मयत (२) --- करीअर गायडंस वर्ग

आंबोळी's picture
आंबोळी in जनातलं, मनातलं
26 May 2008 - 12:04 pm

हल्ली एखादा प्रकार हीट झाला की लगेच त्याच्या आवृत्त्या काढायची फ्याशन येते. एखादा पिक्चर हीट झाला की लगेच त्या थीमच्या 3-4 आवृत्या निघतात. हा प्रकार इथे मिसळपाववर नवीन नाही. एक खायाली पुलाव फेमस झाल्यावर लगेच तो प्रकार 5-6 जणानी वापरला. एक रेखाटन प्रसिध्ध झाल्याझाल्या लोकानी लगीच आपापली बरीच वर्ष कपाटात असलेली, घड्या, डाग पडलेली रेखाटने काढून मिपावर डकवली. सांगायचा उद्देश एवढाच की एखाद्या प्रकाराला प्रसिध्धी मिळती आहे म्हणल्यावर वाहत्या गंगेत बरेच जण हात धुवून घेताना दिसतात. भडकमकरांचे गायडंस वर्ग तुफान चालतायत बघून आम्हीही या गंगेत हात धुवायचे ठरवले.

तर मित्रानो आम्ही मयत इव्हेंट म्यानेज करून आपली प्रसिध्धी कशी वाढवायची हे शिकवणारे गायडंस वर्ग काढले आहेत.

पण आमच्या व भडकमकरांच्या वर्गामधे मूलभूत फरक आहे.त्यांचे वर्ग हे प्रसिध्ध होउन पैसे कसे मिळवायचे या बद्दल आहेत तर आमचे फक्त प्रसिध्धीमुळे येणारे आत्मिक सुख व समाधान देणारे आहेत. त्यांचे वर्ग हे पदवी किंवा पदव्योत्तर वर्गाचे आहेत. आमचे वर्ग हे शाळा लेव्हलचे फार तर पदविका लेव्हलचे म्हणता येतील. किंवा भडकमकरांच्या इव्हेंट म्यानेजमेंट्च्या मुलाना पैसे खर्च न करता प्रात्यक्षिके करण्याचे वर्ग आहेत असे म्हणले तरी चालण्यासारखे आहे.
हा वर्ग भडकमकरांच्या विद्यार्थ्यानी पहिली पायरी म्हणून करायला हरकत नाही. तसेच ज्यांची पैसे खर्च करायची इच्छा नाही पण एखादा इव्हेंट म्यानेज केल्याचे समाधान हवे असेल आणि फुकटात प्रसिध्धी हवी असेल त्यानी आमच्या ह्या वर्गात अवश्य प्रवेश घ्यावा.
काळजी नसावी. शेवटी “येन केन प्रकारेण प्रसिध्धी पुरुषो भवेत” हे आमच्या वर्गाचे ब्रीद वाक्य आहे. आपण फक्त आम्ही सांगितलेल्या खालील सूचना पाळाव्यात . आपणास प्रसिध्ध होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

१)सर्वात प्रथम ही गोष्ट ध्यानात ठेवा की मयत हा शाश्वत, चिरंतन , अधून मधून सतत , पण अकस्मात होणारा असा एक अनम्यानेज्ड इव्हेंट आहे. येथे टायमिंगला अतिशय महत्व आहे. दुसर्‍याकोणी याची सूत्रे हाती घायच्या आधी आपण ती हातात घेणे अत्यंत महत्वाचे असते. सुत्रे हाती कशी घ्यायची त्याच्या सुचना खाली दिल्या आहेतच.

२)नात्यातल्या, ओळखीच्या, आसपासच्या घरात कोणी मयत झाले असे कळाले की त्वरीत तेथे पोहोचावे. थोडाजरी उशीर केलात तर आमच्या वर्गातला दुसरा कोणी विद्यार्थी तेथे पोहोचण्याची व सुत्रे हाती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ अजिबात वाया घालवू नका.

३) तेथे त्या घरातला क्रमांक 2 चा माणुस गाठावा.

आता हा क्रमांक 2 चा माणुस कोण? तर मयताच्या मुलाबाळानंतर ज्याचा वट त्या घरात आहे असा पुरुष. क्रमांक 2 चा माणुस शोधणे सोपे असते. मयताच्या घरचा सेट-अप साधारण असा आसतो : बाहेरच्या हॉल मधे प्रेत ठेवलेले असते. त्याच्या भोवती अर्ध वर्तुळाकारात लोक बसलेले असतात. पहिले वर्तुळ हे अत्यंत जवळचे लोक (क्रमांक १ चे लोक). म्हंजे मुल, मुली , सुना नातवंडे वगैरे. त्यानंतरच्या वर्तुळात भाऊ, बहीणी, भावाजया हे नातेवाईक. त्यानंतरच्या वर्तुळात ओळखीच्या वा आसपासच्या घरातील बायका बसलेल्या असतात. ही सर्व मंडळी आपल्या दृष्टीने बीनकामाची आहेत हे पक्के लक्षात ठेवा. आपल टार्गेट आहे जे लोक बाजूला किंवा बाहेर अंगणात दबक्या आवाजात चर्चा करत उभे असतात ते लोक. या मधे जावई, म्हेवणे , ओळखीचे वा आसपासचे लोक जास्त करून असतात असा आमचा अनुभव आहे. विशेषत: म्हेवणे किंवा जावई. सर्व लोक दबक्या आवाजात बोलत असताना जो मोठ्या आवाजात आपल्या बायकोला सूचना देतो किंवा रडणार्‍या मुलाचे सांत्वन करतो तो क्रमांक 2 चा माणुस ओळखावा. हा साधारण मयताचा म्हेवणा किंवा जावई असतो . क्रमांक 2 चा माणुस जर त्याच गावातला नसेल तर आपले काम खूपच सोपे होते. म्हणजे आमच्या गावात शनिवारी/गुरवारी मर्तिक नेत नाहीत. भटजी मिळत नाहीत वगैरे वाक्ये टाकून त्याच्या समोर आपले वजन वाढवता येते.

४)या क्रमांक 2 च्या माणसाला गाठुन थोडेसे बाजूला घ्यावे वा सरळ “ सगळे आले का? आजुन कोण यायच राहिलय?” हे विचारून घ्यावे. कोणी येणार असेल तर कुठून येतायत कधी पर्यंत पोहोचतील हा तपशील विचारून घ्यावा."जास्त थांबता येणार नाही , परत अमावस्या/शनिवार सुरु होत आहे" वगैरे वाक्ये नीट तपशील माहित असेल तर टाकावीत. पुढच्या तयारीला कोणी लागले आहे काय हे ही चाचपडून पहावे. एक लक्षात ठेवा की इथे ओळखीचा प्रश्न येत नाही. ओळख नाही म्हणून तुम्ही बुजलात तर तुम्ही आयुष्यात कुठेच यशस्वी होऊ शकणार नाही.
ही मिळालेली माहिती बाहेरच्या कोंडाळ्यात घराचाच माणुस आसल्याच्या थाटात सांगावी. “विजु यायची आहे आजुन. पुण्यावरुन निघालीय… एक दोन तासात पोहोचेल. तिच्यासाठी थांबावेच लागेल. फार जीव होता हो तिच्यावर. नाहीतर नंतर कावळा शिवायला अडचण यायची.” यावरुन बाहेरच्याना तुम्ही घरातले वाटता. आणि घरच्याना तुम्हाला एकंदर फारच कळकळ आहे असे वाटते. दोघांचेही असे गैरसमज झाले की आपले पुढचे काम सोपे होउन जाते. या क्रमांक २ वर घरातील जबाबदारी सोपवावी. म्हंजे मृताची अंघोळ, तोंडात सोन्याचा तुकडा, रडणार्यांचे सांत्वन अशा जबाबदार्‍यात त्याला अडकवला की बाहेरचे रान आपल्यासाठी मोकळे रहाते. नाहीतर बाहेरची कामे हा हातात घेतो व तुमच्या प्रसिध्ध होण्याच्या मार्गातील धोंड बनुन जातो.

५)मयताच्या शेजारी राहाणारा आणि मयताच्या कुटुंबाशी चांगले संबन्ध असणारा माणुस शोधावा.
या सर्व प्रकारात एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे आपण स्वतः कुठलेही काम करायचे नसते. सगळी कामे नीट दुसर्‍याकडून करुन घ्यायची असतात. कामे करण्यासाठी असा शेजारी उत्तम.हा शेजारी शोधणे हे कामही फार सोपे असते. तिथे भेटायला आलेल्या प्रत्तेक नवीन माणसाला हा शेजारी ”अहो कालच संध्याकाळी भेटले होते. तब्बेत अगदी उत्तम होती. आमच्या मुलाला 10वीत चांगले मार्क पडले (हल्ली लोकाना आपल्या मुलांचे कुठे कौतुक करावे याचेही भान नसते) म्हणून कौतुक करत होते. आणि आज हे असे झाले.” किंवा “अहो सकाळीच भेटले होते. दुपारी असे काही होईल असे वाटले सुध्धा नाही” वगैरे तीच तीच माहिती न दमता सांगत असतो. या शेजार्‍याला पकडून त्याला लाकडे स्मशानात पोचवण्यासाठी व मडके , बांबू वगैरे सामान आणण्यास पिटाळावे. गाडी चालवू शकेल असे एखादे कॉलेजमधे जाणारे पोरगे त्याच्या गाडी सकट “यांच्या बरोबर जा … जरा बघ हे सामान कुठे मिळते … ह्या गोष्टी पण आल्या पाहिजेत” असे म्हणून त्या शेजार्‍याला जोडुन द्यावे. वर त्या शेजार्‍याला "तुम्ही तेवढ बघा हं हे. काय आहे... कुणी तरी जबाबदार व्यक्तीने केले की बरे आसते.... नही तर नंतर खोळंबा होउन फजिती व्हायची...." असे हरबर्‍याच्या झाडावर चढवावे. फुकटची गाडी व जबाबदारीचे काम मिळाल्याने तो शेजारीही खुश. शिवाय असल्या प्रकारात शक्यतो कुणाची नाही म्हणण्याची टाप नसते. त्यामुळे इथे फार स्कील वापरावे लागत नाही.
अशी सगळी कामे लोकाना वाटून देउन आपण उगचच अधुन मधून आतबाहेर करावे. मधेच रडणार्‍या मुलाच्या शेजारी बसुन त्याच्या खांद्यावर थापटून "अहो सदानंदराव देवाच्या इच्छे पुढे कुणाचे काय चालणार? शोक आवरा....अहो तुम्हीच अस केलत तर आम्ही कुणाकडे बघायचे" वगैरे वाक्ये टाकून आसपासच्या लोकांच्यावर छाप पाडावी.

६)तिरडी बांधताना त्यावर जातीने लक्ष देणे.
दोन मुख्य बांबूमधील अंतर, त्यावर आडव्या बांधल्याजाणार्‍या बांबुची लांबी, बांधताना दिला जाणारा काथ्याचा तिढा याविषयी सुचना या दिल्याच गेल्या पाहिजेत. त्या दिल्याशिवाय तुमची या विषयातील मास्टरी लोकाना कळत नाही. या सुचना देताना "याचे ही एक शास्त्र आहे" असे वाक्य टाकावे. जगात कुणालाही तिरडी बांधायच्या शास्त्राविषयी माहिती नसते. शिवाय कोणी असल्या प्रसंगात "सांगा बघू काय शास्त्र आहे ते?" किंवा "दाखवा बघु ,कुठे असे लिहिलय की तिरडी कशी बांधावी ते?" अशी आव्हाने देत नाही. त्यामुळे वरील वाक्य बिनदिक्कत टाकावे. ऊलट लोक आपणास यातला तज्ञ समजू लागतात. तिरडी कुठल्या दिशेला ठेवावी, प्रेताचे डोके कुठल्या दिशेला ठेवायचे या विषयी लोकांचा खूप गोंधळ असतो. लोक हमखास चुकतात. अश्या वेळी मात्र पटकन पुढे जाउन तिरडीची दक्षिणोत्तर पोझिशन ठिक करावी. शिवाय 'अजुन ५ मिनिट तिरडी अशीच ठेवली आसती तर तो मुडदा उठुन चालायला लागला असता.काय राव तुमची अक्कल...' असे भाव चेहर्‍यावर आणुन चुकीची तिरडी ठेवणार्‍याकडे पहावे. खल्लास. तुमच्याबद्दल तिथल्या लोकांच्या मनात अतीव आदराशिवाय काहीही नसेल.

हाच प्रकार अंत्ययात्रेच्या वेळी करावा. हल्ली जवळजवळ सगळीकडे रुग्णवाहीकेतूनच प्रेत स्मशानात नेतात. त्यामुळे विसावा, खांदेपालट या गोष्टी विसरल्या जातात. शिवाय स्मशानाच्या दारापासून चवथर्‍या पर्यंत ५-१० पावलेच अंत्ययात्रा निघते. त्यात कसले आलय विसावा आणि खांदे पालट? पण नाही. त्या १० पावलातसुध्धा पाचव्या पावलावर लवकुशाच्या अभिनिवेशात ती यात्रा अडवायची, आणि २ मिनिट विसावा घायला लावून खांदेपालट करायला लावायचा. वर "शास्त्र आहे" असे ठणकाऊन सांगायचे. कोणीही तुम्हाला विरोध करायच्या भानगडीत पडत नाही. उलट तुम्ही किती कळकळीने व शास्त्रशुध्धपध्धतीने हे सर्व करत आहात याबद्दल तुमचाबद्दलचा आदर द्विगुणितच होतो.

७)श्रध्धांजली
अत्यंत महत्वाची व प्रसिध्ध होण्यासाठी अत्तापर्यंत केलेल्या धड्पडीवर कळस चढवायची सुवर्ण संधी. प्रेताला अग्नी देणारा अग्नी देउन खाली येउन बसतो आणि चिता धडाडून पेटते तो क्षण टिपायचा. उठून उभे रहायचे आणि "जरा सगळे जण इकडे या" असे म्हणून स्मशानात विखुरलेल्या लोकाना एकत्र करुन अंत्ययात्रेचे छोट्याश्या सभेत आणि खांदेकर्‍यांचे श्रोत्यात रुपांतर करायचे. आणि मग एक १५-२० मिनिट श्रध्धांजलीच्या नावाखाली एक छानसे भाषण ठोकायचे.(येथे श्रोत्यामधुन "थांबा","बास करा" असे शेरे येत नाहीत. त्यामुळे तुमच्या भाषणाचा कंड हवा तितका वेळ जिरवू शकता. शिवाय कुठलाही श्रोता सभा सोडून जायचे धाडस करत नाही.) यात मयत व्यक्तीचा परिचय कधी झाला इथुन सुरवात करुन त्यांचे व माझे संबंध कसे जिव्हाळ्याचे होते, त्यांच्या मनात माझ्याबद्दल कशी आपुलकी, प्रेम, आदर होता हे सांगण्यासाठी फक्त दोघांमधील प्रसंग सांगावयाचे. ते प्रसंग खोटे आहेत म्हणायची उपस्थीतांना हिम्मत होत नाही, शिवाय तो वर गेलेला मनुष्यही खाली येणार नसतो. त्यामुळे असले प्रसंग बिनधास्त रचुन सांगावेत. फार तर आगोदरच मेलेली एखादी प्रतिष्ठीत व्यक्तीपण तेंव्हा उपस्थीत होती असे ठोकून द्यावे. फक्त स्थळ काळ वेळ सांगू नये. "मागे एकदा.." येवढाच मोघम उल्लेख करावा.या भाषणात टाळया, हश्या घेणारी वाक्ये घालायची नसतात.शिवाय चेहर्‍यावरचे भावही विशिष्ठ ठेवावे लागतात. पण ती तयारी आम्ही आमच्या वर्गा मधे करुन घेउच. म्हंजे सांगायचे प्रसंग,चेहर्‍यावरचे भाव घोकून आणि घोटून घेउ. नन्तर फक्त मेलेला माणुस बदलायचा प्रसंग साधारण तेच ठेवायचे.भाषणाची तयारी मात्र तुम्हाला आधी पासुनच करावी लागेल कारण प्रसंग सांगून येत नाही.

तर मित्रानो एकदा तुम्ही आमच्या टिप्स लक्षात ठेवून त्याप्रमाणे मार्गक्रमणा केलीत तर तुम्ही गावातील एक अत्यंत प्रतिष्ठीत व्यक्ती बनून जाल. तेही खिशातले ५ पैसे खर्च न करता. तेंव्हा ताबडतोब आम्हाला खरड टाकुन तुमचा प्रवेश या वर्गासाठी आरक्षीत करा.
प्रसिध्धी तुमचीच आहे.

शिक्षणसल्ला

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

26 May 2008 - 12:20 pm | विजुभाऊ

'अजुन ५ मिनिट तिरडी अशीच ठेवली आसती तर तो मुडदा उठुन चालायला लागला असता........... :))
तुमचा कन्दील काय कामाचा मग.कंदीलातली पावर कमी झालीकी काय?
अरे हो लोकांच्या सोयीसाठी खास अरण्यारुदन करणार्‍या लोकांचे खास पथक तयार केले जात आहे जालावर इतरत्र लिहिणार्‍या समिक्षकांच्या गायडन्स खाली. ते नसतील तर त्यांचे रे़कॉर्डेड ध्वनीफीती उपलब्ध आहेत.
बाकी तुमचा अनिभव दांडगा दिसतो हो.....अनुभवी लोक असले की सगळे कसे यथासांग होते
अवांतर : तुमच्या कंदीलाच्या दुकानाशेजारच्या इनोबाच्या मयताच्या सामानाच्या दुकानाशेजारच्या धमु च्या भजन मंडळाशेजारी मी " येथे कावळे भाड्याने मिळतील " अशी पाटी लावतोय. जरा प्रचार करा हो.
"तीन कावळे बूक करणारास एक कोलम तांदळाचा पिंड फ्री " अशी स्कीम पण राबतोय

प्रभाकर पेठकर's picture

26 May 2008 - 2:53 pm | प्रभाकर पेठकर

बराच अभ्यास दिसतोय ह्या विषयातला. चांगले निरिक्षण आहे. पण अशा 'अतिउत्साही' माणसाला हेरून कामाला लावणारे महाभागही असतात. 'तुम्ही स्वतः काम न करता इतरांकडून कामे करून घ्यावीत' असा आपला सल्ला असला तरी इतरांची कोंडी करण्याच्या पद्धतीने तुमचीही कोंडी होऊ शकते. एखादा माणूस तुम्हालाच 'बळीचा बकरा' बनवतो. तुम्हाला ही एखादे काम 'नाही' म्हणणे शक्य नसते. असो.

आमच्या गावात असे एक प्रसिद्ध (ह्या कामासाठी) गृहस्थ होते. मैलोंनमैल दूरून गिधाडांना मुडद्याचा वास येतो तसे त्यांना गावात कोणाचा मृत्यू झाला की बातमी लागायची. लगेच स्वखर्चाने पावशेर 'देशी' मारून ते घटना स्थळी हजर व्हायचे. त्यांच्या आधी कोणी पोहोचून तिरडी बांधायला घेतली असेल तर, 'चला, चला, बाजूला व्हा. तुम्हाला काय येणार तिरडी बांधायला' असे म्हणून तिरडी 'ताब्यात' घ्यायचे. लग्न कार्यात भडजी जसे मुहूर्त जवळ आला की 'कन्येला घेऊन या' असे म्हणतात त्या प्रमाणे तिरडी बांधून झाली की 'प्रेत घेऊन या' असे फर्मवायचे. नातेवाईक प्रेत तिरडीवर ठेवू लागले की, 'थांबा. गाठी सोडल्या का?' असा मौलीक प्रश्न करायचे. श्रोत्यांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह दिसले की 'अरे! प्रेताच्या लेंघ्याच्या नाड्या सोडा. वस्त्राला कुठे गाठी असतील तर त्या सोडा. सगळ्यातून मुक्त करा त्याला' असा उपदेश करायचे. मधे मधे मोठ्या मुलाला सांत्वनपर बोलताना 'मी करतो सगळं, तू काही काळजी करू नकोस' असे सांगायचे. त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ओळखिच्या अनोळखी माणसास ' काय आहे, ही आपली माणसं आहेत. आम्ही गावातले जुने. एकमेकांच्या उपयोगी पडले पाहिजे. त्यामुळे मी काही जास्त चार्ज घेत नाही. '(म्हणजे 'मी चार्ज घेतो' हे सांगून टाकायचे).असे करत थेट स्मशानभूमी पर्यंत 'साथ' द्यायला पुढे. स्मशानात, ह्या पुर्वी येऊन इथे आणलेल्या प्रेतांच्या कथा मिठमसाला लावून उपस्थितांना ऐकवायच्या. कोणाची भूते झाली, कोणाला मुक्ती मिळाली वगैरे उपकथानके जोडायची. 'कवटी फुटल्याशिवाय कोणी घरी जाऊ नका' असा खणखणीत दम मृताच्या मोठ्या मुलादेखत सर्वांना द्यायचा, असा त्यांचा खाक्या. सर्व उरकल्यावर कोणी निकटचा नातेवाईक त्यांना त्याची फी विचारतो. त्यावर लाचार हसून 'द्या तुमच्या मर्जीनुसार' असे म्हणून लगेच त्याच्या पुढेच 'तुमच्याच गल्लीतल्या कुळकर्ण्यांनी त्यांचे आजोबा गेले तेव्हा ३०० दिले होते' अशी पुस्ती जोडून रक्कम सुचविण्याचे कामही ते करतात. पण ५०रु. पासून जे मिळेल ते स्विकारण्याचा व्यावसायिक लवचिकपणा त्यांच्यात आहे.
संध्याकाळी ते 'फुल्ल' असतात.

अनिल हटेला's picture

26 May 2008 - 3:54 pm | अनिल हटेला

च्या मायला !!!

ऐकाव ते नवलच !!!!!!!

ऋचा's picture

26 May 2008 - 4:53 pm | ऋचा

'अजुन ५ मिनिट तिरडी अशीच ठेवली आसती तर तो मुडदा उठुन चालायला लागला असता.काय राव तुमची अक्कल...'

लै भारी राव!!!!

मन's picture

27 May 2008 - 2:47 am | मन

लिवलत की राव याही येळेला.

आपलाच,
मनोबा

मन's picture

27 May 2008 - 2:48 am | मन

लिवलत की राव याही येळेला.

आपलाच,
मनोबा

धमाल मुलगा's picture

27 May 2008 - 3:42 pm | धमाल मुलगा

च्यामारी...
आम्बोळ्या, तू आता 'मृत्यू' हा विषय घेऊन पी.एच.डी. करच.

बाकी पेठकरकाकांशी सहमत...
तेव्हढं क्लासमध्ये शिकवून घ्या बुवा...समोरच्यानं आपल्या गळ्यात तंगडी अडकवली तर त्याला कसा उलटा करायचा ते :)

अवांतर : तुमच्या कंदीलाच्या दुकानाशेजारच्या इनोबाच्या मयताच्या सामानाच्या दुकानाशेजारच्या धमु च्या भजन मंडळाशेजारी मी " येथे कावळे भाड्याने मिळतील " अशी पाटी लावतोय. जरा प्रचार करा हो.
"तीन कावळे बूक करणारास एक कोलम तांदळाचा पिंड फ्री " अशी स्कीम पण राबतोय

विजुभाऊ, वेलकम टू पार्टनरशीप :)

येऊद्या अजुनही...

स्वगतः त्या नचिकेतापेक्षा ह्या आम्बोळ्यालाच मृत्यू जास्त चांगला समजलेला दिसतोय. :?