काही वेळा कुणीतरी आपल्याशी फार रंगात येऊन बोलत असतं. अशा वेळेस त्या व्यक्तिकडून काही चुकीचे संदर्भ दिले जातात. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असते? तुम्ही लगेच त्याला त्याची चूक दाखवता वा त्याच्या चुका न दाखवता, त्याच्या रंगाचा बेरंग न करीत संभाषण चालू ठेवता?
उदाहरणार्थ,
गेल्या वर्षी पावसाळ्यातली घटना. आमच्या स्नेह्यांच्या मोबाईलवर आम्ही फोन केला. ते मुंबईत असतील ही आमची समजूत. पण ते तेव्हा कोकणात होते. त्यांनी फोन घेताच ते उत्साहाने बोलायला लागले.
"नमस्कार पंत... आत्ता गुहागरला आहे.....समुद्रकिनार्यावर भटकतोय. काय मौसम आहे हो! वा वा. हलकासा पाऊस पडतोय.... आभाळ मेघाच्छादित आहे. सर्वत्र हिरवेगार डोंगर...
पाडगावकरांनी काय सुंदर लिहिलाय हो
"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे....क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे".
या पाडगावकरांच्या ओळी गुणगुणत मी समुद्रकिनार्यावर भटकतोय......................"
आम्ही बालकवींची मनातल्या मनात क्षमा मागितली. व त्यांना म्हटले
"हो ना, पाडगावकर म्हणजे काय? विचारूच नका".
आपल्या आयुष्यात असे प्रसंग घडले असतील तर सांगावे.
धोंडोपंत
प्रतिक्रिया
17 May 2008 - 10:16 pm | अविनाश ओगले
पंत, तुम्ही ए़का त्रासदायक विषयाला हात घातला आहात. आता मनात ठसठसणारं सारंच सांगून टाकतो. एका कवीच्या ओळी दुसर्याच्या नावावर खपविणे हे भलतेच सामान्य झाले आहे. "त्या फुलांच्या गंधकोषी" ही कविता वि.स. खांडेकरांची आहे, हे अनेकजण खात्रीने सांगतात. वॄत्तपत्रे आणि दूरदर्शन यावरचे मराठी आणि चुकीचे संदर्भ हे फार भयानक आहे. होम मिनिस्टर या कार्यक्रमात बांदेकर नावाच्या गृहस्थाने सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पती असल्याचे सांगितले होते. सारेगमप सारख्या कार्यक्रमात बोलले जाणारे मराठी ऐकवत नाही. "मी त्यांचे खूप धन्यवाद करते" "त्यांचं अभिवादन आहे" वगैरे ऐकवत नाही. परवाच्या सारेगमप मध्ये एक गायक "मर्मबंधातली ठेव ही '' हे पद गात होता. त्यातल्या ओळी त्याने "...लोभी अती हा, मकरंद ठेवा लुटण्यासी आला" अशा गायल्या. मूळ ओळी "लोभी अलि हा" अशा असाव्यात असे वाटते. अलि म्हणजे भृंग या अर्थाने. आशा खाडिलकर परिक्षक म्हणून ही चू़क दुरुस्त करतील असे वाटले होते. पण तसे झाले नाही. आता मीच गोंधळात पडलो आहे. वृत्तपत्रातील शुद्धलेखनाच्या चुका संपूर्ण माफ केल्या तरी अनेक गोष्टी छळतात. हास्यास्पद आणि हास्यकारक हे शब्द समानार्थी असल्यासारखे वापरले जातात. अशी अनेक कात्रणे मी जमवली आहेत. (हा खरं तर एक मुर्खपणाच आहे.) या विषयाच्या निमित्ताने काही अफलातून नमुने दाखवीन.
सोसत रहा, पंत... सोसत रहा.
18 May 2008 - 3:20 pm | लिखाळ
विषयाच्या निमित्ताने काही अफलातून नमुने दाखवीन.
नक्कीच दाखवा.. या लोकांचे मराठी आणि त्यात डोकावणारे इंग्रजी अगदी वात आणते... कालच एका पेक्षा एक या कार्यक्रमाचा एक जूना भाग सहज पाहिला. हे असे मराठी ऐकण्यासाठी मुद्दाम.. आणि पार डोक्याचे भजे झाले...
--लिखाळ.
20 May 2008 - 1:09 am | llपुण्याचे पेशवेll
त्यातल्या ओळी त्याने "...लोभी अती हा, मकरंद ठेवा लुटण्यासी आला" अशा गायल्या. मूळ ओळी "लोभी अलि हा" अशा असाव्यात असे वाटते. अलि म्हणजे भृंग या अर्थाने. आशा खाडिलकर परिक्षक म्हणून ही चू़क दुरुस्त करतील असे वाटले होते. पण तसे झाले नाही. आता मीच गोंधळात पडलो आहे.
मला पण ते जेव्हा ऐकले तेव्हा हेच वाटले की परीक्षक तरी चुकीची दुरुस्ती करतील. आणि गाणरे गृहस्थ सुधा कीर्तनकार वगैरे आहेत. त्यामुळे कदाचित अर्थ ध्यानी घेऊन गातील असे वाटले होते. आणि ते सवईने तीच चूकीची गोष्ट वर्षानुवर्ष गात असतील असे वाटते. कारण हे पद मी नेहेमी गातो असे ते सांगत होते.
पुण्याचे पेशवे
17 May 2008 - 11:37 pm | मन
एकदा सह्याद्री वाहिनीवर ५-७ वर्षांपुर्वी एका वृत्त- निवेदकाने एका दिवंगत व्यक्तीच्या
आयुष्याबद्दल दिलेली माहिती:-
".....आणि त्यांच्या ग्राम्य(!!) बोलण्यामुळे आणी तशाच वागणुकी मुळे ते जनतेत लोकप्रिय होते"!!!
:-) :-)
आमी सगळे तर ऐकुनच गार्र्...गप गार....
बहुदा त्या निवेदकाला "ग्रामीण " हा शब्द वापरायचा सुचला नसावा.
आपलाच,
मनोबा
18 May 2008 - 8:50 am | विसोबा खेचर
माझं मत -
तुम्ही लिहिलेल्या प्रसंगात त्या गुहागरच्या किनार्यावर हलकासा पाऊस, मेघाच्छादित आभाळ, सर्वत्र हिरवेगार डोंगर इत्यादी सुंदर वातावरणात मनमोकळेपणाने निसर्गाचा आनंद लुटत फिरणार्या त्या माणसाच्या भावना महत्वाच्या, त्याचा मूड महत्वाचा! आणि तो इसम मुद्दामून फोन करून त्या भावना तुमच्याशी शेयर करू पाहतो आहे हा मुद्दा मला अधिक महत्वाचा वाटतो!
मान्य आहे की त्याचा तपशील चुकला! परंतु त्या क्षणी त्या माणसाच्या मनात निर्माण झालेली 'श्रावणमासी हर्ष मानसी...' ची भावना तपशीलापेक्षा केव्हाही अधिक महत्वाची!
त्यामुळे तुम्ही जे केलंत तेच मीही केलं असतं! एखाद्या अट्टल मनोगतीसारखं त्याच्या भावना समजून न घेता लगेच तपशीलातील चूक दाखवून त्याचा हिरमोड केला नसता! पुन्हा केव्हातरी त्याच्याशी बोलताना 'साहेब, ती कविता पाडगावकरांची नसून बालक्वींची आहे बरं का!' असं हळूच त्याला सांगितलं असतं! :)
तात्या.
18 May 2008 - 9:12 am | धोंडोपंत
आपले म्हणणे खरे आहे. अशा अनेक अक्षम्य गोष्टी प्रसारमाध्यमाद्वारे दाखवल्या/ ऐकवल्या जातात.
तसेच अनेक किस्से हे दिवसेंदिवस हसवत ठेवतात. असा एक घडलेला किस्सा.
फार पूर्वी जेव्हा दूरदर्शनवर खाजगी वाहिन्या नव्हत्या त्या वेळेचा काळ. तेव्हा सप्रेम नमस्कार नावाचा एक कार्यक्रम दर आठवड्याला व्हायचा. त्यात वेळेच्या सोयीप्रमाणे म्हणजे पुढील कार्यक्रमाचा अवधी लक्षात घेऊन सप्रेम नमस्कारची वेळ ऍडजेस्ट केली जायचे. डॉ. किरण चित्रे आणि आकाशानंद हे त्या कार्यक्रमाचे संचालन करीत. त्यावेळे गोट्या ही मालिका खूप गाजली होती आणि तिचे पुन:प्रक्षेपण करावे अशी प्रेक्षकांची मागणी होत होती.
त्या वेळेच्या एका सप्रेम नमस्कार मधील हा संवाद-
डॉ. किरण चित्रे (आकाशानंदांना उद्देशून) - आबा ... अमूक अमूक ठिकाणावरून तमूक तमूक व्यक्तिंचे पत्र आले आहे आणि ते विचारतात की तुम्ही गोट्या केव्हा दाखवणार?
आकाशानंद - त्यांना असं सांगायचं की तुम्ही प्रश्न विचारायला आणि आम्ही गोटया दाखवायला एकच वेळ आली आहे आणि पुढील सोमवार पासून तुम्ही गोट्या बघू शकता.
डॉ. किरण चित्रे - (संभाव्य शाब्दिक आपत्ती सांभाळत) तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर आबांनी दिले आहेच . तुम्ही गोटया हा कार्यक्रम पुढील सोमवार पासून बघू शकाल.
हे ऐकून आम्ही खो खो हसत सुटलो. दुसर्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये कळव्याच्या मालवणकरांनी हा विषय काढला आणि ऑफिसही खळखळून हसलं.
आपला,
(प्रेक्षक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
18 May 2008 - 9:48 am | विसोबा खेचर
डॉ. किरण चित्रे (आकाशानंदांना उद्देशून) - आबा ... अमूक अमूक ठिकाणावरून तमूक तमूक व्यक्तिंचे पत्र आले आहे आणि ते विचारतात की तुम्ही गोट्या केव्हा दाखवणार?
आकाशानंद - त्यांना असं सांगायचं की तुम्ही प्रश्न विचारायला आणि आम्ही गोटया दाखवायला एकच वेळ आली आहे आणि पुढील सोमवार पासून तुम्ही गोट्या बघू शकता.
=)) =)) =))
18 May 2008 - 4:16 pm | भडकमकर मास्तर
=)) शाळेत या कार्यक्रमावरून या पद्धतीचे विनोद झाल्याची आठवण आहे....
एकदम तो काळ आठवला...
=)) =))
18 May 2008 - 9:20 am | विसोबा खेचर
आपल्या आयुष्यात असे प्रसंग घडले असतील तर सांगावे.
अनेक आहेत!
धोंड्या, अद्याप काय म्या लगीनबिगिन केलं नाय, परंतु कधी काळी घरच्यांच्या आग्रहाखातर केवळ एक हौस म्हणून कांदेपोह्यांचे अनेक कार्यक्रम मी खेळलो आहे! ह्या कांद्यापोह्यांच्या कार्यक्रमात खूप गंमतीशीर प्रकार मी अनुभवले! त्याबाबत कधितरी लिहिणारच आहे सवडीने, तूर्तास एक सांगतो... :)
असाच एके ठिकाणी मुलगी पाहायला म्हणून गेलो होतो. मुलगी तशी बरी होती, अंमळ लाजाळू वाटत होती. मला पाहताच जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा असे भाव तिच्या चेहेर्यावर होते! चालायचंच! साक्षात तात्या अभ्यंकर तिला पाहायला आले होते म्हटलं! :)
तर ते असो...!
सुरवातीचे नमस्कार चमत्कार झाले. गप्पांच्या ओघात एकमेकांच्या आवडीनिवडीचा विषय निघाला. मी सहजच म्हटलं की मला गाणं ऐकायला खूप आवडतं, भीमसेन जोशी हे माझे अतिशय आवडते कलाकार आहेत.
का कुणास ठाऊक, 'भीमसेन जोशी' हे नांव ऐकल्यावर मुलीच्या आईचा चेहेरा एकदम खुलला आणि तिने एकदम भाबडेपणाने मला म्हटलं,
"वा वा! भीमसेन जोशी का? काय सुंदर सतार वाजवतात!"
हे ऐकल्यावर मला हसू आवरेना. खुद्द मुलगी आणि मुलीचा बाप हेही अंमळ ओशाळल्यासारखे झाले. शेवटी मुलीच्या बापानेच तिला परस्पर उत्तर दिले,
"अगं काहितरी काय? भीमसेन जोशी कुठे सतार वाजवतात? ते तर गातात!"
"माहित नाही तर जळ्ळं नाही त्या विषयात बोलते कशाला कुणास ठाऊक! उगाच भावी जावयासमोर कशाला अक्कल पाजळायची?!"
असे भाव मुलीच्या बापाच्या चेहेर्यावर होते! त्याचं 'स्वगत' मला ऐकू आलं होतं :)
मला मात्र त्या माऊलीचा मुळीच राग आला नाही. ज्या भाबडेपणाने तिने 'भीमसेन जोशी काय सुंदर सतार वाजवतात!' हे वाक्य म्हटले होते तो भाबडेपणा मला खूप भावला होता! अण्णांसारखा दिसणारा कोण बरं सतारवादक असावा हा विचार करतच मी त्या घरातनं बाहेर पडलो! :)
आपला,
(सुयोग्य वर!) तात्या.
18 May 2008 - 9:28 am | धोंडोपंत
क्या बात है तात्या!!!
तुमचे म्हणणे खरे आहे. बोलत्या माणसाची बोलती बंद करणे हे योग्य नव्हे. माणूस बोलू पहातोय हीच घटना मोठी आहे.
आपला,
(संवादप्रिय) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
18 May 2008 - 7:26 pm | ऋषिकेश
वा वा वा! काय बोललात धोंडोपंत.. आजचा रविवार या अवतरणांना समर्पित! :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
18 May 2008 - 9:24 am | धोंडोपंत
तुमचे खास देवगड पद्धतीचे विश्लेषण आवडले, पटले सुद्धा.
असाच एक प्रसंग आमच्या घरी घडला होता तो आठवला.
कविवर्य ग्रेस आमचे जुने स्नेही. अनेक वर्षांची मैत्री.
ज्या वेळेस ग्रेस पहिल्यांदा घरी आले होते त्या वेळेचा हा किस्सा.
आम्ही आमच्या मातोश्रींशी कविवर्य ग्रेस यांची ओळख करून दिली.
आम्ही - " हे कवि ग्रेस. मराठीतील अत्यंत प्रतिभावान कवी व साहित्यिक"
मातोश्री - नमस्कार, तुमच्याबद्दल खूप ऐकले वाचले आहे.
ग्रेस - "हो का, वा वा"
मातोश्री - "लहानपणी तुमच्या कविता शाळेत होत्या आम्हाला"
आम्ही अवाक. ग्रेसना हे ऐकून चक्कर येते की काय असे आम्हांला वाटले. पण ग्रेस लगेच सावरले.
ते मातोश्रींना म्हणाले " तुम्हाला आवडल्या का आमच्या शाळेच्या पाठ्यपुस्तकातील कविता?"
आपला,
(अवाक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
18 May 2008 - 3:15 pm | लिखाळ
मस्त किस्सा !!
संवाद तुटू नये आणि उगीच आपल्याला संदर्भ माहित आहे हे दाखवून कुणाचा हिरमोड करु नये असे मला सुद्धा वाटते.
चर्चा आणि प्रतिसाद मस्त आहे..
-- लिखाळ.
18 May 2008 - 9:10 pm | मुक्तसुनीत
सत्यं ब्रूयात् , प्रियं ब्रूयात् , न ब्रूयात् अप्रियं सत्यं असे म्हण्टलेलेच आहे. जिथे प्रश्न तत्वाचा , जगण्या-मरण्याचा असेल तेथे प्रिय व्यक्तीला कटु अशी सत्ये सांगणे अनिवार्य ठरते. ज्या प्रमादांमुळे त्या व्यक्तिचे किंवा कुणाचे नुकसान होत असेल तर तो प्रमाद दाखवून देणे भाग पडते.
अन्यथा ," एव्हरीवन होल्ड्स काँटीनेन्ट्स ऑफ इग्नोरन्स . इच वन ऑफ अस डिसर्व्स अवर्स." हेच खरे. आनंदाच्या क्षणामधला आनंद , केवळ त्या आनंदामागे अज्ञान आहे या क्षुल्लक कारणापायी कशाला हिरावून घ्या ? :)
20 May 2008 - 3:37 am | धनंजय
हे खरेच.
एका बाईंच्या छोट्याशा चित्रकला प्रदर्शनाला गेलो होतो. चित्रे सुंदर होती. आपली स्फूर्ती कुठून आली ते बाई सांगत होत्या. पण मग मध्येच कुठल्यातरी "Chaos" गणितशास्त्राचे दाखले देऊ लागल्या - चुकलेले दाखले होते.
अर्थात त्यांना त्याबद्दल काही बोललो नाही. पण मनात सारखी चुळबुळ होत होती - "बाईसाहेब, इतकी सुंदर चित्रे काढता, त्यांच्याविषयी इतके चांगले बोलण्यासारखे तुमच्यापाशी आहे, हा ओढूनताणून चुकीचा दाखला दिला नसता तर चाललेच असते ना?"
गप्पागोष्टींत तपशिलाच्या फार चुका नाही केल्यात तर बरे. ऐकणार्याची एकाग्रता भंग होते.
डिस्कोक्लबमध्ये नाचताना भिडूने ताल चुकवला तर असेच काही होते. त्याला/तिला "ताल चुकला" असे सांगून आनंदात विरस करू नये. पण त्यामुळे आपलाही ताल बिघडतो, आपली तल्लीनता भंग पावते, हेसुद्धा खरेच.