्याचा आदर न राखता जे काही वर्तन होत या सार्‍याला मी अगदी बिनधास्त नंगानाच म्हणते. एक आदर, देवा धर्माचा, समतोल, आपण सुशिक्षीत आहोत, तेंव्हा धर्म म्हन्जे काय हे आपण ठरवु शकतो, तो राखुन रहाण याला मी आब म्हणते.
अगदीच उलगडायच म्हंटल तर हेलन करायची तो नाच, अन आज राखि सावंत घालते तो नंगा नाच.
वरती मुतालिक साहेबांची जी अवस्था एक बातमी वाचुन झाली ती त्यांच्या अपब्रिंगींगची दर्शक आहे. उद्या कुणीही अस असहाय्य त्यांच्या समोर आल तर निदान ते रक्षक जरी नाही झाले तरी राक्षस नाही होणार याची खात्री जाणवते मला त्यातुन अन तोच माझा उद्याचा माझी मु;ल या समाजात सोडायला आधार !

स्पा's picture

14 Sep 2011 - 8:15 am | स्पा

अ प्र ती म

प्रतिसाद आवडला ब्वा आपल्याला

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2011 - 8:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्हा आम्हा धर्म पाळकांच्याही वर जी एक सर्वात्मक अशी काही संकल्पना आहे त्या संकल्पनेला मी देव माणते.

अशी संकल्पना माझ्या डोक्यात नाही. त्यामुळे माझ्या लेखी देव हा फक्त एक शब्द आहे, जसा सैतान हा देखील एक शब्द आहे.

बर्‍याचदा चिडुन जाउन बदला घेण्यासाठी ... पण अश्या वेळी मी माझ्या मनाच्या आरश्यात मला निर्भेळ पाहु शकते का?

प्रचंड राग आला तरीही कोणी असभ्य वर्तन करू नये यासाठी जर कोणी भीती दाखवून देव आहे असं सांगत असेल तर मग "धर्म भीतीवर आधारित आहे" हे शंभर वर्षांपूर्वी सांगणारा बर्ट्रांड रसल थोर वाटतो. "जो दुसर्‍यावरी विश्वासला" हे चारशे वर्षांपूर्वी सांगणारे रामदास मला थोर वाटतात. "Je pense, donc je suis" (मी विचार करते म्हणून मी आहे) असं साडेतीनशे वर्षांपूर्वी म्हणणारा दे कार्ते मला थोर वाटतो; तुमच्या भाषेत माझी विचारशक्ती हाच माझा आधारवड. काडीचा आधार शोधण्यापेक्षा मला पोहायला शिकणं, शिकवणंच योग्य वाटतं.

आब म्हणजे नक्की काय हे मला अजून समजलेलं नाही. हा शब्द मला नवीन आहे.

बाकी आहार, निद्रा, भीती आणि मैथुन या मनुष्याच्या प्रमुख गरजा आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलायचं? झोप झाली की आपण उठून रोजच्या व्यवहारांस लागतो, भीती घालवण्याचा प्रयत्न करतो, पोटात खड्डा पडतो म्हणून खातो आणि एका ठराविक वयानंतर शरीराची भूक असते म्हणून मैथुन. त्यात कसलं आलंय पाश्चात्य आणि भारतीय? आणि कसलं भोग भोगून रितं होणं? लैंगिकदृष्ट्या डिप्रेस्ड लोकं शोधली तर भारतातही चिक्कार सापडतील. मूल होणं हा शरीराचा व्यापार नसतो काय? (अरे बाप रे, मिपावर काय वयाची लोकं येतात?) बरं हे मीच म्हणते असं नव्हे, तर नटसम्राट नाटकात "आमच्या वासनेच्या शिड्यांवरून आलेले जीव" असा काहीसा उल्लेख वि. वा. शिरवाडकरांनीही केला आहे. कामदेव, मदन, रति अशी पात्र जिथे पुराणात वगैरे असतात तिथे मैथुनाचा, रोमँटीक प्रेमाचा उल्लेख असा क्षुल्लक गोष्ट म्हणून व्हावा ही गोष्ट मलातरी समजत नाही.

जस की आई वडिलांसमोर धुम्रपान वा मद्यपान न करणे हे त्यांचा आदर दाखवण्या साठी असत, तसच काहिस श्रावण पाळण, त्या मुळे का असेना पण तुम्ही आत्म्संयम दाखविता हे ही नसे थोडके, नाहितर साराच नंगा नाच.

धूम्रपान, मद्यपान, मांसाहार यात काय आलाय नंगानाच हे अजूनही समजलेलं नाही.

असो. एक मजेशीर किस्सा सांगते, आधीही एक-दोनदा लिहिलेला असेल, पण तरीही:
तुम्ही ज्या पाश्चात्यांना नंगानाचप्रेमी म्हणता आहात, त्यांच्यापैकीच एका देशातली गोष्ट. नोव्हेंबरच्या दिवसात, संध्याकाळी साडेचारलाच गुडुप्प अंधार होत असे. मी रात्री आठच्या सुमारास, पाणी आणि ब्रेक्स गोठवणार्‍या थंडीत, किर्र अंधारात, खेड्यातल्या रस्त्यावरून सायकलने घरी जात होते. ओरडले असते तरी ऐकायला कोणी नसेल एवढी निर्जन जागा. थोडा वेळ सायकल चालवून हाताला घाम आला म्हणून हातमोज्यांची एक जोडी काढून पाठीवरच्या झोळीत टाकण्यासाठी थांबले तर एक चारचाकी शेजारी थांबली. खिडकीची काच खाली झाली आणि एक गोरा, मध्यमवयीन माणूस बोलला, "तू ठीक आहेस ना? काही मदत हवी आहे का?". "हो, मी ठीक आहे, थोडं उकडलं म्हणून हातमोजे काढत होते." "कुठे चालली आहेस? सायकल मोडली वगैरे नाही ना?" "नाही, नाही. इथेच, त्या टेलिस्कोपच्या इथेच. इथून निघाले की पाच-सात मिनीटांत पोहोचेन." "ठीक आहे, काळजी घे, गुडनाईट" असं म्हणून मी पुन्हा सायकलवर बसायच्या आत गाडी रस्त्यावरून दिसेनाशी झाली.
त्या गोर्‍याला श्रावण म्हणजे काय हे ही माहित नसेल, पण संयम आणि सभ्यपणा नक्की माहित असावा. नाही का?

असो. आमचीच काय ती संस्कृती आणि पाश्चात्य म्हणजे नंगानाच या विचारांचा मी निषेध करते.* या विषयावर आणखी लिहीण्याची माझी इच्छा नाही.

असो. तर मुद्दा असा की चांगलं वागणारे सगळ्या देशांत असतात; तसेच निरीश्वरवादीही असतात. सज्जन आणि सभ्य असण्यासाठी भारतात जन्म होणं, मोठं होणं आणि देवावर निरंतर विश्वास असणं हे काही सक्तीचं नाही. फक्त आपणच काय ते सज्जन, सभ्य आणि वेगळा विचार करणारे ते नंगानाच करतात हा खांब सोडण्यासाठी किंऽचित विचार करावा लागतो.

*आम्हीच काय ते पुढारलेले आणि तुम्ही हातांनी जेवणारे आणि धुणारे म्हणजे अविकसित, रानटी टोळ्यावाले याची विचारांचा प्रतिवाद करून मी दमले आहे.

आपली कशी काय संस्कृती? हे कोण म्हणाल? अन आपलीच जर संस्कृती असती तर आपल्या इथे बलात्कार झाले अस्ते का ? पण होतात ना? का? त्याच कारण हा 'नंगानाच' जो आपल्या इथेच काय पण सारी कडेच चाललाय, मी पाश्च्यात्त वाईट कधीच नाही म्हंटल ना ही माझ्या पहिल्या प्रतिसादात त्यांचा उल्लेख होता. मांसाहार अन मद्य दोन्ही आपल्या संस्कृतीत पुर्वापार आहेत अन राहतील, पण त्याचा वा कशाचाही अतिरेक हा नंगानाचच !
अन बर्‍याचदा असले खांबच कामी येतात, अगदी जातिय वादाच्या दंगलितही. जी दंगल धर्मावरुन सुरु झाली त्या दंगलीत माझा देव मला अस कर म्हणत नाही म्हणणारे खुप जण पाहिले मी लोकल मध्ये.
श्रावण, अन तस्तम प्रकार हे जर आपण मनोबला साठी म्हणुन वापरले तरी चालतात. सारच का सोडायच्?

मुल होण..

नक्की फक्त शरिराचा व्यापार? मग झाल्या वर ती सोडुन दिली चालतील? कशाला त्यांना वाढवायच? आपल्या आपण दुसरा साथिदार शोधायचा अन मज्जा करायची. शरिराचा व्यवहार तर तो. बघ म्हणुन? वादा साठे वाद घालण अन शब्दच्छलान दुसर्‍याला नामोहरम करण वेगळ अन स्वतःलाही पटेल अस बोलण वेगळ.

>>कामदेव, मदन, रति अशी पात्र जिथे पुराणात वगैरे असतात तिथे मैथुनाचा, रोमँटीक प्रेमाचा उल्लेख असा क्षुल्लक गोष्ट म्हणून व्हावा ही गोष्ट मलातरी समजत नाही>>

तु स्वतःच्याच विरुद्ध लिहिते आहेस. मी म्हणते आहे ते हेच. आपल्या साठी त्याच मह्त्व शरिराच्या पलिकडे असत. आता आपल्या साठी म्हणजे भारतियांसाठी अस जर वाचत असशील तर मी त्या वादात कधीच नस्ते. तरीही सांगते, ख्रिश्चन लग्नात फक्त थोड्याजणी पांढरा वेडींग गाउन घालतात. बाकिच्या कुठेतरी क्रिम, जरासा कमी पांढरा वापरतात. का ते विचार आहेस तिथच तर. समजेल तुला त्यांच्यातही शारिरीक संबधाला किती महत्व होत ते.

अन शिरवाडकर लिहुन गेले, करुन नाही गेले. हा फरक आहे.

प्रश्न पाश्च्यात्त्यांचा कधीच नव्हता अन नाही आहे. पण मनुष्याच्या व्यवहाराला आळा घालणार्‍या अश्या संस्कृती वा देव या संकल्प्नेच्या वापराचा आहे. अधार हा असतो की समाजाला हे मान्य नाही. उद्या समाजाला मान्य असण नसण जर नगण्य झाल तर काय याचा आहे. अन म्हणुनच अश्या संकल्पना डोळे उघडे ठेउन रुजवण्याच्या गरजेचा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2011 - 10:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्याचा वा कशाचाही अतिरेक हा नंगानाचच !

आत्मसंयमाचाही?

श्रावण, अन तस्तम प्रकार हे जर आपण मनोबला साठी म्हणुन वापरले तरी चालतात. सारच का सोडायच्?

नाही हो, मी अजून अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजा सोडलेल्या नाहीत. शब्दशः कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेलं नाही. ;-) आणि कशातही काय संयम आणि काय? भूक लागली की उपलब्ध असेल, परवडेल, पचेल, बनवायला जमेल, तब्येतीला झेपेल ते सगळं खावं आणि कामाला लागावं. त्यात कसला महिना बघायचा? आणि हिवाळ्यात मी देवगड हापूसचा हट्ट मी करत नाही हा संयमच नव्हे काय? भूक लागली असली तरी जेवण शिजत असताना स्नॅक्स तोंडात न टाकणं हा संयम नव्हे काय?

ख्रिश्चन लग्नात फक्त थोड्याजणी पांढरा वेडींग गाउन घालतात. बाकिच्या कुठेतरी क्रिम, जरासा कमी पांढरा वापरतात. का ते विचार आहेस तिथच तर.

सध्या तरी कोणाशी एवढी ओळख नाही. पण विकीपीडीया हे म्हणतो आहे:
Brides from wealthy families often wore rich colors and exclusive fabrics. It was common to see them wearing bold colors and layers of furs, velvet and silk.
त्यातूनही तुम्हाला काय सुचवायचं आहे हे मला समजलं असं वाटलं; म्हणून रॉजर फेडरर आणि मिर्का वाव्हरीनेच यांच्या लग्नाचे फोटो पाहिले. काय सुंदर पांढरा शुभ्र वेडींग ड्रेस होता मिर्काचा!
असो. ज्यू लोकांत म्हणे धार्मिक पद्धतीने लग्न केलं तर वधूचं कौमार्य शाबूत आहे का असं जाहीरपणे विचारतात. अनेक इस्रायली ज्यू लोकांनाही हे पटत नाही म्हणून ते लोकं चूपचाप अमेरिकेत येऊन लग्न करतात आणि परत जातात अशी माहिती तिथे काही वर्ष रहाणार्‍या मैत्रिणीकडून मिळाली.
"पितृसत्ताक पद्धतीमधली खुळं सगळी, योनीशुचिता वगैरे" ... हे वाक्य कविता महाजन यांच्याकडून साभार.

अन शिरवाडकर लिहुन गेले, करुन नाही गेले. हा फरक आहे.

म्हणजे बोलले तसे वागले नाहीत? "बोले तैसा चाले" वगैरे आम्हाला शाळेत उगाच शिकवलं का??

नक्की फक्त शरिराचा व्यापार? मग झाल्या वर ती सोडुन दिली चालतील? कशाला त्यांना वाढवायच? आपल्या आपण दुसरा साथिदार शोधायचा अन मज्जा करायची.

अरे कर्मा! सगळे, यच्चयावत पाश्चात्य लोकं असंच करतात का काय? बाळंतपणानंतर जर्मनीत सहा महिने (का एक वर्ष?) सक्तीची सुटी असते, आई-वडीलांपैकी कोणाला एकाला किंवा दोघांनाही घ्यावी लागते. अनेक पाश्चात्य देशांत मूल झाल्यानंतर मुलासाठी म्हणून पहिली काही वर्ष ठराविक रक्कम मिळते, मुलाच्या पोषणासाठी, ते काय आई वडील अर्भकांना वार्‍यावर सोडतात म्हणून? जोडीदाराशी जमत नाही म्हणून सरळ वेगळं होणारे पालक पोरांना वार्‍यावरच सोडून देतात का काय?
आणि उदाहरणच द्यायचं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना लहानाचं मोठं करणारी त्यांची अमेरिकन आईच होती. पाश्चात्य देशांतल्या माझ्या पहिल्या ख्रिसमसला मला स्वतःच्या घरी बोलावणारे माझ्या मित्राचे आईवडील काय त्याची पीएच.डी. सुरू झाल्यावर त्याच्यावर प्रेम करायला लागले होते का काय?

लग्न केलेल्या किंवा ज्याच्याबरोबर रहात आहोत अशा व्यक्तीमधला आपला रोमँटीक इंटरेस्ट संपला आहे हे लक्षात आल्यावर वेगळं होणार्‍या लोकांबद्दल मला अजिबात राग नाही, असलाच तर थोडाबहुत आदर आहे.

सुख मिळवताना दुसर्‍याला दु:ख होऊ नये अशी अपेक्षा रास्त आहे, पण त्याशिवाय मज्जा करण्यात काय गैर आहे? कोणाला सुखच टोचत असेल तर माझा काही इलाज नाही.

(hedonist) अदिती

आणि उकीरड्यात, कचर्‍यात सापडणार्‍या, दुधाच्या भांड्यात जन्माला येताच बुडणार्‍या बालिका कोणत्या देशात असतात? त्यांच्या आईबापांनातर दुसर्‍या व्यक्तीत रस आहे हे ही कारण नसतं. निष्कारणच बालिका मरतात नाही का?

नगरीनिरंजन's picture

15 Sep 2011 - 7:24 am | नगरीनिरंजन

वाद देवावरून सुरु होऊन संस्कृतीवर कसा आला कोण जाणे, पण एक गोष्ट नक्कीच जाणवली, देवाची गरज संपली आहे.
समाजातल्या काही घटकांचा चरितार्थ, सत्ता वगैरे देवाच्या अस्तित्वावर अवलंबून होते, पण पश्चिमेकडून आलेल्या सुधारणावादी आणि वैज्ञानिक विचारांच्या वार्‍यांनी एकाचवेळी देवाचं संरक्षक छप्पर उडवून लावलं आणि त्याचवेळी त्यांचं तारू प्रगतीच्या नव्या प्रवाहांकडेही वळवलं. देवाच्या संकल्पनेचा या लोकांना आता तितकासा फायदा उरलेला नाही. ज्यांना तो आहे ते आपापल्यापरीने नवनवे जुलूस भरवून तो उठवत आहेत.
उर्वरित जे सरळ मनाचे साधेभोळे लोक आहेत ते पूर्वापार चालत आलेल्या देवाच्या गप्पागोष्टींवर अजून विश्वास ठेवून आहेत. बर्‍याच लोकांना परंपरागत देवाचे रूप पटत नसूनही काही तरी वैश्विक शक्ती आहे असा विचार करायला आवडतो.
व्यक्तिशः मला गीतेत सांगितलेला परमेश्वर आणि निसर्गाची संकल्पना यात साम्य वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2011 - 9:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वाद देवावरून सुरू होऊन इथे या प्रतिसादात संस्कृतीचा उल्लेख प्रथम आला.

... देवाची गरज संपली आहे.

माझ्या बुद्धीला देवाचं अस्तित्व पटलं नाही तेव्हा माझ्यासाठी देवाची गरज संपली. ज्या कोणाला देवाची गरज आहे त्यांच्याबद्दल माझी "नो कमेंट".

व्यक्तिशः मला गीतेत सांगितलेला परमेश्वर आणि निसर्गाची संकल्पना यात साम्य वाटते.

यावर थोडं जास्त विस्तारीत लिहीलंत, कदाचित वेगळ्या धाग्यात, तर वाचायला आवडेल. Gaia सिद्धांतावर तुमचा विश्वास आहे काय?

नगरीनिरंजन's picture

15 Sep 2011 - 2:18 pm | नगरीनिरंजन

Gaia सिद्धांताची मला शास्त्रीयदृष्ट्या फार माहिती नाही पण त्यातलं जे मुख्य तत्व आहे की सध्याच्या जीवनावश्यक स्थितीचा समतोल साधण्यासाठी काही तरी घडत असतं तेच निसर्ग या संकल्पनेमध्ये अध्यारुत आहे असं मला वाटतं. जीवन सांभाळण्याच्या त्या जगङ्व्याळ, काटेकोर आणि नि:पक्षपाती यंत्रणेत आणि परमेश्वराच्या विश्वरूप दर्शनात बरंच साम्य वाटतं.
यावर लिहीण्याची इच्छा बर्‍याच दिवसांपासून आहे. पण विषय माझ्या बुद्धीला झेपेल असे वाटत नाही.

सेरेपी's picture

15 Sep 2011 - 7:37 am | सेरेपी

तुझ्या ह्या आणि वरच्या प्रतिसादाला. तू लिहिलयंस तसंच थोडंफार लिहायचं होतं, पण ते सारे विचार वाचून पडलेला जबडा उचलताना राहून गेलं! ;-)

हुप्प्या's picture

17 Sep 2011 - 12:59 am | हुप्प्या

<<असो. एक मजेशीर किस्सा सांगते, आधीही एक-दोनदा लिहिलेला असेल, पण तरीही:
<<.....
<<त्या गोर्‍याला श्रावण म्हणजे काय हे ही माहित नसेल, पण संयम आणि सभ्यपणा नक्की माहित असावा. नाही का?

आपण जरा जास्तच ठामपणे निष्कर्ष काढत आहात. आपल्याकडे बघून "तसे" काही वाटलेही नसेल. एखाद्या मांजराच्या पिल्लाला वा पाखराला मदत करायची इतक्याच तटस्थपणे त्याने मदत केली असेल.
त्यामुळे हा त्या व्यक्तीच्या संयम वा सभ्यपणाची कसोटी पहाणारा तो क्षण होता हा आपला गैरसमज आहे असे वाटते आहे.

परमेश्वराचे अस्तित्व अन विश्लेषण हे सर्व Occult Sciences या सदरात मोडतात.
पण त्याचे यथोचित्त न्यान संपादन करणे फ़क्त आम्हा मनुष्यालाच शक्य आहे .
या सर्व गोष्टी प्रयोगशाळेत बुध्दिप्रामाण्यवादावर तपासून पहाणे अन सिध्द करणे एवढे नक्कीच सोपे नाही
जसे पाणी = H2O तशीच परमेश्वराची फ़ोड करणे शक्य आहे का ? तर नाही हेच उत्तर मिळेल

आधुनिक जगातील एक महान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिन्स यांनी एके ठिकाणी म्हटले आहे,
''परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध करणे कठीण आहे, परंतु त्याहीपेक्षा जगात परमेश्वर नाही' हे सिद्ध करणे जास्तच कठीण आहे.''

For thousands of years philosophers and theologians have struggled with the classical problem of why an all-loving and all-powerful God would allow evil to exist. In all that time NOBODY has come up with a complete answer.

First, some have tried to solve the problem of evil by simply saying God doesn't exist. Evil and good are simply two aspects of reality that war against one another. But if there is no God, there is no Creator to create the ultimate values of good and evil. And if there is no good and evil,the problem of suffering is gone too.

If God does not exist, our moral indignation over what we think is wrong is simply personal prejudice, subjective feeling.Bertrand Russell said, "There is no God, therefore there is no good and evil." But deep within us something cries out against the murder of innocent people, the abuse of children, the rape of women. We know these are wrong because our consciences rise up against them.

The conscience is actually a gift from the Creator who is just and who defines good and evil. The fact that a conscience exists indicates therefore, that there is a conscience giver. For without a conscience-giver, without God,we couldn't tell what is good and what isn't. In fact, just before Bertrand Russell died, he said, 'To love is good. To hate is evil." Isn't it amazing that we as human beings have an innate ability and desire to distinguish between good and evil, right and wrong?

Don't make the mistake of using moral indignation as an argument against God's existence. For if there is no God, there is no authority to define what is absolutely right and what is absolutely wrong.

हल्ली बरीच शिकलेली मंडळी 'जगात परमेश्वर आहे' याच्यावर फारसा विश्वास ठेवत नाही अन खऱ्या श्रद्धेलाही अंधश्रद्धा म्हणून हिणवू लागली आहेत. पण एक गोष्ट आपण जरूर ध्यानात ठेवा, की प्रत्येक जीवाने वा मनुष्यप्राण्याने आपल्या जीवनात कुठेतरी, कोणावर तरी आपल्या स्वत:च्या हिताकरिता श्रद्धा ठेवावी. कोणी म्हणेल 'जगात श्रद्धा ठेवण्याच्या उंचीची वा लायकीची माणसं कुठं आहेत? कुठे आहेत असे आदर्श?' यावर मला कोणीतरी सांगीतलेले बोल आठविले "तुम्हाला जगात कुणीही आदर्श दिसत नसेल, सद्गुणी दिसत नसेल वा कुणावरही श्रद्धा ठेवावी असे वाटत नसेल, तर किमान एखाद्या 'दगडा'वर तरी श्रद्धा ठेवा. अट एकच की ती तुमची श्रद्धा खरी असावी, नि:संशय व निर्मळ असावी.''

ते गृहस्थ पुढे म्हणाले, ''या तुमच्या साध्या दगडावरील खऱ्या श्रद्धेमुळे, त्या दगडामध्ये किंवा पाषाणामध्ये 'देवत्व' निर्माण होईल की नाही हे मला माहित नाही, परंतु तुमच्या अंत:करणामध्ये 'देवत्व' निश्चितच निर्माण होईल, असा माझा पूर्ण विश्वास आहे"

मी स्वतः मुर्तिपूजक नाही पण त्यांनी 'अंत:करणामधली देवत्वा' बध्द्ल जे सांगीतले ते मात्र मला खुप आवडले

सहानुभूतीशून्य स्वार्थाचे नमुने बघण्यात-ऐकण्यात आले की फार वाईट वाटते, हे खरे आहे.

चित्रगुप्त's picture

13 Sep 2011 - 3:19 am | चित्रगुप्त

देवाबद्दल वेगळे विचार मांडणारी पुस्तके:





प्रियाली's picture

13 Sep 2011 - 4:00 am | प्रियाली

डॅनिकेन साहेबांना जमिनीला नाक घासून साष्टांग नमस्कार. ;)

बाकी चालू द्या!

नंदन's picture

13 Sep 2011 - 4:10 am | नंदन

>>> डॅनिकेन साहेबांना जमिनीला नाक घासून साष्टांग नमस्कार.
--- मी डॅनिकेन साहेबांचं नाव वाचून पॉपकॉर्नचा पुडा घेऊन आलो होतो. एकाच वाक्यात त्यांची अशी बोळवण केलेली पाहून अंमळ निराशा झाली ;). बादवे, सूक्ष्मरुपाने मंगळावर गेलेल्या प. वि. वर्तकांबद्दल अजून कोणी कसे लिहिले नाही?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Sep 2011 - 5:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यांनी (म्हणजे कोणी?) तुलाच बुद्धी नाही का दिली प. वि. वर्तकांबद्दल लिहीण्याची!

अप्पा जोगळेकर's picture

13 Sep 2011 - 8:14 pm | अप्पा जोगळेकर

'माणूस पॄथ्वीवर उपराच' असे एक पुस्तज 'सुरेशचंद्र क्षीरसागर' नावाच्या पुण्याच्या एका इसमाने लिहिलेले आहे. त्या पुस्तकात या डॅनिकेनचा उल्लेख आहे. चार्ल्स डार्विन खोटा आहे म्हणण्यापर्यंत या माणसाने मजल मारली आहे. त्यामुळे आम्ही तरी सदर पुस्तक पुढे वाचू शकलो नाही. शिवाय पुरावे म्हणून दिलेले फोटो इतके अस्पष्ट आहेत की ज्याचे नाव ते. जाउंद्या.

प्रियाली's picture

13 Sep 2011 - 8:46 pm | प्रियाली

मला वाटतं नाडकर्णी. चू. भू. द्या. घ्या.

पुरातन मडक्यावर परग्रहवासियांची चित्रे होती हे दाखवण्यासाठी एक मडके डॅनिकेनने आपल्या ओळखीच्या कुंभाराकडून बनवून घेतले होते अशी माहिती मिळाली होती.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Sep 2011 - 10:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

होय नाडकर्णीच. अलिकडेच सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे निधन झाले. ही बातमी.

अवांतर: खूप वर्षांपूर्वी 'पृथ्वीवर माणूस उपराच' हे मी वाचलं होतं. तेव्हा ते मजेशीर (विनोदी या अर्थाने) वाटलं होतं. डार्विनचा उत्क्रांतीवाद वाचायचा म्हणून त्याची दोन पुस्तकं (The journey of Beagle आणि The origin of species) विकत घेतली. रटाळ वाटली, नंतर कधीतरी वाचू म्हणून ठेवून दिली.

अप्पा जोगळेकर's picture

14 Sep 2011 - 10:11 pm | अप्पा जोगळेकर

दुरुस्तीबद्दल आभार.

अर्थात कलिंगडातला संदेश (नाही, ही पाककृती नाही)!
http://www.youtube.com/watch?v=l8-8WJxA-cI

शिल्पा ब's picture

13 Sep 2011 - 4:37 am | शिल्पा ब

लेख आवडला. शेवटचे उदा. भयंकर. :(

लेख आत्ता वाचला..

देवाचं काय माहित नाय बा.. असेल तेथे सुखात र्‍हावं त्यानं.. आम्ही आपले भाउसाहेब पाटणकरांचा उपदेश मानणारे

सांगशी निष्काम कर्मा, कृष्णा अरे वेदांत तू
समजला की काय आम्हा किर्लोस्करांचा पंप तू

मोक्ष हा परमार्थ ऐसे सांगशी जेथे तिथे
तू तरी देवा कधी आहेस का गेला तिथे?

भोगीशी ऐश्वर्य, सारे वंदिति एच्छा तुझी
सन्यास पण सार्‍या जगाने, घ्यावा अशी इच्छा तुझी

निष्कामता अंगी, थोडी जरी असती तुझ्या
धावूनी सार्‍या येत्या, आमच्याकडे गोपी तुझ्या

अरे भगवंता भेटुनीया, मज काय देशील तू?
मंत्र्या परी येशील, थोडा हासूनी जाशील तु

प्रारब्ध जर अमुचे, आम्हा आहे भोगायचे
सांग तर आम्ही कशाला,कुंकू तुझे लावायचे

देवाची माझ्यापुरती व्याख्या म्हणजे "माझी सद्सद्विवेकबुद्धी म्हणजे देव"

शिल्पा ब's picture

13 Sep 2011 - 9:20 pm | शिल्पा ब

कविता आवडली अन पटली.

दैत्य's picture

14 Sep 2011 - 12:21 am | दैत्य

वा! बरेच दिवसांनी भाऊसाहेब पाटणकरांची गझल्/कविता वाचून मस्त वाटलं! इथे ती टाकल्याबद्दल धन्यवाद!

मूकवाचक's picture

16 Sep 2011 - 5:56 pm | मूकवाचक

ती इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.

प्रारब्ध जर अमुचे, आम्हा आहे भोगायचे
सांग तर आम्ही कशाला,कुंकू तुझे लावायचे

या जोडीलाच ... एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा| गुरुकृपे त्याचा नाश होय || हे ही वाचले. गझल वाचनाचा आनन्द लुटलाच, त्या बरोबर अध्यात्मिक वैधव्य टाळलेलेच बरे असे वाटले. असो.
(पुपे याना धन्यवाद.)