मराठीतील पहिली गझल

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
12 Jul 2011 - 1:29 pm

मराठीतली पहिली गझल

डॉ. बिरुटेसरांनी सांगितले म्हणून मध्वमुनिश्वर व अमृतराय यांची एकदमच ओळख करून देण्याचा विचार होता. पण त्या आधी अमृतराय यांचा एक विशेष नमुद करावासा वाटतो. हा मराठीतला पहिला गझलकार. इतके दिवस हा मान मोरोपंत पंडितांना दिला जात होता. त्यांची " रसने न राघवाच्या थोडी यशात गोडी " ही पहिली गझल मानली जात होती. त्यावरून छंद-- रसना जाती असे नावही पडले. पण अमृतराय (१६५८-१७५३) हा मोरोपंतांना (१७२९-१७९४) ज्येष्ठ असल्याने त्याची " जगव्यापका हरीला नाहीं कसें म्हणावे " हीच मराठीतली पहिली ज्ञात गझल म्हणावयास पाहिजे.

मला स्वत:ला या छंद, जातीत काही फारसा रस नाही. " मारावा समरा जनास समरा ताराप ताराप गा " शाळेत शिकलो तेवढे बास या मताचा मी. त्यामुळे या गझला किती शास्त्रशुद्ध आहेत ते मी तपासले नाही, नव्हे तो माझा अधिकारच नव्हे. तज्ञ त्या बद्दलची मते देतीलच. या काळी दक्षिणेत गझल हा काव्यप्रकार होता. या दोघांचा त्याच्याशी संबंध होता की नव्हता तेही कळण्यासारखे नाही. बहुधा नसावा. शिवाय या दोनही गझलांत विषय आहे " भक्तीभाव ". आपण आज पहातो त्या गझलांतील भावापेक्षा निराळाच. तेव्हा दोनही रचना देऊन मोकळे व्हावे हे बरे.

जगव्यापका हरीला

जगव्यापका हरीला नाहीं कसें म्हणावें !!धृ !!

तंतू पटी मिळाले भूमी नभापरी हो
घट-मृत्तिका निराळी ऐसें कसें म्हणावें !!

मुक्ता सतेज पाणी पुष्पीं सुगंध तो हा
मैलागिरी सुवासा नाहीं कसें म्हणावें !!

गौडी ती साखरेची पाखडितां नये वां
भिन्नत्व हेम-वस्तू ऐसें कसें म्हणावें !!

मी मानतो तुम्हांला तुम्हि ध्या श्रीपांडुरंगा
अमृतेश्वराचे भजनीं द्वैत कसें म्हणावें !! अमृतराय

(मैलागिरी--मलय पर्वत, पाखडिता नये -- साखर आणि गोडी निराळी करता येत नाही. हेम-वस्तू --सोने आणि अलंकार )

रसने न राघवाच्या थोडी यशांत गोडी !!धृ!!

निंदास्तुती जनांच्या, वार्ता वधूजनांच्या,
खोट्या व्यथा मनाच्या,काही न यांत जोडी !!

साधूंचिया सदातें, सुख देतसे सदा तें,
श्रवणीं सुधा, मदातें सोडूनि हात जोडी !!

विनवी मयूर भावें, सखि हेंचि नित्य गावें
मजला द्रवोनि पावें,दुसरे न बंध तोडी !! मोरोपंत

शरद

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

12 Jul 2011 - 1:39 pm | श्रावण मोडक

वाचनखूण साठवली आहे. :)

प्रास's picture

12 Jul 2011 - 1:55 pm | प्रास

अप्रतिम!!

या नितांत सुंदर रचनांची माहिती करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!

चन्द्रशेखर गोखले's picture

12 Jul 2011 - 6:50 pm | चन्द्रशेखर गोखले

अत्यंत महत्वाच्या माहिती बद्दल धन्यवाद !!!

कच्ची कैरी's picture

12 Jul 2011 - 8:42 pm | कच्ची कैरी

अप्रतिम! माझाही धन्यवाद!

राजेश घासकडवी's picture

12 Jul 2011 - 8:52 pm | राजेश घासकडवी

तंतू पटी मिळाले भूमी नभापरी हो
घट-मृत्तिका निराळी ऐसें कसें म्हणावें !!

हा शेर फारच सुंदर. गजलेच्या पारंपारिक विषयांपेक्षा थोडा वेगळा विषय हाताळणाऱ्या. अतिशय परिणामकारक.

स्वाती दिनेश's picture

12 Jul 2011 - 9:15 pm | स्वाती दिनेश

तुमचे मराठीतील उत्तमोत्तम रचनांच्या ओळखी करुन देणारे, रसग्रहणात्मक धागे अर्थातच वाचनीय.
धन्यवाद,
स्वाती

स्वाती२'s picture

12 Jul 2011 - 9:30 pm | स्वाती२

धन्यवाद!

पैसा's picture

12 Jul 2011 - 9:35 pm | पैसा

या अप्रतिम रचनांबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावेत तितके थोडेच!

अविनाशकुलकर्णी's picture

12 Jul 2011 - 9:47 pm | अविनाशकुलकर्णी

धन्स.....क्या बात है..

अविनाशकुलकर्णी's picture

12 Jul 2011 - 9:47 pm | अविनाशकुलकर्णी

धन्स.....क्या बात है..

मेघवेडा's picture

12 Jul 2011 - 9:51 pm | मेघवेडा

'तंतू पटी मिळाले' ही द्विपदी सुरेखच आहे! या रचनांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

वाचनखूण साठवली आहे.

धन्या's picture

13 Jul 2011 - 7:54 am | धन्या

खुप छान माहिती आणि उत्तम अशा दोन गझला तुम्ही उपलब्ध करुन दिल्या आहेत...

जगव्यापका हरीला नाहीं कसें म्हणावें !!धृ !!

तंतू पटी मिळाले भूमी नभापरी हो
घट-मृत्तिका निराळी ऐसें कसें म्हणावें !!

या ओळी वाचून मंगेश पाडगावकरांची दर्शन कविता आठवली.

- धनाजीराव वाकडे

विदेश's picture

13 Jul 2011 - 8:12 am | विदेश

पहिली गझल ज्ञात करून दिल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद, शरदजी .

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jul 2011 - 12:53 am | बिपिन कार्यकर्ते

मस्तच!