बरेच वर्षांपूर्वी दिवे आगरला गेलो होतो. सोन्याच्या गणपतीची मूर्ती सापडून त्याचे देऊळही बांधून झाले होते.ही काही पूजेतील मूर्ती नक्कीच नव्हती; पण धंदा जोरात चालला होता. दुर्वा, फुले, नारळ यांना चढ्या भावातही चांगले गिर्हाईक मिळत होते. पर्यटन क्षेत्र, धार्मिक क्षेत्र नव्हे, म्हणून दिवे आगरचे भविष्य सगळ्यांना, विशेषत: स्थानीकांना लक्षात येऊ लागले होते. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातले चढे भाव लोकांना खुणावत होते. पुण्यात ६ रुपयांना मिळणारा मोदक तेथे आठ रुपयांना मिळत होता. समुद्र किनारा, वाड्या इतरत्र कोकणांत असतात तश्याच होत्या पण त्यांचे गुणवर्णन केले जात होते. छान चालले होते.
पुण्यात आल्यावर एक कल्पना डोक्यात भुंगा घालू लागली. जमीनीत मिळालेली मूर्ती. तिथे मिळाली, पुण्यात आपण का मिळवू नये ? आपण ती मिळवूच. आता ती जमीन खणतांना सापडण्यात मजा नव्हती. ती सर्वांसमोर जमिनीतून वर आली पाहिजे. तेही सोपे होते. न्युमॅटिच जॅक. पूर्व प्रसिद्धी. एक बर्यापैकी लोकप्रिय महाराज गाठून त्यांना साक्षात्काराची प्रेरणा व्हावयास पाहिजे होती.आमच्या मित्रमंडळीत एकाने ही जबाबदारी स्विकारली. माझा पुण्याजवळ एका टेकडीवर मालकीची जमीन होती. रस्त्यापासून जरा आंत. सुरवातीला भक्तांना थोडे कष्ट पडणे गरजेचे होते. नंतर रस्ता वगैरे होणारच होता. योजना अशी होती :
(१) जमिनीवर कुंपण बांधून थोडी झाडी लावणे. दोन तीन खोल्या बांधणे. तेथून न्युमॅटिक जॅकची सोय करणे.
(२) हा जॅक खाली पुराववाचा व तो जमीनीतून माती, दगड व मूर्ती वर उचलेल अशी व्यवस्था करणे.
(३) अधिकस्य अधिकं फलं या न्यायाने एकाऐवजी दोन मूर्ती बाहेर काढवयाच्या ठरवले. एक गणपती होताच; दुसर्याबद्दल एकमत होईना. शेवटी बालाजी ठरला.भक्तही कॉस्मॉपॉलीटन (व श्रीमंत) पाहिजेत ना. त्या वेळी सातारा रोडवरचे बालाजी मंदिर नव्हते.
(४) मूर्ती लांबून म्हणजे बंगालमधून आणावयाचे ठरले. (कलकत्ता नाही!) तिकडे आडगावातही चांगले सोनार असतात. एकेक किलोच्या आसपासच्या वजनाच्या मूर्ती त्या काळात १५ लाखांत होणार होत्या. कुणाला पाठपुरावा करावयास अवघड जावे म्हणून ही योजना.
(५) मूर्ती जुन्या व पुरलेल्या अवस्थेत सापडणार असल्याने योग्य ती रासायनिक व मेकॅनिकल ट्रीटमेंट देण्याची जबाबदारी माझ्याकडे.
(६) महाराजांनी त्यांच्या एका प्रवचनात सांगावयाचे की त्यांना साक्षात्कार झाला आहे. पुण्यात एका टेकडीवर दोन मूर्ती मिळणार आहेत. अंनिसच्या कार्यकर्त्यानी मोहोळ उठवले की सर्वांनी आमच्या जागेत येऊन खणाखणी करावयाची. काही मिळाले नाही की महाराजांची फजिती झाली असे सर्वत्र पसरावयाचे. पंधरा दिवसांनी महाराजांनी प्रसिद्ध करावयाचे की त्यांना परत साक्षात्कार झाला आहे. मूर्ती मिळणार नाहित; त्या स्वत: होऊन प्रगट होतील. महाराज स्वत:च तेथे मुक्काम करणार आहेत. ते तेथे आले की दुसर्या दिवशी कडेकोट बंदोबस्तात मूर्ती वर उचलावयाच्या. वरचा मातीचा थर फक्त फूटभरच ठेवावयाचा. (गुप्त धन नव्हे, सरकारची मालकी नाही). संशोधकांना बोलवून मूर्ती दाखवावयाच्या. ते सांगतीलच की मूर्ती फार जुन्या नाहित. ऍंटिक व्हॅल्यु शून्य. मग देवळे बांधावयाचा संकल्प सोडावयाचा..... नंतर पैसे कोठे ठेवावयाचे एवढाच प्रश्न उरणार होता.
या सर्वाला जवळजवळ ४०-५० लाख खर्च होता. माझ्याजवळ जमीन व ५-१० लाख उभे करवयाची ताकद होती. जवळचे मित्र म्हणाले ते २० लाखांपर्यंत उभे करतील. तरीही भागणार नव्हते. मग काही शॉर्ट कट काढले.महाराजांना ५ लाख ठरले होते. त्यांना रोकड रकमेऐवजी शेअर द्यावयाचे ठरले. त्यांनी एकदम मान्यता दिली.( त्यामुळे प्रॉजेक्टच्या यशस्वितेबद्दल आमच्या विश्वासात भर पडली.) असे ठरले की सुरवात झाली की लगेचच फुले, नारळ, फोटो, प्रसाद व्यवस्था, इत्यादी यांचा लिलाव करून लागणारी रक्कम उभी करावयाची. कुंपणावर बसलेल्या मित्रांना हे एकदम पसंत पडले. एकदा सुरवात झाली पैसे गुंतवण्यास त्यांची हरकत नव्हती. ७-८ मित्रांमध्ये सर्व कामगिरी वाटून देण्यातही आली.
आता तुम्ही म्हणाल ही मंदिरे कुठे दिसत नाहीत, काय झाले ? तेच सांगतो. म्हणतात ना " देवा, शत्रूंची काळजी मी घेईन; मित्रांपासून वाचव ". तेच झाले. आमच्या मित्रांपैकी एकाची सदसद्विवेकबुद्धी जागी झाली. तो म्हणू लागला, " असे करणे चुकीचे आहे. देवाच्या नावावर तुम्ही लोकांची फसवणुक करता आहा." आता भावेस्कूलमधील मुलांना हा अवयव नसतोच. यालाच कुठले खुळ लागले कोणास ठाऊक. त्याला सांगितले, "ठीक आहे, तू नकोस येऊ. आम्ही करू काही तरी सोय." तरीही त्याचा हेका कायम राहिला. तो आम्हाला करून द्यावयासही तयार होईना. एक जण फुटल्यावर उद्योग गुंडाळणे एवढेच हातात उरले.
कळले किफायतशीर धंद्यात मराठी माणसे मागे का पडतात ते ?
शरद
प्रतिक्रिया
13 Jun 2011 - 4:56 pm | छोटा डॉन
मजेशीर लेख.
जाता जाता मराठी माणसाच्या व्यापार स्वभावाची कारणमिमांसा करता करता शरदकाकांनी 'बिझीनेश शिक्रेट' ओपेन केले आहे असे वाटते ;)
- छोटा डॉनेश्वर राव
13 Jun 2011 - 4:57 pm | ऋषिकेश
हा हा हा.. __/\__
एक आगामी लेखाचे भविष्य वर्त्वतो: प्रो.अबक यांच्या समोरून जमिनीतून नाड्या बाहेर आल्या
13 Jun 2011 - 5:15 pm | अत्रुप्त आत्मा
हा हा हा हा....साक्षात-कार वाल्यांची अशिच तळी उचलायला पाहिजे....ह्ही ह्ही ह्ही....मस्त मस्त...चालू द्या...हसु थांबत नाहिये....अबो बो बो बो बो....ही एक षोकांतिका आवडली...
13 Jun 2011 - 5:17 pm | परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ एकदम झंटंम्यॅटिक किस्सा हो.
शरद काका तुम्ही आमच्या सेंट भावे'ज ला होतात ? कुण्याच्या कि. भा. बळीच्या काळात का?
13 Jun 2011 - 7:57 pm | गोगोल
आणि नंतर गोसावी ही कान पिळी.
14 Jun 2011 - 2:02 pm | धमाल मुलगा
गोगोल...
यु टू??? :)
13 Jun 2011 - 5:34 pm | राजेश घासकडवी
अहो, मराठी लोक मागे पडतात ते तुमच्या मित्राच्या कचखाऊपणामुळे नाही.... तर उरलेल्यांच्या कचखाऊपणामुळे. आता मूर्ती बाहेर येणार म्हटल्यावर जो प्रसिद्धीचा भडका उडेल त्याबद्दल कोण ना कोण बोलणारच. त्यात तुमचा मित्र 'हा सगळा कट आहे' वगैरे बोलला असता तर काय बिघडतं? मग द्यायचे त्याला चारदोन लाख, किंवा गुंड घालायची धमकी द्यायची. सद्सद्विवेकबुद्धीला घाबरणारे बहुतेक वेळा गुंडांना खूपच जास्त घाबरतात.
असो. मुळातलं बिझनेस प्लानिंग फारच छोट्या झेपेचं झालं ब्वा... अहो, या प्रोजेक्टमधून दर मोदकामागे दोन रुपये कसले काढत बसलात? च्यायला शंभरेक कोटी घालून आसपासच्या जमिनी घ्यायच्या, त्याच्यावर भक्तांना लागणाऱ्या सगळ्या सोयी पुरवणाऱ्या दुकांनांचे गाळे बांधून तयार ठेवायचे. आलिशान हॉटेलं, भक्तांच्या साथीदारणींसाठी शॉपिंगचे एरिया वगैरे आखून ठेवायचे. मग एकदा सगळं रान पेटलं की हे सगळं सातपट किमतीने विकायचं.... चिं. वि. जोशींनी कुठच्या तरी एका मारवाडी शेठने कॉलेज काढायला काही लाख दिले आणि आसपासची न विकली जाणारी डेव्हलपमेंट चढ्या भावाने विकली त्याची कथा लिहिली होती ती आठवली.
लेआहेवेसांन
13 Jun 2011 - 6:20 pm | रेवती
अर्रर्र..... फिसकटला का प्ल्यान?
आम्ही इनव्हेष्ट केले नसते का?;)
बरं, आता पुन्ना योजना निगाली की कळवा.;)
मजेदार लेखन आहे.
13 Jun 2011 - 7:19 pm | कुंदन
>>आम्ही इनव्हेष्ट केले नसते का?
+३
13 Jun 2011 - 7:38 pm | प्राजु
अर्रर्र! सॉल्लिड शोकांतिका!
एका चांगल्या मंदीराका मुकले पुणेकर!! :P
13 Jun 2011 - 7:41 pm | प्रीत-मोहर
हेहेह
13 Jun 2011 - 8:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कल्पनेची आयडिया लै भारी होती. :)
-दिलीप बिरुटे
13 Jun 2011 - 8:03 pm | पैसा
मराठी माणूस धंद्यात नेहमीच मागे!
13 Jun 2011 - 10:16 pm | स्वाती२
:D
13 Jun 2011 - 10:36 pm | आनंदयात्री
छान लेख. एकदम आवडला.
13 Jun 2011 - 11:20 pm | धनंजय
हाहाहा
(हा हन्त हन्त!)
13 Jun 2011 - 11:31 pm | भडकमकर मास्तर
मस्तच
झकास गोष्ट
"छोट्या मंदिरापासून बडे संस्थान कसे एष्टाब्लिश होत जाते..." अशी एक द.मा. मिरासदारांची गोष्ट आठवली
14 Jun 2011 - 2:28 am | अभिज्ञ
लै भारी.
अभिज्ञ.
14 Jun 2011 - 1:19 pm | नारयन लेले
शरदराव तुमच्या मालकीची टेकडीवर जागा आहे तर आसला खुळचट विचार का करत बसलात. आहो एखादा बिल्डर पकडुन कोटी कोटी रुपये केले आसते की हो. मराठी माणुस आसा कसा हो.
आता तुमचा नविन विचार काय आहे ते मिपा वरिल सर्वाना कळुद्या.
विनित