डॉ. करणिकांचं फिजीओलॉजीचं शेवटचं लेकचर संपलं.
सेकंड एम बी बी एस च्या वर्गातून पांढरा शुभ्र एप्रन घातलेली भावी डॉक्टर मंडळी भराभर बाहेर पडली. अविनाशसुद्धा घाई करत वाचनालयाच्या दिशेने निघाला. आज काहीही करून ग्रे चं anatomy चं पुस्तक मिळायला हवं याच विचारात तो चालला होता. तो जिना चढून दुस~या मजल्यावर आला. त्याच्या मागोमाग मोठ्याने चपलांचा आवाज करत कुणीतरी येत असल्याचं त्याला जाणवलं. ''असेल कुणी सीनियर किंवा स्टाफ मेम्बर", तो स्वताशीच पुट पुटला.
"ए स्कॉलर", मागून आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं. त्याच्याच वर्गांमधील राखी कुलकर्णी स्मित करत उभी होती. पहिल्या वर्षाच्या पहिल्या टर्म ला जेव्हा त्याला फर्स्ट क्लास मिळाला होता तेव्हापासून ती त्याला स्कॉलर म्हणूनच हाक मारत असे.
" बोल"
"काही नाही रे. फ्रेंडशिप रीबीन बांधायची होती. आज फ्रेंडशिप डे आहे हे लक्षात आहे नं तुझ्या ?"
"हो पण सगळ्याच भावना शब्दांतून किंवा कृतीतून व्यक्त करताकेल्या पाहिजेत अ स नाही. भावनांची जपणूक मनातही करू शकतो आपण", त्याने स्मित चेहर्याने तिच्याकडे पाहत म्हटलं.
" ते प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबुन असतं रे राजा. शेवटपर्यंत निभावणार नं ही मैत्री ?" रंगाची छोटी रीबीन त्याच्या हातावर बांधत राखीने त्याला विचारलं.
"तू मला बहिणीसारखी आहेस. आणि भाऊ कधी बहीनीची साथ सोडतो का ?"
*****************************************************************************************
" And thus I conclude on the topic Dr. Freud psychology and the Society..." अविनाश मान खाली झुकवून डायसवरून उतरला. आणि सारा हॉल टाळ्यांच्या आवाजाने गजबजुन गेला.
"अभिनंदन", राखीने पुढे होऊन त्याचा हात हातात घेत म्हटलं.
" Come on यार. ती परिक्षा होती. सभेतलं भाषण न्हव्तं"
" ठीक आहे यार, परीक्षा तर परीक्षा. अभिनंदन वाया तर नाही गेलं"
"ए राखी तुला काही सांगायचं होतं पण आता नाही. दुपारी सांगेन. "
दुपारचं Patholgy च लेक्चर संपताच दोघेही कॅण्टीन च्या दिशेने निघाले. समोरून रवि आणि समीर येत होते. अविनाशचं लक्ष समीर कडे जाताच समीरच्या चेह~यावर हसू उमटलं. त्याच्या त्या हसण्याचा अर्थ अविनाश समजून चुकला. गेले वर्षभर हे अस चाललं होतं. अविनाश ला राखीवरुन चिडवणं नेहमीचंच झालं होतं. अर्थहात हे सारं राखीच्या अपरोक्ष चालायचं. अविनाश त्याकडे दुर्लक्ष करत असे. मी तिला बहीण मानतो हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असे. पण मित्र मात्र " बहिणीवरचं प्रेम उतू चाललं आहे" अस म्हणून त्याची संभावना करत असंत.
"बोल अवी, काय सांगणार होता तू ?" समोरच्या गरम चहावर फुंकर मारत राखीने त्याला विचारलं.
"राखी तुझ्या मैत्रिणी माझ्याबद्दल कुजबुजत असतात."
"काय ?"
" हेच की, तुझं आणि माझं काही ...."
" बोलू दे नं त्याना काय हवं ते.... तू कशाला मनावर घेतो ? अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचा असतं अवी. चल चहा थंड होतोय तुझा.."
आणि तो विषय तिथेच संपून गेला.
*****************************************************************************************
"अवी, मला तुझं pathology च जर्नल हवं आहे. कधी देशील ?"
"तुला हवं तेव्हा, पण एका अटीवर"
"काय भाव खातो रे मुलीसारखा ? ठीक आहे बाबा बोल तुझी अट"
"राखी, मी तुला जर्नल दिल्यावर थॅंक्यू म्हणावं लागेल"
"मुळिच नाही"
"का ?"
"आपल्या माणसांचे आभार मानणे मला आवडत नाही"
"बरं बाई, राहीलं. मी उद्या देतो जर्नल"
दोनच दिवसांनी राखीने अविचं जर्नल परत केलं. जर्नल दिल्यानंतर तिने आपल्या पर्समधुन एक कागद काढला. कागदाची घडी उलगडत अवीसमोर पकडला.
"अवी, स्केच छान आहे रे. त्या खालची चारोळीही अगदी छान जमली आहे.
नाकारलं आहेस जरी तू मला
तरी मी तुला नाकारलेलं नाही
वादळं तर तशी पुष्कळ आली
गलबत माघारी हाकारलं नाही
अवी, कोण आहे रे ही"
"कोण कोण आहे ? मला नाही माहीती"
"ए, उगाच वेड घेऊन पेडगावला जाऊ नको. हे स्केच तुझ्या जर्नलमध्ये होतं. म्हणजे हे तुला आवडणा~या मुलीचं स्केच आहे. आणि ती चारोळी हेच सांगत आहे की ती मुलगी तुला भाव देत नाहीए."
"चूप बस ना जरा."
"नाही. आधी मला सांग, कोण आहे ही ? आपल्या कॉलेजला आहे का ?"
"नाही"
"इंजिनीयरींगला ?"
"नाही"
"अवी, आता दोनच पर्याय उरतात. एक तर ती ज्युनियर किंवा सीनियर कॉलेजला आहे नाही तर मग शाळेत"
राखीच्या चेह~यावरचे मिश्कील भाव पाहून अवीला हसायला आलं. अन् तो अनावधानाने बोलून गेला, ""सीनियरला. सेकंड आर्टला."
"सही."
"राखी, त्यात सही काय आहे ?" अवीने त्रासीक सुरात विचारलं.
"ए अवी, चिढतो काय एव्हढा ? वन वे ? कधी विचारलं होतं तू तिला ? काय म्हणाली ती ?"
"माझे आई, सांगतो मी तुला सारं. पण माझं डोकं खाऊ नको. मी अकरावीला असताना तिला विचारलं होतं. 'नाही' म्हणाली. बारावीला असताना विचारलं. पुन्हा ती 'नाही' म्हणाली. तिचं सुद्धा बरोबर होतं म्हणा. खूप फरक होता तिच्या आणि माझ्या घरच्या परिस्थितीमध्ये. एकदा योगायोगाने नजरेला नजर भीडली. मला तिची निरागस नजर आवडली. आणि मी कधी तिच्या प्रेमात पडलो माझं मलाच कळलं नाही. मी तेव्हा बारावीला असल्यामुळे फारसं मनावर न घेता अभ्यासात गुंतलो. पण आता मात्र पुन्हा तिला विचारावं अस वाटत आहे"
"अवी इंटरेस्टिंग आहे रे सगळं. पण एक सांगू ? तू नको विचारू आता तिला"
"का ? तू जलन वगैरे होते का ?"
"अवी, काहीही बडबडू नकोस. मला जलन व्हायचा प्रश्न येतो कुठे ? एक मुलगी म्हणून तुला सांगते, खरंच विसरून जा तू तिला. जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलाला केवळ त्याच्या घरच्या परीस्थीतीमुळे नाही म्हणते तेव्हा ती त्या मुलाचा फक्त तिरस्कार करते. काही मुली बोलून दाखवतात. काही मुली नाही बोलत."
"तरीही मी तिला विचारणार आहे"
"ठीक आहे. जशी तुझी मर्जी. फक्त या सगळ्यात अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घे."
*****************************************************************************************
एम बी बी एसचं तिसरं वर्ष संपलं होतं. पेपर्स चालू झाले होते. अवी जरी पेपर्स देत होता तरी मनातून मात्र तो पुरता कोलमडला होता. त्याचं काहीतरी बिनसलं आहे हे राखीने ओळखलं. त्या दिवशी physiology चा पेपर होता. पेपर संपला. अवी एग्झाम हॉलमधून बाहेर आला.
"अवी", पाठीमागून राखीचा आवाज आला. आवाजाच्या दिशेनं त्याने वळुन पाहिलं.
"अवी काय झालं रे ?" त्याला बाजूला घेत राखीने विचारलं.
"कुठे काय झालं आहे ?" तिची नजर टाळत त्याने प्रतीप्रश्न केला.
"अवी, माझ्याशीसुद्धा बोलणार नाही तू ? एव्हढी परकी आहे का रे मी ?"
"राखी, तिचं... तिचं दुस~या मुलाबरोबर अफेअर आहे"
राखीने त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे अश्रूनी डबडबले होते. त्याची ती अवस्था पाहून तिलाही भरून आलं.
"अवी इट्स ओके यार. फर्गेट इट. अस समज की ते स्वप्न होतं. जाग येताच संपून गेलं."
"राखी इतकं सोपं असतं का एखाद्याला विसरनं ? एकतर्फे का होईना पण मी तिच्यावर जवळजवळ चार वर्षा प्रेम केलं आहे. मनात आशा होती की आज ना उद्या ती हो म्हणेल. चार वर्ष जिवापाड जपलेलं स्वप्न कागद फाटावा इतक्या सहजतेनं तुटले आहे गं राखी"
"अवी, सगळीच स्वप्नं वास्तवात येतात अस नाही. यापूर्वीच तू मन कठोर करून तू तिला विसरून जायला हवं होतं. ती तुला आवडते म्हणून तिलाही तू आवडायला हवास अस काही नाही. आणि ज्या मुलीला तुझ्याबद्दल जराही आपुलकी नाही, ती मुलगी तुझ्या आयुष्यात यावी असा तुझा अट्टाहास का ?"
"राखी कळत आहे गं सगळं"
"पण वळत नाही असंच ना ?"
"राखी प्लीज चीडू नकोस गं, मला तुझा खूप आधार वाटतो गं"
"अवी, मी चिडत नाहीये रे. तुला वास्तवाची जाणीव करून देत आहे. अवी, माणसानं कुणावर इतकंही प्रेम करू नये की ज्यामुळे त्यानं स्वता:चं अस्तित्व विसरून जावं. मन कठोर कर. तुला भूतकाळ विसरायलाच हवा. मी अस म्हणत नाही की तू आजच आणि आताच विसर. थोडा वेळ जरूर लागेल. दोन महिने, सहा महिने कदाचित पूर्ण वर्ष जाईल. मला माहिती आहे, तू तिला नक्की विसरशील. तुला आठवतंय ? मागे एकदा तू म्हणाला होतास की तुला gynacology घेऊन एम डी करायचं आहे. खूप मोठा स्त्री रोग तज्ञ व्हायचं आहे. बास, तुझ्या या ध्येयावर लॅक्स केंद्रित कर. कुठलं एक स्वप्न तुटले तर आयुष्य थांबत नसतं अवी. तुला खूप मोठी झेप घ्यायची आहे अवी. माइंड वेळ माय डियर फ्रेन, स्काय इज द ओन्ली लिमिट फॉर यु. जोडीदार, प्रेम या सगळ्या खूप नंतरच्या गोष्टी आहेत रे. इट्स टाइम टु स्टडी. कळलं का ? वेडा कुठला. चाल मला उशीर होतो आहे. येते मी. बाय"
अवी डबडबल्या डोळ्यानी पाठमो~या जाणा~या राखीकडे पाहत बराच वेळ पाहत राहीला.
*****************************************************************************************
पेपर्स संपून सेमिनार चालू झाले. त्या दिवशीचा सेमिनार संपून अवी होस्टेलला आला. संध्याकाळी मेसला जाऊन आल्यावर तो सहज म्हणून आडवा झाला. इतक्यात रूम पार्टनरने टेपरेकोर्डर सुरू केला. "सो गयी हैं सारी मंजीले..." सुरांच्या जोडीने शब्द कानावर पडू लागले. अवीचे डोळे भरून आले. आणि एका हळव्या क्षणी तो रडु लागला.
" ए अव्या, काहीतरीच. रडतो काय मुलीसारखा. एक नाही म्हणाली तर दुसरी पाहायची. तू नही तो और सही. चल उठ सेमिनारचा अभ्यास कर." टेप बंद करत रुममेटने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
"आणि तसाही अव्या तुला ओप्शन आहे की" शेजारच्या रूममधला अमित म्हणाला.
"अमित कुणाबद्दल म्हणतो आहेस तू हे ?" अवीला अमितच्या बोलण्याचा रोख कळला होता.
"ते तुला माहीती आहे"
"अमित" अवी जवळजवळ अमितवर ओरडलाच. "ती माझी चांगली मैत्रीण आहे. आनी इतकंच नाही तर मी तिला बहीण मानतो."
"बहीण मानतोस" मानतोस शब्दावर जोर देत अमित म्हणाला. "आज काल सगळं चालतं रे. दादा भाई नवरोजी"
"अमित, तुझं तुला कळत आहे का तू काय बोलतो आहे ? आताच्या आता चालता हो रूममधून"
आणि अवी उशीमध्ये डोकं खुपसुन हमसाहमसी रडु लागला.
"अवी शांत हो जरा" रुममेटने समजूतीच्या सुरात म्हटले.
त्या रात्री अवीला झोप अशी लागलीच नाही. सारखा या कुशीवरुन त्या कुशीवर तो लोळत राहीला. त्याच्या मनाची नुआसती तगमग चालू होती. त्याला राहून राहून प्रश्न पडत होता. का सारे मित्र माझ्या आणि राखीच्या मैत्रीबद्दल असा विचार करतात. सगळेच जर असा विचार करत असतील तर कशाला हवीय आपल्याला राखीची मैत्री ? हा विचार जेव्हा त्याच्या मनात आला तेव्हा त्याला बरं वाटलं. त्याचा श्वास थोडा हलकेच चालू लागला.
*****************************************************************************************
सेमिनार चालूच होते. अवीनं राखीशी बोलणं जवळजवळ बंदच केलं होतं. बोलला तरी अगदी तुटकपणे. आपण जे करत आहोत ते ठीक नाही हे त्याला कळत होतं. पण ते टाळणं त्याला जमात न्हव्तं. दोन दिवस असेच गेले.तिस~या दिवशी मात्र राखीने त्याला अडवलं.
"अवी, काय झालं रे ? तू मोकळेपणाने का बोलत नाहीस ?"
"राखी... " पुढे काय बोलावं हे अवीला सुचेना.
"अवी, तुला कुणी काही बोललं का ? ती काही म्हणाली का ?"
'राखी तसं काही नाहीये गं. राखी मला वाटतं आपण आपली मैत्री इथेच थांबवु या."
"काय ? अवी पुन्हा बोल एकदा"
"राखी प्लीज..."
"अवी, तू मला नीट सांग काय झालं ते."
अवी आता राखीला काय सांगावं या विचारात पडला. आणि तसंही तो काय सांगणार होता तिला. अचानक त्याच्या मनात एक विचार चमकून गेला.
"राखी..."
"हो बोल तू. मी ऐकते आहे"
"मला तुझ्याबद्दल आकर्षण वाटु लागलं आहे"
दोन वर्षांच्या मैत्रीमध्ये आपण पहिल्यांदा राखीशी खोटं बोलत आहोत या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत होतं. पण त्याच्या दृष्टीने ती एकच गोष्ट अशी होती की ज्यामुळे त्यांची मैत्री तुटणार होती.
"एव्ह्धच ना रे. म्हणून तू माझ्याशी बोलणं बंद केलं होतं ? मी मुलगी आहे रे... वाटलं तुला माझ्याबद्दल आकर्षण तर त्यात काय गैर आहे ?"
"पण राखी मी तुला बहीण मानत होतो. आणि आता हे तुझ्याबद्दल अस वाटू लागलं आहे."
"ठीक आहे रे. चल चुक झाली तुझी. ते माझ्याबद्दलचे आकर्षण वगैरे डोक्यातून काढून टाक. चुकतो रे माणूस कधी कधी. पण म्हणून काय आपली मैत्री तोडणे हा त्यावरचा उपाय नाही. काही झालेलं नाही. तू फक्त ते विचार डोक्यातून काढून टाक म्हणजे झालं."
"नाही राखी. नाही जमणार मला यापुढे तुझ्याशी बोलायला"
"कधीच बोलणार नाहीस अवी तू माझ्याशी ?"
"होय"
"ठीक आहे. जशी तुझी मर्जी. अभ्यास कर. विश यु ओल द बेस्ट"
आणि त्याच्याकडे एक अश्रुभरला कटाक्ष टाकून ती चालू लागली.
*****************************************************************************************
त्यानंतर जेव्हा अवीला जाणवू लागलं की आपण चुकलो आहोत तेव्हा त्याने राखीची माफी मागितली होती. पण त्या स्वाभिमाने मूलीनं त्याला माफ करायचं नाकारलं होतं. त्याला राहून राहून वाटत होतं की मित्रांचं बोलणं आपण एव्हध मनावर घ्यायला नको होतं. तसाही आपला काय दोष होता त्यात म्हणा. आपली मनस्थिती तेव्हा स्थीर नव्हती. कुणीच आपल्या जवळ नको होतं आणि मित्र राखीच्या नावाने चिडवत होते.
त्याला हे जाणवत होतं की राखी आपल्या कुठल्याही मित्राइतकीच आपल्याला जवळची होती. आपल्याशी किती आपुलकीने आणि जिव्हाळ्याने बोलायची ती. किती मायेनं समजावायची ती आपल्याला. आई बाबांच्या नंतर इतकं निरपेक्ष आणि निस्वार्थी प्रेम फक्त राखीनेच केलं होतं. किती विश्वास टाकला होता तिने आपल्यावर. आणि आपण मात्र तिच्या मनावर अशी जखम केली की जी कधीही भरून येणार नाही.
जेव्हा आपण मनाने पुरते तुटलो होतो तेव्हा राखीनेच आपल्याला आधार दिला होता. तिनेच आपल्याला सावरलं होतं. खूप खूप रडलो होतो तेव्हा आपण. जर तेव्हा आपलं दुखणं ऐकायला राखी नसती तर काय झालं असतं आपलं ? आपल्याच वयाची असूनही किती समजून घेतलं होतं तिने आपल्याला तेव्हा.
त्याला मागचा एक प्रसंग आठवला. तनुजा चंद्राचा सूर नुकताच प्रदर्शीत झाला होता. अवीचा ग्रूप पहीलाच शो पाहून आला होता. अर्थात सोबत राखीही होती. चित्रपटातलं ते शेवटचं गाणं 'कभी शाम ढले तो मेरे दिलमें आ जाना' अवीच्या मनात घर करून राहीलं होतं. त्या गाण्यावर त्याने नंतर राखीशी चर्चा केली होती. नव्हे त्याने तिच्याशी वादच घातला होता. ते गाणं म्हणजे एक विरहगीत आहे अस राखीचं म्हणणं होतं. कातरवेळी प्रेयसीने प्रियकराला घातलेली आर्त साद म्हणजे ते गीत असे तिचं मत होतं. अवीचं म्हणणं होतं की ते गीत एक उत्कट भावगीत आहे. दोन प्रेमी जीवांच्या मधली ओढ जसं ते गीत व्यक्त करतं तसंच एका हळूवार मनाचं भावविश्व ही त्या गीतातून उलगडत जातं. ते गाणं म्हणजे भक्ताने आपल्या देवासाठी आळवलेला आर्त नाद आहे. गर्भार मातेने आपल्या गर्भातल्या बाळाशी साधलेला हळूवार संवाद आहे. आणि त्याच्या या मतापुढे राखीने माघार घेतली होती.
हे सगळं आठवताच अवी व्याकुळ झाला.
"राखी ते गीत म्हणजे एक भाव गीत आहे हे मी आणखी एका उदाहरणाने सिद्ध करू शकतो. ते गाणं म्हणजे एका मित्राने आपल्या दुरावलेल्या मित्राला मारलेली एक हाक आहे" तो स्वताशीच पुटपुटला.
त्याने हलकेच डोळे मिटले. व्हायोलिनचा नाद त्याच्या कानात घुमू लागला. महालक्ष्मी अय्यरचा आर्त स्वर त्याच्या मनाचा गाभारा व्यापून उरला....
कभी शाम ढले तो मेरे दिलमें आ जाना
कभी चाँद खिले तो मेरे दिलमें आ जाना
मगर आना इस तरह तुम के यहासे फिर ना जाना...
(जाता जाता - महालक्ष्मी अय्यर च्या 'कभी शाम ढले तो मेरे दिलमें आ जाना' या गीताची चित्रफीत इथे पाहायला मिळेल... तिचा लाइव परफॉर्मन्स आहे तो. प्रेक्षकांमध्ये बसल्या आहेत अलका याग्निक, सुनिधी चौहान आणि... श्रेया घोशाल... )
प्रतिक्रिया
24 May 2008 - 8:16 pm | प्राजु
आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 May 2008 - 12:06 pm | अनिल हटेला
क्या बात है!!!
मनाला भिडली रे कथा!!!!
26 May 2008 - 5:27 pm | आनंदयात्री
अजुन येउ दे ! मस्त !