पुरुष!

अभिजीत राजवाडे's picture
अभिजीत राजवाडे in जे न देखे रवी...
18 Aug 2011 - 3:28 am

माझी कविता माझ्या आवाजात....मला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली ते?

पुरुष हवे आहेत...
या देशाला हवे आहेत पुरुष,
मानसिक पुरुषत्व असलेले पुरुष,
शारिरीक पुरुषत्व असुनही मानसिक शंढत्व
असलेल्या पुरुषांच्या या काळ्या ढगात,
वीजेसारखे आसमंत उजळवणारे पुरुष,
निराशा अन निशेला आपल्या बलदंड खांद्यांनी,
स्मशानात पोहचवणारे पुरुष
समरांगणात मारिता मारिता,
तलवार वाकवणारे पुरुष
सहानुभुतीवर थुंकणारे पुरुष,
वादळांना फुंकणारे पुरुष,
शुन्यातुन स्वर्ग निर्माण करणारे पुरुष,
राष्ट्रासाठी हसत हसत मरणारे पुरुष,

कुठे मिळतील असे पुरुष?,
इतिहासात खुप होते,
वर्तमानात दुर्मिळ झाले आहे,
उज्वल भविष्यासाठी ह्या वाघांसाठीही एखादा व्याघ्रप्रकल्प उघडावा लागेल, कदाचित...

वीररसकविता

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2011 - 4:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे सर्व गुण बायकांमधे नसतातच का? व्हीडीओ क्लिपच्या थीममधेच राणी लक्ष्मीबाई दाखवायची आणि अमुक ढमुक हे गुण (?) फक्त पुरूषांतच असतात असं काही लिहायचं ... thumbs down.

अभिजीत राजवाडे's picture

18 Aug 2011 - 4:40 am | अभिजीत राजवाडे

म्हणजे तुम्हाला कविताही कळली नाही अन व्हिडीयो मधला राणी लक्ष्मीबाईचा फोटो ही दिसला नाही.

हि कविता मानसिक पुरुषत्वावर आहे. आणि ते कित्येक स्त्रीयांमधेही असते. माझी कविता पुरुषांची बाजु घेण्यासाठी लिहिली नाही.

तळटिप - तुमचे नाव साजेशे आहे. कुणाला ते कृपया विचारु नका.

आभार!!!

"पुरुषत्व" म्हणजे काहीतरी ग्रेट असच ना? त्यालाच तर आक्षेप आहे ना भाऊ. स्त्रीत्व ग्रेट नसतं का?
तुम्ही पण राव एवढं रामायण झाल्यावर रामाची सीता कोण विचारताय. स्त्रीत्व म्हणजे सोशीकपणा, मार्दव, सौम्यता हेच गृहीतक चूकीचं नाही का? पुरुषत्व = वीरश्री???

पंगा's picture

18 Aug 2011 - 4:51 am | पंगा

आंतरजालावर पूर्वी, म्हणजे आमच्या वेळेस, म्हणजे अगदी आत्ताआत्तापर्यंत पु.लं.ची क्वोटे औट-ऑफ-कॉण्टेक्ष्ट फेकण्याची फ्याशन होती. हल्ली सुरेश भटांची आली आहे काय?

नाही, काळ बदललाय काय याचा अंदाज घेतोय.

अभिजीत राजवाडे's picture

18 Aug 2011 - 4:53 am | अभिजीत राजवाडे

तुमची प्रतिक्रिया in context आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खरच गागाभट्ट आहात.

अभिजीत राजवाडे's picture

18 Aug 2011 - 4:51 am | अभिजीत राजवाडे

माझी सर्व मिपा सदस्यांना विनंती आहे कि या कवितेच्या अर्थाचा विपर्यास करु नका. या कवितेचा अर्थ समजुन घ्या. हि कविता या सर्वांच्या पुढे जाउन समजाऊन घेण्याचा प्रयत्न करा.

जर मला पुरुषांना वर दाखवायचे असते तर राणी लक्ष्मीबाईचा फोटो मी टाकलाच नसता. मी एका विचार सरणी बद्द्ल लिहिले आहे. जसे इंग्रजी मधे "you are man!!!", असे मुलीसुद्धा मुलींना म्हणतात अगदी तसेच काहिसे.

पण मी मनापासुन कळकळीची विनंती करत आहे कि या कवितेद्वारे मला कुणालाही वरचढ किंवा खाली दाखवायचे नाही कवितेचा विषय यासर्वांपेक्षा वेगळा आहे.

हळहळ - एखाद्या कवीला त्याच्या कवितेचा अर्थ सांगावा लागतो आहे हि सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे अन त्यानुसार लौकिकार्थाने हि कविता फसली आहे :(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2011 - 5:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शौर्य, धाडस, देशप्रेम, इ.इ. गोष्टी तुम्हाला स्त्रियांमधे दिसल्याच नाहीत का? हे गुण (फक्त) पुरूषांचे नव्हे, (काही किंवा अनेक) माणसांचे असतात असं तुम्हाला म्हणावंसं वाटलंच नाही!

आजच खरडाखरडीत मला एक प्रसंग आठवला, तेच इथे पुन्हा डकवते:
भरत शाहवर झालेल्या गोळीबाराच्या खटल्यात इतर सर्व साक्षीदार उलटले पण प्रीती झिंटा उलटली नाही आणि गुन्हा शाबीत झाला. मिडीयाने तिचा उल्लेख "साक्षीदारांपैकी एकमेव मर्द" असा केला हे तिला अवमानकारक वाटलं.

असो. लौकिकार्थाने कविता अजिबातच फसलेली नाही, पण विचार मात्र अगदीच पुरूषप्रधान मानसिकता दाखवणार वाटल्यामुळे कविता मिडीओकर वाटली.

हां, ते माझं नाव मी समजून उमजूनच घेतलं आहे आणि मला त्याचा अभिमानही आहे. कल्जि न घेने.

पंगा's picture

18 Aug 2011 - 5:58 am | पंगा

मिडीयाने तिचा उल्लेख "साक्षीदारांपैकी एकमेव मर्द" असा केला हे तिला अवमानकारक वाटलं.

हे पूर्णपणे समजण्यासारखे आहे. पण...

- 'खूब लड़ी मर्दानी थी'बद्दल काय म्हणता येईल? (श्रीमती सुभद्राकुमारी चौहान या मी शेवटचे ऐकले तोपर्यंत तरी स्त्री होत्या. मग ही नक्की कोणाची मानसिकता म्हणायची?)

- श्रीमती इंदिरा गांधींचा उल्लेख अनेकदा "देशातला एकमेव मर्द" असा होत असे. खुद्द श्रीमती इंदिरा गांधींनी त्याबद्दल कधी आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. (दुर्लक्ष केले असणे शक्य आहे. पण अपमान झाल्याचा निदान जाहीर दावा तरी केल्याचे ऐकण्यात आलेले नाही. मग ही नेमकी कोणाची मानसिकता म्हणायची?)

अर्थात, "शौर्य, धाडस, धमक हे गुण केवळ पुरुषांत असतात" किंवा "शौर्य, धाडस, धमक हे गुण म्हणजे पुरुषाचे लक्षण आहे" किंवा "शौर्य, धाडस, धमक नसलेली व्यक्ती ही पुरुषच नव्हे" असा दावा जर कोणी करत असेल, तर ते मूर्खपणाचे आहे. परंतु एखादी शूर, धाडसी, धमकवाली किंवा फॉर द्याट म्याटर डोके आणि प्रायॉरिटीज़ शाबूत असलेली कोणतीही व्यक्ती - पुरुष किंवा स्त्री - असल्या फडतूस गॉसिपचा बाऊ करेल असे वाटत नाही. दुर्लक्ष करेल, फाट्यावर मारेल आणि शी ऑर ही विल गेट ऑन विथ हर ऑर हिज़ ओन लाइफ, अशी निदान माझी तरी समजूत आहे.

बाकी भाषा काय, बदलेल तेव्हा बदलेल, बदलेल हळूहळू पण बदलेल निश्चित. किंवा शब्दांचे अर्थ बोथट होतील, बदलतील. नी-जर्क पद्धतीने 'प्रथमव्यक्ती एकवचनी', 'काळव्यक्ती' असे शब्दप्रयोग आणता येतीलही कदाचित, पण अशा उपायांनी ज्यांच्यात तुम्ही म्हणता तशी पुरुषप्रधान मानसिकता आहे, त्यांत खरोखरी काही बदल होणार आहे काय? आणि ज्यांच्यात तशी ती नाही, त्यांच्यावर अशा उपायांची काय गरज आहे? की हा नुसताच वरवरचा बँड-एड उपाय होणार आहे?

आणि जिथे टोकाची पुरुषप्रधान मानसिकता आहे, तिथे मला वाटते वाद घालून नि प्रबोधन करून काहीही उपयोग होऊ नये. ते दगडावर डोके आपटणे ठरावे. अशा ठिकाणी आयसोलेट इट, इग्नोर इट अँड लेट इट डाय इट्स नॅचरल डेथ, अँड इन द मीनव्हाइल मेक गुड फ्रेंड्स अमंग बोथ जेंडर्स हू आर डिव्हॉइड ऑफ सच अ‍ॅटिट्यूड्स, आणि अशांची वीण वाढवावी, हाच उपाय मला वाटते दीर्घकाळात प्रभावकारक ठरावा.

लेट अस नॉट गेट स्टक इन अ लूप, ट्रायिंग टू चेंज द अनचेंजेबल. बट अ‍ॅट द सेम टाइम, लेट अस ट्राय टू ब्रिंग अबाउट चेंज इन अचीवेबल, प्रॅक्टिकल वेज़. (असे आपले मला तरी बुवा वाटते.)

बाकी चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2011 - 6:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

"खूब लडी मर्दानी" किंवा "देशातली एकमेव मर्द" या उपमाही मला आवडलेल्या नाहीत. माझ्या निषेध व्यक्त करण्याने मानसिकता बदलेल अशा दिवास्वप्नात मी जगत नाही. पण निदान या विचारांचं अस्तित्व आहे एवढं तरी मी दाखवून देऊ शकले तरी उत्तम.
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना दिलेल्या मर्द या विशेषणाबद्दल निषेध व्यक्त केला नाही म्हणून तो विचार स्वीकारार्ह आणि कमी कपडे घालून, चित्रपटात बागडणारी म्हणून प्रिती झिंटाचे विचार उथळ असा विचार तुम्ही तरी करत नसाल अशी आशा आहे.

'खूब लडी मर्दानी' हे काव्य कोणत्या काळात लिहीलं गेलं हे मला माहित नाही. पण आजही शौर्य, धैर्य हे गुण पुरूषी समजले जातात. तर काही(शे?) वर्षांपूर्वी असा समज असणं अस्थानी वाटत नाही. बदलत्या काळात मूल्य बदलणार आणि बदलली पाहिजेत एवढंच.

पुरूषप्रधान मानसिकता फक्त पुरूषांचीच असावी का? बहुदा नाही. स्त्रीवादी किंवा समानतावादी विचार करणारे पुरूषही प्रसिद्ध आहेत. भारतात स्त्रियांसाठी पहिली शाळा काढणार्‍याचं नाव महात्मा ज्योतिराव फुले असं आहे.

अशा ठिकाणी आयसोलेट इट, इग्नोर इट अँड लेट इट डाय इट्स नॅचरल डेथ, अँड इन द मीनव्हाइल मेक गुड फ्रेंड्स अमंग बोथ जेंडर्स हू आर डिव्हॉइड ऑफ सच अ‍ॅटिट्यूड्स, आणि अशांची वीण वाढवावी, हाच उपाय मला वाटते दीर्घकाळात प्रभावकारक ठरावा.
लेट अस नॉट गेट स्टक इन अ लूप, ट्रायिंग टू चेंज द अनचेंजेबल. बट अ‍ॅट द सेम टाइम, लेट अस ट्राय टू ब्रिंग अबाउट चेंज इन अचीवेबल, प्रॅक्टिकल वेज़.

देवा, माझी थोडी अडचण अशी आहे की रोमन लिपीतलं मराठी आणि देवनागरीतलं इंग्लिश वाचायला मला फार त्रास होतो. कृपया त्या-त्या भाषेच्या सर्वमान्य लिपीत लिहीलंत तर वाचताना समजण्याचाही आनंद मिळेल.

एवढा मुद्देसूद प्रतिसाद देऊन मलाही माझा मुद्दा मांडण्यासाठी फूटेज दिल्याबद्दल धन्यवाद.

पंगा's picture

18 Aug 2011 - 7:39 am | पंगा

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना दिलेल्या मर्द या विशेषणाबद्दल निषेध व्यक्त केला नाही म्हणून तो विचार स्वीकारार्ह आणि कमी कपडे घालून, चित्रपटात बागडणारी म्हणून प्रिती झिंटाचे विचार उथळ असा विचार तुम्ही तरी करत नसाल अशी आशा आहे.

हं?

श्रीमती प्रीती (प्रेइटी?) झिंटा यांनी आपले विचार मांडताना कशा प्रकारचे कपडे घातले होते, याची मला कल्पना नाही. आणि श्रीमती इंदिरा गांधी यांनी (कोठल्याही लांबीचे कपडे घालून) निषेध व्यक्त केला नाही म्हणून तो विचार स्वीकारार्ह असावा हा निष्कर्ष मला तरी सयुक्तिक वाटत नाही.

फक्त, Mrs. Gandhi probably had better things to worry about एवढाच निष्कर्ष यावरून काढू इच्छितो.

'खूब लडी मर्दानी' हे काव्य कोणत्या काळात लिहीलं गेलं हे मला माहित नाही. पण आजही शौर्य, धैर्य हे गुण पुरूषी समजले जातात. तर काही(शे?) वर्षांपूर्वी असा समज असणं अस्थानी वाटत नाही.

मलाही निश्चित कल्पना नाही. पण पाहू या.

पुरूषप्रधान मानसिकता फक्त पुरूषांचीच असावी का? बहुदा नाही. स्त्रीवादी किंवा समानतावादी विचार करणारे पुरूषही प्रसिद्ध आहेत. भारतात स्त्रियांसाठी पहिली शाळा काढणार्‍याचं नाव महात्मा ज्योतिराव फुले असं आहे.

हो. मग? (मुद्दा समजला नाही.)

देवा, माझी थोडी अडचण अशी आहे की रोमन लिपीतलं मराठी आणि देवनागरीतलं इंग्लिश वाचायला मला फार त्रास होतो. कृपया त्या-त्या भाषेच्या सर्वमान्य लिपीत लिहीलंत तर वाचताना समजण्याचाही आनंद मिळेल.

ठीक.

अशा ठिकाणी Isolate it, ignore it and let it die its natural death, and in the meanwhile make good friends among both genders who are devoid of such attitudes, आणि अशांची वीण वाढवावी, हाच उपाय मला वाटते दीर्घकाळात प्रभावकारक ठरावा.
|
|
|
Let us not get stuck in a loop, trying to change the unchangeable. But at the same time, let us try to bring about change in achievable, practical ways.

आता ठीक?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2011 - 8:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

... म्हणून तो विचार स्वीकारार्ह असावा हा निष्कर्ष मला तरी सयुक्तिक वाटत नाही.

हीच अपेक्षा होती.

फक्त, Mrs. Gandhi probably had better things to worry about एवढाच निष्कर्ष यावरून काढू इच्छितो.

better च्या जागी other हा शब्द मला जास्त योग्य वाटतो.

हो. मग? (मुद्दा समजला नाही.)

पुरूषप्रधान मानसिकता फक्त पुरूषांचीच असते असं नव्हे, स्त्रियांचीही असू शकते. याविरूद्ध स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कार पुरूषही करताना दिसतात आणि याचं मोठं उदाहरण म्हणून मी ज्योतिबा फुल्यांचा उल्लेख केला.

... आणि अशांची वीण वाढवावी, हाच उपाय मला वाटते दीर्घकाळात प्रभावकारक ठरावा...

तुमच्या विचारांचा आदर आहेच. हातात फलक घेऊन मी बालभारतीच्या कार्यालयासमोर भाषा-बदल-आंदोलन करण्याच्या विचारात नाही. पण कधीमधी टंकनापुरता वेळ आणि मूड असतो. बहुतांश वेळ मी तशीच वागतेही.
पण अशाही पद्धतीने विचार करता येतो हेच अनेकांना माहित नसण्याची शक्यता आहे आणि त्या लोकांपर्यंत निदान या विचारांचं अस्तित्व पोहोचलं हेच खूप आहे.
इथले चार-दोन प्रतिसाद वाचून एखाद्या-एखादीच्याही विचारांत आमूलाग्र बदल वगैरे होईल असं मलातरी वाटत नाही.

>> इथले चार-दोन प्रतिसाद वाचून एखाद्या-एखादीच्याही विचारांत आमूलाग्र बदल वगैरे होईल असं मलातरी वाटत नाही.>>

तसं नाही अदिती. विचारांत बदल घडतो. मिपा सारख्या व्यासपीठाचा खूप फायदा होतो. मी खरच खूप अंधश्रद्धाळू होते. आतातरी बरच कमी झालं आहे. निदान मी बॉर्डर लाइनपर्यंत आले आहे. नाईल, तू आणि बर्‍याच अन्य लोकांच्या सतत चर्चेतून विचार मांडण्याच्या प्रक्रियेला हे श्रेय जाते.
खूप खूप चांगले बदल घडले आहेत या व्यासपीठामुळे. पण तेवढा ओपननेस हवा.

हे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही व्यक्तीच्या अक्चुअल विचारांच्या संपर्कात येता. वाण नाही पण गुण लागतोच. तुमच्या विचारांत बदल घडण्याची प्रक्रिया नाही नाही म्हणता सुरु होतेच.

अभिजीत राजवाडे's picture

18 Aug 2011 - 6:16 am | अभिजीत राजवाडे

गागाभट्ट,

खुप खुप आभार!!!

मला जे सांगता आले नाही ते तुम्ही फारच सुरेख पध्द्तीने सांगितले आहे.

खुप खुप आभार!!!

थ्रेड ओपन केला आणि कंपणीचा रेस्ट्रिक्ट अक्सेस हा मेसेज दिसला. कृपया टेक्स्ट मध्ये ही , ही कविता द्यावी.
तरीही वरील रिप्लाय मधुन बरीच कलप्ना आली.

आणि एक पौरुष्य आणि पुरुष/पुरुषत्व यांच्या अर्थाबाबत येथे गडबड झालेली वाटते.
माझ्या मते तरी पौरुष्य हे पुरुष आणि स्त्रीस (तीचे स्त्रीत्व कायम ठेवुन) वापरता येते.
पौरुष्य म्हणजे पुरुषत्व नसुन कर्तबगारी, धाडसी वीरपणा असा शब्द आहे, आणि तो पुरुष आणि स्त्री या दोघांच्यात ही भेद न करता दोघांनाही वापरता येतो.
असो. कदाचीत हे पटत नसेल, तर सोडुन द्यावे.

जेंव्हा कोणी पौरुष्याबद्दल बोलत असेन तर स्त्री म्हणजे दुबळीच का हा प्रश्न मनात उठणे हेच चुकीचे आहे.
स्त्री ही माता असते म्हणुन ती कोमल सौम्य गुणांची म्हणली जाते आणि ही तीची आभुषणे आहेत. ह्या गोष्टी असुन ही स्त्री मधेय पौरुष्य.. वीरता असते आणि ते कोणीही नाकारत नाहि.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2011 - 8:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कृपया टेक्स्ट मध्ये ही , ही कविता द्यावी.

सहमत आहे. विडंबन करण्यास सोपे पडते.

बाकी इतर पौरूष्य, स्त्रैणपणा वगैरे मुद्दा पंगाशेटच्या प्रतिसादाचे पालन करून दुर्लक्षित करण्यात आल्या गेलेला आहे.

अवांतरः प्रियालीच्या प्रतिसादाशी १००% सहमत.

प्रियाली's picture

18 Aug 2011 - 5:03 pm | प्रियाली

या देशातले पुरुष षंढ असल्याचे आधीच जाहीर झाल्याने 'पुरुष हवेत' अशी जाहीरात द्यायची असल्यास हरकत नाहीच.

चालू द्या!

जे कोणी मागवाल ते चांगले टॉल, डार्क आणि हँडसम असतील याची काळजी घ्या. आमची सोय बघून मागवा म्हणजे झाले. हवे असल्यास आणखी रिक्वायरमेंट्स कळवते.
;)

धनंजय's picture

18 Aug 2011 - 10:14 pm | धनंजय

थोडीशी जुन्या वळणाची रूपके आहेत.

मला वैयक्तिकदृष्ट्या वर्तमानाला हीन मानणारे स्मृतिरंजन तितकेसे आवडत नाही. कवितावाचनाच्या फितीमध्ये राणी लक्ष्मीबाईचे चित्रही आहे. राणी लक्ष्मीबाईच्या शूर कृत्यांपैकी एक म्हणजे तान्ह्या बाळाला पाठीशी बांधून किल्ल्याच्या तटावरून घोडा टाकून दौडत जाणे. आपल्या अपत्यांसाठी जीव धोक्यात घालणार्‍या कित्येक आया आणि बाप आजही असतील असे वाटते. परंतु त्यांचे पोवाडे अजून लिहिलेले गेले नाहीत. हीच बाब अन्य काही शूर कृत्यांबाबत.

माणसे हवी आहेत...
या जगाला हवी आहेत माणसे,
मानसिक माणुसकी असलेली माणसे,
शारिरीक मनुष्यत्व असुनही मानसिक पशुत्व
असलेल्या मनुष्यांच्या या काळ्या ढगात,
वीजेसारखी आसमंत उजळवणारी माणसे,
निराशा अन निशेला आपल्या बलदंड खांद्यांनी,
स्मशानात पोहचवणारी माणसे
समरांगणात मारिता मारिता,
तलवार वाकवणारी माणसे
कोर्‍या कणवेवर थुंकणारी माणसे,
वार्‍या वादळांना फुंकणारी माणसे,
शुन्यातुन स्वर्ग निर्माण करणारी माणसे,
सर्वांसाठी हसत हसत मरणारी माणसे,

कुठे मिळतील अशी माणसे?,
इतिहासातली दुर्मिळ तेजःपुंजे,
वर्तमानातही दुर्मिळ का बरे?
उज्वल भविष्यासाठी ह्या वाघांसाठीही एखादा व्याघ्रप्रकल्प उघडावा लागेल, कदाचित...

- - -

काही लिंगनिरपेक्ष शब्दांतही बदल केलेले आहेत. उदाहरणार्थ "सहानुभूती" - हा शब्द मूळ कवीने ठीक वापरलेला नव्हता, असे माझे मत आहे. दुसर्‍यासाठी झटणे म्हणजे सहानुभूतीच होय. त्यावर थुंकण्याची गोष्ट म्हणजे अंतर्गत विरोध आहे. म्हणून त्या ठिकाणी "कोरी कणव" योजले आहे. या आवृत्तीत "देश" ऐवजी "जग" म्हटले आहे. "देश" म्हणायला हरकत नाही.

इतिहासाला वर्तमानापेक्षा चांगले म्हणणारा भाग मी माझ्या मतानुसार बदललेला आहे. परंतु मूळ कवीला इतिहास वर्तमानापेक्षा उज्ज्वल वाटत असेल, तर त्यांनी आपल्या दृष्टीशी प्रामाणिक राहून मूळ ओळी ठेवणेच बरे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 7:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुडंबन आवडले.

पण 'समरांगणात मारिता मारिता' याचा संदर्भ आलेला नाही असं वाटतं. साधारण ज्याला युद्ध समजलं जातं त्याचं समर्थन कसं करायचं? आणि जर ते युद्ध अभिप्रेत नसेल तर मानसिक द्वंद्व किंवा इतर काही असेल तर मग ही ओळ अधांतरी वाटते.

जमेल तितके "फक्त लिंगनिरपेक्षतेसाठी बदल" करायचा प्रयत्न केला आहे. बाकी मूळ कवीच्या दृष्टीला कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. बिगर-लिंगनिरपेक्ष बदल केलेत त्याबाबत तळटिपेत सांगितलेच आहे. ते सर्व केले नाहीत तरी चालतील.

"युद्ध"/"लढा" वगैरे रूपक कुठल्याही चळवळीला वापरण्याची पद्धत आहे - "स्वातंत्र्यासाठी अहिंसक लढा". या रूपकाचा अर्थ रिवाजानुसार करता येईल. शिवाय अहिंसेबाबत मूळ कवितेचा निर्देशही नाही. मूळ सादरीकरणात राणी लक्ष्मीबाई आहे, आणि काही गणवेशधारी पुरुषही आहेत. रूपक म्हणा, खरी म्हणा, हिंसा ही लिंगनिरपेक्षही आहे. म्हणून या ठिकाणी बदल करता-करता मी आवरता घेतला.

(माझी स्वतःची कविता असती, तर रूपके, मथितार्थ, भावना, हे सर्वच माझ्या स्वभावानुसार असते :-) )

राजेश घासकडवी's picture

19 Aug 2011 - 11:07 pm | राजेश घासकडवी

या सुडंबनाची गरज कळली नाही. मला मूळ कवितेवरचे पुरुषधार्जिणी, स्त्रियांवर अन्यायकारक असले आरोप पटलेले नाही. कविता असा न्याय वा अन्याय करू शकतात का हा प्रश्नही विचारता येईल.

पुरुष आणि पौरुष या शब्दांना काही विशिष्ट अर्थ आहेत. भाषा आहे ही अशी आहे. ती बदलावी का? माझ्या मते मनोवृत्ती बदलणं महत्त्वाचं आहे, ते आधी झालं की भाषा आपोआपच बदलेल. वृत्ती बदलल्या नाही तर निगर म्हणून जो दुस्वास करता येतो तोच कलर्ड पर्सन किंवा आफ्रिकन अमेरिकन म्हणून करता येतो.

लिंगनिरपेक्ष वर्तणुक ठेवायची याचा अर्थ कलाकृतींमधले सर्व असल्या शब्दांना 'फिक्स' करून नपुंसक करणं का?

धनंजय's picture

20 Aug 2011 - 3:23 am | धनंजय

नाही. (शेवटच्या ओळीतील प्रश्नाला उत्तर.)

इतिहासातल्या कुठल्याच पुस्तकांना बदलायची गरज नाही. इतिहासातली पुस्तके आपण "*त्या काळी असे गैरसमज होते, त्या गैरसमजावर हे रूपक आधारित आहे" अशी तळटीप जोडून वाचतो. त्यामुळे एखाद्या दुष्ट चिक्कू माणसाकरिता "पक्का अमुक-तमुक जमातीचा आहे" अशा प्रकारचे रूपक तळटिपेसकट खपते. उदाहरणार्थ अशा एखाद्या रूपकाचा अर्थ "शेक्पियरच्या गैरसमजातील ज्यू माणसासारखा" असा होतो. नेहमीसारखा "मला माहीत असलेल्या ज्यू माणसासारखा" असा होत नाही. शेक्सपियरच्या गैरसमजातल्यासारखे सरसकट ज्यू लोक मला माहीत नाहीत. त्यामुळे "राजेश पक्के ज्यू आहेत" हे वाक्य "दुष्ट आणि चिक्कू आहेत" या पारंपरिक अर्थाने वापरण्यास माझ्याकरिता व माझ्या आजूबाजूच्या लोकांकरिता जागा नाही. ते पारंपरिक घिसेपिटे रूपक न वापरल्यामुळे माझी निर्मितिक्षमता मुळीच घटत नाही (**नपुंसक होत नाही). उलट गुळगुळीत आणि निरर्थक रूपके टाळल्याने माझ्या लेखनाची धार वाढते (**कडक होते).

(१) शेक्स्पियरचा शायलॉक तळटिपांसह मी चालवून घेतो. त्यात तळटीप देण्यावेगळी खाडाखोड करण्यास मी विरोध करतो. (२) ज्यू लोकांबाबत तोच समज पसरवणारे - तेच "पारंपरिक शब्दार्थ असलेले" - आधुनिक नाटक मी त्याच प्रकारे खपवून घेत नाही. (फक्त अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाबतीत समर्थन करतो. आशयाच्या, किंवा "आशयाच्यासाठी बिगरनपुंसकत्व अपेक्षित" म्हणून नाही. उलट रूपक म्हणून आशय हीन आहे, असे म्हणतो.)
वाक्य (१) आणि वाक्य (२) मध्ये काही परस्परविरोध आहे असे मानणे हा मानसिक गोंधळ आहे.

- - -

रूपके/उपमा कधी परिणामकारक असतात? दोन्ही अर्थ (म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, हाताशी असलेला विषय आणि दृष्टांत म्हणून दिलेले चित्र) हे दोन्ही जिवंत आणि चित्रदर्शी असले पाहिजेत. मुख्य म्हणजे दृष्टांत पटला म्हणून हातचा विषय पटला (किंवा सुंदर वाटला) पाहिजे.

पुरुष आणि पौरुष या शब्दांना काही विशिष्ट अर्थ आहेत.

येथे रूपकाचा ऐतिहासिक उपमा-उपमेय-अर्थ विसरला गेल्यामुळे तयार झालेला अर्थ हा "विशिष्ट अर्थ" आहे काय? मग तो गुळगुळीत/साधा अर्थ आहे, रूपक नाहीच आहे. त्याला साहित्यिक मूल्य असे काहीच नाही. (उदाहरणार्थ "तुंबडी", "कारटा" हे शब्द वापरलेली वाक्ये रूपके नव्हेतच. त्यांचे चित्रदर्शी अर्थ पुरते विसरले गेले आहेत. पुरुष आणि पौरुष यांचे चित्रदर्शी अर्थ विसरले गेले आहेत असे तुमचे म्हणणे नसावे.)

येथे बहुधा रूपकात्मक मूल्य सांगायचे आहे.

याबाबत दोन व्यक्तींना विशेषकरून सांगितले आहे : (अ) कवीने आणि (ब) त्याखाली रूपक न पटल्याचे लिहिणार्‍या प्रतिसादकाने. दोहोंचे मत "रूपक आहे" असल्यामुळे "रूपक नाहीच आहे" असे कोणी म्हटल्यास विक्षिप्त अल्पमत म्हणून आपण दुर्लक्षू शकतो.

- - -

**तुमच्या प्रतिसादात "नपुंसक" शब्द वापरलेला आहे. हा चित्रदर्शी आहे, की कुठल्यातरी ध्वनींची नवीन साखळी आहे? जर रूपकात्मक/चित्रदर्शी नसेल, तर याचा शब्दाचा अर्थ काय आहे, असे कुतूहल वाटते आहे.

"फिक्स" भोवतीच्या चिह्नामुळे ते रूपकच असावे. (रूपकातील उपमान काय - लिंगविच्छेदन की वृषणविच्छेदन ?)

या शब्दाचे दोन रूपकात्मक अर्थ ठाऊक आहेत "कडकपणा हवा तेव्हा मऊ" आणि "नवनिर्मिती करण्यास असमर्थ" : या दोहोंपैकी कुठलातरी एक अर्थ अपेक्षित आहे काय?

"पुरुष"ऐवजी "माणूस" शब्द मुळातच वापरला असता, तर वरील कवितेतला कडकपणा नको इतका मऊ झालेला असता, की त्यातील नवनिर्मिती असमर्थ झालेली असती?

राजेश घासकडवी's picture

20 Aug 2011 - 5:05 am | राजेश घासकडवी

त्या काळी असे गैरसमज होते, त्या गैरसमजावर हे रूपक आधारित आहे

हे ठीकच.

दोन्ही अर्थ...हे दोन्ही जिवंत आणि चित्रदर्शी असले पाहिजेत.

हेही बरोबरच.

पुरुष आणि पौरुष यांचे चित्रदर्शी अर्थ विसरले गेले आहेत असे तुमचे म्हणणे नसावे

हेही बरोबर. (चित्रदर्शी म्हणजे मी मर्दानगी, शौर्य, धार्ष्ट्य, शक्ती, ताठा, आक्रमकपणा वगैरे वगैरे अर्थ गृहित धरतो आहे. तेच विशिष्ट अर्थ मला अध्याहृत होते.) 'तसे अर्थ असणं पोलिटिकली करेक्ट नाही, तेव्हा तो शब्द वापरणं योग्य नाही.' अशा प्रवृत्तीला माझा आक्षेप आहे.

याबाबत दोन व्यक्तींना विशेषकरून सांगितले आहे : (अ) कवीने आणि (ब) त्याखाली रूपक न पटल्याचे लिहिणार्‍या प्रतिसादकाने. दोहोंचे मत "रूपक आहे" असल्यामुळे "रूपक नाहीच आहे" असे कोणी म्हटल्यास विक्षिप्त अल्पमत म्हणून आपण दुर्लक्षू शकतो.

हे काही कळलं नाही. कोणी कोणाला सांगितले?

रूपकाच्या अर्थाबद्दल का अकारण घोळ माजवला आहे? अर्थ सगळ्यांना माहीत आहे. तशा अर्थाने तो शब्द वापरला तर स्त्रियांवर काहीतरी करून अन्याय होतो हा युक्तिवाद मला पटलेला नाही.

नपुंसक हे नवनिर्मिती करण्यास असमर्थ या अर्थाने जास्त वापरला होता. म्हणजे वाचकाच्या मनात अर्थाविष्काराला जन्म द्यायला कमकुवत, पुरेसा नाही असा. पुरुष या शब्दात जी धार आहे ती माणूसमध्ये नाही. फिक्स वर दुरुस्ती/खच्चीकरण श्लेष केला होता म्हणून तो अवतरणात आहे.

माझ्या नसबंदी कवितेतली पहिली ओळ मी

माणुसकीचा ताठा मिरवित गुर्मित धुमसत धुंद जवानी

अशी वाचून बघितली. तिथे मर्द हा शब्द जसा आवश्यक आहे, तसाच वरील कवितेतही आवश्यक आहे.

"पोलिटिकली करेक्ट" म्हणजे काय?

हा शब्दप्रयोग पुष्कळदा ऐकला आहे. पण त्याचा अर्थ समजलेला नाही. साधारणपणे "अमुकतमुक लोक खरे तर माजले आहेत, पण पोलिटिकल करेक्टनेसमुळे त्यांची टीका करणार्‍यांची मुस्कटदाबी होते आहे" अशा संदर्भात ऐकला आहे. अर्थात त्या ठिकाणी "माजलेल्या लोकांबाबत भीती पसरल्यामुळे" असा अर्थ कळून येतो. नाहीतर कोण कधी कशाची मुस्कटदाबी करण्यास समर्थ आहे?

तुम्हाला "पुरुषा"च्या चित्रामधून "शौर्य" गुण कळून येत असेल, आणि ते प्रामाणिक असेल, तर तुम्हाला कोण थांबवू शकते? वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणालच "ते चित्र तसे सगळ्यांनाच दिसले पाहिजे, अपमान तरी वाटायलाच नको." आणि त्याच्या विरोधातले लोक प्रामाणिकपणे म्हणतील "अपमान वाटतोच". "तुम्हाला अपमान वाटतो, त्याकडे मी दुर्लक्ष करतो" असे म्हणायचे पूर्ण स्वातंत्र्य तुमच्यापाशी आहे. मुस्कटदाबी कुठे आली आहे?

"पोलिटिकल करेक्ट"ची रड करणार्‍यांची खरी रड असते, की अपमानित लोक मग "अपमान नव्हताच मुळी" म्हणणार्‍यांचा सत्यवक्ते मानत नाहीत. त्यांचा उलट अपमान करतात. "पोलिटिकल करेक्ट"बद्दल आरडा म्हणजे "मी तुमचा करतो तो अपमान नाही, आणि तुम्ही माझा करता तो मात्र अपमान" ही कोती वल्गना असते.

प्रामाणिक टीका करणार्‍यांना कोणी आपली प्रामाणिक टीका करत असेल अशी रोखठोक देवाणघेवाण करता येते.

'तसे अर्थ असणं पोलिटिकली करेक्ट नाही, तेव्हा तो शब्द वापरणं योग्य नाही.' अशा प्रवृत्तीला माझा आक्षेप आहे.

म्हणून हे वाक्य मला समजलेले नाही. त्यामुळे हा आरोप मला लागू आहे की नाही, हे मी सांगू शकत नाही.

- - -

चित्रदर्शी म्हणजे मी मर्दानगी, शौर्य, धार्ष्ट्य, शक्ती, ताठा, आक्रमकपणा वगैरे वगैरे अर्थ गृहित धरतो आहे. तेच विशिष्ट अर्थ मला अध्याहृत होते.

या यादीत उपमान-शब्द कुठले आहेत आणि उपमेय-शब्द कुठले आहेत?
यात "मर्दानगी" (आणि कवितेतला "पुरुष") उपमान आहे काय? यात चित्रदर्शिता बाब शिश्नवृषण असण्याच्या स्थितीशी संबंधित आहे. अथवा जुन्या काळात ज्या व्यवसायांत स्त्रियांना शिश्नवृषण नसल्याचे बाळपणी दिसल्यामुळे मज्जाव होता, त्या व्यवसायांतील कर्तृत्वाला जुन्या काळात मर्दानगी म्हणत -> पुन्हा थेट शिश्नवृषणाचे निरीक्षण करण्याच्या सामाजिक रूढीशीच संबंधित. शिश्नवृषण नसलेल्यांना जे व्यवसाय उपलब्ध होते, त्यातील अचाट कर्तृत्वाला पूर्वी कधीही "मर्दानगी" म्हटल्याचे मी ऐकलेले नाही. "सुइणीने शेकडो बाळंतपणे करून मर्दानगी दाखवली??? मीराबाईने छळ सोसून गीतरचनांची मर्दानगी गाजवली??? पद्मिनीने विटंबना टाळण्यासाठी मर्दपणे आत्महत्या केली???" म्हणजे शारिरिक निरीक्षण केल्याशिवाय मर्दानगीचे व्यवसायही ठरवता येत नाहीत, त्यामुळे शिश्नवृषणाच्या चित्राशिवाय हा पारंपरिक अर्थ नाहीच.
उपमेये ही काय? "शौर्य, धार्ष्ट्य, शक्ती, ताठा, आक्रमकपणा" यांच्यात शिश्नवृषणवगैरे असण्याचे कुठलेच चित्र नाही. म्हणजे शिश्न-वृषण नसलेल्या/असलेल्या लोकांत हे गुण कमीअधिक प्रमाणात दिसतात. पारंपरिक व्यवसायातल्या स्त्रियांबाबत ही वर्णने येतात. "सुइणीने न थकता शेकडो बाळंतपणे करून अचाट शक्ती दाखवली. मीराबाई धार्ष्ट्याने छळवादी नवर्‍याला सामोरी गेली" वगैरे. "मर्दानगी"सह हे सर्व शब्द एका यादीत दिल्यामुळे माझा घोटाळा होतो आहे.

कोणी कोणाला सांगितले?

पहिल्या प्रतिसादात म्हटले आहे :

हे सर्व गुण बायकांमधे नसतातच का?

या प्रतिसादावरून असे दिसते की "पुरुष" या चित्रदर्शी रूपकात "स्त्रीपेक्षा भिन्न पुरुष" हे चित्र समजून आलेले आहे.

हि कविता मानसिक पुरुषत्वावर आहे. आणि ते कित्येक स्त्रीयांमधेही असते.

म्हणजे कवी "पुरुष आणि स्त्रिया" ही नैसर्गिक शब्द-जोडी असल्याचे मानतात. "मानसिक पुरुषत्व" म्हणजे काय? "पुरुष" असल्याची काही शारिरिक चिन्हे असतात, आणि काही मानसिक चिन्हे असतात. पैकी मानसिक चिन्हांचा संच म्हणजे मानसिक पुरुषत्व. (आता ही मानसिक चिन्हे कोणती, हे मला माहीत नाही. पण कवीला कुठलीतरी चिन्हे ठाऊक आहेत, असा अंदाज करता येतो.)
कवी म्हणतात :

शारिरीक पुरुषत्व असुनही मानसिक शंढत्व
असलेल्या पुरुषांच्या या काळ्या ढगात,

म्हणजे काळा ढग नसलेल्या सामान्य/ऐतिहासिक परिस्थितीत शारिरिक पुरुषत्व आणि मानसिक बिगरषंड पुरुषत्व एकत्र सापडेल असे कवीला अपेक्षित आहे. जर कवीची अशी अपेक्षाच नव्हती तर या ओळींचे प्रयोजन काय आहे?

मानसिक पौरुष "कित्येक स्त्रियां"मध्ये सापडतात, असे कवी म्हणतात. "मानसिक पुरुषत्व" हे स्त्रियांमध्ये सापडणे अनपेक्षित आहे, तरी कधीकधी सापडते, अशा अर्थानेच वरचे वाक्य अर्थपूर्ण आहे. वर्तमानकाळाचा आणि "कित्येक स्त्रियांचा" अपवाद सोडल्यास शारिरिक-मानसिक पुरुष हे बहुधा एका देहात-मनातच सापडावेत असे कवीचे चित्र आहे.

रूपकाच्या अर्थाबद्दल का अकारण घोळ माजवला आहे? अर्थ सगळ्यांना माहीत आहे. तशा अर्थाने तो शब्द वापरला तर स्त्रियांवर काहीतरी करून अन्याय होतो हा युक्तिवाद मला पटलेला नाही.

"अकारण" घोळ माजवला आहे, हा तुमचा फाजिल आरोप आहे. त्यास "अकारण नाही" इतके म्हणून नकारता येते. "सगळ्यांना" ठाऊक असलेला अर्थ मला माहीत नाही. "सगळ्यां"पैकी एक तर मी नाही, आणि माझे मत दुर्लक्षण्याइतके अल्पसंख्य आहे हे तुम्ही दाखवलेले नाही.

रूपकामध्ये उपमान काय आणि उपमेय काय हे तुम्ही स्पष्टपणे सांगितलेले नाही. शारिरिक चिन्हांनी कळून येणारा पुरुष हे उपमान आहे, आणि शौर्य हे उपमेय आहे, असे मी म्हणतो, आणि ही उपमा जुनाट/बोथट आहे, असेही मी म्हणतो. माझे विश्लेषण सुस्पष्ट आहे. घोटाळा काय आहे? "सगळ्यां"च्या मते हीच उपमान-उपमेय जोडी आहे, पण ती माझ्या मताच्या विरुद्ध आधुनिक/धारदार आहे : असे म्हणायचे आहे का? धारदार की बोथट, याबाबत तुमचा शब्द माझ्या शब्दाच्या फिट्टंफाट आहे. पण शारिरिक पुरुषत्व आणि शौर्य यांचा संबंध आधुनिक रसिकाला दिसणार तर नाहीच ना! याबाबत तुम्ही "सगळ्यांनी" काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. काही संबंध नसलेल्या उपमानाची धार काय कामाची?

- - -

मी एका प्रसिद्ध ऐतिहासिक वचनाचा असा अर्थ लावला. ह्यू रोझ म्हणाला की "बंडवाल्यांपैकी एकमेव पुरुष म्हणजे लक्ष्मीबाई होय."
मी लावलेला अर्थ असा होता :
ह्यू रोझ ज्या समाजात वाढला होता, त्या समाजात युद्धप्रसंगी कर्तृत्ववान असे फक्त पुरुष त्याने बघितलेले होते. त्याने बघितलेल्या सर्व बायका युद्धापासून दूर राहात असत, शिवाय भित्रट असत. त्यामुळे पुरुष<-> शूरपणे युद्ध करणारे; बायका<->युद्धापासून दूर राहाणार्‍या भित्रट हा अवश्यसंबंध त्याच्या मनात होता. हाच अवश्यसंबंध त्याचे पत्र वाचणार्‍या व्यक्तीच्या मनातही आहेत, असे मानण्यास त्याच्या समाजात वावरापासून त्याला अपेक्षा होती. स्त्रियांमध्ये शौर्य दिसणे हे इतके अनपेक्षित होते, की ते बघता लक्ष्मी स्त्री नसून पुरुष होती असा भास झाला (काव्यात्मक भास). बंडवाले बाकी लोक पुरुष नसून स्त्रिया असल्याचा काव्यात्मक भास ह्यू रोझला झाला.
हा भास होण्यासाठी त्याच्या मनात तिरप्या ठशातला अवश्यसंबंध गृहीतक म्हणून लागतो. नाहीतर तो भास होण्याचा प्रसंग उद्भवतच नाही.

मला "ह्यू रोझला तो काव्यात्मक भास झाला" इतकेच विश्लेषणाने कळते. मला स्वतःला तो काव्यात्मक भास आजवर कर्तबगार स्त्रियांना बघून कधीच झालेला नाही.

- - -

तुम्हाला एक प्रयोग सुचवतो. तुमच्या ओळखीच्या आणि आप्त अशा काही कर्तबगार स्त्रिया असतील : त्यांना म्हणून बघा "तुझे कर्तृत्व मोठे आहे, शारिरिक स्त्रीत्व असले तरी तुझे मानसिक पौरुष आहे."
कृपया खरोखर प्रयोग करावा. नुसता मानसिक प्रयोग तुम्ही केलेलाच आहे, आणि "स्त्रियांचा अपमान झालेला नाही, होऊही नये" अशा निष्कर्षापाशी आधीच पोचलेला आहात. काही स्त्रियांनी दिलेले वरील प्रतिसाद बघता तुमचा मानसिक प्रयोग पुरेसा नाही, ही जाणीव व्हावी.

पुरुष या शब्दात जी धार आहे ती माणूसमध्ये नाही.

याबाबत तुम्ही प्रामाणिकपणे आपली स्वतःची मनःस्थिती सांगत आहात, याची मला खात्री वाटते. त्याबाबत माझे स्पष्टीकरण असे : तुम्ही म्हणता ती धार फक्त पुरुषांनाच जाणवते. तमिळ-मराठी मिश्र समूहाला "अरे भाषेने नव्हे तर वृत्तीने तमिळ वाघ व्हा" म्हटले तर धार त्यातील तमिळ लोकांनाच जाणवेल. जे तमिळ असतील त्यांच्या आत्मप्रौढीला फुंकर मिळते, आणि तेवढ्यावरून मराठी माणसाला तितकीच धार वाटली पाहिजे असा त्यांचा भ्रम होतो, इतकेच.