चला शिकागोला ...

मर्द मराठा's picture
मर्द मराठा in कलादालन
14 Jul 2011 - 10:54 am

शनिवार रविवार जोडून सुट्टी आली की.. कपाटातल्या 'ब्यागा' उड्या मारायला लागतात...उगाचच कॅमेरा फ्लॅश मारतो आहे असे वाटायला लागते... पोटापाण्यासाठी मायदेश तात्पुरता सोडावा लागला तरी भटकण्याची खुमखुमी स्वस्थ घरी बसून देत नाही. अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन ४ जुलै आणि तोही सोमवार म्हटल्यावर दोन आठवडे आधीच सहचारीणीशी मसलत करून गूगल नकाशावर स्थळ दर्शन सुरु झाले.... आम्ही राहतो रिचमंड, व्हर्जिनिया येथे गेली ३.५ वर्षे... त्यामुळे एक मोठ्ठ्या परिघातली सगळी शहरे, गावे, डोगंररांगा, समुद्रकिनारे पाहून झाले आहेत... म्हणून परिघाबाहेर जाणे क्रमप्राप्त होते... तेही विमान खर्चाची चाट खिशाला बसून न देता... परीघा बाहेरची दोन ठिकाणे ठरली ती म्हणजे बोस्ट्न आणि शिकागो ... बर्‍याच काथ्याकूटानंतर शिकागो ठरले...

शिकागो म्हणजे ८०० मैल लांब (~१३०० कि.मी.).... म्हणून अजून आधी नंतर एकेक दिवस रजा टाकली.
जाताना वाटेतले पिट्सबर्ग करायचे म्हणजे एक रात्रीचा थांबा आणि देवदर्शन (तिथली हिंदू देवळे प्रसिध्द आहेत) दोन्ही करता येईल असे ठरले.

हे पहिले मंदिर --> हिंदू-जैन मंदिर, पिट्सबर्ग - एकवीस वर्षे जुने असे हे मंदिर 'नाग्रदी' स्थापत्यशास्त्रानुसार बांधले आहे (संदर्भः मंदिराचे संकेतस्थळ)

श्री वेंकटेश्वर मंदिर - हे पस्तीस वर्षे जुने असून वेंकटेश्वराची मुर्ती मंदिराच्या मध्यभागी गर्भगृहात आहे. इथे मंदिरात पुजारीकाकांनी जातीने प्रत्येक परिवाराकडून गोत्रादी चौकशी करून पुष्पांजली मुर्तीला वाहिली, हा अनुभव खरच सुखद होता.

मंदिराचे दर्शन आटोपून शिकागोच्या दिशेने प्रवास सुरू केला... अजून ८ तासांचा पल्ला गाठायचा होता...
रात्री ११-१२ च्या सुमारास शिकागोच्या मुक्कामी पोहोचलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी युनियन स्थानकात गाडी दिवसभरासाठी उभी करून (रास्त भाव आणि सुरक्षित म्हणून) शहरात फिरायला 'उडी आत/उडी बाहेर' बस पकडली.. ती अशा शहरात फिरायला बरी पडते म्हणुन आधीच तिकिटे काढुन ठेवली होती.... आणि केली शिकागोच्या भटकंतीला सुरुवात...

वाटेत भेटली 'म्हस'... म्हशीला शिंक आणायच्या प्रयत्नात आमची कार्टी...

लेकीला कबूल केल्याप्रमाणे पहिला थांबा 'मिलेनिअम पार्क' मधील क्राऊन कारंजी होता...

तिने मस्तपैकी चिंब भिजून घेतले...

इथे तर भिजायला आबालवॄध्द् जमलेले... जत्रेचे स्वरूप आले होते...

भिजून-सुकून, पोटपुजा आटोपून जॉन हॅनकॉक ह्या १०० मजली इमारतीच्या दिशेने आम्ही निघालो...
संध्याकाळी जॉन हॅनकॉक इमारतीवरून संध्याप्रकाशात हळूहळू प्रकाशमान होणारे शिकागो....

थोडा अजुन वेळ थांबून टिपलेले रात्रीचे शिकागो....

हा तर थोडाफार मुंबई-मरिन लाईन्स चा राणीच्या चमचमत्या कंठ्हारासारखा वाटला...

दुसर्‍यादिवशी शिकागो मधील सर्वात उंच इमारतीवर (विलीस टॉवर्स्/सीअर्स टॉवर्स्) स्वारी केली... एकशे तिसर्‍या मजल्यावरून काढलेली ही काही छायाचित्रे ..

आणि हे त्या इमारतीचे खालून घेतलेले छायाचित्र... ह्या इमारतीचे स्थापत्यकार फाजलर खान नावाचे गृहस्थ आहेत हे समजून थोडे आश्चर्य वाटले... ह्या इमारतीची रचना सिगारेटसच्या बंडलावरुन योजलेली आहे... खालील छायाचित्रावरून ते स्पष्ट होतेय. मधल्या दोन सिगारेटस सर्वात उंच आहेत...

नंतर 'उडी आत/उडी बाहेर' बसमधून शहर पाहीले... मुख्य आकर्षण होत्या स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या विविध इमारती...

ही एका महिला स्थापत्यकाराने (जीन गँग) आकारलेली सर्वात उंच इमारत (अ‍ॅक्वा) ...

शहरात फिरताना जाणवले की इथे ही पुतळ्यांची कमतरता नाही...

संध्याकाळी ५.३० ची शिकागो स्थापत्यशास्त्र संस्थेच्या नौकेने सैर केली.. ही नौकानयन व्यवस्था ह्या संस्थेने शिकागोमधील विविध इमारती आणि त्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व पर्यटकांना दाखवण्यासाठी कार्यरत ठेवली आहे.

नौकाविहार आटोपून आम्ही मोर्चा वळवला 'ढग द्वार' (क्लाउड गेट) कडे...

हा स्थापत्याचा अविष्कार जन्माने भारतीय असलेल्या ब्रिटनस्थित स्थापत्यकार अनीश कपूर ह्यांनी केलेला आहे...
वजनाने ११० टनी असा हा स्टेनलेस स्टीलचा 'दाणा' शिकागोच्या मध्यवर्ती भागातील मिलेनिअम बागेत आहे.

ही मिलेनिअम बागेतली अजुन काही स्थापत्ये ...
'जे प्रित्झेकर सभागृह'...

'क्राऊन कारंजे'...

शेवटच्या दिवसाची सकाळ... पुन्हा एकदा 'स्टीलचा दाणा' पाहायचा मोह आवरला नाही...

आता फिरायचे राहिले होते ते 'झगमगत्या मैलभर रस्त्या'वर (magnificient mile)
मायलेकी हर्शेस आणि चिराडेली मधे बर्‍याच वेळ रमल्या...

हर्शेस मधे लेकीची चंगळ झाली ... चॉकोलेट्स (चकट्फू) आणि 'गांधी' टोपी मिळाली ... मग काय लगेच पोज द्यायला तयार..

आणि चिराडेली मधले आईस्क्रिम ...

शेवटच्या दिवसाचे शेवटचे आकर्षण होते ते ... अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचे आणि आतिषबाजीचे ... मग आमचा कबिला पोहोचला .. 'नेव्ही धक्क्या'वर.... इथे अलोट गर्दी झाली होती फटाक्यांची आतिषबाजी पाहायला....

थोडा वेळ असल्याकारणाने लेकीची आवडती रिंगणझुल्यावरची स्वारी झाली....

गर्दीचा अंदाज गेल्या वर्षीपर्यंत आलेल्या लोकांनी लिहीलेल्या प्रवासवर्णनावरून आला असल्याने आम्ही आधीच 'फटाका विशेष' नौकेचे (fireworks cruise) आरक्षण केले होते...

रात्रीचे ९ वाजले होते, सुंदर संधीप्रकाशात दूरवर शिकागो चमचमत होते...

आमच्या नौकेच्या कप्तानाने आमची नौका अगदी मोक्याच्या जागी आणून स्थिर केली.. बोटीवर छान संगीत चालू होते ... काही वेळातच तो प्रकाशसोहळा सूरू झाला ...

शेवटची निरोपाची आतिषबाजी तर डोळ्यांचे पारणे फिटवणारी होती...

शिकागो नजरेत साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो... ह्यावेळेस मधे थांबा घेणार नसल्यामूळे सकाळी लवकर निघालो... आणि मजल दरमजल करत (४ राज्ये) पार करत रात्री रिचमंडला सुखरुप पोहोचलो.

आमच्या गाडीने ५०००० मैलांचा दगड पार केला ह्या सफरी दरम्यान... आणि ह्या रिचमंड-शिकागो-रिचमंड प्रवासाचे असे १७४३ मैल (२८०५ कि.मी.) कापले होते.

'ब्यागा' पुन्हा आत गेल्यात... पुढच्या 'लांब सप्ताहांता'ची वाट पाहात....

प्रवासछायाचित्रण

प्रतिक्रिया

घर बसल्या शिकागोची उत्तम सफर...... (विना सफरींग

धन्यवाद मर्द मराठासाहेब!

सोत्रि's picture

14 Jul 2011 - 2:12 pm | सोत्रि

शिकागोची घरबसल्या झालेली सफर आवडली.
आतिषबाजी बघुन मला जपानमधल्या हानाबी ची आठवण जागी ज़ाली आणि माझ्या पुढच्या धाग्याची तयारी झाली, धन्यु.

- (आतिषबाज) सोकाजी

सोत्रि's picture

14 Jul 2011 - 2:14 pm | सोत्रि

प्रतिसाद चुकुन दोनदा सबमीट झाल्यामुळे. प्रकाटाआ!

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jul 2011 - 2:20 pm | परिकथेतील राजकुमार

शिकागो दर्शन आवडले.

आपल्या कन्येला पाहून बिकांच्या कन्येची आठवण झाली.

चतुरंग's picture

14 Jul 2011 - 9:01 pm | चतुरंग

सर्वच चित्रे अत्यंत स्पष्ट आणि सुरेख आली आहेत.

तुमच्या कन्येला पाहून बिकांच्या कन्येची आठवण झाली - असेच म्हणातो.

('हर्षे'भारित)रंगा

कच्ची कैरी's picture

14 Jul 2011 - 3:02 pm | कच्ची कैरी

सर्वच फोटो एकापेक्षा एक आहेत ,व्वा !! एकदमच छान ,आवडले :)

पियुशा's picture

14 Jul 2011 - 4:03 pm | पियुशा

मस्त्,अमेझिन्ग फोटो आहेत :)

विलासराव's picture

14 Jul 2011 - 5:40 pm | विलासराव

खुप आवडली.
धन्यवाद.

प्रभो's picture

14 Jul 2011 - 7:04 pm | प्रभो

भारी!!

प्राजु's picture

14 Jul 2011 - 8:35 pm | प्राजु

मस्त सफर! मस्त वर्णन.

पिंगू's picture

15 Jul 2011 - 3:25 am | पिंगू

सफर आवडली..

- (कधीतरी भटकणारा) पिंगू

राजेश घासकडवी's picture

15 Jul 2011 - 3:30 am | राजेश घासकडवी

शिकागोची स्कायलाइन बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या...तो चमचमता रत्नहार म्हणजे प्रसिद्ध लेक शोअर ड्राइव्ह. मात्र काही नवीन गोष्टीही बघायला मिळाल्या (पूर्वी तो स्टीलचा दाणा आणि ते फाउंटन नव्हतं)

फोटो छान आलेले आहेत - विशेषतः संध्याकाळी हळुहळू प्रकाशमान होणारं शिकागो आवडलं.

बहुगुणी's picture

15 Jul 2011 - 4:05 am | बहुगुणी

आठवणी जाग्या केल्यात, छान वृत्तांत आणि फोटो.

मीनल's picture

15 Jul 2011 - 4:16 am | मीनल

एकदा जायलाच हवे. मस्तच आहे वर्णन.

मस्तच आलेत फोटो!
सगळ्यात चांगला कोणता असे ठरवता आले नाही.
अ‍ॅक्वा इमारत छानच!
भरपूर ड्रायव्हिंग झाले तुमचे!

मस्त फोटो आणि माहिती, सगळ्यात आवडला तो शेवटचा फोटो १७४३ मैलाचा, जाम मजा येते ना असे लांब लांब ड्रायव्हिंग करायला. मागच्या वर्षी मी पुणे ते गोवा विनाथांबा केलं होतं त्याची आठवण आली. गाडी कोणती आहे तुमची ?

या सफरीमधले गाडिबद्दलचे अनुभव टाकता काय ?

मर्द मराठा's picture

20 Jul 2011 - 5:33 am | मर्द मराठा

धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल..

लांब लांब गाडी चालवण्याची आवड आहे मला... भारतात तितके जमले नाही जास्त पण इकडे खूप चालवलीय आतापर्यंत... तुमच्या सारखे विना थांबा चालवणे भारतात जरा कठीण वाटते पण प्रयासाने जमेल बहुतेक..

आमची गाडी होंडा सीआरव्ही आहे २००८ सालची.. कोणत्याही गाडीशी तुलना करत नाही पण आतापर्यंत चालवलेल्या गाड्यांमधे सर्वात आरामदायक (चालवायला आणि बसून प्रवास करायलाही), तीन जणांच्या कुटुंबासाठी ऐसपैस, सामानाला भरपूर जागा, दणकट इंजिन असलेली अशी वाटली.

शिकागोला जाताना/येताना अपे़क्षेप्रमाणे चालवताना कसलीही अडचण आली नाही.. अगदी विनाथांबा गेलो नाही.. दर २-३ तासांनी ५-१० मिनिटांचा विराम घेत केले.. जाताना आणि येताना जास्तीत जास्त म्हणजे सलग ४ तास चालवली असेन (४००-४५० कि.मी) (बायको आणि मुलगी झोपली की माझी आवडती गाणी लावून) .. पण हायवे असल्याने काही जाणवले नाही. मी शक्यतो क्रुझ कंट्रोल वर न टाकता चालवतो.. माझ्या अनुभवाने जास्त इंधन बचत होते. गाडीने बरी म्हणजे १२-१२.५ किमी प्रती लीटर इतकी सरासरी दिली.

ही जाताना-येतानाची गोष्ट. शिकागो शहरामधे गाडीने फिरण्यापेक्षा ती मध्यवर्ती ठिकाणी पार्क करून सोयिस्कर अशा कधीही उतरता आणि चढता येणार्‍या बस मधून फिरणे पसंत केले. नाहीतर पार्किंगला जागा शोधता शोधता नाकी दम आला असता आणि खिशालाही परवडले नसते.

प्रवासवर्णन , फोटो सर्वच मस्त ... पण मला मनापासून सांगावसं वाटतंय की मला तुमची प्रवासाची रूपरेषा / आखणी ( itinerary/planning) फारफार आवडली. परिघातल्या प्रवासांचे वर्णन देखील येऊ द्या.

मर्द मराठा's picture

20 Jul 2011 - 5:44 am | मर्द मराठा

धन्यवाद.. प्रवासाची आखणी करायची आवड आणि सवय बर्‍याच आधीपासून लावून होती.. भारतात असताना नकाशे, एम एस एक्सेलवर दिनवारानूसार काय पाहायचे ते ठरवत असे... आता स्मार्ट्फोनने कागद कमी केले आहेत. ;-)
इकडे तर एकदा गेलेल्या स्थळी परत जाता येईलच असे नसते.. तेव्हा मिळालेल्या २-३ दिवसांचा जमेल तितकी योग्य स्थळे (पूर्ण कुटुंबाला आवडेल अशी) पाहायचे ठरवून बाहेर पडतो ..

नक्की प्रयत्न करतो ..इतर प्रवास वर्णने सचित्र टाकायचा...

अंतु बर्वा's picture

18 Jul 2011 - 8:45 am | अंतु बर्वा

छान फोटोज... स्पेशली शेवटचा, तो पाहुन आमच्याही शिकागो रोडट्रिप ची आठवण आली...

मर्द मराठा's picture

20 Jul 2011 - 6:46 am | मर्द मराठा

धन्यवाद.. तुमचीही सफर आवडली..
हो पण मित्रांबरोबर जाणे आणि कुटुंबकबिल्याबरोबर जाणे बराच फरक आहेना राव.. मित्रांबरोबर कैफ सोबत असतो.. कुटुंबाबरोबर जबाबदारी अविरत साथ असते. :-) हो की नाही ?

अंतु बर्वा's picture

21 Jul 2011 - 2:26 am | अंतु बर्वा

नक्कीचं... मित्रमंडळी म्हणजे कुठेही थांबा, कितीही वेळ घालवा आणी मुख्य म्हणजे प्लानींग करायची गरज नाही...
पण आम्हीसुद्धा आता लवकरच तुमच्या क्लबात पाउल टाकणार असल्याने प्लानींग करायची सवय लावुन घ्यावी लागणार आहे. :-)

दीप्स's picture

19 Jul 2011 - 2:42 pm | दीप्स

नमस्कार मर्द मराठे साहेब, आपण प्रदेशात राहून देखील आपले मराठी खूप चांगले आहे . आपले लिखाण सुद्धा छान आहे. पण तुमच मराठी वरच प्रभुत्व आवडले बरका. जसे सहचारीणी, कार्टी..., 'ढग द्वार' (क्लाउड गेट) ,स्टीलचा 'दाणा' , 'फटाका विशेष' नौकेचे (fireworks cruise), रिंगणझुला हे शब्द अतिशय आवडले आणि हो 'उडी आत/उडी बाहेर' हा काय प्रकार आहे ते नाही समजले. कृपया याचे विश्लेषण करावे. आणि हो आपल्यामुळेच घरबसल्या शिकागो दर्शन झले. अजून एक आपले फोटो अजून प्रकाशित करावे. तसेही ते मी माझ्या शेजारच्या म्याडम कडे ते पहिले आहे. परंतु दुसर्यांना देखील त्याच लाभ मिळावा अशी आग्रहाची विनंती

मर्द मराठा's picture

20 Jul 2011 - 6:02 am | मर्द मराठा

मी मराठी माध्यमातून दहावीपर्यंत शिकलोय.. आणि आजन्म जरी भारताबाहेर राहिलो तरी कधीही मराठी शब्द आठवायला कमी पडणार नाही ह्याची खात्री आहे. :-)

'उडी आत/उडी बाहेर' म्हणजे... 'hop on-hop off' बस.. अमेरिकेत मोठ्या शहरांमधे पर्यटन करताना उघड्या टपाच्या बसने प्रवास करणे सोयिस्कर पडते.. शहर पाहताना कोणत्याही थांब्यावर उतरून.. त्याच तिकिटावर त्याच संस्थेच्या दूसर्‍या बसने पून्हा आपण प्रवास करू शकतो. हे तिकिट आपल्या सोयीनूसार हवे तितक्या दिवसांचे घेता येते.

शक्य तितकी सचित्र प्रवासवर्णने लिहायचा प्रयत्न करतो. आपल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

मराठे's picture

20 Jul 2011 - 11:49 pm | मराठे

hop on-hop off = तळ्यात मळ्यात बस ;)

स्मिता.'s picture

19 Jul 2011 - 3:05 pm | स्मिता.

छान फोटो आहेत. घरबसल्या शिकागोची सहल झाली.

घरबसल्या शिकागो दर्शन झाले त्याबद्दल धन्यवाद

स्वाती दिनेश's picture

20 Jul 2011 - 3:57 pm | स्वाती दिनेश

सफर छान झालेली दिसतेय..
स्वाती

मॅन्ड्रेक's picture

24 Jul 2011 - 1:12 pm | मॅन्ड्रेक

मस्त..