असच एखाद्या दिवशी असेल धो धो पाउस
आणी तू न मी असुत सिंहगडावर
भिजलेले असुत चिंब आपण
आणी गोठलेले असतील शब्द सुद्धा
मग वारा धरेल अंतरपाट आपला
अन आकाश करेल तुझे कन्यादान
तिथेच होईल सप्तपदी आपली
अन गारांच्या असतील अक्षता
झोकून देऊ हे शरीर मग
उंच कड्यावरुन एखाद्या
सोपवून देऊ सगळे काही
चिरंतन अविनाशी मृत्यूला
-आनंदयात्री
हे लेखन इतरत्र पुर्वप्रसिद्ध.
(कवितेत आम्हाला फारशी गती नाही हे जाणुन आहोत :D तरी पण आज पण काहितरी बदलतयं... हे वाचुन पुर्वप्रसिद्ध लेखन पुन्हा देण्याचा मोह आवरला नाही, धन्यवाद.)
प्रतिक्रिया
21 May 2008 - 2:35 pm | पद्मश्री चित्रे
झोकून देऊ हे शरीर मग
उंच कड्यावरुन एखाद्या
सोपवून देऊ सगळे काही
चिरंतन अविनाशी मृत्यूला-
हे कशासाठी बुवा?
छे .. छे. शेवट असा दु:खांत नको हो..
21 May 2008 - 2:42 pm | मनस्वी
मस्त... पहिली २ कडवी खूपच छान.
21 May 2008 - 2:44 pm | ऋचा
>>छे .. छे. शेवट असा दु:खांत नको हो..
सहमत
बाकी छान
21 May 2008 - 2:45 pm | मनिष
छानच कल्पना आहे!
21 May 2008 - 2:53 pm | धमाल मुलगा
वा! काय मस्त कल्पना रे!!!!!
पण
हे असं का रे बाबा?
अरे...लढ ना बिन्धास्त! साला जीव बीव देऊन का कुठं प्रेमं सफल होतात? वेळ पडली तर साला आडवं येणार्यांची डोकी सुध्दा फोडायची तयारी हवी.... क्काय? दे धडक बेधडक...कसें ?
बाकी, ही कविता वाचून सुखविंदरसिंगच्या "नशा ही नशा है" गाण्याच्या व्हीडिओची आठवण झाली :) बहुतेक आरती छाब्रिया असावी त्यात.
21 May 2008 - 3:06 pm | प्रभाकर पेठकर
मग वारा धरेल अंतरपाट आपला
अन आकाश करेल तुझे कन्यादान
तिथेच होईल सप्तपदी आपली
अन गारांच्या असतील अक्षता
ह्या नंतर तर खर्राखुर्रा स्वर्ग असतो रे राजा....!
झोकून देऊ हे शरीर मग
उंच कड्यावरुन एखाद्या
सोपवून देऊ सगळे काही
चिरंतन अविनाशी मृत्यूला
भद्र कार्यात ही अभद्र भाषा का? नवीन सृष्टी निर्माण करण्याची ताकद असताना 'अविनाशी मृत्यूला' कवटाळण्याचा विनाशकारी अविचार, मनाचा दुबळेपणा दर्शवतो.
21 May 2008 - 3:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरुवातीचे दोन्ही कडवे चांगले आहेत
त्यातील कल्पना एकदम जबरदस्त आहेत.
फक्त, शेवटच्या चार ओळी नै आवडल्या राव !!!
झोकून देऊ हे शरीर मग
उंच कड्यावरुन एखाद्या
सोपवून देऊ सगळे काही
चिरंतन अविनाशी मृत्यूला
च्या ऐवजी....
ढकलून देईन तुझे शरीर मग
उंच कड्यावरुन एखाद्या
सोपवून देईन सगळे काही
चिरंतन अविनाशी मृत्यूला.
असे करता येईल का ;)
पण प्रेमात असे नाही करता येत, बरोबर ना ?
21 May 2008 - 4:19 pm | आनंदयात्री
अर्या बाप :O .. काय बेकार जोक करता राव .. कंदिल्या चावला की काय तुम्हाला ?
22 May 2008 - 8:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्या बाप .. काय बेकार जोक करता राव .. कंदिल्या चावला की काय तुम्हाला ?
अशा कल्पना सुचायला 'कंदिल्याच' चावायला पाहिजे असं काही नाही. शेवटच्या चार ओळी वाचून कोणत्याही 'मठ्ठ' माणसाच्या प्रतिभेला असे धुमारे फुटू शकतात.
वार्याचा अंतरपाट, आकाशाने कन्यादान करणे, गारांच्या अक्षता आणि तेव्हाच आमच्या मनात अशी कल्पना आली की या वधूने लग्नापूर्वी तिच्या अन्य एका प्रियकराचा चहात विषारी शंकरपाळे टाकून खून केलेला असतो. त्याचा बदला म्हणुन सिंहगडावरुन तिला एकटीला ढकलून द्यायच्या चार ओळी आम्हाला सुचल्या,सुचवाव्या वाटल्या. असो, कविता छान आहे. असे म्हणुन आम्ही थांबायला हवे होते.
21 May 2008 - 5:08 pm | विसोबा खेचर
मग वारा धरेल अंतरपाट आपला
अन आकाश करेल तुझे कन्यादान
तिथेच होईल सप्तपदी आपली
अन गारांच्या असतील अक्षता
ह्या ओळी लै भारी!
तात्या.
21 May 2008 - 5:18 pm | धनंजय
पण दु:खांतासाठी काही वेगळे रूपक आवडले असते.
कड्याचा उंबरठा ओलांडून
आयुष्याचे माप सांडू
वगैरे असे काही...
21 May 2008 - 5:33 pm | शितल
मस्त कल्पना, पण शेवट थोडासा जीवा लागे.
21 May 2008 - 5:42 pm | वरदा
मी विषय वाचून काहीतरी झक्कास असणार म्हणून वाचलं पहिली दोन कडवी एकदम सुंदर्..मग काय झालं एकदम?
मधेच आंबोळीची मयताची गोष्ट वगैरे वाचलीत का तिसरं कडवं लिहीण्याआधी?
21 May 2008 - 8:20 pm | बेसनलाडू
वार्याचा अंतरपाट, आकाशाने कन्यादान करणे, अक्षता - सगळ्या कल्पना आवडल्या. धनंजयरावांच्या सूचनेचा नक्की विचार करा. कविता छान वाटली. आवडली. कवितेत गती नाही, असे वाटत नाही :)
(आस्वादक)बेसनलाडू
22 May 2008 - 4:56 am | अनिता
<झोकून देऊ हे शरीर मग
<उंच कड्यावरुन एखाद्या
<सोपवून देऊ सगळे काही
<चिरंतन अविनाशी मृत्यूला-
हे काही आवडले नाही तेवधे.
(अवातरः उच्च बिदुवर असताना असे का वाटावे?
अती अवातरः म्हणुन मराथि माणूस मागे पडतो आहे काय? ह. घ्या.)
हा लेकाचा " ढ " कसा लिहावा कोणी सागेल का?
<पहिली दोन कडवी एकदम सुंदर्
असेच म्हणते.
22 May 2008 - 7:32 am | यशोधरा
झोकून देऊ हे शरीर मग
उंच कड्यावरुन एखाद्या
सोपवून देऊ सगळे काही
चिरंतन अविनाशी मृत्यूला
का बरं?? :( पहिली २ कडवी आवडली...
22 May 2008 - 8:48 am | फटू
तुमच्या कवितेच्या नायकाला मानलं पाहिजे... चांगला लग्नानंतर सुखानं संसार करायचा सोडून जीव देण्याची अवदसा सुचली त्याला...
मग वारा धरेल अंतरपाट आपला
अन आकाश करेल तुझे कन्यादान
तिथेच होईल सप्तपदी आपली
अन गारांच्या असतील अक्षता
हे बाकी अगदी छान आहे... कल्पना आवडली... सालं कुणी पोरगी आपल्या प्रेमात बिमात पडली तर आपल्याला तिच्याशी या पद्धतीने लग्न करायला आवडेल...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
22 May 2008 - 9:45 am | अरुण मनोहर
सर्वच वाचकांना निराशावादी शेवट आवडलेला नाही. विषेशतः येवढ्या प्रबळ दोन कड्व्यांनंतर लगेच अमंगळ भाषा कशाला? वाचकंशी मी पूर्णपणे सहमत.
आनंदयात्री आपल्या नावाला जागून आनंद यात्रेने शेवट करतील काय?
------ आनंदाचे डोही आनंद तरंग--------
22 May 2008 - 5:47 pm | आनंदयात्री
दिलेल्या दादेबद्दल मनापासुन आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद.
बाकी बर्याच सुहृदांनी शेवट न आवडल्याचे कळवले आहे, त्यात कुठेतरी आपुलकीची भावना जाणवली, धन्यवाद.
धनुदादा अन बेला ने लग्नाचे विधी अन निसर्गाचे रुपक याची सांगड शेवटच्या कडव्यात अजुन छान जमु शकते असे सुचवले आहे, नंतर कधी परत प्रयत्न केला तर या गोष्टींचा नक्की विचार करिन.
-आनंदयात्री.