मी तसा चिडणारा,
कपाळाला आठी घेउन वावरणारा
सगळे घाव, वेदना न विसरता जगणारा
एकटाच चालणारा आणि एकाकीच राहणारा
पण काहितरी बदलतयं…
तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं
तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय
तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं
तिची हसरी नजर मलाही हसवतेयं
‘सगळं छान होईल’ ती मला समजवतेयं
तिच्या भाबडेपणा, तिचा विश्वास, तिची श्रध्दा
सगळंच अपरिचित
आणि तिचं माझ्यावरील प्रेम
अगदिचं अनपेक्षित
तू काय पाहिलसं माझ्यात
हा प्रश्नही अनुत्तरीत
आणि तिच्या डोळ्यात प्रश्नच हरवतात
हा शोधही अवचित
पण काहितरी बदलतयं…
कपाळावरील आठी जाऊन स्मित हळुच फुलतयं
ती भरेलही कदाचित सगळ्या जखमा
असं उगाचंच वाटतयं
ते हरवलेले क्षण, ते हरवलेले दिवस
आणि तो अविरत झिरपणारा कडवडपणा
हे सगळं विसरता येईल असं जाणवतयं
तिच्या डोळ्यात हरवलेलं काहीतरी गवसतयं
तिच्या स्पर्शात सगळं दुःख विरघळतयं
समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं
एक वेगळंच जग दुरुनच खुणावतयं
माझ्या नकळत मीहि स्वप्नात रमतोयं
फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय
बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं!
हे लिखाण आधी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केले होते, बाकी फक्त 'मिसळपाव' साठी! :)
प्रतिक्रिया
20 May 2008 - 7:56 pm | प्राजु
सुंदर मुक्तछंदातले काव्य.. शेवटचं कडवं तर खूप छान.
खास करून,
तिच्या डोळ्यात हरवलेलं काहीतरी गवसतयं
तिच्या स्पर्शात सगळं दुःख विरघळतयं
समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं
एक वेगळंच जग दुरुनच खुणावतयं
माझ्या नकळत मीहि स्वप्नात रमतोयं
फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय
बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं!
आवडलं...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 May 2008 - 9:19 pm | वरदा
तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं
तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय
तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं
तिची हसरी नजर मलाही हसवतेयं
हे जास्त आवडलं...
21 May 2008 - 4:26 am | मदनबाण
तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय
तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं
हे मस्तच.....
तू काय पाहिलसं माझ्यात
हा प्रश्नही अनुत्तरीत
:?
फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय
बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं!
व्वा क्या बात है |
(बदलता येईल सगळं ) असेच म्हणणारा.....
मदनबाण.....
21 May 2008 - 6:51 am | फटू
तिच्या डोळ्यात हरवलेलं काहीतरी गवसतयं
तिच्या स्पर्शात सगळं दुःख विरघळतयं
समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं
एक वेगळंच जग दुरुनच खुणावतयं
माझ्या नकळत मीहि स्वप्नात रमतोयं
फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय
बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं!
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
21 May 2008 - 7:31 am | अरुण मनोहर
तिच्या भाबडेपणा, तिचा विश्वास, तिची श्रध्दा
सगळंच अपरिचित
ती भरेलही कदाचित सगळ्या जखमा
भाबडेपणा म्हणजे निरागस लहान मूल. तिथे देवाचा अंश असतो. ह्याच दैवी प्रकटनाकडे कवी आकर्षीत झाला नसेल ना?..... खूप सकारात्मक कविता...
21 May 2008 - 9:16 am | विसोबा खेचर
वा मनिषराव!
सुरेख कविता....
तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं
तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय
तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं
या ओळी क्लासच!
आपला,
(कविताप्रेमी) तात्या.
अवांतर -
हे लिखाण आधी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केले होते, बाकी फक्त 'मिसळपाव' साठी!
जियो...!
आपला,
(मिसळपावकर) तात्या.
21 May 2008 - 9:19 am | यशोधरा
सुरेख!!
21 May 2008 - 12:28 pm | मनिष
बापरे! एवढे सारे प्रतिसाद मला खरच अपेक्षित नव्ह्ते...मि.पा. ची जिंदादिली जिंदाबाद! :)
आणि सर्वांना मनापासून धन्यवाद! [:)]
@ अरुण मनोहर - भाबडेपणा, निरागसपणात एक विलक्षण "healing, soothing power" असते हे मला कित्येक वेळा अनुभवायला आले आहे. मला लहान मुलांबरोबर खेळणे/बोलणे हा एक उत्कृष्ट स्ट्रेस-बस्टर वाटतो.
अवांतर - कवितेतील "ती" आता नुकतीच बायको झाली आहे. :) कधी कधी रोजच्या व्यवहारात तिच्या ह्याच भाबडेपणाचा वैताग येऊन वाटते, "इतकी कशी तू/ही बावळट पणे वागू शकतेस?" -- आणि मग मी ह्याच भाबडेपणावर कसा फिदा होतो हेही आठवते (नाहितर ती आठवण करून देतेच!:)), आणि मी स्वत:लाच समजावतो. कवितारुपी 'लिखित पुराव्याचा" असाही एक उपयोग!! (फायदा की तोटा ते ज्याने त्याने ठरवावे! :D)
बाकी व.पु. म्हणाले तसं "क्षण एक भाळण्याचा, बाकी सांभाळण्याचे" चा प्रत्यय येतच असतो - दोघांनाही! :)
सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद!
- मनिष
स्वगत : अवांतर जरा 'जास्तच' झालं का?
21 May 2008 - 12:34 pm | आनंदयात्री
मनिष .. सह्ही कविता .. च्यामारी काय अचुक उतरवलय भावनांना शब्दात .. कविता लै लै आवडली.
21 May 2008 - 12:37 pm | आनंदयात्री
मी तसा चिडणारा,
कपाळाला आठी घेउन वावरणारा
सगळे घाव, वेदना न विसरता जगणारा
एकटाच चालणारा आणि एकाकीच राहणारा
पण काहितरी बदलतयं…
तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं
सहीये बॉस्स ... परत वाचली .. परत वाचली अन वाचतच राहिलोय .. आपण तर फ्यान बॉ तुमचे !!
21 May 2008 - 5:52 pm | मनिष
@ आनंदयात्री - धन्यवाद! :)
21 May 2008 - 6:21 pm | मनस्वी
मनिष..
कोणत्या ओळी क्वोट करू.. सगळ्याच आवडल्या..
विचार छान उतरलेत.
21 May 2008 - 8:22 pm | बेसनलाडू
कविता आवडली. काही ठिकाणी संदिग्ध वाटली; पण एकंदर छान. लिहीत रहा.
(वाचक)बेसनलाडू
22 May 2008 - 11:05 am | मनिष
नक्की काय संदिग्ध वाटले हे जाणून घ्यायला आवडेल. कदाचित संतर्भ माझ्या मनात स्पष्ट होते, पण लिहितांना संदिग्ध झाले असतील.
तुला काय/कुठल्या ओळी संदिग्ध वाटल्या?
सर्वच प्रतिक्रिया देणार्यांचे आभार!
- मनिष
22 May 2008 - 11:20 am | बेसनलाडू
काही ठराविक ओळींकडे स्पष्ट निर्देष करता येत नाही; पण आठ्या विसरणे,जखमा पुसणे,भाबडेपणा आवडणे,तिचे हसणे, समजावणे या संदर्भांचे कवितेतील नेमके स्थान लक्षात घेतले तर पूर्ण कविता समजून घ्यायला (निदान मला तरी) बरेचदा खालीवर करावे लागले. यात वाचक म्हणून माझी फ्रेम ऑफ रेफरन्स/ओरिजिन हरवली/ले असू शकते. कविता टॉप टू बॉटम पद्धतीने वाचून समजली तर खुमारी वाढते (असे मला वाटते). मग ती भले २-३दा वाचायला लागो. पण या कवितेच्या बाबतीत मला बरेचदा खालीवर नाचानाची करावी लागली. पुढचे समजून घेताना मागे काय म्हटलंय याचा पुनर्विचार, त्यासाठी पुन्हा मागे जाऊन पुनर्वाचन. गद्य लेखनात एकवेळ चालूनही जाते, विशेषतः वैचारीक स्वरूपाच्या लेखनात. पण कवितेत असे होऊ नये असे वाटते. चूभूद्याघ्या.
(सविस्तर)बेसनलाडू
22 May 2008 - 2:25 pm | मनिष
मला वाटले की तो फ्लो सरळ आहे गद्यासारखा, पण हे लक्षात ठेवेन. खालीवर करावे लागू नये असे मलाही वाटते - ह्या कवितेत ते तसे नाही असे मला वातले - पण कदाचित मी आत्ता पुर्ण त्रयस्थासारखा नाही वाचू शकत माझीच कविता.
22 May 2008 - 5:20 am | शितल
एकदम अफलातुन रचना, मस्त भाव छेडलेत.
आणखी काय बोलु शब्दच हरवलेत.