सदर विषयावर लेखन करायच अनेक दिवसांपासून मनात होत. पण आधीच आध्यात्मिक गुरुंची प्रतिमा चांगली नाही, त्यात मी स्वतः आध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य आहे . त्यामुळे हा विषय माझ्यासाठी थोडा नाजूक बनला होता. पण मग जे आपण निष्कर्ष काढले आहेत, विचार केला आहे (तो १००% बरोबर आहे अशी खात्री आहे) तो मांडला पाहिजे अस मला वाटल.
मी इथे काही मुद्दे वार निष्कर्ष मांडणार आहे, म्हणजे थोडक्यात काय म्हणायचे आहे ते सर्वांना कळेल. लेखामध्ये स्पष्टीकरणाच्या ओघात विषय भरकटण्याची शक्यता असते.
हे निष्कर्ष सांगण्यापूर्वी मला एवढेच सांगायचे आहे, समस्त आध्यात्मिक साधकांना किंवा जिज्ञासुंना, मी विस्तृत वाचन , विचार, अनुभव आणि परीक्षण ह्या नंतर हे निष्कर्ष काढले आहेत.
मी अजुन ही पूर्ण आध्यात्मिक आहे, पारंपारिक वैदिक विचारांचा पुरस्कर्ता आहे, व सश्रध्द आस्तिक आहे. समस्या कुठे आहे हे आपल्याला खालील मुद्दे वाचुन कळेल.
एक सूचना- नास्तिक बुध्दिवाद्यांनी आपल्या बाजुने हा काही पुरावा मानु नये. जे सश्रध्द आस्तिक आहेत , त्यांच्या साठीच हा विषय आहे.
१. गेल्या शतक भरात, साधारण १८९३ पासुन भारतभरात नव्या आध्यात्मिक गुरुंची मोठी लाट आली. शिष्याने गुरु कडे जावे हा प्राचीन आदेश मोडून गुरुच समुद्र उल्लंघायची बंदी मोडून परदेशात जाऊ लागले व शिष्य शोधू लागले. असे करताना त्यांना सर्व नियम-यम मोडावे लागले , व पाश्चात्य शिष्यांनुसार उपदेशात बदल करावा लागला.
२.चार्वाकवादामुळे व पाखंडामुळे , मृत्यूनंतर जीवन संपते हा विचार सर्वत्र फैलावलेला होता. आधुनिक गुरुनी प्रसिध्दी साठी पारंपारिक हिन्दु धर्म पाखंडानुसार अॅड्जस्ट केला, व ते ही बोलू लागले, लोकांनो स्वर्ग-नरक जे काही आहे ते ह्या पृथ्वीवरच आहे, ह्या जीवनातच अनुभवायचे आहे. पारंपारिक अध्यात्म स्वर्ग-नरकांचे मरणोत्तर अस्तित्व सांगत होते.
३.चमत्कार हा पारंपारिक सिध्दत्वाची निषाणी होती. चमत्कार तेथे नमस्कार हा साधा नियम होता. ज्यांच्या जवळ कुठले ही सामर्थ्य नव्हते, अशा गुरुंनी सांगायला सुरुवात केली , चमत्कार म्हणजे हातचलाखी, ते दुय्यम दर्जाचे ! .................. विचार बघा...उच्च मानसिक अनुभव घ्या...समाधि अनुभवा. सर्व पारंपारिक संतांजवळ, योग्यांजवळ असामान्य दैवी सामर्थ्य होते, सिध्दी होत्या. त्याची विस्तृत वर्णने सगळ्या जुन्या चरित्रात उपलब्ध होती. नव्या गुरुंकडे सिध्दींचा अभाव असल्यामुळे , त्यांनी केवळ मानसिक अनुभवांवर भर द्यायला सुरुवात केली
४. अजुन थोडा काळ गेला, आता समाधी अनुभवायला देणे ही नव्या गुरुंना जमेना, मग त्यांनी ध्येय अजुन खाली आणले. मानसिक शांती, रिलॅक्सनेस, चिन्तामुक्ती , आरोग्य ही नवीन ध्येये बनली
५. शिष्याला १००% अनुभव देऊन जन्म-मरण चक्रातुन सोडवणे ही भारतीय अध्यात्माची परंपरा. नव्या गुरुंनी अनुभवाची जबाबदारी शिष्यांच्या वरच ढकलायला सुरुवात केली. सर्व प्राचीन व ऐतिहासिक गुरुंनी शिष्याची संपूर्ण जबाबदारी स्वता:वर घेतल्याचे त्यांच्या चरित्रातुन दिसते. नवे सामर्थ्यहीन गुरु नेमके उलटे करु लागले, कारण त्यांना स्वतःलाच आपल्या आध्यात्मिक उन्नती बाबत खात्री नव्हती.
६.१९४० च्या सुमारास अशांचा उदय झाला की ज्यांनी तत्वज्ञानाच्या नावाखाली मूर्तिभंजन सुरु केले. सर्व अनुभवांना विरोध करुन, शब्दच्छ्ल सुरु केला. स्थितीहीन स्थिती, कालातीत जगणे, वर्तमानात जगणे, हे सोपे असल्याचे लोकांना भासवुन उच्च बौध्दिक वर्तुळात महान तत्वज्ञ म्हणून मिरवायला सुरु केले. अनाकलनीयता व पाखंडीपणा ह्यामुळे विदेशात लोकप्रिय होण्यास ह्यांना फार वेळ लागला नाही.
७.१९८० च्या दशकात काही असे नवे संत जन्मले, जे वेदान्ताच्या नावाखाली बेधडक सांगु लागले, पुनर्जन्म वगैरे काही अस्तित्वात नाही, जे काही आहे आता इथेच . मृत्युनंतर आपण सगळेच सत्यामध्ये परत जाऊ व जन्मापूर्वी ही आपण सत्यच होतो. काही तर तुम्ही ह्या क्षणाला मुक्तच आहात, साधनेची वगैरे कोणती ही गरज नाही इ. बेलगाम असत्य प्रतिपादन करु लागले . असले पाप कृत्य करताना व बरोबर संतत्व मिरवताना त्यांना काही वाटले नाही.
८.ह्या सर्व नव्या गुरुंमध्ये एक समानता होती, अलौकिकतेला , चमत्कारांना ह्यांचा विरोध होता. कारण ह्यांच्या स्वतःजवळ ते सामर्थ्य नव्हते. सर्व सामान्य लोकांची दु:खे दुर केल्याच्या कोणत्या ही घटना ह्यांच्या चरित्रात दिसत नाहीत. सिध्दीहीन, सामर्थ्यहीन असे हे बोलबच्चन गुरु भारतीय महान योग्यांच्या परंपरेला कलंक बनुन राहिले. योगसामर्थ्य नसणे हे ह्या सर्वांचे कॉमन लक्षण होते.
१८९३ मध्ये सुरु झालेली ही परंपरा आजता गायत टिकुन आहे. अगदी १०००० कोटींची मालमत्ता ही बनवुन आहे. सर्वदुर देशात ह्यांचे आश्रम आहेत. फिलॉसोफर म्हणून ह्यातील काही जगप्रसिध्द आहेत, ह्यांचे ग्रंथ जगभर वाचले जातात. जे वाचुन अनेक लोक तात्पुरती मनःशांति मिळवतात. पण ते यु कॅन विन सारख्या उत्तेजक पुस्तकांसारखे असते. शिष्याला भवसागराच्या पार नेण्याचे अद्वितीय सामर्थ्य त्यांच्या जवळ नसते. भारतीय योग व अध्यात्म परंपरेला सगळ्यात ठेच कुणी पोचवली असेल तर ह्यांनी स्वतःच ! गेल्या साधारण शंभर वर्षात उत्पन्न झालेल्या ह्या मॉडर्न गुरुंनी !!!!!!!!!!!!!!!!!
प्रामाणिक आध्यात्मिक वाचन करणार्यांना वरील निष्कर्षात तथ्य वाटेल अशीआशा आहे....................
ता.क.- नावे मुद्दामुनच घेतलेली नाहीत, कारण लिस्ट मोठी होईल, व त्यातुन मुद्दा हरवेल.
प्रतिक्रिया
12 Jun 2011 - 1:16 pm | चिरोटा
विचार करण्यासारखा लेख. autobiography of yogi मध्ये परमहंस योगानंद ह्यांनी त्याच्या गुरुंचे(युक्तेश्वर महाराज) आणि ईतर स्वामींचेही चमत्कार दिले आहेत: महावतार बाबाजी/लाहिरी महाशय. पण योगानंदांनी तर समुद्र पार केले होते. लॉस एन्जेलिसला त्यांचा मोठा आश्रम होता.(बहुदा अजुनही असावा). पण हे सगळे १८९३ नंतर घडलेले आहे.
12 Jun 2011 - 2:02 pm | मूकवाचक
आधुनिक गुरुनी प्रसिध्दीसाठी पारंपारिक हिन्दु धर्म पाखंडानुसार अॅड्जस्ट केला ... हे पटले.
सगळेच तत्वज्ञान गोलमाल आहे, सगळे जगच दाम्भिक आहे त्यामुळे तुम्ही बेछूट रहा असा सोयिस्कर उपदेश करणारे सद्गुरू(!) गल्लीबोळात झाले आहेत. देव ही कल्पना यान्च्या सोयिस्कर "अद्वैताच्या" मधे आडवी येते. भक्तीभावनेने माणूस द्वैतात अडकतो. ती त्याज्य. द्वैतात यायचे ते प्रणयाची मजा वगैरे लुटायला, दुढ्ढाचार्यासारखे इतराना ढापीव ब्रह्मज्ञानाचे फुकट डोस देऊन चाहते गोळा करायला हे यान्चे सान्ख्य.
यापेक्षा थोडा वेगळा आणखी एक प्रकार आहे. आजवर जगात जे काही अशुभ झाले त्याचे लचान्ड देव, देश (राष्ट्रभक्ती) आणि धर्मावर ढकलले आणि समाज ही कल्पनाच नाकारली की सगळे प्रश्न कसे बसल्याजागी आणि विनाप्रयत्न सुटतात. मग "ती खारुताई बघा किती छान खेळते आहे, निष्पाप फुले कशी टवटवीत दिसत आहेत, माणसेच अशी हिन्सक कशी काय ब्वॉ?" असल्या रोजनिश्या लिहून आयुष्यभर फुकटचा ऐशोआराम करायला हे मोकळे. असो. लेख आवडला.
(तुमच्या प्रत्येक वाक्याचा जो तो आपापल्या धारणेप्रमाणे कीस पाडेलच. ज्या हेतूने तुम्ही हा लेख लिहीला आहे तो पटला इतकेच म्हणेन.)
12 Jun 2011 - 1:43 pm | कवितानागेश
अत्ता मी बाबाजींबद्दलच लिहायला आले होते.
अनेक मुद्द्यांशी असहमत.
असो.रुमाल टाकून ठेवतेय......
12 Jun 2011 - 1:47 pm | Nile
वरील वाक्यांमध्ये विचारांबद्दल असलेली खात्री पटवण्याचा प्रयत्न अप्रमाणिक आहे असेच दिसते, "डिनायल" स्पष्ट दिसते. स्वतःच्या मनातली चुकचुकती पाल अजून शांत करणे जमलेले दिसत नाही. असो, चालूदे.
12 Jun 2011 - 1:51 pm | JAGOMOHANPYARE
१. शिष्याने गुरु कडे जावे हा प्राचीन आदेश मोडून गुरुच समुद्र उल्लंघायची बंदी मोडून परदेशात जाऊ लागले
ही समुद्र उल्लंघायची बंदी नेमक्या कोणत्या पुस्तकात आहे? रामाने समुद्र ओलांडून लंकाक्गाठली , कृष्णाने समुद्र ओलांडून द्वारका गाठली, दोघेही पापी आहेत की काय?
२. चार्वाकवादामुळे व पाखंडामुळे , मृत्यूनंतर जीवन संपते हा विचार सर्वत्र फैलावलेला होता.
मेल्यानंतरचे आस्तित्व माना वा न माना, जिवंतपणी चांगले वागावे, हा धर्माचा खरा पाया आहे. चार्वाकाने वाईट वागायला सांगितले असे कुठे ऐकिवात नाही.
३. गुरु योगसामर्थ आहे का नाही याचा समाजाला काय उपयोग? गुरुला पाण्यावरुन चालता येते, आकाशातून उडता येते... याचा नेमका समाजाला काय फायदा? त्याना तर विमान, नाव याशिवाय तरणोपाय नाही. बरे, योग विद्या आली तरी ते विकारांपासून मुक्तच होतात, असेही काही नाही.
12 Jun 2011 - 2:07 pm | मूकवाचक
http://www.spiritualteachers.org/neo_advaita_article.htm
12 Jun 2011 - 3:47 pm | राही
"चार्वाकवादामुळे,मृत्यूनंतर जीवन संपते हा विचार सर्वत्र फैलावलेला होता."
हे कुणी सांगितले? उलट हिंदूधर्माने चार्वाकाला झिडकारले. पुनर्जन्माच्या संकल्पनेचा हिंदूमनावर इतका जबरदस्त पगडा आहे की ती संकल्पना मान्य असणे हे हिंदूधर्माचे (अनेकांपैकी) एक व्यवच्छेदक लक्षण मानले जाते. आणि १८९३ हीच विभाजक रेषा का? त्या वर्षी विवेकानंदांनी समुद्रपर्यटन केले म्हणून? जे झाले ते इष्ट की अनिष्ट? स्वामी विवेकानंदांनी तर रामकृष्ण परमहंसांच्या बारा परमशिष्यांपैकी कमीतकमी दोघांना आपल्या परदेशातल्या कार्याचा व्याप सांभाळण्यासाठी इंग्लंड्-अमेरिकेत बोलवून घेतले होते.
12 Jun 2011 - 3:43 pm | अविनाशकुलकर्णी
बोगस अध्यात्माची सुरसकथा
बोगस अध्यात्म असते का? का बाबा बोगस असतात..?
बोगस बाबांच्या अध्यात्माची सुरसकथा....असे तर म्हणायचे नाहि ना का बोगस अध्यात्म....
12 Jun 2011 - 3:52 pm | तिमा
हाय काय आन नाय काय.
आमच्यासारख्यांसाठी असा विषय समजण्याच्या पलिकडचा आहे, त्यामुळे कसलीही प्रतिक्रिया न देता फक्त ज्ञानकण टिपत वाचायचे असे ठरवले आहे.
----- अश्रध्द नास्तिकराव पाखंडे
12 Jun 2011 - 4:04 pm | आर्या अंबेकर
बुवाबाजी सर्वत्र फोफावलीच आहे, आपणच बळी न पडता योग्य मार्गाने चालणे गरजेचे आहे.
12 Jun 2011 - 4:13 pm | शैलेन्द्र
च्यामायला त्या अध्यात्माच्या.. सरळं निसर्गाच्या नियमानुसार जगाव.. मागच्याच ओझ नको न पुढ्च्याची चिंता नको ...
12 Jun 2011 - 4:39 pm | मूकवाचक
मागच्याच ओझ नसणे आणि पुढच्याची चिन्ता नसणे हा निसर्ग नियम आहे? तसे असले तर सगळे मानसोपचारतज्ञ बेकार होणे, विमा उद्योग बन्द पडणे, किमान डेल कार्नेजीची 'हाऊ टू' वाली पुस्तके न खपणे असे काहीतरी नैसर्गिकरित्या घडायला हवे होते असते असे वाटते. बाकी चालू द्या.
13 Jun 2011 - 9:32 am | शैलेन्द्र
टप्पा चुकलात दादा...निसर्गाच्या नियमानुसार साधी मुंगीसुध्धा येत्या पावसाळ्याची चिंता करते.
आपण भौतीक गोष्टींबद्दल न बोलता अधिभौतीक तत्वांबद्दल बोलतोय. स्वर्ग-नरक-मोक्ष-संचीत इत्यादी इत्यादी जड गोष्टीबद्दल.. त्यातुनही लेखकाने स्वता:लाच "अध्यात्मीक वृत्तीचा" असल्याचे प्रमाण्पत्र देवुन ठेवलय..
" नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी.. जिणे गंगौघाचे पाणी" याला मी नैसर्गीक जगण म्हणतो.
13 Jun 2011 - 3:13 pm | मूकवाचक
आवडले. टप्पा चुकला खरा...
तुमचे बरे आहे. एखाद्याला असते अशा गोष्टीत स्वारस्य, अगदी भलामोठा स्वतन्त्र लेख लिहून उत्तर देण्याइतके!
13 Jun 2011 - 3:39 pm | शैलेन्द्र
पण त्यांच उत्तर मला खरच आवडल..
13 Jun 2011 - 3:51 pm | मूकवाचक
उत्तर छानच आहे.
13 Jun 2011 - 6:34 am | धूम्केतु
पु ल देशपांडे यांचे "माझे अध्यत्मिक जीवन" या हे या विषयावरचे छान विडंबन आहे.
13 Jun 2011 - 4:34 pm | रणजित चितळे
विषय चांगला आहे व मांडणी पण आवडली.
माझे मत -
पुर्वीच्या काळी हे जे थोर महात्मे होते ते त्यांच्या शिष्यांना व भक्तजनांना कर्मयोगाचे, भक्तीमार्गाची फक्त दिशा दाखवायचे. स्वतः प्रपंचात पडायचे नाही (येथे प्रपंच म्हणजे लग्न व संसार नाही पण कोठची गोष्ट अमलात आणायला लागणारे करायचे कार्य - रोजचे व्यवस्थापन, प्रशासन इत्यादी) पण दुस-यांकडून करवून घ्यायचे. रामदास स्वामींनी शिवाजी राजांना योग्य वेळा (पाहीजे तेवढीच) दिशा दाखवली पण स्वतः पडले नाहीत त्यात. पुर्वी गुरुंच्या सान्निध्यात येताक्षणिक शिष्याला साजेसा योग (कर्मयोग, भक्तीयोग वा सांख्ययोग) त्याच्या प्रतिभेतून व्यक्त व्हायचा.
रामदेवबाबांनी किंवा श्री श्री रविशंकर ह्यांनी फक्त दिशा दाखवली पाहीजे. त्यांची स्वतःची अशी प्रतिभा असली पाहीजे की करिष्मा झाला पाहीजे.
म्हणतातना थोर महात्म्यांना तेवढेच महान शिष्यगण पण लाभले पाहीजेत.
द्रोणाचार्यांना कोणालाही अर्जून बनवता आले नसते. व द्रोणाचार्य नसते तर कदाचित अर्जून झाला नसता.
हल्ली सर्वच श्रोते वक्ते सावधान आहेत काय करावे त्यासी.
ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह्विर्यम् करवावहे तेजस्विना वधितम् अस्तु मा विद् विशावाहे ॐ शांति शांति शांति.
15 Jun 2011 - 3:25 pm | llपुण्याचे पेशवेll
भक्तिमार्गाविषयी ज्ञानेश्वर महाराज "ही सूळावरची पोळी" असे म्हणतात. आजकालचे हे अध्यात्मिक गुरु कुठे सूळावर बसणार आहेत की त्यावर बसून पोळी खायला. म्हणजे जेवढे कष्ट खडतर परिश्रम कोण घेणार आहे?
संत कबीर एकदा विदेही अवस्थेत रस्त्याच्या कडेला एका पारावर पडून होते. त्यांच्या पायाला एक जखम झालेली होती कुत्रं येऊन ती जखम चाटत होतं. मग त्या कुत्र्याने त्यांची चामडी दाताने, नखाने खरवडायला सुरुवात केली. त्यांच्या एका भक्ताने बाजूने जाताना ते पाहीले आणि त्या कुत्र्याला हाकवले. मग कबीराना भानावर आणून ते कुत्रे त्यांची चामडी ओढून खात होते हे सांगितले. त्यावर कबीरांनी "कुत्ता जाने, चमडा जाने" असे उत्तर दिले. म्हण्जे ते कुत्रं आणि ते चामडं काय ते बघून घेतील माझा त्याच्याशी संबंध नाही. इतके वैराग्य आहे आत्ताच्या या बाबालोकांच्या अंगामधे?