अस्तित्व दान केले
असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले
मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले
हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले
चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले
वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले
इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
निष्कपट भावनेला देदीप्यमान केले
जळले न रोज जेव्हा, चुल्ह्यातले निखारे
तेव्हा "अभय" भुकेला, धारिष्ट्यवान केले
- गंगाधर मुटे
------------------------------------------------
या रचनेचे प्रताधिकार सुरक्षित आहेत.
------------------------------------------------
प्रतिक्रिया
6 Sep 2011 - 1:07 pm | दत्ता काळे
कविता आवडली.
असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले
हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले
ह्या ओळी फार आवडल्या
इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
निरपेक्ष भावनेला मी शक्तिमान केले
ह्या ओळी मला सुसंगत वाटल्या नाहीत.
6 Sep 2011 - 4:54 pm | गंगाधर मुटे
काळे साहेब,
बदल केलाय. :)
9 Sep 2011 - 10:36 pm | पिवळा डांबिस
आवडली!
असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले
सावलीने अस्तित्व दान करण्याची कल्पना विलक्षण सुरेख आहे.
जियो!!
10 Sep 2011 - 2:16 am | पाषाणभेद
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले
एकदम छान गझल मुटेजी
14 Nov 2011 - 10:23 am | गंगाधर मुटे
------------------------------------------------------------------
लोकमत दिवाळी विशेषांक
मध्ये प्रकाशीत कविता/ गझल
----------------------------------------------------------------