च तु र्भु ज

चेतन सुभाष गुगळे's picture
चेतन सुभाष गुगळे in जनातलं, मनातलं
17 Jul 2011 - 3:40 pm

(प्रवेश १ला स्थळ : महिपतराव पाटलांचा प्रशस्त वाडा आणि त्यासभोवतालचा परिसर)
प्रसंग : महिपतरावांची एकुलती एक कन्या हेमांगी चा विवाह संपन्न होत आहे. लग्नसमारंभात काम करणारी नोकरमंडळी आणि त्यांना सूचना देणारे यांची लगबग चालु आहे. मंद आवाजात वाद्ये वाजत आहेत. वातावरणात एक प्रसन्नता भरून राहिली आहे.

महिपतराव : (मोठ्याने ओरडून) आरं रामा, शिवा, गोविंदा. कोणी हाय का तिकडं? कुठं मेलेत समदे? हितं अजून किती कामं करायची बाकी आहेत. वावरात खुर्च्या मांडायच्यात. माईक अन् स्पीकर अजून आले नाहीयत. ........
.....
(स्वगत / प्रेक्षकांना) मंडळी आज तुमच्या भाषेत ते नर्वसनेस का काय म्हणत्यात ना.. तसं फील होतंय बघा मला. म्हंजी आजचा दीस आनंदाचा बी आन् टेन्शनचाबी. एका डोळ्यात आसू आन् दुसर्‍यात हांसू. (फोटोकडे पाहत).. ईस वर्षामागं आमची ही हाथरूनाला खिळून होती तवा तिला शहरात घेऊन जायला, मोठ्या हास्पीटलात भरती कराया मला काई जमलं न्हाई. (डोळे पुसत) बिचारी शेवटपर्यंत एकाच काळजीत होती... तिच्यामागं हेमाचं कसं होईल? मरण बी सुखासमाधानात न्हाई येऊ शकलं तिला... पोरीत जीव गुतला होता तिचा. तवा नियतीपुढं माझं काही चालु शकलं न्हाई... पन् ते तेवढंच. त्यानंतर म्या ठरिवलं ही गरिबीच आपली दुष्मन हाय. तिला दूर सारायचं. जमंल तसं कधी एक एकर, कधी दोन एकर, कधी पाच एकर असं तुकड्या तुकड्यानं घेत, येळ प्रसंगी बॅंकेचं कर्ज काढून जिमीन वाढवली. रातंदिस काबाडकष्ट केले. गावातल्या गरजू पोरांना हाताशी धरून जमिनीची मशागत केली. जोडीला गाई म्हशी विकत घेऊन दूधाचा धंदा बी सुरू केला. तुमची धवल क्रांती का काय म्हणत्यात तिच केली म्हना की या आडगावात. यवढ्यावर जीव समाधानी नव्हता म्हणूनशान पोल्ट्री फार्म बी टाकला.
अपेक्षेपरमानं फळं मिळाया लागली. ईस खणांचा मोठा दोन मजली वाडा झाला. ईज आली. पंपानं हिरीतलं पानी आता थेट वरच्या टाकीत. निस्तं चावी फिरविली की फुल्ल प्रेशरमदी पानी शेवेला हजर. सोबतीला ते शहरावानी इन्वर्टर आन् जेनसेट बी लावले. आता हितं बारा - चौदा तास लोड शेडींग असतंया, पर मला तीन दिस ईज आली न्हाई तरी कायबी फरक पडत न्हाई. तळघरात हजार लिटरची डिजल ची टाकीच करून घेतलीया, त्यामुळं जेनसेट बिनदिक्कत चालतुया. अन् त्यावर सैपाकघरातला फ्रीजबी बंद पडत नाय आन् शेजघरातला येशी बी बंद पडत न्हाय. हेमाच्या आयचं असं झालतं त्यामुळं एक हमेशा ध्यानात ठिवलं.. आपन कितीबी म्हंटलं तरी खेड्यात र्‍हातो तवा मोठ्या ईलाजाची गरज लागली तर शहरच गाठाया लागनार... त्याकरता दिमतीला यक ईनोबा अन् यक खार्पियो जीपा बी घिवून ठिवल्या. कदीबी गरज लागली तर तासाभरात शहरात जाता येतंया.. कुनावर अवलंबून र्‍हायला नगं. इतकं समदं मिळालं तर जोडीला प्रतिष्ठा आन् प्रसिद्धी बी मिळवावी म्हून राजकारनात बी शिरलो आन् गावचा सरपंच झालो.
आता येवडी सगळी सुखं हात जोडून हुबी हाईत तर जीवाला नवाच घोर लागला बगा. कसला म्हून काय ईचारतायसा? अवं आमची हेमा अन् दुसरं काय? दोन वर्षांची होती तवापासून आईबिगर संभाळली तिला. बारावीपर्यंत गावातच शाळा होती तवा तिला जाऊ दिली. बारावी पास झाल्यावर शहरातल्या कालेजला शिकायला जाते म्हनाया लागली आन् पैल्यांदाच लक्षात आलं पोर किती मोठी झालीया. नक्षत्रावानी दिसाया लागली. आता शहरात तिला हजार नजरांपासून कोन वाचिवनार? ते काई न्हाई.. ते यक्स्टर्नल का करसपांडन्स काय म्हनत्यात ना मुक्त ईद्यापीठातलं तसलं बीए / बीकाम काय करायचं ते कर म्या म्हंटलं. शहरात जाऊन बुकं आनून दिली. दर सा म्हैन्याला परीक्षेकरता आठवडाभर स्वत: रोज जीपनं तिला शहरात घेऊन जायचो. आसं तीन वरीस केलं अन् यकदाची ग्रॅज्वेट केली. ल्हानपनापासून तिचे सगळे हट्ट म्या पूरिवले पन् हा फूलटैम शिनीयर कालिजात शिकायचा तिचा ईचार म्या पार ख्वडूनच काढला. तिनं बी लै तानलं न्हाई. माजा सबूद राखला.
मदल्या टायमात म्या तिच्याकरता स्थळं बगत र्‍हायलो. पर यक बी मनाजोगतं सापडंना. कुनी आमच्या तोलामोलाचं नसायचं, तर कुनी मंजी लईच तालेवार लोकं - ह्येमा त्यांच्याकडं नांदल का ही मला धास्ती. आन् यक दिस मला कळलं म्या उगाच गाडीची टायरं हिच्यासाटी झिजवतोय. कार्टी तर अगोदरच कुणाच्या तरी प्रेमात पडलीया. तिच्या शेलफोनचं यका म्हैन्याचं बिल यकदम आठ हजार सातशे त्रेपन्न रूपये. काहीतरी चूक झाली आसल असं वाटून डिटेल बिल मागीवलं तर यकाच नंबरावर यकशे त्र्याऐंशी येळा डायलिंग केलेलं. मग सरळ हेमाला ईचारलं “ह्यो नंबर कुनाचा? अन् ही काय भानगड हाय?” तर नजरेला नजर भिडवत म्हणाली, “विजय देशमुखचा. माझा मित्र आहे तो.”
आपल्या पोरीला कोनी मित्र असू शकंल असं मला कदीच वाटलं नव्हतं. गावात तशी कुनाची हिंमत व्हनारच न्हाय म्हना. पर ह्या ईजयरावची बातच निराळी. गेल्या साली यसपी सायब ह्याला घिवून गावात आले. म्हनाले तरूण उद्योजक हाईत, ह्यास्नी गावात केबलचा व्यवसाय टाकायचाय. गावातल्या पोरांना बी रोजगार मिळंल. तुमच्याकडनं होता होईल तितकं साह्य करा. आता यस्पी सायबानी शिफारस केलेला मानूस म्हंटल्यावर म्या जागा बगून देन्यापास्न, बॅंकेच्या कर्जाला जामीन र्‍हान्यापर्यंत समदी मदत केली. कामाला पोरं मिळवून दिली, गावातली गिर्‍हाईकं कनेक्षनसाठी पटवली. कामानिमित्तानं ईजयरावचं आमच्या घरी जानं येनं चालुच हुंतं. आमच्या केबल कनेक्षन संबंदानं ह्येमाबी त्यांच्या संगं बोलत असायची. पर ह्ये तर आता भलतंच क्र्वास कनेक्षन होऊन गेलं.
ही भानगड समजल्यावर पैल्याछूट तर मला ईजयरावचा भलताच राग आला. पर नंतर थंड डोक्यानी ईचार केल्यावर मला जानवलं माझी हेमाच त्याला मित्र म्हणतीया. तो कुटं तिला मैत्रीन म्हणतुया. पुन्हा मी त्याच्याशी भांडाया जायचं तर कंचा मुद्दा घिवून? त्यानं थोडंच माझ्या पोरीला घिवून पळ काढलाय की तिचा हात मागाया माझ्या दारात आलाय? बरं त्यानं पोरीला फितवली म्हनावं तर तसं बी न्हाय. ह्येमा तर बावीस वर्षाची हाय... म्हंजी मेजर होवून आनिक चार वर्सं. वरतून पंधरावी पर्यंत शिकल्याली. काय करावं? शेवटी ईचार केला आन् डायरेक्ट ईजयरावला भेटाया त्याचंच घर गाठलं.
ईजयरावच्या घरी त्यानं केलेलं आदरातिथ्य आन् त्याचं येकूनच वागनं बगून माजा राग यकदम निल झाला अन् त्याची जागा कव्तुकानं घेतली. मी काय बोलाया आलतो आन् काय ईचारून बसलो. ईजयरावनं केलेल्या चहाचा पहिला घोट घेऊन झाल्यावर माझ्या तोंडून आपसूकच निघुन गेलं, “ईजयराव आमची ह्येमा तुमाला कशी वाटती? लग्नाच्या दृष्टीनं ईचारतोय मी?” ईजयरावला बी ह्ये ऐकून जोराचा ठसका लागला. खरं तर आपन ह्ये काय विचारलं ह्याचा मला बी धक्का बसला होता पर त्यो पानी पिवून घेईपर्यंत म्या बी सोताला सावरून घेतलं.
पर धा मिनीटातच फुडची बोलणी झाली. त्यालाबी आमची ह्येमा आवडत व्हतीच की, पर आव आनून म्हनतोय कसा, “या गावात तुम्हीच माझे गॉडफादर आहात. तुम्हाला वाटेल तसं करा. तुमच्या शब्दा बाहेर मी नाही.” म्या मनात म्हंटलं - आरं लब्बाडा उद्या हेमाचा नाद सोड म्हंटलं तर माजा सबूद राखशील व्हय. पर आता ह्ये सगळं बोलून उपेग न्हवता. पुढंच्या गोष्टीत आपला कंट्रोल ठिवनं महत्त्वाचं. त्यादृष्टीनं मी त्याला ईचारलं, “ ईजयराव, आता तुमच्या घरच्यांशी आदी तुम्ही बोलुन घेताय न्हवं, म्हंजी रीतसर बोलनी कराया आम्हाला येता यिल. आन् ह्येमा आमची येकुलती येक लेक. तिच्याकरता ह्ये यवढं साम्राज्य हुबं केलं, त्ये काई म्या सोबत तर घिवून जानार न्हाई. ह्यो सगळा प्रपंच तिनं अन् तुमीच तर सांबाळायचाय. तवा तुमी आमचे घरजावै हु शकलात तर दूदात साकर.”
यावर ईजयराव यकदम गप्पच झाले. पाच मिन्ट तशीच शांततेत गेली. मलाबी काईच सूचंना. मायला कोन आपला सबूद खोडून काडला, ईरोधात गेला तर त्याला गप कसा करायचा याचे पन्नास प्रकार ठाव हाय मला. पन कोनी असा शांतच राह्यला तर त्याला बोलतं कसं करायचं ह्ये सालं आम्हाला कुनी शिकिवलंच न्हाई. शेवटी मी म्हंटलं, “ईजयराव तुमी असं गप का? आमचं काई चूकलं का?”
“नाही सरपंचसाहेब, तुम्ही जे बोललात ते एकदम योग्यच आहे. मला कळायला लागल्यापासून माझे आईवडील मी कधी पाह्यलेच नाहीत. मी अगदी लहान होतो तेव्हाच एका बस अपघातात दोघेही...(थोडं थांबून) शिक्षकी पेशाच्या निमित्ताने माझे वडील अमरावती सोडून पुण्यातल्या वडगावात स्थायिक झाले होते. त्यामुळे आमचे कुणी नातेवाईक जवळ नव्हतेच. शेवटी गावातल्या लोकांनीच वर्गणी काढून मिळालेल्या पैशातून माझा सांभाळ केला. पाचवीनंतर मलाच असं फुकटचं खायला कसंतरी वाटू लागलं म्हणून शाळा सुटली की मोकळा वेळ मिळेल तसा मी गावातल्या सगळ्यांची कामं करू लागलो. गावातल्या प्रत्येक घरीदारी माझा राबता सुरू झाला. पुढं शिक्षण संपवून मी नोकरी करायचं ठरवलं तसं माझ्या लक्षात आलं की मला गावात राहायची, गावातल्या लोकांमध्ये मिसळायची सवय झालीय. नोकरी निमित्ताने आठ ते पाच टेबलाला खिळून राह्यला मला जमणार नाही. मग मी गावातच करता येईल असा व्यवसाय टाकायचं ठरवलं. त्या दृष्टीने गावच्या केबल व्यावसायिकाच्या हाताखाली दोन वर्षं उमेदवारी केली. धंद्यातल्या सगळ्या खाचाखोचा समजून उमजून घेतल्या. आता स्वत:चा व्यवसाय सुरू करता येईल असं वाटलं पण गावात तसं करणं म्हणजे ज्याच्याकडे हे सारं शिकलो त्यालाच स्पर्धा करण्यासारखं होतं. मग एका प्रसंगानिमित्तानं पोलिस अधीक्षक श्री. घोरपडे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी तुमच्या गावात आणून तुमच्याशी भेट घडवून दिली आणि त्यापुढचं सारं काही तुमच्याच कृपाशिर्वादानं सूरळीत चालु आहे. ज्या घरात मी राहिलो, लहानाचा मोठा झालो ते वडगावातलं वडिलांनी बांधलेलं घर मी गावच्या विकासाकरिता शाळेच्या नावे करून आलो आहे. ह्यामुळे गावाने माझ्यावर केलेले उपकार काही अंशी तरी फिटतील असं मला वाटतं. घराण्याची ईस्टेट, वारसा म्हणावं असं आता माझ्याकडे काहीही नाही. आज जे काही माझं आहे ते सर्व इथे आहे तेवढंच. पण तरीही मी तुमचा घरजावई होण्यापेक्षा हेमांगीनेच इथं राह्यला यावं असं मला नम्रपणे वाटतं. अर्थात हेमांगी तुम्हाला तुमच्या घरी येऊन केव्हाही भेटू शकते. माझी काहीच हरकत असणार नाही.”
ईजयरावचं बोलनं मला बी पटलं. म्हंटलं माझ्याकडं तरी कुटं बापजाद्याचा पैका होता? म्हून तर बायकोला वाचवू शकलो नाही अन् त्या दु:खानं चिडून जाऊन तर आज ह्यो डोलारा हुबा केला. ईजयरावबी माज्यासारकाच शेल्फ्मेड परसन हाय तर म्या तरी त्याला इरोद कशापायी करावा? अन् असा सारासार ईचार करून म्या ईजयरावचं म्हननं मान्य केलं आन लग्नाची तारीक ठरिवली.
(भावूक होऊन) आज सांजला हेमा ह्या घरातून भायेर पडनार...तशी जवळच जानार असली तरी आता पूर्वीसारखा तिचा घरातला वावर र्‍हानार न्हाई... पन् ह्ये कदी ना कदी व्हनारच व्हतं. (डोळे पुसत) अन् जे घडनार व्हतं तेच जर घडत असंल तर दु:ख करण्यात तरी काय अर्थ आहे? उलट आता पोरीची आनंदानं पाठवनी केली पायजे. तिला आयची कमी जानवली नाय पाह्यजे.... आरं तिच्यायला म्या किती वेळचा बोलत बसलोय... अजून बरीच कामं आटपायला पाह्यजेत. घाई करायला हवी. (निघून जातो. रंगमंचावर अंधार)
(प्रवेश दुसरा: स्थळ तेच. प्रसंग: कामाची गडबड सुरू आहे. लोक धावपळ करताहेत. सामानाची मांडामांड करतायत. तेवढ्यात महिपतरावांचा भाचा श्रीपती प्रवेश करतो.)
श्रीपती : लईच जोराचा बार उडवून दिला जातुया. गावातली इतकी लग्न पाहिली पर यवडा थाट माट पैल्यांदाच बगतुया. पर काई म्हना मामासायेबांनी ह्ये काई झाक केलं न्हाई. यवड्या कष्टानं पै पै करून जमवलेली ही इश्टेट घरातल्या घरातच र्‍हायला नको का? कोण कुठला तो केबलवाला ईज्या... त्याला गावात येऊन वरीस झालं न्हाई तर त्याच्या हवाली ह्ये सगळं करताय? का पण असं का? आरं आमच्यात काय कमी हुती? घरजावई सुद्दा व्हायला तयार हुतो. तर म्हणतात कसे - शिर्‍या आमची ह्येमा ग्रॅज्वेट झालीय. पंधरा यत्तांचा पर्वत पार केलाया तिनं... तुमचं घोडं तर पाच यळा गटांगळ्या खावूनबी अजून मॅट्रीकची टेकडीसुदीक पार करू शकलं न्हाई. आता शिकून कुनाचं भलं झालंया? आनि ह्ये मामासायेबांना वेगळं समजवायची गरज हाय का? ते सोता तरी शिकल्याले हायत का? अंगठा बहादूर असूनबी त्यांनी यवडा पसारा वाडिवलाच ना? मग ह्यो च पसारा फुडं सांबाळायला त्यांचा हा भाचा बी तितकाच बहादूर हाय न्हवं? अन् त्यांचा ह्यो शिकलेला जावई तरी काय करतोय इंज्नेर होवून? शेवटी लोकांच्या छपरावरून ताराच खेचतोय न्हवं? असाच छपरी जावई हवा होता काय त्यांना? अरे माझं न्हाईतरी सोताच्या भैनीचं, तरी ऐकायचं ना? पन न्हाई माज्या मायला म्हनाले - आक्का अगं ही आजकालची तरूण पोरं.. त्यांच्या कलानीच आपण घ्यायला हवं. तिचं परेम हाय ईजयराव वरती. आता बोला. ही ह्येमा मला गेल्या ईस वर्षापासनं वळकतीया. ल्हानपनी माज्यासंगं ती खेळलीया. यवड्या वर्षांत तिला माज्याबद्दल परेम वाटलं न्हाई. आन् हा गडी गेल्या दिवाळीनंतर मंजे एक्जॅक्ट सांगायचं तर नोव्हेंबर २०१० मदी या गावात आला. आता चालु हाय जुलै म्हैना. येवड्या दिसांत काय परेम व्हतया? हां आता या नऊ म्हैन्यात दुसरं काई झालं असंल तर गोस्ट येगळी.
(श्रीपती चा मित्र झाकिर प्रवेश करतो)
झाकिर : म्हंजी शिर्‍या मामासाहेबांनी तुजाच मामा केला म्हण की...
श्रीपती : (त्रासिक चेहर्‍याने) झाकिर अखिर तूने भी दगा देही दिया ना. तुम भी दुश्मनोंसे जाकर मिल गए. गद्दार कही का. (दु:खी चेहरा करून) दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा
झाकिर : (आश्चर्याने) प्यार विषयी गायलास ते ठीक पण ह्या दोस्ताने तुला काय दगा दिला. उलट तूच आपली दोस्ती विसरलास. नाहीतर मला झाकिर अशी हाक मारली नसतीस. ल्हानपनापासूनच मैतर ना आपण शिर्‍या आणि खिर्‍या या नावांशिवाय एकमेकांना कधी हाक मारली न्हाई आपण. सगळा गाव पूर्वीपासून म्हणत आलाय “तोडेसे भी ना टुंटे भई यह शिर्‍या खिर्‍या की जोडी” आणि तू हा आज असा बिनसाखरेच्या शिर्‍यासारखा तोंड करून बसलायस.
श्रीपती : खिर्‍या अरे मामासाहेब जे वागले त्याचं तर वाईट वाटतंच. पण काही झालं तरी ते माझे नातेवाईक. नातेवाईक निवडणं माणसाच्या हाती नसतं. पण तू तर माझा दोस्त ना? मी सोताच्या मर्जीनं निवडलेला.. तूही असं वागावंस. तूला दुसरं कायबी काम मिळालं नाय का म्हनून त्या केबलवाल्याकडं कामाला लागलास?
झाकिर : अच्छा म्हंजी त्यामूळं तू माज्यावर नाराज हायेस व्हय? आरं पन मित्रा तुज्या मामांनीच मला तिथं कामाला लावलं. म्हनले, ’खिर्‍या दीसभर उकिरडे फुंकत बसतो. त्यापरीस ईजयरावासंगती काम कर. चार पैकं मिळतील. तुजे अब्बा अम्मी खूश व्हतील. तुज्या ल्हान भावंडांच्या खर्चापान्याला तेवडाच तुजा आदार वाटंल त्यांस्नी.”
श्रीपती : खिर्‍या तुला खरंच असं वाटतं की तुज्या अम्मी अब्बुला खूश करन्यासाठी मामांनी तुला काम दिलं. न्हाई गड्या मामा लई बेरकी हायेत. तुला तिथं कामाला लावल्यानी तुमच्या वस्तीतली सगळी कनेक्षन्स मिळविणं त्यांना सोपं गेलं. सोताच्या जावयाचाच फायदा बगितला मामासाहेबांनी. पक्के राजकारनी हाईत ते.
झाकिर : आसंल गड्या.. तसं बी आसंल. अर्थात परत्येक जन आपला फायदा बगनारच ना? त्यांनी त्यांचा बगितला. आपून आपला बगितला म्हंजी झालं.
श्रीपती : (कुत्सितपणे हसून) अस्सं? मग तुझा काय फायदा झाला तिथं राबून?
झाकिर : मित्रा माझा न्हाई पर तुजा फायदा तर नक्कीच व्हईल. आरं त्या ईज्याकडच्या सगळ्या शीड्या मी उचकून पाहिल्यात. आणि काय सांगू मित्रा? माझ्या हाती अशी यक शीडी लागलीया की ती बगून...पन तसं कशाला? थांब जरा आता मी आमच्या केबल ट्रान्समीटर कडे जातो आणि गावातल्या सगळ्या घरांमध्ये ती शीडी दिसेल अशी व्यवस्था करतो. मग बघ तो विज्या चतुर्भुजच व्हतो की न्हाई ते?
श्रीपती : (वैतागून) तो तसाही चतुर्भूजच व्हनार हाय. आज लगीन हाय न्हवं त्याचं?
झाकिर : आरं त्या अर्थानं न्हाई म्हणत मी. चतुर्भूज चा आणखी एक अर्थ होतो. विंग्रजीत काय म्हणतात ते - यॅरेष्ट.
श्रीपती : काय विज्याला अटक होईल? ती आणि कशी काय बुवा?
झाकिर : कान इकडे कर सांगतो.
(झाकिर श्रीपती च्या कानात काहीतरी सांगतो)
श्रीपती (आश्चर्याने कावराबावरा होऊन) : काय सांगतोस? माझा ईश्वासच बसत नाही.
झाकिर : बसेल. सोताच्या डोळ्यांनी समदं पाह्यलं म्हंजी नक्कीच बसेल. तुजबी आणि तुज्या मामांचाही. आता फक्त तू पंधरा मिनीटांत सगळ्यांना टीवी समोर एकत्र आण. तेवड्या येळात मी तिथे जाऊन शीडीचं ट्रान्समिशण चालु करतो.
(दोघेही वेगवेगळ्या दिशांना जातात. रंगमंचावर अंधार)
(प्रवेश ३ रा. स्थळ: वाड्याचा आतला दिवाणखाना. टीवीची पाठ प्रेक्षकांकडे असावी. प्रसंग - श्रीपती आणि महिपतराव प्रवेश करतात. श्रीपती महिपतरावांच्या धरून त्यांना बळेच टीवीपाशी नेतोय)
महिपतराव : शिर्‍या हा काय यडेपना हाय? लग्नाची गडबड सुरू आहे. अजून किती कामं करायची बाकी हायेत आन् तू मला टीवी बगायला काय सांगतोयस?
श्रीपती : मामासायेब. यडेपना तर यडेपना. पर आज माज्यासाटी तेवडा कराच. म्हंजी आपला जावई कसा हाय ते तरी तुमास्नी समजंल.
महिपतराव : अरे, आता एकाद्या च्यानलवर तो तसले पिक्चर दाकवीत असंलही बाबा. तेवड्याकरता तू माजं डोकं नको खाऊ. केबलचा धंदा म्हंटला की ह्ये सगळं आलंच. प्रेक्षकच असलं काही दाखवा म्हणून मागनी करतात. पब्लिक डिमांड पूरवावीच लागते. बाकी तू येवडा साळसूदाचा आव आणतोयस. तूही बगत असशीलच की. अरे तूला आता काय सांगायचं? (इकडे तिकडे बगत). ह्येमा झोपली की मी पण कधी मधी रात्री उशिरा तुमचा तो काय यफ टीवी..आणि ...
श्रीपती : (चिडून कपाळावर हात मारतो) अहो मामा, मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? आणि तुम्ही ह्ये काय भलतं सलतं बोलताय? वयाचं तरी काही भान आहे की न्हाई तुमास्नी? आदी तो टीवी लावा पाहू.
महिपतराव : (गडबडून) बरं बरं लावतो. कुठलं च्यानेल लावू?
श्रीपती : कुठलंही लावा हो. आता सगळीकडे एकच कार्यक्रम दिसणार. एव्हाना सगळ्या गावात बोंब झाली असणारच.
(महिपतराव टीवी चालु करून टीवी समोर येऊन उभे राहतात)
महिपतराव : ....आरं तिच्या हे काय?..... हे तर आपले जावईबापू दिसताहेत........ आन् ह्यो काळा माणूस कोण हाय? च्यामायला ह्यो फुडं धावतोय अन् आपले जावईबापू कुर्‍हाड घेऊन त्याच्या मागं मागं का धावतायत? (चेहर्‍यावरचा घाम पुशीत) आरं ह्ये काय झालं? त्याच्या छाताडावरच कुर्‍हाड हानली? (मोठ्याने) ईजयराव ह्ये काय केलंत तुम्ही?
(विजय आणि हेमांगी घाईघाईने प्रवेश करतात)
विजय : अरे हे काय? केबलवर हे काय भलतंच? ऑफिस मध्ये फोन लावतो. (फोनवरून) हॅल्लो, कोण? मिस्टर झाकिर अत्तार का? हॅल्लो तुम्ही चूकुन ही कुठली भलतीच सीडी लावली आहे? आणि कुठल्याही वाहिनीवरून तिच दिसतेय. आधी हे प्रक्षेपण थांबवा पाहू.
(महिपतराव पुढे येतात. रागाने विजयच्या हातातला मोबाईल खेचून घेतात.)
महिपतराव : (चिडून) खिर्‍या ट्रान्समिशण थांबलं न्हाय पायजे. उलट पुन्हा पुन्हा ह्योच कारेक्रम रिपीट व्हायला हवा. दुसरा कुठलाबी च्यानल दिसत कामा नये न्हाईतर माज्याशी गाठ हाये. (रागाने फोन जमिनीवर आपटतात.) अजून तरी गावात ज्यांच्याकडे केबलटीवी हाय त्यांनाच ह्यो णजारा बघाया भेटतोय. बाकीच्यांसाटी हितं आंगनातच मोठ्या पडद्याच्या यलशीडी टीवीवर हे दाखवायची सोय करतो आता मी.
विजय : (आश्चर्याने) सरपंचसाहेब हे काय भलतंच? अशा मंगलप्रसंगी असलं अभद्र चित्रीकरण दाखवणं योग्य आहे काय?
श्रीपती : वा वा वा. म्हणे अभद्र चित्रीकरण. तुमचं वागनं अभद्र न्हवं काय? त्या गरीबावर तुम्ही कुर्‍हाडीचे सात घाव घातलेत. नीट ध्यान देऊन मोजलेत मी. त्यो पार निपचीत पडल्यावरच दम घेतलात तुम्ही. आता तुमी करायचं आन् आमी दाकवायचं बी न्हाय का?
विजय: हे पाहा मिस्टर श्रीपतराव पाटील. तुम्हाला सत्य परिस्थिती ठाऊक न्हाई. लेट मी एक्स्प्लेन दि फॅक्टस.
श्रीपती: वो सायेब. आता लई विंग्रजी झाडू नगा सा. ह्यो गोर्‍यागोमट्या चेहर्‍याचा आणि सफाईदार बोलनारा मानुस परत्यक्षात कसा हाये ह्ये आमाला चांगलंच कळलंया. आता लोगांनाबी कळू दे की सरपंचांचा जावई कसा हाये ते?
महिपतराव: कोन जावई? कुनाचा जावई? हे लगीन कवाच मोडलं. असल्या खुन्याला मी माजी पोरगी देऊ व्हय. तरी मी ईचार करत होतोच की लग्नाला याच्याकडचं कुनीच कसं येनार न्हाई? बरोबर हाय अशा खुनी मानसाला मित्र तरी कोन असनार?
विजय : सरपंच साहेब. तुम्ही हे काय बोलत आहात? निदान मी काय म्हणतोय ते तरी ऐकून घ्या. अरे कुणीतरी समजावा ह्यांना. अगं हेमांगी तू तरी त्यांना काही सांग.
हेमांगी : विजय माझ्या फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दे. या शुटींग मध्ये कुर्‍हाडीने वार करणारा माणूस तूच आहेस की अजून कोणी? आणि हे शुटींग ऍज ऍक्चुअल आहे म्हणजे तो काळा माणूस खरंच मेलाय की ही एखादी तांत्रिक करामत आहे?
विजय : तो काळा माणूस वास्तवात मरण पावलाय आणि त्याला कारण मी त्याच्यावर कुर्‍हाडीने घातलेले घावच आहेत. या चित्रीकरणात कुठलीही तांत्रिक करामत नाही ते अगदी घडलं तसंच आहे. पण त्यावेळची परिस्थिती काय होती ते तरी ऐकून घे.
हेमांगी : यापुढे काही ऐकायचं आणि बोलायचं बाकी ठेवलं आहेस का? तू स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तरी नक्कीच त्या माणसाला ठार मारलेलं नाहीस. त्याला मारताना तुझ्या चेहर्‍यावर एक वेगळीच पॅशन दिसून येत होती. मी कल्पनाही करू शकत नाही तू इतका क्रूर कसा होऊ शकतोस? विजय आता यापुढं मला विसरून जा.
महिपतराव : ईजय. आमच्या हेमाचा फैसला ऐकलास ना? बस्स आता माझा फैसला ऐक. अरे कोणीतरी माझी बंदूक आणून द्यारे. (श्रीपती लगबगीने भिंतीवरची बंदूक आणून हातात देतो. ती ते विजयवर रोखतात.) आता भोग आपल्या कर्माची फळं. माझ्या हातनं मरायला तयार हो.
विजय : (अतिशय शांतपणे) हेमांगीनेही मला नाकारलंय तेव्हा माझ्यासारख्या अनाथ माणसाच्या मृत्यूने कोणालाच काही फरक पडणार नाही आणि मला स्वत:लाही आता जगायची काही इच्छा राहिली नाही. मी मृत्यूला हसत सामोरं जायला तयार आहे. पण त्याकरिता तुम्ही तुमचे हात कशाला खराब करून घेता? कारण मी मेल्यावर रडणारं कुणी नसलं तरी माझा खून केल्याबद्दल तुम्हाला फाशी झाली तर हेमांगीचं काय होईल? (महिपत राव बंदूक खाली करून विचारात पडतात) आणि मगाशी तुम्ही म्हणालात ते काही अगदीच खरं नाहीये. माझ्यातर्फे निदान एक व्यक्ति तरी विवाह समारंभाला नक्कीच हजर राहणार आहे. पोलीस अधीक्षक श्री. घोरपडे आता येतीलच. तुम्ही मला त्यांच्या स्वाधीन करा.
(इतक्यात पोलीस अधीक्षक श्रीयुत घोरपडे प्रवेश करतात)
घोरपडे : अरे हे काय? लग्न घरातच आलोय ना मी? पण तसं जाणवत का नाहीय? तुम्ही सगळे इतक्या गंभीर मुद्रेने का उभे आहात?
महिपतराव : या साहेब तुमचीच वाट पाहत होतो आम्ही सगळे.
श्रीपती (लगबगीने): याना साहेब असे इकडे टीवीसमोर याना. पाहा तरी हे काय चालु आहे टीवीवर.
(घोरपडे दोन मिनीटे टीवीसमोर नजर लावतात आणि पुन्हा हटवतात)
घोरपडे : पाह्यलं. बरं मग पुढे काय?
श्रीपती : (गोंधळून) पुढे काय? काय म्हणजे पुढे काहीतरी कारवाई करा ना...
घोरपडे : तुम्ही मला कारवाई करायला सांगताय. मग काय कारवाई करायची आणि कुणावर तेही सांगा ना. कारण हे सगळं मी यापूर्वीच पाहिलंय आणि त्यावर कार्यवाही देखील झालेली आहेच. आता पुन्हा काय करायचं असतं ते काही मला समजत नाहीये.
महिपतराव (आश्चर्याने): म्हणजे हे सगळं तुम्हाला आधीच ठाऊक होतं आणि तुम्ही त्यावर यॅक्शन बी घेतलीया?
घोरपडे : हे काय चाललंय मिस्टर विजय देशमुख? तुम्ही स्वत:च ही सीडी मला माझ्या कार्यालयात आणून दाखविली होतीत ना? मग या सगळ्यांना तुम्ही याविषयी काहीच का सांगितलं नाहीत?
विजय (उद्वेगाने) : सर आय ट्राईड माय बेस्ट टू एक्स्प्लेन देम दि ट्रूथ बट....आणि आता माझीच काही सांगायची इच्छा राहिली नाहीय. तुम्ही मला तुमच्या सोबत घेऊन चला. जाण्यापुर्वी मला इथे वर्षभर राहू दिल्याबद्दल आणि व्यावसायिक सहकार्य केल्याबद्दल समस्त गावकर्‍यांचे मी आभार मानु इच्छितो. सरपंचसाहेब, माझ्या इथल्या वास्तव्याच्या काळात माझ्या वागणुकीने मी जर कळत नकळत आपले मन दुखावले असेल तर आपली आणि आपली कन्या मिस हेमांगी पाटील यांची मी हात जोडून माफी मागतो. शक्य असेल तर माफ करा आणि विसरून जा. जस्ट फर्गिव्ह ऍन्ड फरगेट एवरीथिंग व्हॉट हॅपन्ड. चलतो मी. (श्रीपतीच्या जवळ जाऊन त्याच्याशी हस्तांदोलन करतो. हेमांगीकडे एक नजर टाकतो) तुमच्या भावी आयुष्याकरिता मनापासून शुभेच्छा श्रीपतराव! बराय चलतो मी. (विजय आणि घोरपडे बाहेर जायला निघतात आणि नेमका त्याचवेळी झाकिर त्यांच्या समोर येतो. विजय त्याचा हात हातात घेतो आणि दुसर्‍या हाताने खांद्यावर हलकेच थोपटतो) मिस्टर झाकिर अत्तार बरं झालं तुम्ही आलात. मी चाललोय यांच्याबरोबर इथून कायमचाच. आता आपला व्यवसाय यापुढे तुम्ही लोकांनीच चालवायचा बरं का. मी तुमची यापुढे काही मदत करू शकेल असं मला वाटत नाही. माझं काही चूकलं असेल तर मला माफ करा. जस्ट फर्गिव ऍन्ड फरगेट एवरीथिंग व्हॉट हॅपन्ड. आणि हो... आजच्या प्रक्षेपणाबद्दल तर तुमचे विशेष आभार. त्यामुळे मला माझा भावी मार्ग निवडायला फारच मदत झाली. (घोरपडेंकडे वळून) चला सर आपण निघुयात.
घोरपडे : एक मिनीट. खिर्‍या त्या शुटींगशी तुझा काय संबंध?
झाकिर : (कॉलर ताठ करत) असं काय ईचारता साहेब? अहो मीच तर जीवावर उदार होऊन ते शुटिंग केलं ज्यामुळे तुम्ही या खुन्याला पकडू शकला आहात. आता घेऊन जा याला आणि चढवा सरळ फासावर.
घोरपडे : बरं खिर्‍या मला असं सांग तू हे शुटींग केव्हा केलंस? आणि कुठं केलंस
झाकिर : हे हे आत्ताच ... (इकडे तिकडे बघत) म्हणजे गेल्या आठवड्यात.... आपलं हे ते गेल्या महिन्यात...
घोरपडे : नक्की का? की गेल्या साली?
झाकिर : (पुन्हा इकडे तिकडे पाहतो) असेल असेल गेल्या सालीच केलं असेल.
घोरपडे : (झाकिरच्या थोबाडीत एक सणसणीत चपराक ठेऊन देतात. झाकिर खाली पडतो.) माणुस मरत असताना तू शुटींग करत होतास काय? त्याला वाचवायचा प्रयत्न का केला नाहीस? आणि एक वर्षंभर कुठं मुका होऊन राहिला होतास? तूदेखील खूनी व्यक्तिचा बरोबरीचा भागीदार आहेस. खूनी माणासाला फाशी द्यायची तर मग तुलाही तीन वर्षं सक्तमजूरी व्हायला हवी. (झाकिर उठू उभा राहू लागताच पुन्हा एक थोबाडीत लगावतात.)
झाकिर (कळवळून): नाही साहेब मी शुटींग केलं नाही. मी फकस्त शीडी ट्रान्शमिशन केली. ती शीडी मला विजयसाहेबांच्याच कपाटात मिळाली.
महिपतराव : यस्पी सायब हा सगळा परकार काय हाय? मला तर काहीच समजत नाहीये.
घोरपडे : दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी पोलिस अधीक्षक म्हणून पुणे ग्रामीणचा पदभार स्वीकारला तेव्हा देहूरोड परिसरात महाबली आणि त्याच्या गॅंगने भयंकर थैमान घातले होते. पोलिसांनी एकदा त्याला पकडलेही होते. त्याच्यावर खटला चालविला जाऊन त्याचा दोष सिद्ध झाला आणि न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पण हा महाबली काही दिवसातच कारागृहातून पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर त्याला जिवंत किंवा मृत पकडून देणार्‍याला एक लाख रूपये ईनाम जाहीर झाले. ह्या महाबलीची वडगावात लपण्याची एक जागा होती. तिथे तो ठराविक काळाने जात असे. वडगावातल्या लोकांनी त्याला पाहिले आणि त्याच्या डोक्यावर ठेवलेले ईनाम मिळवायचे ठरविले. महाबलीला जिवंत पकडणे शक्यच नव्हते. तेव्हा त्याला ठार मारावे लागणार हे उघड होतेच. पण त्याला ठार मारले तरी त्याच्या गॅंगमधले इतर गुंड बदला घेतील या भीतीने गावातली माणसे पुन्हा मागे हटली. तेव्हा एका सुशिक्षित पण अनाथ तरूणाने महाबली भल्या पहाटे जेव्हा प्रातर्विधीला बाहेर पडला तेव्हा तो नि:शस्त्र असल्याची खात्री करून कुर्‍हाडीच्या साह्याने ठार मारले. सरकारी ईनाम मिळवायला काही अडचण येऊ नये म्हणून या घटनेचे आपल्या मित्रामार्फत चित्रीकरणही करून घेतले. दुर्दैवाने ते तुम्ही आज बघितले आणि भलताच गैरसमज करून घेतला. ईनाम मिळाल्यावर मीच विजयला वडगाव सोडून जाण्याचा सल्ला दिला. महिपतराव, तुम्ही विजयला ठार मारायला निघाला होतात असं तुमच्या हातातल्या बंदुकीवरून दिसतंय. हा विचार तुम्ही वेळीच बदललात ते बरंच झालं. कायद्यानुसार तुम्हाला शिक्षा झाली असतीच. पण तुमच्यासाठी रडणारं देखील कोणी राहिलं नसतं. साधा विचार करा ना की जि केवळ खूनी असल्याच्या संशयावरून आपल्या प्रियकराला सोडून देऊ शकते ती तुमची मुलगी, तुम्ही एका निरपराध व्यक्तिचा खून केल्यावर तुम्हाला तरी माफ करू शकली असती काय? याशिवाय गावच्या भल्यासाठी सदैव तत्पर असलेल्या, कुणाचं कुठलंही काम करायला कायमच तयार असलेल्या मनमिळावू स्वभावाच्या विजयला जर तुम्ही मारलं असतंत तर त्याच्या गावच्या लोकांनीही तुम्हाला कधीच माफ केलं नसतं. आजही सारे त्याच्या विवाहाकरिता इकडे यायला अतिशय उत्सुक होते पण आपल्या या कृतीनं महाबली गॅंगला विजयचा पत्ता समजेल म्हणून ते स्वत:ला अत्यंत नाईलाजाने आवर घालताहेत. विजयशी संपर्क ठेवत नसले तरी त्याची सर्व खबर ते माझ्यामार्फत माहीत करून घेतात. आज ते इथे नसले तरी या मंगल प्रसंगानिमित्तानं गावात मोठा समारंभ आयोजिला आहे. मी देखील इथलं कार्य आटोपून तिकडेच जायचं ठरवलं होतं.
विजय : सर मला वाटतं, मी ही तिकडंच जायला हवं. त्या लोकांना मला पाहून अतिशय आनंद होईल. चला आता आपण जास्त उशीर करून चालणार नाही.
महिपतराव : उशीर तर झालाच आहे जावईबापू. चला पटकन मुहूर्ताची वेळ टळण्याआधी सारे विधी उरकून घेऊ.
विजय : जावई? कोण जावई? कुणाचा जावई? ते नातं तर तुम्हीच आता काही वेळापूर्वी संपवलंत.
हेमांगी : विजय असं काय बोलतोस? आमची चूक झाली खरी. पण ती केवळ गैरसमजातून. आम्हाला माफ करणार नाहीस का?
महिपतराव : (श्रीपती आणि झाकिरचे कान धरून) या कडवट शिर्‍यानं आन् नासक्या खिर्‍यानं डाव रचला आन् आमी त्यात फसलो. आमचीबी चूकी झाली पर तुमी आमास्नी माफ कराया हवं ईजयराव. आवो आमची ही हेमा यवडं शिकलं पन कसं तर कालिजात न जाता, फकस्त घरी बसून, बुकं वाचून. मानसं वाचायला शिकलीच न्हाई. शिकला सवरलेला हुशार मानूस तिनं गावात बघितलाच नाही. तिला भेटलेले तुमी पयलेच सुशिक्षित मानूस, बिचारी तुमास्नी समजू शकली न्हाई. यात तिचा काय दोष? माझं म्हनाल तर मी यकदम अंगुठाछाप मानुस. रांगडा शेतकरी गडी. माजं डोकं ते काय असनार. आपली सगळी अक्कल हुशारी गुढघ्यात. चटकिनी तापतंया अन् तेवड्या बिगी बिगी थंड बी व्हतंया. आता मला माफ करा. (डोक्यावरचा फेटा हातात घेऊन खाली वाकतो) पोरीच्या बापाची लाज राखा. मी काई तुमच्या वानी शिकला सवरलेला न्हाई पन तुमी मगा काय म्हनलात ते चांगलं ध्यानात हाय माज्या. तवा आता आमाला माफ करा अन् झालं गेलं इसरा. जस्ट फर्गिव्ह ऍन्ड फरगेट यवरी थिंग व्हाट हॅपन्ड.
(विजय महिपतरावांचा हात हाती घेतो आणि त्यांचा फेटा पुन्हा डोक्यावर ठेवतो. हेमांगी देखील त्याच्या शेजारी येऊन उभी राहते.)
घोरपडे : मिस्टर विजय शेवटी तुम्ही यांच्या डावाला बळी पडलातच ना?
विजय (आश्चर्याने) : म्हणजे मी काही समजलो नाही.
घोरपडे : तुम्ही शेवटी चतुर्भुज झालातच ना? अर्थात पोलिसांकडून नाही पण हेमांगीकडून.
(सारे हसतात. विजयही त्यांच्यात सामील होतो.)

नाट्यमौजमजा

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

18 Jul 2011 - 3:51 am | इंटरनेटस्नेही

फॅन्टास्टिक!

स्वैर परी's picture

18 Jul 2011 - 12:40 pm | स्वैर परी

मस्त लिखाण! :)

RUPALI POYEKAR's picture

18 Jul 2011 - 2:46 pm | RUPALI POYEKAR

मस्तच, मज्जा आली वाचून

गणेशा's picture

18 Jul 2011 - 8:51 pm | गणेशा

छान लिहिले आहे एकदम

चेतन सुभाष गुगळे's picture

19 Jul 2011 - 9:02 am | चेतन सुभाष गुगळे

ऋषिकेश चिंदरकर
तृप्ती दळवी
रुपाली पोयेकर
आणि
गणेशा

आपणा सर्वांचे आभार

https://sites.google.com/site/jalarangaprakasana/announcements/jalavani2...

वर उल्लेख करण्यात आलेल्या जालीय अंकात प्रकाशित करण्यासाठी चतुर्भुज नाटकाचे नाट्यवाचन करून त्याचे ध्वनिमुद्रण करण्याची योजना आहे. यास्तव नाटकातील सहा पात्रांना आवाज देण्या करिता हौशी कलावंतांची आवश्यकता आहे.

इच्छुकांनी व्यक्तिश: संपर्क साधावा.

धन्यवाद.