माधव, माधवी, आणि मंदी

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
9 Aug 2011 - 11:35 am

"अगं माधवी, हे काय? तू चक्क आम्रखंड आणलयंस आणि ते ही चितळेंच? तुला माहिती आहे नं काय चाललंय ते?"

"अरे असं काय करतो, माधव? आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. मग काही गोड-धोड नको का जेवणात?"

"ही काय गोड खाऊन सेलिब्रेट करण्यासारखी घटना आहे का?"

"काय???"

"नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की फक्त गोड-धोड खाऊनच आनंद सेलिब्रेट करता येतो का? आपलं एकमेकांवरचं वाढत जाणारं प्रेम काय कमी गोड आहे? त्या तरल, रोमँटीक, गुलाबी भावबंधनाच्या गोडव्यापुढे आम्रखंडाचा गोडवा किती फिका वाटतो हे तुला सांगायची गरज आहे का?"

"अरे हो पण थोडं गोड आणलं बाजारातून तर काय बिघडलं? सासूबाईंना पण आवडतं..."

"ते काही नाही, आत्ताच्या आत्ता जाऊन परत करून ये हे आम्रखंड. अगं, अमेरिकेचं रेटींग कमी झालंय; शेअर बाजार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलाय; फनी मे आणि फ्रेडी गे.. नाही, काय ते? फेणी घे आणि फे फे ते...च्यायला, सरळ नावं नाही ठेवता येत या लोकांना. आपल्याकडे किती सोपी नावं ठेवतात, धनलक्ष्मी बँक, अजित बँक...यांच्या बँकांची नावंच इतकी अवघड असतात की लोकांच्या लक्षातच राहत नाहीत; मग कशा चालणार या बँका?"

"फॅनी मे आणि फ्रेडी मॅक!"

"हां, तेच ते...त्यांचं पण रेटींग कमी केलयं. स्टँडर्ड आणि पुअर्सने जे दिसेल त्याचं रेटींग कमी करण्याचा सपाटा लावलाय. यांचे कर्मचारी पण घरी असं रेटींग-रेटींग खेळत असावेत बहुतेक. बायकोने केलेला पिझ्झा करपला की लगेच रेटींग बी देऊन निषेध, पोराने दारू पिऊन गोंधळ घातला की लगेच रेटींग 'पी' देऊन घरातून वॉकआऊट; यांच्या घरचे पण वैतागत असतील...बरं, ते जाऊ दे, मी म्हणत होतो की खूप मोठी मंदी येणार आहे असं मी ऐकलंय. घरांच्या किमती राजकारण्यांच्या नीतीमत्तेप्रमाणे धाडधाड कोसळणार आहेत, होम लोनचे व्याजदर आपल्या घोटाळ्यांच्या संख्येप्रमाणे धाडधाड....नाही, धाडधाड झालंय एकदा...काडकाड कडाडणार आहेत, नव्हे, कडाडले आहेत. नोकर्‍या जाण्याची 'पुन्हा' एकदा वेळ येणार आहे. सालं, आधी नोकरी मिळवण्याचं टेन्शन, मग ती टिकवण्याचं टेन्शन, मग नोकरी जाऊ नये म्हणून टेन्शन, ती पुन्हा जाऊ नये म्हणून टेन्शन....इतके टेंशन्स असूनदेखील आपण नोकरी का करतो?"

"अरे माधव, शांत हो, अजून तसं काही झालंय का? मग राहू दे ना आज आम्रखंड!"

"अरे, कमाल करतेस तू माधवी! आपल्या भविष्याचा विचार आपण नको का करायला? सहा हजार पाचशे रुपयांचं कर्ज आहे अमेरिकेवर! आहेस कुठे तू?"

"काय? सहा हजार पाचशे रुपयांचं फक्त?"

"अरे अरे सॉरी, सॉरी, काय आहे, आपल्या कुवतीनुसारच शब्द आणि आकडे बाहेर पडतात नं. त्या हीना खारच्या बॅगेची बातमी वाचतांना पण माझं असंच झालं; मी सतरा लाखातला 'लाख' हा शब्द नेमका वाचायला विसरलो आणि फक्त सतरा वाचलं...च्यायला, म्हटलं हीची बॅग सतरा रुपयाची आहे यात काय मोठी बातमी आहे? म्हटलं, माझ्या बायकोच्या नुसत्या मोबाईलचं कव्हर वीस रुपयाचं आहे...मी मोठ्ठ्याने हसून ती बातमी विन्याला सांगीतली तर त्याने मला वेड्यातच काढलं, म्हणाला की ती बॅग सतरा लाख रुपयांची आहे. मी मुकाट्याने माझ्या मिसळीतलं झुरळ बाजूला काढून पावाचा तुकडा मोडला...हं तर ते सहा हजार पाचशे लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे; म्हणजे कितीतरी ट्रीलियन डॉलर्सचं...नेमका आकडा लक्षात नाही माझ्या...मूळ मुद्दा असा आहे की अमेरिकेवर गंडांतर म्हणजे भारतातल्या नोकर्‍यांवर गंडांतर असा सरळ-सरळ हिशेब आहे हा...मागच्या वेळेस आठवत नाही का तुला, २००८ मध्ये कशी फा....र वाट लागली होती. मी तर दुपारचं लंच बंद केलं होतं, रात्रीचं लंच बंद करण्याचा सीरियस विचार मी सुरु केला होता...पण रात्रीचं लंच नसतं, डीनर असतं, म्हणून मग तो विचार मी सोडून दिला. सकाळी ऑफीसात पोहोचल्यावर कुणाला तरी पकडायचो, 'वा मीनाक्षी ड्रेस मस्त आहे तुझा, हा रंग खुलूनच दिसतोय तुझ्यावर, कुठला, बैंगनी आहे का हा? काल काय सॉल्लिड रिपोर्ट बनवला होता तू, वा मजा आ गया..' असं म्हणून कँटीनमध्ये फुकटात इडली-वडा सांबार पदरात...आपलं उदरात पाडून घ्यायचो..."

"कोण ही मीनाक्षी? कशी आहे दिसायला?"

"ते सोड गं, ती कशी का असेना, (विचारात गर्क होऊन) कश्मिराची मजा नाही तिच्यात..."

"काय???"

"अगं, मला म्हणायचं होतं की कश्मिरासोबत ब्रेकफास्टमध्ये चक्क शिरा मिळायचा...इडली-वडा सांबार काय, नेहमीचाच आहे, शिरा म्हणजे कसा एकदम लुसलुशीत, गोड, गोड, असा अगदी हवाहवासा...असा मस्त...ओठांशी आल्या-आल्या एकदम ओठ गोड करून जाणारा..."

"पुरे!!!"

"हां, तर मीनाक्षी ना? अगं, जाड भिंगांचा चष्मा होता तिला..नाव मीनाक्षी होतं पण त्या जाड भिंगांच्या चष्म्यातून तिचे डोळे रेड्यासारखे दिसायचे..."

"आणि कश्मिरा कशी होती दिसायला?"

"कश्मिरा...(दृष्टी हरवते)...ती तर खरचं काश्मीर होती गं..नंदनवन होती अगदी. शिरा! साजूक तुपातला, मनुके टाकलेला, काजूच्या कापांनी सजवलेला शिरा होती नुसती...(सावरत) बघ, फुकटात असा ब्रेकफस्ट मिळाल्यावर असं होतं माणसाचं..."

"कळतयं मला सगळं. ती शिरा होती, आणि मी?"

"लाल भोपळा"

"काय?"

"लाल भोपळा घातलेला चविष्ट सांबार मात्र द्यावा तो मीनाक्षीनेच असं म्हणायचं होतं मला. तू ना? तू म्हणजे...केरळ आहेस गं, तिथं सापडलेल्या सोन्यासारखी लखलखणारी...शेकडो किलो सोन्यासारखी..."

"म्हणजे जाड?"

"नाही, नाही, मौल्यवान! तेरा सराफा, ऐसा हैं हमदम..."

"खरंच? मग राहू दे हे आम्रखंड?"

"अजिबात नाही. उद्या नोकरी गेली माझी तर या आम्रखंडाच्या किमतीत निदान तीन ब्रेडचे पुडे तरी येतील. दोन-तीन दिवस ढकलता येतील ब्रेड खाऊन. आणि हो, आता आपल्याला काटकसर करावी लागणार आहे. मी आता आठवड्यातून एकदाच दाढी करणार आहे, तू पण..."

"शी, मी काय दाढी करते?"

"अगं, तू पण ब्युटी पार्लरला दोन महिन्यातून एकदाच जात जा!!! आणि आता मला पुन्हा मीनाक्षी, कश्मिरा यांच्यासारखं कुणीतरी शोधायला लागेल...काय वैताग आहे, मला खरं तर अजिबात आवडत नाही सुंदर-सुंदर, कमनीय बांध्याच्या, मादक, नशील्या डोळ्यांच्या मुलींशी सलगी वाढवायला...पण काय करणार, ही मंदी अशी छंदी-फंदी बनायला भाग पाडेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. उद्यापासून मला डबा देऊ नकोस. आणि आपल्या त्या पूज्य कार्ट्याला जरा कमी पोरी फिरवायला सांग आता. आहे कार्ट चौदा वर्षाचं पण अगदी बापावर (जीभ चावतो) सूड काढतोय. मॅक्डीमध्ये घेऊन बसतो पोरींना! अरे तुझा बाप काय कलमाडी आहे की पवार असं कुठेही, कसंही, कितीही 'खायला'? आजपासून भात बंद, रोज एकच भाजी करायची....भरपूर पाणी टाकून, पोळ्यावाल्या मावशींना सुटी दे आणि पोळ्या तू करत जा आता. टीव्ही फक्त अर्धा तास बघायचा..होम मिनिस्टर बघून बंद करायचा."

"का, होम मिनिस्टर का? आम्हाला 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' बघायचं असतं"

"तुला काहीच कळेना बघ. अगं, होम मिनिस्टरमध्ये किती छान-छान, नवीन-नवीन बायका (जीभ चावतो) बायकांचे खेळ दाखवतात. माहिती मिळते खूप त्यातून. आदेश भावजी किती नवनवीन प्रश्न विचारून आपला जीके वाढवतात...मग? फक्त होम मिनिस्टरच बघायचं. आणि उद्यापासून आपलं डीनरनंतर वॉक घेणं बंद!"

"का?"

"का म्हणजे काय? शिकलेली आहेस ना तू? अगं, वॉक घेतला म्हणजे श्रम होतात आणि श्रम झाले म्हणजे भूक लागते! कमालच आहे तुझी! बंद! (माधवचा फोन येतो) हॅलो, कोण बोलतयं? हू इज धिस? ओह, देशपांडेसर तुम्ही? बोला सर." (खुणांनी माधवीला देशपांडेसरांचा फोन आल्याचं सांगतो)

"अरे माधव, तुझं अभिनंदन करायचयं." सर

"कशाबद्दल सर? माधवीचं प्रमोशन झालंय की काय?"

"अरे नाही रे, तुला सांगीतलं नाही का तिने? अरे, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि जास्तीत जास्त गरीब मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी तिने ज्या उपाययोजना सुचवल्या होत्या त्या शिक्षण मंडळाने स्वीकारल्या आहेत आणि तिच्या या कामाचं कौतुक म्हणून तिचा सत्कारही आयोजित केला आहे. एवढंच नाही, याच विषयातली पीएचडी देखील तिला जाहीर झाली आहे. आहेस कुठे तू? पार्टी द्या आता तुम्ही!!"

"अरे वा!!! नक्की सर, अगदी नक्की पार्टी देणार, तुम्ही म्हणाल तिथे पार्टी देणार. थँक्यू वेरी मच! (फोन ठेवतो) वा, माधवी, तुझ्या जिद्दीला, चिकाटीला मानलं! अभिनंदन!! सांग तुला काय हवंय बक्षीस? आज तू जे मागशील ते घेऊ आपण, सोन्याचा दागिना, पैठणी.."

"काही नकोय मला, मंदी आहे ना!"

"अगं तुझा मला वाटणारा अभिमान हा त्या मंदीच्या चटक्यापेक्षा कितीतरी पट जास्त मोहक आहे. मंदीची ऐशी तैशी! सांग, काय पाहिजे तुला?"

"फार काही नको, हे आम्रखंड!!!"

--समीर

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

9 Aug 2011 - 12:05 pm | नितिन थत्ते

मस्त.

(मंदी आहे म्हणून कौतुकाचे जास्त शब्द वापरले नाहीत) ;)

श्रीरंग's picture

9 Aug 2011 - 12:47 pm | श्रीरंग

खरोखर, मस्तच!!

महाबळ's picture

9 Aug 2011 - 12:55 pm | महाबळ

मजा आली वाचताना, चांगलं जमलंय...

स्वतन्त्र's picture

9 Aug 2011 - 12:57 pm | स्वतन्त्र

मस्त !

हा हा हा
समीर तुफान लिहिलयस.

धन्या's picture

9 Aug 2011 - 1:14 pm | धन्या

अगदी झक्कास लिहिलंय !!!

गवि's picture

9 Aug 2011 - 1:20 pm | गवि

हेच म्हणतो.

मन१'s picture

9 Aug 2011 - 1:29 pm | मन१

मस्त!
खुसखुशीत!!

-----/\-----

(अरीचशी वाक्य्/कोटेशन्स आवडलेली आहेत, कुठलं एखादाच इथे देउन दाद देणं म्हणजे इतरांना विसरण्यासारखं वाटलं, म्हणुन देत नाही.)

गणेशा's picture

9 Aug 2011 - 1:34 pm | गणेशा

अप्रतिम ... मस्त मजा आली वाचताना

सुरेख...खल्लास....सफाचट...टरटर...राप्चिक...
क ड क...

मृत्युन्जय's picture

9 Aug 2011 - 1:41 pm | मृत्युन्जय

_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
------------------------------------------------_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
------------------------------------------------_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
------------------------------------------------_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
------------------------------------------------_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
------------------------------------------------_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_

सन्जोप राव's picture

9 Aug 2011 - 1:49 pm | सन्जोप राव

सुंदर, खुसखुशीत लेखन. आवडले.

तिमा's picture

9 Aug 2011 - 6:51 pm | तिमा

रावांचे दर्शन बर्‍याच दिवसांनी झाल्याने डोळे प्वाणावले.

किसन शिंदे's picture

9 Aug 2011 - 1:59 pm | किसन शिंदे

मस्त खुसखूशीत लेख...!

सोत्रि's picture

9 Aug 2011 - 3:03 pm | सोत्रि

अतिशय खुमासदार लेखन!

-( मंदीने ग्रासलेला) सोकाजी

सुंदर हलकाफुलका लेख! मजा आली वाचताना! :)

प्रीत-मोहर's picture

9 Aug 2011 - 11:58 pm | प्रीत-मोहर

अस्सेच म्हण्ते

विकास's picture

9 Aug 2011 - 10:12 pm | विकास

AAA

बबलु's picture

10 Aug 2011 - 4:17 am | बबलु

मंदी taken in a right spirit !!! मस्त लिहिलंय.

बाकी, मंदी असल्यामुळे कौतुकाचे शब्द जरा हात आखडून वापरतो. ;)

सहज's picture

10 Aug 2011 - 7:02 am | सहज

मराठी साहीत्यात मध्यमवर्गीय मानसीकता (हो हो पिवळे पितांबर)असलेले ललित लेखन / बूर्झ्वागिरीला छेद देणारे लेखन!

म्हणजे आजवरची बूर्झ्वामुल्ये व आधुनिकोत्तर लेखनमुल्ये कशी तर
१) नवरा बायकोला घाबरणारा. बायकोला बडवणारा, अन्याय करणारा तो अन्य लेबल घेउन येतो. मध्यमवर्गीय नाही. ते बंडखोर साहित्य. इथे मध्यमवर्गीय नवरा बायकोकडे जवळजवळ दुर्लक्ष करतोय. पहीलीबार.
२) लग्नाच्या वाढदिवशी तर आज हिसाब किताब जपून केले पाहीजे असा. जसे शाळेत आज इन्स्पेशनला अधिकारी येणार म्हणुन चिंतीत मुख्याधापक किंवा फायनल ऑडीटला स्टोअर मॅनेजर. इथे चक्क अन्य बायकांची नावे व सलगी बायको पुढे बोलतो.
३) लग्नाच्या वाढदिवशी तर भेटवस्तू हवी किमान वादा हवा जरी नेहमीप्रमाणे वाढदिवस विसरला तर. इथे आठवण करुन दिली तरी बायकोला खर्च कमी कर सांगणारा. बहुदा याला घटस्फोट हवाच आहे. आधुनिकोत्तर. या इसमाची येती पौर्णीमा घाणेरडी निश्चीत!

बाकी शिफारसी दिल्या म्हणून पीएचडी मिळाल्या असत्या तर परा, थत्तेचाचा, विकासराव यांच्या पिएचड्या एकमेकांशेजारी ठेवल्या असत्या भारत आठ वेळा तर उत्तर गोलार्ध दीड वेळा झाकला गेला असता. (संदर्भ - विचित्रविश्व)

असो आजवरच्या बूर्झ्वा लेखनविषयक नियमांच्या धज्ज्या उडवल्या म्हणुन लेख उठून दिसतोय. फार तर BB+ मानांकन (मराठीत रेटींग - 'बाबूजी बचके' अशी आठवण करुन द्यायला) बाकी बहुदा पिडाकाका म्हणाले तसे मिभोकाकांचे ऐकून वर सर्वांनी प्रतिसाद दिला असावा इतकेच म्हणतो.

(समीक्षक ) सहज

नितिन थत्ते's picture

10 Aug 2011 - 8:10 am | नितिन थत्ते

>>बाकी शिफारसी दिल्या म्हणून पीएचडी मिळाल्या असत्या तर परा, थत्तेचाचा, विकासराव यांच्या पिएचड्या एकमेकांशेजारी ठेवल्या असत्या भारत आठ वेळा तर उत्तर गोलार्ध दीड वेळा झाकला गेला असता. (संदर्भ - विचित्रविश्व)

विचित्रविश्व मधील माहिती चुकीची आहे असे वाटते. उत्तर गोलार्ध दीड वेळा जरा कमी आहे. तेवढा तर विकासरावांच्या एकट्याच्याच पीयेच्ड्यांनी झाकेल. :)

समीक्षकांनी समीक्षा लिहिण्यापूर्वी लेखकाची भेट घेऊन लेखकाचा दृष्टीकोन समजून घेतला आहे का?

समीरसूर's picture

10 Aug 2011 - 2:37 pm | समीरसूर

मनापासून धन्यवाद! :-)

समीर

चिर्कुट's picture

10 Aug 2011 - 2:56 pm | चिर्कुट

लेख मस्तच आहे...

'लाईक' बटण शोधत होतो...(च्यायला हे फेसबुक वापरायचं बंद केलं पायजे..)