२६ जुलै २००५ एक अनुभव !!

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जनातलं, मनातलं
26 May 2008 - 2:06 pm

आता काही दिवसात पाऊस चालु होईल. पावसाळा हा सर्वांना आवडतो. माझ्यासकट सर्वांच्या रम्य आठवणी पावसाशी निगडीत असतात मग ते पावसात मनसोक्त भिजणे असो वा केलेला एखादा सुंदर प्रवास असो.

२६ जुलै २००५ पासुन मात्र मुंबईकरांना पाऊस म्हणले की एक प्रकारची सुप्त भीती वाटू लागली आहे.

'न भुतो न भविष्यती!' अशा प्रकारचा झालेला पाऊस जो मी अनुभवला तो शेअर करण्याचा एक प्रयत्न .

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

२६ जुलै २००५ एक अनुभव !!

३ वर्ष झाली या गोष्टीला पण काही घटना आपण कधीच विसरु शकत नाही.

त्या दिवशी दुपारी वाशीतील ऑफिसमधे नेहमी प्रमाणे काम सुरु होते. बाहेर पाऊस चालुच होता. साधारणपणे ४ वा. काही कामानिमीत्याने छ्त्रपती शिवाजी टरर्मीनलला (छ. शि.ट) जायचे ठरले. ऑफिसमधुन बाहेर पडेपर्यंत पावसाचा अंदाज आला नाही परंतु वाशी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी रिक्षात बसल्यावर परिस्थीती समजायला लगली. पाऊस धो धो कोसळत होता.खरं म्हणजे पावसात प्रवास करण्याची आवड असणारा (अगदी लोकलचा प्रवासाचीही) मी त्या वेळी मात्र पावसाचा राग रंग पाहुन थोडासा साशंक होतो.

कदाचीत पुढील संकटांची चाहुल / धोक्याची जाणीव माणसाला होत असावी. माझी मनःस्थीती तशीच होती .परंतु त्याचे विश्लेशण करण्यास कदाचीत कमी पडलो असेन. किंवा नियतीच्या मनात काही वेगळाच विचार असेल.

वाशी रेल्वे स्थानकावर टिकीट काढण्यासाठी जेंव्हा रांगेत उभे राहिलो तेव्हा ठरवले की २ टिकीटे काढायची, एक छ. शि.ट( कामाचे ठिकाण) आणी दुसरे बेलापुर-कोकण भवन ( वास्तव्याचे ठिकाण). दोन्ही ठिकाणे बरोबर विरुध्द बाजुला. जी आधी लोकल येईल त्याने जायचे. बस्स !! इथेच चुकले.

आता वाटते की सारासार विचार करुन घरी जाण्याचा निर्णय घेतला असता तर बरे झाले असते. कारण बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस , थोड्या पावसातही मान टाकणारी मध्य रेल्वेची हार्बर (पनवेल-छ. शि.ट) सेवा, अशा प्रसंगी कुणीही घरी जाऊन मस्त कांदा भजी, मिसळ पाव खात बसला असता परंतू त्यावेळी मी मात्र छ. शि.ट का बेलापुर या विवंचनेत होतो. वाशी स्थानकावर जेव्हा दोन्ही बाजुचे इंडिकेटर पाहिले तेव्हा वाटले की चला आज लवकर घरी जण्याचा योग आहे बहुतेक कारण पनवेलला जाणारी लोकल ५ मिनीटे आधी येणार होती.पण तसे होणार नव्ह्ते.

" आपण जर एखाद्या निर्णया बाबत ठाम नसू किंवा द्विधा मनस्थितीत असू तर परिस्थितीला/नियतीला आपल्यावर भारी पडायला ५ मिनीटे खुप झाली". आणी तसेच झाले.

माझ्या दुर्दैवाने पनवेल लोकलच्या आधी छ. शि.ट ला जाणारी लोकल आली आणी अजिबात गर्दी नसलेल्या (तरीही लक्षात न घेता) त्या लोकल मधे माझ्यासकट चढ्लेल्या काही मोजक्या लोकांना(इतर लाखो लोकांबरोबर) नियती एक वेगळा अनुभव द्यायला सिध्द झाली होती.

प्रवासाची सुरुवात तर एकदम छान झाली. वाशी रेल्वे ब्रीज वरुन दिसणारे निसर्गाचे अप्रतीम सौंदर्य्, कधी नव्हे ते मिळालेली खिडकी जवळची जागा, आपण खरोखरच मुंबईत आहोत ना? असे वाटायला लावणारे हवामान. ही धुंदी फार वेळ टिकली नाही. जसजसे गोवंडी-चेंबुर जवळ यायला लागले तसा लोकलचा वेग मंदावला आणी सभोवतालचा अंधार आणखी गडद्द होत चालला असताना डोक्यात लक्खः प्रकाश पडला, आपण आता अडकणार.

गाडी जेंव्हा बराच वेळ चेंबुर आणी तिळकनगर स्थानकांच्यामधे थांबली तेंव्हा लक्षात आले की डाउन लाईनचे रुळ ( वाशी कडे जाणारे) पाण्यात मस्त डुंबत आहेत. याचा अर्थ अगदी स्पष्ट होता की त्यांची भावंडे ही पाण्यात मस्त डुंबत असणार (अप लाईनचे रुळ) आणी आमची लोकल पुढे जात नाही म्हणजे ती ही त्यांच्यात सामील असणार. परंतु त्यावेळेला मोटरमनच्या रुपाने परमेश्वर धाऊन आला आणी त्याने लोकल आणी रुळ यांचे भांडण होणार नाही हे पहात ( अगदी सुजाण पालकांसारखा) , अतीशय शिताफीने आमच्या लोकलला कुर्ला स्थानकावरच्या ८ नं. च्या प्लॅटफॉरमवर सुखरुप पोहचवले. कुठेतरी वाटेत अडकुन पडण्यापेक्षा हे थोडे बरे होते की निदान आता प्लॅटफॉरमवर होतो.

कुर्ला स्थानकावर १ नं. प्लॅटफॉरमवर ठाण्याला जाणारी आणखी एक गाडी उभी होती. सगळीकडे शब्दशः धबधब्यासारखे पाणी वहात होते. विचार केला की तासा दोन तासात पाऊसाचा जोर कमी होईल आणी रेल्वे सेवा जरी चालू झाली नाही तरी कुर्ल्याहुन(पूर्व) बसने जाता येईल. याच वेळी घरी मोबाईल वरुन सुखरुप असल्याचा ( सुखरुप अडकल्याचा) निरोप पाठवून बायकोला रात्री पर्यंत पोचेन असे कळवळे.

मुंबईच्या माणसाला तास दिड तास वेळ घालवणे फारसे अवघड नाही. लोकलमधे बसायला जागा असल्याने तशी काळजी नव्ह्ती. पावसापासुन बचाव करण्यासाठी आणी गाडीत जागा असल्याने प्लॅटफॉरमवरचे लोक गाडीत आसरा शोधू लागले आणी गाडीतही गर्दी वाढू लागली. सर्वांची चुळबुळ, घरी जाण्याची ओढ्,सहप्रवाशांपैकी कोण, कुठे आणी कसे जाणार किंवा कसे जाणे योग्य आहे याबाबत चर्चा सुरु झाली. त्यातच बाहेरुन आलेल्या प्रवाशांच्या वेळोवेळी मिळ्णा-या पावसाबद्दलच्या अपडेटमुळे ( ब्रे़कींग न्युज) निराशा वाढत गेली. अशा सर्व वातावणात साधारपणे ७ च्या सुमारास सगळीकडचे दिवे गेले आणी एकच हाहाकार उडाला. सर्वत्र अंधार, लोकांचा प्रचंड आरडाओरडा अशा परिस्थितीत बायका, लहान मुले , शाळेतील विद्यार्थी यांचे काय हाल झाले असतील याची कल्पनाच न केलेली बरी!

साधारण १० एक मिनिटात दोन्ही लोकलच्या मोटरमनने इमर्जन्सी दिवे( जे आपल्या झिरो बल्ब सारखे असतात) चालु केले आणी सर्वांच्या जिवातजीव आला. आता संपुर्ण कुर्ला स्थानकात १८ डब्यातील मिणमिणते दिवे ८ ते १० हजार लोकांना रात्रभर साथ देणार होते. एकाच जागी बसुन कंटाळा आल्याने शेजा-याला जागा धरायला सांगुन डब्याच्या बाहेर आलो. ६ आणी ७ नं प्लॅटफॉरम मधील पाण्याच्या पातळीने धोक्याची पातळी दाखवणा-या लाल रेषेला गिळंक्रीत करुन बहुदा बराच वेळ झाला होता.पावसाचा जोर वाढला होता. काहीजणांनी पुर्व, पश्चिम दिशेने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला परंतु तो पर्यंत खुप उशीर झाला होता. दोन्ही ठिकाणी पाण्याने अवघ्या परिसराला मिठीत घेतले होते.

आता लक्षात आले की परतीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. आपल्याला पाऊस थांबेपर्यंत लोकल मधे बसुन रहाण्याशिवाय काही एक पर्याय नाही . एक वडापाव घेतला आणी निमुटपणे जागेवर येऊन बसलो. जनता अडचणीत असतानाही त्या स्टेशनवरच्या टपरीवाल्याने ( कदाचीत अमराठी मालकाने) नेहमीच्याच दराने सर्व पदार्थ विकले आणी शक्य असेतोपर्यंत आपली टपरी उघडी ठेवली याचे राहुन राहुन आश्चर्य वाटते आहे.

दुपारपासुनच्या सर्व घटना पुन्हा एकदा आठवल्या आणी आपण आयुष्यातला एक सगळ्यात चुकीचा निर्णय(घरी न जाण्याचा) घेतला आहे याची जाणीव झाली. आता ब-यापैकी सर्वांनी परिस्थिती स्विकारली आणी माझ्यासकत जो तो एक दुस-यांसी संवाद साधु लागला त्याचप्रमाणे घरी संपर्क करण्याचा अयशस्वी प्रयत्न करु लागला. मोबाईल बंद, बॅटरी संपत आलेली तरी ही प्रयत्न चालुच. घरी काय परिस्थीती असेल? पाणी घरात आले असेल का? बायको, मुले कुठे असतील हे सर्व प्रश्न सर्वाच्या चेह्-यावर दिसत होते. एकमेकांना धीर देत होते, उभ्या लोकाना काही वेळ जागा देणे, लहानांना सांभाळुन घेणे हे सगळीकडे चालु होते. ज्या लोकाना बसायला जागा नाही त्यांनी पादचारी पुलाचा आश्रय घेतला होता. साधारण ११ वाजता पावसाचे पाणी प्लॅटफॉरमवर यायला सुरुवात झाली आणी परत एकदा सर्वांचे धाबे दणाणले. आता पाणी लोकलमध्ये काय ते शिरायचे राहिले होते. पण ती अशक्य गोष्ट होती. लोकल मधे बसलो असलोतरी खिडकीतुन टपकणा-या पाण्याने ब-यापैकी भिजत होतो पण खिडकी बंद करणे शक्य नव्ह्ते. अशा सर्व परिस्थीतीत, पावसाच्या एक प्रकारच्या गंभीर निनादात केव्हा डुलकी लागली ते कळलच नाही.

सकाळचे ६ वाजेतो पर्यंत जागचा हललो नाही. थोडेसे दिसायला लागल्यावर मात्र आता काही तरी करायलाच पाहिजे असे ठरवले. खिशातील पैसे, मोबाईल इ. गोष्टी बॅगेत घातल्या आणी जागा सोडली. पावसाचा जोर रात्री पेक्षा थोडा कमी झाला होता. एक चहा घेतला आणी पादचारी पुलावर कुर्ला पुर्व जाण्यासाठी चढलो. जागोजागी लोक दाटीवाटीने बसले होते. पुलावरुन कुर्ला(पू) चे जे द्रुष्य पाहिले ते पाहुन मोठा धक्का बसला. सर्व परिसर जलमय झाला होता. स्टेशनबाहेर खांद्याएवढे पाणी होते. सभोवतालची दुकाने निम्मी बुडली होती. हळुहळु एक एक जण पाण्यात जायचे धाडस करत होता. मी ही हातातली बॅग डोक्यावर घेतली आणी सुमननगर( सायन-पनवेल मार्ग) कडे चालु लागलो. जसजसे पुढे जायला लागलो तस तसे पाण्याची पातळी वाढत होती आणी पाय उचलणे अवघड जात होते. कुर्ला बस डेपोच्या जरापुढेच पाणी खांद्याला लागले. डोक्यावरची बॅग सांभाळत बॅलेंस राखत रस्त्याच्या मधोमध चालणे म्हणजे मोठी कसरत वाटत होती.पावसाच्या त्या घाण पाण्यातुन चालणे अगदी जिवावर आले होते. सगळेजण एका पाठोपाठ रांगेत चालत होते. पुढे काही अंतरावर छोटा पुल होता. तिथे पाण्याल प्रचंड ओढ होती.सुदैवाने एकमेकांच्या सहकार्याने ते अंतर ही पार पडले आणी कसाबसा सुमननगरला आलो.

आता इथे पाणी फारसे नव्हते पण हायवेवर प्रचंड वाहतुककोंडी झाली होती.एक ही वाहन जागचे हालु शकत नव्ह्ते.तसेच चालत वाशीच्या दिशेने निघालो.आणी साधारण सकाळ्चे १० वाजता देवनार डेपोत पोहोचलो.

बेस्टने तेथुन वाशी साठी खास बसेस सोडल्या होत्या. अर्थाथ नंतर बेलापुरला पोचायला फारसा त्रास झाला नाही.

घरी पोचल्यावर बायकोलाही हायसे वाटले.
जन्मभर न विसरणारा अनुभव यानिमीत्याने मिळाला.
आपले ही अनुभव वाचण्यास आवडेल.

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 May 2008 - 2:33 pm | विसोबा खेचर

केळकरसाहेब,

सुरेख, चित्रदर्शी अनुभवकथन..! आपण छानच लिहिलं आहे.

२६ जुलै २००५ चा तो पाऊस सर्वच मुंबईकरांच्या आयुष्यभर लक्षात राहील. अक्षरश: अक्राळविक्राळ प्रलय! दुसरे शब्दच नाहीत...!

मीही त्या दिवशी पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळी ते ठाणे चालत घरी आलो होतो. रात्री दहाचा सुमार असेल. रस्त्यावर मिट्ट अंधार, वरून अक्षरश: ढगफुटीसारखा कोसळणारा तो पाऊस, आणि सोसाट्याचा वारा अश्या अवस्थेत आम्ही काही पादचारी एकमेकांचा हात धरून रस्त्यावरून चाललो होतो. मधुनच कानठळ्या बसवणारी खणकन वीज चमके आणि त्या प्रकाशात क्षणभरच काय तो रस्ता उजळून निघे व रस्त्यावरून चालणारी इतर माणसे दिसत. पुढच्याच क्षणी पुन्हा मिट्ट अंधार!

मी त्याचा आणि त्याने माझा हात धरला होता व आम्ही दोघं एकमेकांना सांभाळून घेत हळूहळू मार्गक्रमणा करत होतो. मला त्या माणसाचे नावही माहीत नव्हते, ना कधी पूर्वायुष्यात त्याला भेटलो होतो, तरीही त्या क्षणी मला त्याचा खूप आधार वाटत होता!

एवढ्या प्रलयसदृष परिस्थितीत एरवी केवळ एक अनोळखी चेहेरा असलेल्या किंवा माणसांच्या अफाट गर्दीत चेहेराच हरवलेल्या मुंबई शहरात माणूसकीची एक वेगळीच झलक त्या दिवशी पाहायला मिळाली, अनुभवता आली! ओळख ना पाळख नसलेली माणसं आपापल्या भागात येणारा कुणी पांथस्थ पुरात वाहून जाऊ नये म्हणून रात्रभर पावसात भिजत रस्त्यात साखळी करून उभी होती! आजूबाजूच्या इमारतीमधली माणसं येणार्‍याजाणार्‍यांना चहापाणी, बिस्किटं वगैरे देत होती! आधार देत होती, सांभाळून घेत होती!

असो...

आपला,
(मुंबईचा कट्टर अभिमानी!) तात्या.

ऍडीजोशी's picture

26 May 2008 - 3:28 pm | ऍडीजोशी (not verified)

अरे नका आठवण करून देउ त्या दिवसाची. दर वेळी पावसाळा जवळ आला की कुणी ना कुणी आपत्या 'त्या' दिवशीच्या आठवणी लिहायला घेतं. २००५ नंतरची २ वर्ष तर जरा जोरात पाऊस आला की असल्या मेल्सचाही पाऊस पडत असे. अम्ही कसे अडकलो नी सुटलो ह्याच्या कहण्यांना ऊत येई. (हे पर्सनली घेउ नये)

मुंबई आणि मुंबईकरांनी त्या दिवशी जे गमावलं ते परत मिळणं शक्य नाहीये. हायवेवर दुसर्‍या दिवशी उलटून पडलेले ट्रक्स, बसेस, गाड्या, सफाचट झालेल्या झोपडपट्ट्या, मरून पडलेली गुरं, माणसं मी पाहिलेली आहेत. क्रुपा करून त्या आठवणी पुन्हा नकोत.

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

अमोल केळकर's picture

26 May 2008 - 5:14 pm | अमोल केळकर

खरं आहे आपण जे म्हणता ते. नकोतच त्या वाईट आठवणी.

मुंबई आणि मुंबईकरांनी त्या दिवशी जे गमावलं ते परत मिळणं शक्य नाहीये
सहमत
आपला
(नुकतेच ग्राउंड फ्लोवरला घर घेतलेला) केळकर

ठणठणपाळ's picture

26 May 2008 - 11:19 pm | ठणठणपाळ

त्या वेळी मी नुकताच मुम्बई विद्यापीठात एम्.एस्सी करायला आलो होतो. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच हॉस्टेलमधे रूम मिळाली होती. हॉस्टेलमधेच असल्यामुळे आम्ही सुरक्षीत राहिलो. खाण्यापिण्याचे मात्र हाल झाले. त्यावेळी ८० जणांसाठी असलेल्या हॉस्टेलमधे ३०० हून जास्त मुलं राहिली होती.
़जी मुलं घरी जाण्यासाठी दुपारी कॅम्पसमधून बाहेर पडली त्यांची अवस्था फार वाईट झाली. टिटवाळ्याच्या पुढे राहणारी आमच्या वर्गातील एक मुलगी २८ तारखेला रात्री घरी पोहचली. माझ्या काही काही मित्रांनी २६ तारखेची रात्र बसच्या टपावर बसून काढली.

शितल's picture

27 May 2008 - 4:51 am | शितल

टीव्हीवर बातम्यात पाहुन होते, असे अनुभव वाचल्यावर तर त्या परिस्थितीत मु॑बईकर ज्या पध्द्तीने समोरे गेले त्याची दाद द्यायला पाहिजे.
तुम्ही छान शब्दात अनुभव मा॑डला आहेत. २६ जुलै हादिवस प्रत्येक मु॑बईकर का प्रत्येक महाराष्ट्रीयन विसरू शकणार नाही.

मदनबाण's picture

27 May 2008 - 8:48 am | मदनबाण

हो तो दिवस मीही विसरु शकत नाही,,त्या वेळी मी वसई ला कामाला होतो...संध्याकाळ झाली होती..पाऊस थांबता थांबत नव्हता..मी माझ्या ऑफिस मधल्या सहकार्‍यांना विचारले की मी तर आता निघतोय...कोणी येतय का माझ्या बरोबर्?,,हो, नाही करता करता बराच वेळ गेला...शेवटी मी एकटाच निघालो..स्टेशनवर पोहचल्यावर मी माझ्या ऑफिस मधल्या सहकार्‍यांना फोन करुन लोकलची स्थिती काय आहे हे सांगणार होतो..१५ मिनिटे त्या तुफान पावसात पायपीट करत वसई रेल्वे स्टेशन ला पोहचलो..पादचारी पुला वरुन खाली पाहिल्या वर खाली पाहिले तर ही तोबा गर्दी.....बराच काळ एकही लोकल न आल्याची मला खात्रीच पटली...अनेक परगावी जाणार्‍या गाड्या स्थानकावर थांबुन होत्या..या गर्दीत माझा काही पाडाव लागणार नाही याची मला खात्री पटली..मी ऑफिस मधे असलेल्या माझ्या सहकार्‍यांना लगेच फोन केला आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली..आणि मी हे हे सांगितले की मी आता वसई एस टी आगारात जाणार आहे व तेथुन ठाण्याला जाणारी बस धरणार आहे.परत माझी पायपीट सुरु झाली..मोबाईल नेटवर्क फ्रीझ होत चालले होते..कारण कॉल करताना बर्‍याच वेळा कट होत होता किंवा तो लागतच नव्हता.....
सरते शेवटी बस डेपो आला...तिथही तोबा गर्दी धावपळ करुन कुठली बस कुठे चालली आहे याची चौकशी केली..माझे नशीब जोरात असावे कारण ठाण्याला जाणारी बस लगेच लागली..व त्या गर्दीत बसायला ही मिळाले..
बसचा प्रवास सुरु झाला....
प्रत्येक ठिकाणी रस्तावर तुडुंब पाणी भरलेले होते...बस ड्रायवर तर अगदी सावकाश गाडी चालवत होता..आणि बहुधा त्याच्या कडे दुसरा पर्याय नव्हताच कारण रस्त्यावर एवढे पाणी जमा झाले होते की आता तो एखाध्या तळ्यामधुनच गाडी हाकत होता....बर आपल्या या संपंन्न देशात अजुन तरी खड्डा मुक्त असा रस्ता कोणी दाखवु शकणार आहे का?
वसई चा हा मार्ग असाच खड्ड्यांनी परिपुर्ण होता..
ऑफिस मधल्या सहकार्‍यांचा मला फोन आला..ते आता वसई बस डेपो मधे होते.. त्यांनी मला सांगितले की मी धरलेली बस ही ठाण्याला जाणारी शेवटची बस होती.....आता तेथुन अजुन बस सुटणार नव्हत्या !!!!!
माझी बस आता मुंबई अहमदाबाद महामार्गावर आली...मी मनात म्हंटल की या पावसात कोठेही बंद न पडता,,पंक्चर न होता ही बस इथपर्यन्त आली हे नसे थोडके..
बस आता घोडबंदर ला आली प्रचंड वाहनांची गर्दी...पाऊण तास बस मधे तसाच बसुन काधला...शेवटी पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला..अंधार्,,,गाड्यांचे दिवे आणि आभाळातील तारे हे सोबतीला घेऊन पायी पायी चालणे सुरु केले
अनेक किलोमीटर चाल चाल चाललो...एका उताराच्या वळणावर आलो तर पुढे पाहतो ते काय......माझ्या गळ्यापर्यंन्त पोहचेल एवढ पाणी पुढे साचलेल होत..आता काय करणार ? मी पुर्णपणे भिजलो होतो आणि चालायचा त्राण अजिबात उरला नव्हता.....पण..
एक ट्रक अचानक तिथे आला मी त्याला हात दाखवला तो थांबला मी व अजुन दोन माणसे त्या ट्रक मधे चढलो....
ट्रक मधे आत छान पैकी डिस्को लायटिंग केलेले होते... मी चालकाशी गप्पा मारायला सुरु केल्या...(मी बोलायला सुरुवात केली की काय होत...विचारु नका..)तर माझा पहिला प्रश्न त्या चालकाला किधर से आ रहे हो? तो म्हणाला श्रीनगर से मी लगेच दुसरा प्रश्न पुढे केला ...डिझल बहोत लगता होगा? टंकी फुल होगी ना? कितना लिटर की है...तो खुष...तो म्हणाला महाराष्ट्रात येण्यापुर्वी किंवा महाराष्ट्रातुन बाहेर पडल्यावर म्हणजे साऊथ साईड ला जाताना ते इंधन भरुन घेतात...कारण महाराष्ट्रात इंधन भरणे त्यांना परवडत नाही!!!!!
शेवटी माझा उतरण्याची जागा आली...ट्रक चालकाचे आभार मानले पटकन खाली उडी मारली आणि परत थोडी पायपीट करुन घरी आलो..११:४५ झाले होते...ऑफिस मधुन ४:४५ ला निघालो होतो..घरच्यांच्या जिवात जिव आला...
पुढचे दोन दिवस मी धड चालुही शकत नव्हतो कारण माझे पाय माझ्याशीच भरपर गप्पा मारत होते.. :)
मी ही २६ तारीख कधीच विसरु शकणार नाहीए.....

(अती बडबड्या)
मदनबाण.....