लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
23 May 2011 - 4:20 am

लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी

किती दिस झालं, आठवंना सालं
गोष्ट सांगतो मी खरीखुरी;
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||धृ||

हि असली कसली चढती महागाई
वाढत्या भावानं जीव निघून जाई
पहिल्या आठवड्यात पगार संपतो
बँक खाते अन खिसा रिकामा होतो
पैसा जावून मी जणू होतो भिकारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||१||

ह्या भाववाढीनं डोकं वर काढलं
महागाईनं आगीत तेल टाकलं
पेट्रोल सत्तर रूपये लिटर झालं
गरीबीत दिवस काढणं आलं
उसनवारी करावी लागती दारोदारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||२||

चांगलचुंगलं पोटात आता जाईना
पोरासोरांची हौस करता येईना
बायकोला सांगावं तरी काय?
गेला माझाच फाटक्यात पाय
अशीच स्थिती आहे शेजारीपाजारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||३||

महिन्याला पडतं कोनी आजारी
आठवड्याला येती पैपाव्हनं घरी
कमाईला माझे दोन हातं राहती
खायला रावनाचे दहा तोंडं असती
रिकाम्या खिशानं कसा जावू बाजारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||४||

करता येत नाही वरकमाई मला
नाही कसला जोडधंदा करायला
कामगाराची नोकरी करतो मी आता
नाही सहावा वेतन आयोग, महागाई भत्ता
रातंदिस करावी लागे कंपनीत रोजंदारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||५||

आसं वाटतं व्हावं आपन पुढारी
नाहीतर व्हावं गुंड अन मवाली
त्यांची जात असते लई माजोरी
जनतेचं पैसं खावून करती शिरजोरी
पर गरीबाला नाही कोणी वाली
त्याचं होत नाही कोणी कैवारी
म्हनून मी रोज अंथरून पाहून पाय पसरी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||६||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०५/२०११

कविताजीवनमान

प्रतिक्रिया

निनाद's picture

23 May 2011 - 6:13 am | निनाद

अगदी सामान्य जनतेची कैफियत मांडणारे गीत.

अरुण मनोहर's picture

23 May 2011 - 8:05 am | अरुण मनोहर

अशा रडगाण्यांचा काय उपयोग! त्यापेक्षा स्विस बॅन्केत हजारो करोड कसे जमवायचे ह्याची स्वप्ने जरी पाहीली तर निदान चार क्षण आनंदात तरी जातील!

गणेशा's picture

23 May 2011 - 8:14 pm | गणेशा

मस्त एकदम