कपाट बरेच भरून वाहात असल्याने व तीन-चार लायब्रऱ्याही खुडूस झाल्याने बऱ्याच दिवसांपासून पुस्तके विकत घेणे बंद केले होते. पण तोत्तोचान, दुनियादारी, रारंगढांग, उत्सुकतेने मी झोपलो या पुस्तकांबद्दल वर्तमानपत्रे व आंतर्जालावर वारंवार वाचायला मिळत होते. म्हणून ही सगळीच्या सगळी व व्यंकटेश माडगुळकरांचे “गावाकडच्या गोष्टी” हे फार जुने, पूर्वी कित्येकदा वाचलेले अगदी फर्मास पुस्तक व गो.नि.दां.ची वाघूर व रानभुली, श्याम मनोहरांचे हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तम राव ही पुस्तके एकदाची आणून टाकली.
मौज प्रकाशनकडून प्रकाशित प्रभाकर पेंढारकरांचे “रारंगढांग” हे पुस्तक नुकतेच वाचून संपवले. १९८१ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झालेल्या या पुस्तकाबद्दल आत्ता, म्हणजे जवळपास ३० वर्षांनी २०१०-११ मध्ये अंतर्जालात “फार चांगलं आहे, फार चांगलं आहे” असा गहजब का उडावा हे पुस्तक एका बैठकीत पूर्ण वाचूनही कळले नाही. कारण एवढे सगळे ब्लॉग व विविध साईट्सवर या पुस्तकाची वाहव्वा वाचून मी हे पुस्तक विकत घेतलं. मला या पुस्तकातलं काय आवडलं नाही म्हणाल, तर शैली व त्याचा कथाविषय! तो सांगू का नको? सांगतोच.
एक मुलकी अभियंता मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून भारतीय सैन्यात बॉर्डर रोड मध्ये सैनिकी अभियंता म्हणून नोकरी धरतो. जे सगळीकडे असतं ते शिस्त शिस्त असा उद्घोष करणाऱ्या सैन्यातही असायचंच! ते म्हणजे वरिष्ठांची “नियम आणि शिस्त” या गोंडस सबबीखाली चालणारी अधिकारशाही! अधिकारशाही ऐवजी मनमानी असा शब्द वापरणार होतो, पण गोष्ट सैन्यातील असल्याने ही मनमानी नसून अधिकारशाही आहे. फिल्डवर काम करणाऱ्याला त्याच्या आकलनाप्रमाणे व्यापक हित लक्षात घेऊन आवश्यक असेल तसे काम न करू देता केवळ नियम व शिस्त या सबबीखाली बसेल तसे काम करून घेणे, मग त्या माणसाने आदेश व नियम धाब्यावर बसवून लोकहितासाठी बंडखोरी करणे वगैरे कथेत होत जाते. हे आपणही रोजच्या आयुष्यात अनुभवतच असतो, त्यामुळं पुस्तक वाचून घ्यावा असा नवा अनुभव यात काहीच नाही.
कादंबरीचा नायक मनासारखं काम करता येत नाही म्हणून मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून सैन्यात नोकरी धरतो, आणि तिथेही त्याला पळसाला पाने तीनच हा अनुभव येतो – हा घटनाक्रम महत्वाचा आहे. पण कथानायकाने मुंबईतील नोकरी का, कशी सोडली, सैन्यात नोकरी कशी धरली हे स्थित्यंतर लेखकाने पुस्तकात बिलकुल रंगवलेले नाही. खरे म्हणजे लेखकाने पुस्तकाच्या शैलीकडे जेवढे लक्ष द्यायला हवे, तेवढी दिलेले नाही असे मला वाटते. शैली म्हणावी तेवढी आकर्षक नाही.
विश्वनाथ मेहेंदळे हा नायक वरिष्ठांना शांतपणे वस्तुस्थिती समजावून सांगतो, त्याच्या आकलनाप्रमाणे बॉर्डर रोडचे रारंगढांगवरील चुकीचे काम बरोबर होण्यासाठी, सैन्यात असूनही वरिष्ठांना अक्कल शिकवतो, त्यासाठी आवश्यक ती मंजुरी घेतो.. तरीही ते बांधकाम त्याच्या मनाप्रमाणे होत नाही व रारंगढांग खाली दबून सहा माणसे मरतात.. मग कथानायक सैन्याचा आदेश मोडून लोकांचा जीव वाचवणाऱ्या टेकूचे बांधकाम स्वत:च्या अधिकारात करून घेतो, त्यासाठी त्याच्यावर कोर्ट मार्शल होते, कोर्टासमोर ही सगळी वस्तुस्थिती उघड होते व कोर्ट सगळी वस्तुस्थिती विचारात घेऊन त्याला शिक्षा न देता त्याची नोकरीची लिहून दिलेली तीन वर्षे पूर्ण व्हायच्या आत निवृत्त करते एवढे काय ते कथानक. कदाचित विषय सैन्याशी संबंधीत असल्याने हे पुस्तक लोकांना आवडले असेल, माहीत नाही. मला तरी शैलीच्या बाबतीत ते नक्कीच आवडलेले नाही. जेव्हा एवढा खटाटोप करून पुस्तक लिहिले जाते तेव्हा त्याची शैलीही मोहक असायला हवी, कथा सुद्धा खिळवून ठेवणारी असायला हवी आणि त्यातून नेहमीच्या आयुष्यापेक्षा काही वेगळं मिळायला हवं अशा माझ्या एवढं वर्णन केल्या जात असण्याऱ्या पुस्तकांच्या अपेक्षा आहेत – त्या रारंगढांगने पूर्ण केल्या नाहीत. त्यातल्या त्यात खिळ्याची छपाई असलेल्या मला मिळालेल्या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण बाइंडरांच्याच्या कृपेने पुढे मागे झाले आहे. वाचण्याच्या ओघात नंतर ते लक्षात आले. पुस्तक तसे ठाकठीक आहे, पण आवर्जून वाचायलाच पाहिजे असे त्यात काही विशेष नाही, हे खेदानं म्हणावं वाटतं.
पुन्हा असंही वाटतं की कदाचित आपल्याच संवेदना बोथट तर झाल्या नाहीत? नेहमीनेहमी व्यंकटेश माडगुळकरांची शैलीचे चोचले पुरवणारी पुस्तके वाचून तर असं वाटत नसेल?
तुम्ही जर रारंगढांग वाचले असेल तर तुम्हाला काय वाटतं?
प्रतिक्रिया
28 Aug 2011 - 1:07 am | धन्या
हे पुस्तक आमच्या ईच्छा यादीत होतं... आता नाही घेणार :)
28 Aug 2011 - 6:14 am | संदीप चित्रे
पुस्तक स्वतः वाचल्याशिवाय ठरवू नये ते आपल्याला आवडेल की नाही ते!
बाय द वे -- पुस्तक, नाटक. सिनेमा, खाद्यपदार्थ इ. गोष्टी स्वत: अनुभवल्याशिवाय आपल्या आवडीचे आहे की नाही ते ठरवू नये असं माझं मत आहे :)
-----------
'रारंग ढांग' हे मला स्वतःला अतिशय आवडलेल्या पुस्तकांपैकी एक आहे.
हां आता शैलीबद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्याला वी.वी.एस.ल़क्ष्मणची कलाकारी जेवढी आवडते तेवढाच राहुल द्रविडच्या फलंदाजीतला थेटपणा भावतो!
(अवांतर - 'तेंडल्या' हा माणूस कुठल्याही तुलनेपार कधीच गेलाय असं वाटतं त्यामुळे त्याचं नाव कुठल्याच शैलीत वापरलं नाही)
28 Aug 2011 - 2:05 am | आदिजोशी
पुस्तक मला नक्कीच आवडलं. आणि नेमक्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या नाहीत त्याच मला प्रचंड आवडल्याने पुस्तकाची पारायणेही झाली.
कथा खिळवून ठेवणारी आहे. शैली ओघवती आहे. आवश्यक त्या घटना योग्य मांडल्या आहेत. नायक सामान्यातलाच आहे.
पुस्तकाची शैली आवडणे / न आवडणे हा वैयक्तीक विषय आहे. शैली मोहक अथवा कशी असावी हे लेखकाच्या हातात आहे. कथानक किती फुलवायचे हा लेखकाचा प्रश्न आहे. कथा जर एका पॉइंटपासून सुरु होत असेल तर त्याच्या आधीच्या घटना किती रंगवल्या हा भाग दुय्यम ठरतो.
आम्ही तर बाबा रारंड ढांग ज्याला त्याला रेफर करत असतो.
फिल्डवर काम करणाऱ्याला त्याच्या आकलनाप्रमाणे व्यापक हित लक्षात घेऊन आवश्यक असेल तसे काम न करू देता केवळ नियम व शिस्त या सबबीखाली बसेल तसे काम करून घेणे, मग त्या माणसाने आदेश व नियम धाब्यावर बसवून लोकहितासाठी बंडखोरी करणे वगैरे कथेत होत जाते.
तुम्ही एका ओळीत अमिताभ, धर्मेंद्र, दिलीप कुमार, अमीर खान, सलमान खान, अक्षय कुमार, सन्नी देओल, मॉर्गन फ्रीमन, क्लिंट ईस्टवूड, मेल गिब्सन, निकोलस केज, सिल्वेस्टर स्टॅलोन, ऑर्नॉल्ड, टॉम क्रूझ आणि ९०% हॉलीवूड + बॉलिवूड कलाकारांच्या अख्ख्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे.
28 Aug 2011 - 5:01 am | संदीप चित्रे
मी लिहिणारच होतो की चला आयरिनबाई भेटायला येतायतच तर जोपर्यंत इंटरनेट कनेक्शन शाबूत आहे तोपर्यंत ह्या धाग्यावरच्या चर्चेचा आनंद घ्यावा :)
28 Aug 2011 - 2:44 am | गणा मास्तर
जब आदमी मर जाता है तो पिछे क्या रहता है सिर्फ यादगारी !!!
28 Aug 2011 - 7:07 am | सहज
मला तर हे पुस्तक आवडले.
यातील वातावरण, एकेक व्यक्तिरेखा, संवाद, घटना, ध्येय, शिस्त, मुल्ये, नोकरशाही, आव्हाने, खडतर कष्ट, योग्य काय अन अयोग्य काय याचे द्वंद्व. जर परदेशात असे पुस्तक आले असते तर नक्की सिनेमा, मालीका तयार झाली असती असे वाटते.
बाकी ले. विश्वनाथ मेहंदळेचे वडील मुंबईतली नोकरी का सोडली व नवी नोकरी का धरली हा प्रश्न प्रकरण बाराच्या शेवटच्या पानावर विचारतात (पान क्र. ९१, ९२) व विश्वनाथ त्यचे उत्तर प्रकरण सोळा शेवटचे पान (क्रमांक १२०) वर देतो.
मुंबईच्या वाढत्या गर्दीत, अनेकांच्या घरी पिण्याचं पाणी तासभरदेखील येत नाही. लक्षावधी लोकांना घरच नसल्यानं उन्हाळे पावसाळे फुटपाथवर काढावे लागतात. अशा परिस्थीतीत आकाशात घुसणार्या काँक्रिटच्या इमारतींचं बांधकाम करताना ह्या लोकांविरुद्ध एखादा अमानुष गुन्हा केल्यासारखं मला वाटू लागलं.
इथं रस्ते बांधताना, ह्या प्रदेशात राहणार्या लोकांच्या तरी ते उपयोगी पडतील अशी भावना मनाशी होती. त्यांचं जीवन सुखी करण्यासाठी आपण काही करत आहोत असं मला वाटत होतं.
त्या व्यक्तीरेखेच्या दृष्टीने पुरेसे आहे असे वाटले निदान मला तरी. म्हणजे त्याचे वडील स्वातंत्र सैनीक होते, त्यांची मुल्ये, देशसेवेचे व्रत इ इ विश्वनाथवरचे संस्कार बघता.
शब्दांचा फाफटपसारा न करता १७५ पानामंधे एक सुंदर नाट्य उभे केले आहे असे मला वाटले. पुस्तक आवडले.
पण यशवंता तुला नाही ना आवडले? ओक्के ना! काय फरक पडतो :-) इट्स ऑल राईट.
28 Aug 2011 - 6:29 pm | स्वाती दिनेश
मला तर हे पुस्तक आवडले.
यातील वातावरण, एकेक व्यक्तिरेखा, संवाद, घटना, ध्येय, शिस्त, मुल्ये, नोकरशाही, आव्हाने, खडतर कष्ट, योग्य काय अन अयोग्य काय याचे द्वंद्व.
शब्दांचा फाफटपसारा न करता १७५ पानामंधे एक सुंदर नाट्य उभे केले आहे असे मला वाटले. पुस्तक आवडले.
सहजसारखेच म्हणते,
स्वाती
28 Aug 2011 - 7:55 am | पक्या
मलाही पुस्तक खूप आवडले.
>>शब्दांचा फाफटपसारा न करता १७५ पानामंधे एक सुंदर नाट्य उभे केले आहे .
ह्याच्याशी सहमत.
कथा खिळवून ठेवणारी वाटली. धागालेखकाची वरील मते पटली नाहीत.
28 Aug 2011 - 10:18 am | मिहिर
असेच म्हणतो. मी तर या पुस्तकाची पारायणे केली आहेत.
28 Aug 2011 - 9:44 am | रमताराम
अप्रतिम पुस्तक.
एक सुरेख चित्रपट तयार करता येईल एवढी सुंदर कादंबरी. इतके पैलू आहेत की त्याबाबत लिहिता लिहिता थकून जाईन. तुमचा प्रश्न असा आहे की केवळ लष्करासंबंधी आहे म्हणून लोकांना आवडले का? या प्रश्नाचे उत्तर मी तरी संपूर्ण नकारार्थी देईन. उठसूठ राष्ट्रप्रेमाच्या गफ्फा हाणणार्यांना लष्करी शिस्तीच्या टीकाकाराला केंद्रबिंदू ठेवून लिहिलेली कथा अजिबातच आवडणार नाही. किंबहुना इथे लष्कर ही एक प्रातिनिधिक व्यवस्था आहे, कदाचित सर्वात घट्ट (Rigid) व्यवस्था असल्याने विश्वनाथ नि या व्यवस्थेचा संघर्ष हा अधिक स्पष्टपणे दिसू शकतो, नि संकेतार्थाने (subtleties) लिहिलेले डोक्यावरून जाणारे आमच्यासारखे अल्पमतीदेखील तो समजू शकतात.
विश्वनाथ हा एक प्रोटगॉनिस्ट आहे. अशा व्यक्तीने नेहमी सर्वसमावेशक, व्यापक असे तत्त्वज्ञान सांगावे अशी अपेक्षा नसते. एखादे लहानसे तत्त्वदेखील प्राणपणाने - कदाचित त्याहुन अधिक... - जपावे एवढी बांधिलकी फारच थोड्या व्यक्तींमधे आढळते. अशी व्यक्ती कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध होत नाही परंतु समाजाच्या दृष्टीने - एखाद्या पेज्-थ्री कलाकारापेक्षा, उद्योगपतीपेक्षा, खेळाडूपेक्षा - अधिक सकारात्मक मूल्ये जपत असते. हा वारसा अस्तंगत होण्यापासून जपणे हे - बहुसंख्यांकांच्या खिजगणतीत नसलेले - कार्य ही व्यक्ती साध्य करते. कर्मकांडांचा वारसा संभाळायला तुम्ही आम्ही एका पायावर तयार असतो कारण त्यामुळे स्वार्थाला टिचभर देखील धक्का बसत नाही. पण असे ठाम विचार जे प्रसंगी स्वरूपानंदांनी म्हटल्याप्रमाणे ' ते आहुती साधकाचीच मागे' असे असते ते निर्धाराने जपणे हे अतिशय दुर्मि़ळ आहे. लष्कर ही एक व्यवस्था आहे नि त्याचे काटेकोर नियम आहेत, उघड चुका दिसत असल्या तरी व्यवस्थेने स्वीकारलेल्या नियमावलीनुसार असल्याने त्यांना अनुसरावे हा दुराग्रह नि त्यासाठी - मुळात जिच्या अभिवृद्धीहेतूने व्यवस्था निर्माण केली जाते त्या - व्यक्तीला दुय्यम समजण्याची प्रवृत्ती बळावणे नि त्याविरोधात एका व्यक्तीने ठामपणे उभे राहून स्वतःचे वैयक्तिक आयुष्य, स्वार्थ पणाला लावून निर्माण केलेले हे माणुसकीचे, व्यवस्थेतील सहकार्यांशी असलेल्या व्यवस्थाबाह्य बांधिलकीचे एक सुंदर शिल्प - जे दुर्दैवाने मृत्युलेखाच्या स्वरूपात उभारावे लागते - नि व्यवस्थेमधे हे बसत नाही या एकाच कारणासाठी आठ माणसांच्या मृत्यूला कारणीभूत होणारी आणि त्या व्यवस्थेच्या दृष्टीने बेकायदेशीर परंतु न्याय्य आणि निरपेक्ष कृती करणार्या व्यक्तीच्या विरोधात उभ्या राहिलेल्या व्यवस्थेच्या अधिकारी(!) व्यक्ती, त्या व्यवस्थेतील सहृद्य परंतु निष्क्रिय व्यक्ती, त्या व्यवस्थेच्या निमित्ताने विश्वनाथच्या संपर्कात आलेले नि कुठेही गुंतायचे नाही अशा विलक्षण टोकाच्या संवेदनशील विश्वनाथशी बांधले गेलेले लोक नि या सार्यांना सामावून घेणारे विलक्षण नाट्य हे इतके भावले की कितीही वेळा वाचली तरी ही कादंबरी नेहमीच चिरतरूण वाटते.
अर्थात विशिष्ट आडाखे मनाशी घेऊन वाचली तर अपेक्षाभंग होईलच. समोरच्याच्या 'अपेक्षेप्रमाणे' अभिव्यक्त होणारी माध्यमे आजूबाजूला भरपूर असताना ही कादंबरी नक्कीच अशा व्यक्तिंचा अपेक्षाभंग करेल. हिंदी - खरेतर पंजाबी - चित्रपटात जसे, 'एक हिरो, एक हिरविण एक आयटेम साँग, मारामारी थोडी आणि एक हवी बाग; एक हिंस्र विलन आणि कामेडियनची साथ, थोडे फारिन थोडे जंगल झाले आमचे काम' अशा साच्यात असते किंवा हल्ली कथा म्हटले की 'ट्विस्ट इन द टेल' हवीच असे काहीसे रूढ होते आहे तसे काहीसे घडू शकते.
बाकी तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते. असो.
28 Aug 2011 - 11:34 am | राजेश घासकडवी
अगदी बरोब्बर वर्मावर बोट ठेवलंत तुम्ही. व्यवस्थेच्या आंधळेपणामुळे कित्येक बळी पडतात. त्यांची समाधी म्हणून बांधलेले स्तंभ त्या चुकांची भरपाई करतात. ते स्तंभ बांधण्यासाठी व्यवस्थेबाहेर काम करावं लागतं. असं काम करण्यापोटी सन्मान होण्याऐवजी कोर्ट मार्शल होणं ही त्या रिजिडिटीची परिसीमा. एकदा अशी कर्मठ व्यवस्थेची घडी बसली की मग ती बदलण्यासाठी प्रयत्न करणंही अशक्य होतं हे या पुस्तकात अतिशय सहजपणे सांगितलेलं आहे. लष्कराच्या शिस्तीप्रमाणेच धार्मिक कठोरतेलाही हे लागू पडतं.
यातला संघर्ष हा कुठेही शब्दबंबाळ झालेला नाही, साध्या प्रसंगांतून प्रवाहीपणे आलेला आहे. उत्तम संदेश, रंजक मांडणी, जिवंत पात्रं, पकड घेणारी कथावस्तू, एक वेगळी पार्श्वभूमी - चांगल्या पुस्तकात आणखी काय हवं?
28 Aug 2011 - 12:53 pm | यकु
@ रमताराम,
तुमच्या सहानुभूतीबद्दल आभारी आहे. :)
28 Aug 2011 - 4:16 pm | मनिष
ररा शी सहमत!
इथे ज्याची त्याची आवड. कदाचित कुठल्या वयात हे पुस्तक वाचता तेही महत्वाचे असते. मला आजही ते पुस्तक relevant वाटते. आणि मला तर पेंढारकरांची चित्रदर्शी शैली खूप आवडते, त्याहुनही महत्वाचे म्हणजे ही कथा आवडली. माझी पुवि. वरचीच प्रतिक्रिया पुन्हा इथे लिहितोय -
अजून दोन लेख ह्या पुस्तकाविष्यी -
http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%83...
http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82...
28 Aug 2011 - 10:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुस्तक यादीत आणि घरात आहे. वाचायचा नंबर बराच मागचा आहे. पण या प्रतिसादामुळे पुस्तकाकडे काय नजरेने पहावं ते समजलं.
रमताराम, प्रतिसाद आवडला.
29 Aug 2011 - 10:00 am | llपुण्याचे पेशवेll
ररांचा प्रतिसाद नेहेमीप्रमाणे आवडला.
पण
कर्मकांडांचा वारसा संभाळायला तुम्ही आम्ही एका पायावर तयार असतो कारण त्यामुळे स्वार्थाला टिचभर देखील धक्का बसत नाही. पण असे ठाम विचार जे प्रसंगी स्वरूपानंदांनी म्हटल्याप्रमाणे ' ते आहुती साधकाचीच मागे' असे असते ते निर्धाराने जपणे हे अतिशय दुर्मि़ळ आहे.
सदरहू वाक्यांमुळे तो उगाचच समाजवादी प्रतिसाद वाटला. कर्मकांडाच्या नावाने दरवेळेला तोंडावर मनगट आपटून शिमगा करण्याची फॅशन हल्ली दिसते. कर्मकांडी मनुष्य स्वार्थीच असतो असा दूषित पूर्वग्रह यामधे दिसतो. परंतु कर्मकांड तंतोतंत पाळण्यासाठी देखील स्वार्थ तितकाच सोडावा लागतो हेही खरे. मग ते अग्निहोत्रासारखे आजन्म पाळायचे कर्मकांड असो किंवा सगळी आजूबाजूची वाहने सिग्नल तोडून जात असताना जीवाची पर्वा न करता एकटाच सिग्नल पाळत थांबलेला स्कूटरवाला असो. दोघेही नि:स्वार्थीपणेच कर्मकांड पाळीत असतात असे आमचे वैयक्तीक मत.
29 Aug 2011 - 2:25 pm | विजुभाऊ
मला देखील ते पुस्तक आवडले होते.
एका आगळ्याच प्रदेशात आगळ्याच विषयावरचे पुस्तक आहे.
सर्वसामान्य वाचकाला गुंगवून टाकेल अशी लिखाण शैली वाचकाला आवडते शिवाय या पुस्तकाला अनुभवाची जोड होती . एका अर्थाने कादंबरी पेक्षाही ( नॉन फिक्षनल ) वेगळे पुस्तक वाचायचा अनुभव चांगला वाटला.
काही पुस्तके तुम्ही कोणत्या काळात वाचता यावर तुम्हाला आवडणे न आवडणे ठरते
28 Aug 2011 - 9:49 am | पिवळा डांबिस
मला स्वतःला रारांग ढांग हे पुस्तक आवडलं...
अशासाठी की या पुस्तकात वाचकांसमोर एक वेगळा विचार मांडलेला आहे.
आपणां भारतीयांसाठी शक्यतो सेना, संरक्षण डिपार्टमेंटस, डिआरडीओ या सॅक्रेड काऊज (मराठी प्रतिशब्द?) मानल्या जातात...
या संस्था कधी काही चुकीचं करणारच नाहीत, त्यामुळे यांच्यावर टीका चालू द्यायची नाही अशी सर्वसाधारण मानसिकता असते...
या पार्श्वभूमीवर रारांगढांगमध्ये वर्णन केलेली परिस्थीती अधिक संभवनीय आणि म्हणून अधिक उल्लेखनीय वाटते...
28 Aug 2011 - 10:03 am | कौन्तेय
"शैली आणखी आकर्षक असायला हवी" म्हणता?
व्यं माडगूळकरांची पुस्तकं वाचून काय त्यांचा चावटपणाच नुसता घेतलात का?
(माडगूळकर, क्षमा करा)
28 Aug 2011 - 4:14 pm | यकु
एकतर माडगुळकर चावट होते की नव्हते हे मला माहित नाही.. तरीही मी त्यांचा चावट्पणा घेतल्याचे तुम्हाला कुठे दिसले?
की आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला?
28 Aug 2011 - 6:10 pm | अप्पा जोगळेकर
व्यं माडगूळकरांची पुस्तकं वाचून काय त्यांचा चावटपणाच नुसता घेतलात का?
त्यांच्या कोणत्या पुस्तकात चावटपणा आहे हे सांगाल का प्लीज ?
30 Aug 2011 - 1:54 pm | कौन्तेय
शाळेत असताना माडगूळकरांची भरपूर पुस्तकं वाचली होती. त्यांचं वनसाहित्य फ़ारच सुन्दर (सत्तांतर, जंगलातले दिवस, नवेगावबांध - पाऊलखुणा इ.इ.). पण ग्रामीण जीवनावरच्या कथा-कादंबऱ्या या अंमळ चावटपणाचं तोंडीलावणं घेऊनच येत असत असं आठवत आहे. शालेय जीवनात उमटलेल्या त्या ठश्याच्या आधारावर; आणि मला स्वतःला रारंगढांग ही प्र. पेंढारकरांसारख्या अप्रस्थापित लेखकाची कादंबरी तिच्या लिखाणातील साधेपणासाठीच आवडत असल्यामुळेही त्या साधेपणावर शैलीहीनतेचा आरोप झाल्यामुळे असेल; पण मिपावर एक सनसनाटी संदेश टाकण्याचा मोह आवरला गेला नाही. माडगूळकरांची माफ़ी मागून माझ्या ‘त्या’ विधानावरून सपशेल माघार घेतो ...
स्वतःची चूक निदर्शनाला आल्यावरही तिच्याबद्दल काही न बोलता, मूळ मुद्द्याला बगल देत चर्चा तिरकी तिरकी चालवत राहण्याचा मिपा.चा प्रघात मी मोडत आहे याचीही मला रास्त कल्पना आहे. त्याबद्दलही क्षमा मागावी का?
31 Aug 2011 - 1:40 am | यकु
मला हा प्रश्न विचारलेला नाही असे समजतो. पण धागा मी काढल्याने व तुम्ही चावटपणाचे बालंट माझ्यावर घेतल्याने तुम्हाला उत्तर देण्याची तोशीस देतो. बाकी माझ्या मनात काहीही किल्मिष नाही याबद्द्ल खात्री बाळगा. :)
अरे काय राजेहो.. बिलकुल बिनदिक्कत आरोप करा.. लोकांना भंडावून सोडा... टपल्या मारा ... मजा करा इथे मिपावर!
पण त्यापूर्वी इथल्या खट - उध्दट समुदायातील सदस्याची आधी ओळख तर करुन घ्या ;-)
कदाचित तुम्ही इथले शिनियर सदस्य असाल... पण तरीही ओळख तर झालीच पाहिजे ना?
तुम्ही स्वत: ची चूक निदर्शनाला आल्यावरही... मू़ळ मुद्याला बगल देत चर्चा तिरकी तिरकी चालवत राहाण्याचा प्रघात मोडण्याबद्दल लिहीलं वगैरे लिहीलं आहे... मान्य आहे...
एवढं म्हणालात तरी.. तोच तुमचा दिलदारपणा .. त्याबद्दल मी आभारीच आहे...
क्षमा बिमा च्यायला आजच्या काळात हे शब्द वापरात तरी आहेत का त्याबद्दल साशंक आहे.. म्हणून नो कॉमेंट.
माघार वगैरे घेऊ नका ;-) कारण मिपावर माघार! शक्य नाही.
काय??
31 Aug 2011 - 8:00 am | कौन्तेय
नाथा,
राग ठेवला नाहीत म्हणून आभार.
माझा सदस्य कालावधी २ वर्षे काही महिने जरी दिसला तरी मी शिनीयर मिपा.कर नाही हे माझ्या लेखन-मिपेतिहासावरून दिसलं असेलच.
टपल्यांचं म्हणाल तर आधी टपली मारून मागून सॉरी म्हणण्यासारखा गनिमीकावा तो दुसरा कुठला?
तेच मी केलं :-D (म्हणून मला मनिष तिवारी समजू नका म्हणजे झालं).
थोडक्यात माझ्या माघारीबद्दल दुःख असू नये - तुम्हालाही नि मलाही.
भेटू परत असेच. तोवर - चरैवेति (चरत राहू ...).
31 Aug 2011 - 8:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
:-D
टपल्या मारल्या असल्यात तरी माडगूळकरांच्या साहित्याबद्दल आणखी माहिती देण्याबद्दल आभार.
28 Aug 2011 - 11:22 am | विश्वनाथ मेहेंदळे
हे पुस्तक मला आवडले की नाही हे माझ्या सदस्य नामावरून कळतेच आहे :-) सध्या एकच म्हणेन की मला स्वतःजवळ एकच पुस्तक बाळगायची वेळ येते तेव्हा ते पुस्तक रारंग ढांगच असते.
रारंग ढांग वर अर्धा लेख लिहून बरेच दिवस पडून आहे. पूर्ण करून नक्की टाकेन.
28 Aug 2011 - 11:17 pm | माझीही शॅम्पेन
...
प्र का टा आ
28 Aug 2011 - 11:27 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>इतकी मिळ्मिळित प्रतिक्रिया दिल्या बद्दल निषेध
अरे कारण एखादे पुस्तक आवडणे खूप सापेक्ष असते आणि पुस्तकाच्या बाजूने वर अनेक दिग्गज लोकांनी लिहिले आहे. आता सूर्यापुढे काजव्याने चमकल्यासारखे करण्यात काय हशील ?
>>एखाद पुस्तक / लेख आवडल नाही म्हणून अजुन एक धाग्याची फॅशन नवी आहे
या theory ला एक corollary जोडतो. एखादे पुस्तक आवडले म्हणून काही लिहिले तर तो धागा चार धाग्यांसारखा येतो आणि निघून जातो. पण गाजलेल्या पुस्तकाला नावे ठेवली की धागा शतकी होण्याची शक्यता वाढते :-)
(म्हणून सदर लेखकाने किंवा इतर कुणी मुद्दाम असे केले आहे असे म्हणत नाही)
अवांतर :- माझा पुढील धागा असेल. "शोले - एक टुकार आणि ओव्हररेटेड चित्रपट" ;-)
28 Aug 2011 - 11:33 pm | माझीही शॅम्पेन
ओके माझा पुढचा धागा असेल
अण्णा ! एक डोक्या पासून पाया पर्यंत भ्रष्टचारी सामान्य मानव :)
(मार खातोय आता ..पळा :))
28 Aug 2011 - 10:46 pm | माझीही शॅम्पेन
इतकी मिळ्मिळित प्रतिक्रिया दिल्या बद्दल निषेध :)
अवांतर :- एखाद पुस्तक / लेख आवडल नाही म्हणून अजुन एक धाग्याची फॅशन नवी आहे , अरे मीपकरानो जे पुस्तक आवडेल त्या बद्दल लिहाकी (मेहन्दळे काका तुमचे पण लेख पूर्ण करा :))
28 Aug 2011 - 10:59 pm | यकु
आयडीया चांगली आहे...
लिहा राव.. लवकर लिहा.. मज्जा येईल..
28 Aug 2011 - 11:32 am | जाई.
आदिजोशी, रमताराम, पिवळा डांबिस ,यांचे प्रतिसाद वाचून पुस्तक वाचावेसे वाटतेय.
28 Aug 2011 - 11:45 am | नगरीनिरंजन
पुस्तक वाचले आहे. अगदी खूप स्फूर्तिदायक नसले आणि भाषासौष्ठवाच्या दृष्टीने आकर्षक नसले तरी गोष्ट आवडली. तुम्हाला सो सो वाटले हा कदाचित तुमच्या वाढीव अपेक्षांचा परिणाम असावा.
28 Aug 2011 - 11:57 am | पैसा
मला हे पुस्तक आवडलं होतं. नेमक्या यशवंतला न आवडलेल्या कारणंसाठी. थोडक्यात, फापटपसारा न करता लिहिलेल्या अनलंकृत शैलीमुळे.
कथानक नेहमीचं असलं तरी वेगळ्या पार्श्वभूमीमुळे लोकांना आवडलं असावं. अर्थातच इथे एक गोष्ट आहे, कोणतीही कला, साहित्य आवडणं किंवा न आवडणं हे आस्वाद घेणार्या व्यक्तीला अनुभवण्याच्या त्या क्षणी काय वाटलं यावर अधिक अवलंबून आहे. एका माणसाला एखादं पुस्तक खूप आवडेल तर तेच पुस्तक आणखी एखाद्याला हातात धरावं असंही वाटणार नाही. हेही शक्य आहे, की आज खूप आवडलेली गोष्ट काही महिन्यानी किंवा वर्षानी अजिबात आवडणार नाही. कदाचित याच्या उलटही होऊ शकेल.
तेव्हा तेही ठीकच आहे! इथे काही दिवसांपूर्वी "द अल्केमिस्ट" बद्दल आलेल्या धाग्याची आठवण झाली. तेव्हाही याच स्वरूपाची चर्चा झाली होती. तर यशवंता, तुला पुस्तक नाही आवडलं तरी काही प्रॉब्लेम नाही. काही वर्षानी परत वाच, कदाचित तेव्हा आवडेल!!! ;)
28 Aug 2011 - 12:41 pm | तिमा
मी जरी या पुस्तकाची पारायणे केली नसली तरी पुस्तक वाचल्यावर अतिशय आवडले होते, तसेच अनेक मित्रांना वाचायला सांगितले होते.
अर्थीत मला आवडलेली एखादी गोष्ट दुसर्याला आवडावीच असा माझा आग्रह नाही. व्यक्ति तितक्या प्रकृती.
आदि जोशी, रमताराम व सहज यांचे प्रतिसादही आवडले.
28 Aug 2011 - 1:28 pm | ऋषिकेश
मला रारंगढांग आवडलं होतं. त्यात सगळ्यात आवडलं ते साध्या साध्या वाक्यांतून त्यांनी साधलेला परिणाम व इतक्या सोप्या शब्दांतूनही चित्र डोळ्यासमोर उभं करण्याची ताकद. थोडक्यात लेखकाची सोपी परंतू चित्रदर्शी शैलीच मला आवडली.
हलके घेण्यासाठी: काहिंना कुठलीच प्रसिद्ध किंवा सगळ्यांना आवडणारी गोष्ट आवडत नाही / तितकीशी आवडली नाहि असे सांगायला आवडते. तुमचे तसे नसावे अशी खात्री आहे म्हणा :)
28 Aug 2011 - 10:10 pm | आत्मशून्य
मला सूरूवात रोचक वाटली होती, पण नंतर नंतर कंटाळा आला. पावसाळ्यातच वाचत होतो. इच्छा असूनही काही कामधाम हाताशी नसल्याने किंचीत नैराश्यभाव मनात असतानाच पूस्तके वाचायचा सपाटा लावला होता, पूस्तक वाचताना मी अजारी पडलोय की काय असं वाटायला लागलं होतं, त्याकाळी मला अपेक्षीत होत तेव्हडं उत्कंठा चाळवणारं वाटलं नाही. माझ्या संवेदनाच बोथट/बधीर झाल्या असव्यात हा तूम्ही फार चांगला शब्द वापरलाय, हे माझ्या बाबतीत घडलंही असावं, कदाचीत फोर्साइथची पूस्तके (कल्पनीक साहस कथा) वाचायची चट्क लागलेली असताना तर तसही हे पूस्तक मनाला चाटून जाणं अशक्यच होतं.
अवांतर :- माझी अशीच फसगत अग्निपंख वाचताना झाली होती. पूस्तकाचा फोकस टीम हँडलिंग/मॅनेजमेंट ज्याअनूशंगाने भारतीय नोकरशाही मनोवृतीचा वेध असं आहे (अर्थात हे नाव दील असत तर कोणी विकतही घेतलं नसतं म्हणा), आणी मी आपलं उगीचच कलाम साहेबांच म्हणून पूस्तकातून काहीतरी भरीव शिकायला मिळेल/रॉकींग फंडे असतील अशी भाभडी आशा ठेवली होती.... दर्जेदार पण कंटाळवाणे पूस्तक.
28 Aug 2011 - 4:40 pm | राही
सुमारे तीस वर्षांपूर्वी वाचलं होतं. वाचताना कंटाळा आल्याचं आठवतं. आवडलं नव्हतं.
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी वाचलं. रसास्वाद वगैरे काही आठवत नाही. आवडलं नाही.
आता.... वाचणार नाही. फक्त प्रतिक्रिया आणि रसग्रहणंच वाचेन.
28 Aug 2011 - 6:45 pm | बिपिन कार्यकर्ते
मला हे पुस्तक प्रचंड आवडलेलं आहे. वर आदि, ररा, संदीप, सहज, पिडां वगैरेंनी जे लिहिलं आहे त्याच्याशी शब्दशः सहमत आहे. त्या व्यतिरिक्त काय लिहिणार?
एक आठवतंय... हे पुस्तक वाचताना आधाश्यासारखे एका बैठकीत वाचून काढले होते. पण नंतर मात्र बराच काळ हे पुस्तक मनात रेंगाळत राहिले होते. हेच यश असावे त्या पुस्तकाचे.
29 Aug 2011 - 11:41 am | विसुनाना
वरील यादीत बिपिन कार्यकर्ते यांचे नाव घालून सहमत.
28 Aug 2011 - 8:19 pm | आशु जोग
या लेखकाचे 'एका स्टुडीओचे आत्मवॄत्त' वाचले आहे
28 Aug 2011 - 11:12 pm | यकु
प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार!
बर्याच जणांनी शैली खूप चांगली, चित्रदर्शी असल्याचे लिहीले आहे.
पण मला ती तशी वाटली नाही - प्रसंग वाचताना तो लख्ख डोळ्यासमोर उभा राहावा आणि शब्दाशब्दातून एक खुमारी वाहावी असं लिखाण व्यंकटेश माडगूळकरांचंच वाचलंय.. त्यांचंही लिखाण फार आलंकारिक.. शब्दबंबाळ आहे असं नाही.. साधे - साधे चपखल शब्द जिथल्या तिथे.. त्यामुळं हे आमाला काय पटलं नाही. अर्थात व्यं.मां. चंही लिखाण अत्युच्च आहे असं म्हणणं नाही.. त्यांनीही त्यांनी लिहीलेल्या कथा / त्या कशा लिहील्या वगैरे अतोनात रिपिटेशन करुन ठेवलंय.
असो.
नुकतंच गो.नि.दां. चं "रानभूली" वाचून संपलं.. अप्रतिम आहे.. लगेच त्याबद्दल लिहावं वाटतंय.
पण हात आखडता घेतो.
दुनियादारीनं पकड घेतलीय.
:)
सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद.
चू.भू.दे.घे.
:)
28 Aug 2011 - 11:27 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>दुनियादारीनं पकड घेतलीय.
मग रारंग ढांग आवडले नाही यात नवल नाही ;-)
(कृपया हलके घेणे)
28 Aug 2011 - 11:37 pm | यकु
ब्वॉर्र्! ब्लडी सिव्हीलियन!! ;-)
29 Aug 2011 - 12:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे
Yes !! This bloody civilian and that bloody army !!! :-)
28 Aug 2011 - 11:33 pm | मृत्युन्जय
मला तर पुस्तक प्रचंड आवडले ब्वॉ. लेखकाने चित्र अगदी डोळ्यासमोर उभे केले आहे. शैली एकदम ओघवती आहे आणि पुस्तक वाचायला सुरु केल्यावर वाचुनच संपवले होते. पेंढारकर जेव्हा ढांगेचे वर्णन करतात तेव्हा तो पर्वत अगदी जिवंत भासतो. ते वातावरण मोजक्या शब्दात अगदी प्रभावीपणे समोर ठेवले आहे. मी तर असे म्हणेन की जर कोणी अजुन हे पुस्तक वाचले नसेल तर त्वरित वाचुन काढावे.
29 Aug 2011 - 1:56 pm | परिकथेतील राजकुमार
असे एक पुस्तक असल्याचे मध्ये डॉक्टर साहेबांच्या लेखावरुन कळले होते. तेव्हा वाचण्याची तयारी केली होती पण राहूनच गेले. अर्थात डॉक्टर साहेबांनी सुचवलेले 'युद्ध जिवांचे' वाचायला देखील आम्हाला त्यानंतर वर्ष लागले होते म्हणा. अदितीने हे खरेदी केले तेव्हा मात्र तिथे असूनही ते खरेदी करावेसे वाटले नाही येवढे मात्र खरे.
आता येवढी चर्चा विचर्चा घडलीच / घडत आहे तर पुस्तक वाचावेच असे वाटू लागले आहे. काही व्यक्तिगत आदराच्या व्यक्तिंनी पुस्तकाला येवढी शाबासकी दिल्यावर आता वाचणे मस्टच.
31 Aug 2011 - 5:28 am | क्रेमर
प्रस्ताव व चर्चा वाचून पुस्तक वाचावेसे वाटत आहे.