टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
काठावरून निरखलेला कामाठीपुरा
दचकायला होत ना? एक मध्यमवर्गीय घरातल्या व्यक्तीकडून, त्यातल्या त्यात स्त्रीकडून/ मुलीकडून हा शब्द ऐकला तरी आजूबाजूच्या भुवया लगेच उंचावतात!! या शब्दाचा उच्चार करण म्हणजे देखील पाप जणू.... तुमच्या आमच्या मध्यमवर्गीय आयुष्यात या शब्दाला जागा नसते, जणू काही हे जग अस्तित्वातच नसत आपल्यासाठी. तर, अश्याच मध्यमवर्गीय गर्दीतली आणि बर्यापैकी तशीच मानसिकता असलेली मी एक. मुंबईमधेच, कामाठीपुरा म्हणून एक भाग, वसाहत आहे हेच मला माहीत नव्हत. याबाबत मी पूर्ण अनभिज्ञ होते, आणि मग एके दिवशी अचानक कामाठीपुरा माझ्यासमोर उलगडला, उलगडला कसला, अंगावरच आला एकदम...
काही वर्षांपूर्वी, काही वैयक्तिक कामांसाठी, काही महिने तरी मुंबईमधे फ़ोर्टला सतत भेट द्यावी लागणार, हे स्पष्ट झाल आणि पोटात पहिला गोळा तिथेच आला! मुंबईच्या अफ़ाट बिनचेहर्याच्या गर्दीची मला नेहमीच धास्ती वाटते, सहनच होत नाही ती गर्दी मला. नेहमीच धावत पळत असणारी माणस बघूनच मला गुदमरायला होत आणि आता त्याच गर्दीचा एक नगण्य भाग बनून मला त्यांच्यामधेच वावरायच होत. एक बर होत की रोजची कसरत असणार नवह्ती. मधून मधून सलग, पुण्यात परतायला पण मिळणार होत आणि मुंबईच्या मानाने निवांत अस आयुष्य पण जगायला मिळणार होत. तेवढच बर वाटायच. सात समुद्रापार जाऊन देखील पुण्याची ओढ आणि थोडाफार पुणेरीपणा काही सुटत नाही!! मानाची बिरूद मिरवायला कोणाला आवडत नाही म्हणा!!
म्हणता, म्हणता, मुंबईलाही आपल म्हणायचे दिवस उजाडले आणि, मनात बरीच धाकधूक घेऊन, मी मुंबईत पोहोचले.
नशिबाने, मुंबईमधे नातेवाईक आहेत. मी मावशीकडेच राहणार होते. तिच्या घरापासून लोकल स्टेशन आणि बेस्टचा डेपो, जवळच आहेत. एक दिवस सोबत बरोबर घेऊन , लोकलची आणि पर्यायाने लोकांची गडबड, धांदल बघूनच लक्षात आले की हे काही आपल्याला झेपणारे नाही, आपल्यासाठी बसच बरी. मी बसच्या पहिल्या स्टॉपलाच चढणार होते, त्यामुळे गर्दी वगैरेची चिंता नव्हती, गंतव्य स्थानाच्या बर्यापैकी दारातच उतरू शकले असते, त्यामुले ती ही चिंता राहिली नव्हती. मुंबईमधे जर आधी कधीच वावरला नसाल आणि एकदम असे फ़िरायला लागले, तर मी काय म्हणते आहे ते लक्षात येईल, निदान मला तरी सुरुवातीला खूपच गोंधळल्यासारखे वाटत असे. तर पहिले दोन तीन दिवस मामाने बरोबर यायचे ठरवले. त्याच्या बरोबर गप्पांमधे प्रवासात वेळ कसा जायचा समजत नसे, बाहेरची गर्दी, रस्ता, कशाकडेच फ़ारसे लक्ष न देता, आम्ही खूप गप्पा मारत असू. बरे, तो बरोबर असल्याने मी ही निर्धास्त.
मग, दोन तीन दिवसांनी मी एकटेच जायचे ठरवले, रोज रोज मामाला तरी कुठे जमणार होते माझ्या बरोबर यायला? त्यालाही त्याचे घड्याळाच्या काट्यांवर पळणारे आयुष्य होतेच की. आता इतका आत्मविश्वास नक्कीच आला होता, कि एकटी जाऊ येऊ शकेन, आणि बरोबर घरच्यांचा फ़ोन नंबर होताच. पुस्तक पण घेतले होते वाचायला बरोबर. पुस्तक घेऊन गेले की कुठला ही प्रवास कंटाळवाणा होत नाही, त्यामुळे प्रवासात एक वेळ तिकिट विसरेन, पण पुस्तक नाही!! पहिले तीन चार दिवस, बसमधे चढून एकदा तिकीट काढल की मी पुस्तकात डोके खूपसून वाचत बसत असे. साधारण फ़ोर्टचा भाग लागला, की कंडक्टर ओरडून सांगतच असे, त्यामुळे तशी काळजी नसे. आणि एक दिवस असच वाचत बसलेले असताना, बसच्या बाहेर खूप गलका ऐकयला आला अन, वाचनाच्या तंद्रीतून एकदम जागी झाले.
पहाते तो काय, समोरचा माहौल इतका वेगळा होता... साधारण मध्यमवर्गीय किंवा अतिशय उच्चभ्रू वातावरणापेक्षा अतिशय वेगळ, भसकन अंगावर येईल अस वातावरण वाटल मला ते त्या वेळी.
पहिली पाच दहा मिनिट केवळ अवाक होऊन बसच्या खिडकीतून बाहेर बघण्यातच गेली!! आणि एकदम लक्षात आल, ही वेश्या वस्ती!! तेवढयात पाटीही दिसली लहानशी, कामाठीपुरा. बस, येवढच लिहिलेल. कदाचित, ज्यांना इथे यायची गरज पडते, त्यांच्या साठी पुरेस असाव तेवढच. बस वेश्या वस्तीतून जाते आहे, लक्षात आल, आणि उगीचच माझच मन कसनुस झाल! म्हणजे रोज बस इथून जात होती?? आणि आपल्या काहीच नाही लक्षात आल?? मला खरच वाटेना.... नंतर किती तरी वेळ माझ्या मनातून ते वातावरण पुसलच जात नव्हत. विदारक हा शब्द ऐकला होता, पण विदारक शब्दाचा अर्थ त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिला. अतिशय सुन्न करून टाकणारा असा तो अनुभव होता....
तेह्वासुध्द्धा, पाहताक्षणी जाणवल, ते अतिशय भकास वातावरण, आणि तसेच उदास चेहरे. रस्त्यातली वर्दळही तशीच. कोणाची दखल न घेता, अलिप्त आणि मख्ख देहबोली घेऊन जगणारी, आपल्या आपल्या आयुष्याचे भार सांभाळणारी अन ओढणारी, दैन्य पांघरलेली गर्दी. अन त्यानंतर बसच्या बाहेर पहायच धाडस उरलच नाही त्या दिवशी. परत एकदा मी पुस्तकात डोक खुपसल आणि तशीच बसून राहिले. फ़ोर्ट आल, तस कंडक्टरने ओरडून सूचना दिली अन, मी तंद्रीतून जागी झाले!! इतका वेळ मी एकाच पानावर डोळे खिळवून बसले होते? लक्षातच नाही आल! एक प्रकारचा सुन्नपणा मला वेढून राहिला होता.... त्यातल्यात्यात एवढेच बरे होते, की परत जाताना मी जी बस घेत होते, ती कामाठी पुर्यातून जात नसे. कदाचित दुसरी बस मिळत असावी. माझा शेवटचा थांबा असल्याने, त्या थांब्याच्या नावाचा फ़लक बसवर लावलेला दिसला की मी जास्त विचार न करता बसमधे चढत असे!! काम संपवून घरी पोचले तरी, डोक्यातून विषय जात नव्हता... उद्या परत बस तिथूनच जाणार हे जाणवून उगाचच एक दडपण आले होते मनावर.
... आणि परत एकदा, दुसर्या दिवशी मी त्याच बसमधे चढले. आज पहिल्यांदाच मी बसमधे वाचत नव्हते. परत एकदा बस कामाठी पुर्याच्या रस्त्याला लागली, पण आज मी सारे पाहणार होते.. मनात थोडी भीती, थोडी जिज्ञासा, कुतूहल... हळू हळू नजर एकेक तपशील टिपत गेली... गलिच्छ रस्ता, ठिकठिकाणी फ़ेकलेला कचरा, सांडपाणी, त्यातच खाण्याच्या पदार्थाचे ठेले मांडलेले विक्रेते, चहावाले, इतर दुकाने, विक्रेते, दुकानातली गिर्हाईके. मला सगळयात आश्चर्य वाटत होते ते म्हणजे त्यांच्या तिथल्या सराईत वावरण्याचे. अर्थात, त्यांच्या साठी ते रोजचेच जगणे होते, अन रोज मरे त्याला कोण रडे, असेच होत असावे त्यांचे.
रोज सकाळच्या वेळी तिथल्या, देह विक्रयाचा व्यवसाय करणार्या स्त्रिया, रस्त्यावर किंवा त्यांच्या खोल्यांच्या दारांत बसलेल्या असायच्या. काही एकमेकींशी बोलत असायच्या, काही जणी उगाच थकून भागून बसलेल्या. सगळे काही स्वीकारल्या सारख्या. तर काही उगाच कुठे तरी भकास नजरेने पहात हरवलेल्या.. सार्याच थकलेल्या, भागलेल्या.. आणि काही आक्रस्ताळेपणे झगडताना दिसायच्या. नक्की कोणाशी भांडत असायच्या कोण जाणे? समोरच्या व्यक्तीशी? नशीबाशी? नियतीशी? दैवाशी?? की देवाशी?? या स्त्रियांना बघणे, त्यांच निरीक्षण करणे हा एक कडवट अनुभव होता माझ्यासाठी. का म्हणून यांच्या नशिबात हे दान पडल होत?
इथे येताना कितीजणींना आपण कुठे आणि का चाललोय ते माहीत असेल? अजाणत्या वयात काय अनुभव घेतले असतील? मनावर ओरखडे उठले असतीलच ना? नक्कीच.. आणि मग कदाचित एक दिवस सार काही मनाविरुद्ध अंगवळणी पडल असेल, पाडून घ्याव लागल असेल.. काहींनी कळत्या वयात, नाइलाज म्हणून हे अग्निदिव्य स्वीकारल असेल, घरच्यांवर मायेची पाखर घालण्यासाठी स्वत: अंतर्बाह्य जळत असतील, आणि ही पाखर घालतानाही आपल अस्तित्व दृष्टीआड ठेवून. घरचे लोकही कदाचित दृष्टीआड सृष्टी म्हणत असतील का?? कधीकधी माणसाचे नाइलाज किती पराकोटीचे असू शकतात..... सारच अर्तक्य! काहींची स्वप्नं चुरगाळली गेली असतील, ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकावी अश्याच कोणी नवर्याने, प्रियकराने, भावाने, नात्यातल्या काका, मामानेच या लेकी बाळींना इथे आणून इथल्या गिधाडंपुढे फेकून दिल असेल! या लेकी बाळी ही कधी काळी निरागसपणे कुठे तरी, आपापल्या घरच्या अंगणात बागडल्या असतील, काहींनी परकराच्या ओच्यात फुल, पान जमवली असतील, काहींनी भातुकलीचे संसार मांडले असतील, सख्यांबरोबर साईसुट्यो खेळल्या असतील.. घरच अठरा विश्व दारिद्र्य आणि झोपडीतला अंधार देखील यांच्या स्वच्छ हसण्याने उजळून निघाला असेल..... आज तस हसू फ़ुलेल कधी यांच्या चेहर्यावर? आयुष्यात परत या स्त्रियांचा कधी, कोणावर विश्वास बसेल??
आणि रस्त्यालगतच बागडणारी या माउल्यांची लहान मुल?? त्यांच्या आठवणी आजही मला अस्वस्थ करतात!! त्या निरागस, निर्व्याज लहानग्यांना रस्त्यावर अजाणता बागडताना पाहून खर तर मला उदास, अस्वस्थ व्हायला झाल…। काय भविष्य आहे यांच, हा प्रश्न सतत मनत आल्याशिवाय राहिला नाही… यातल्या मुली असतील, त्यांच हे हसू असच कायम राहील?? का आसूंत बदलेल? या मुलांच निरागस मन निब्बर व्हायला किती लवकर सुरुवात होत असेल! त्यांना देखील याच खातेर्यात उडी घ्यावी लागणार आहे का? काय वाटत असेल तिथे व्यवसाय करणार्या आईला, लेक पोटी आली म्हणून? काय विचार करत असतील ह्या आया आपल्या लेकरांच्या भवितव्याचा? असा काही विचार करायची मुभा नियती देत असेल त्यांना ?? सगळीच परिस्थिती, दाटला अंधार अशी.....
तिथल्या ह्या स्त्रियांच्या खोल्यांकडे बघवत नव्हतं, मोठया मोठया खिडक्या असणार्या काडेपेट्यांसारख्या, तितकीच लांबी, रुंदी असलेल्या ह्या खोल्या पाहून, कबुतरांची खुराडी सुद्धा बरी अस वाटल्या वाचून राहिल नाही. रात्रीच्या वेळेस, ह्याच काडेपेट्यांचे विलास महाल बनतात? तेव्हा, या विलास महालातली औट घटकेची रातराणी, आपल्या कच्च्या बच्च्यांना कुठे आसरा देत असेल? कोणा महाभागाची औट घटकेची सोबत करताना, तिच्या मनात काय येत असेल? मन कस आणि किती आक्रंदत असेल? असे किती मातांचे, नवतरुणींचे, अबोध बालिकांचे आक्रोश या भिंतींनी पाहिले असतील? पचवू शकल्या असतील? सकाळच्या वेळेस, या खोल्यांच्या भिंती अगदी भकास वाटायच्या, जणू काही या बायकांच्या मनातल्या मूक आक्रोशाच्या साक्षीदार होता होता, जगायच विसरून गेल्यासारख्या. सार्या वातावरणातच एक मृतप्राय कळा, एक उदासवाणा, अलिप्त भाव. जणू माणूसकीची जिती जागती कबर.
उगाचच एक वाक्य आठवल होत तेह्वा. स्त्री ही क्षणकालची पत्नी अन अनंतकालची माता असते.... किती वेगळ्या अर्थाने ते वाक्य तिथे साकार झाल होत!
.... अजून एक विरोधाभास पाहिला अन खूप जाणवलाही.
एक रेणुकामातेच देऊळ होत, छोटस, सुंदरस.. मनोभावे स्त्री रुपाची, आदिशक्तीची पूजा झालेली दिसत होती. देवीची मुद्रा प्रसन्न, हसरी, नजर तिच्या ह्या लेकींकडे. देवळाच्या बाहेर एक पताका लावलेली होती, त्यावर देवी सूक्तातले मंत्र ठळक अक्षरात लिहिले होते...
ll या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता l नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम: ll
काय पाहत होती आई उघड्या डोळ्यांनी? मानवरुपातल्या स्त्रीशक्तीची, मातृरुपाची विटंबना? दैन्य, लाचारी, असहायता???
का सगळे फक्त शब्दांचे बुडबुडे केवळ???
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:
ll या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता l नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम: ll
औरत ने जनम दिया मर्दो को.मर्दो ने उसे बाजार दिया...............
पण विदारक शब्दाचा अर्थ त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिला
लाज वाटते रे माणुस म्हणायची असे काही पाहिले की.
पण आपण साले पुचाट षंढ असतो नुसते सगळे फक्त शब्दांचे बुडबुडे काढत बसतो
रातराणी
यशोधरा.. अगदी अशाच भावना मनात येतात अशा वस्त्या पाहिल्या की..
तंतोतंत उतरवलंस..
मनावर ओरखडे
हे भयानक आयुष्य खरच कोणत्याही स्त्रीच्या वाटेला येऊ नये....
पण हे जगच अस झालय...की इथ प्रतेक गोष्टीचा बाजारच मांडला जातो.....
विकणारा आणि विकत घेणारा !!!!!इतरांच्या क्षणीक सुखासाठी यांना मात्र आयुष्यभर मोबदला चुकवत बसावे लागते.....
पैसा फेक तमाशा देख....खरच यांच्या आयुष्याचा तमाशाच होऊन राहतो.....
जो पर्यन्त तारुण्य तो पर्यन्त चलती पण पुढे काय?????
अंधार-अंधार-अधांर------ मग पुर्णपणे निराधार..........
(व्यथित झालेला.....)
मदनबाण.
हे भयानक
हे भयानक आयुष्य खरच कोणत्याही स्त्रीच्या वाटेला येऊ नये....
पण हे जगच अस झालय...की इथ प्रतेक गोष्टीचा बाजारच मांडला जातो.....
विकणारा आणि विकत घेणारा !!!!!इतरांच्या क्षणीक सुखासाठी यांना मात्र आयुष्यभर मोबदला चुकवत बसावे लागते.....
पैसा फेक तमाशा देख....खरच यांच्या आयुष्याचा तमाशाच होऊन राहतो.....
जो पर्यन्त तारुण्य तो पर्यन्त चलती पण पुढे काय?????
अंधार-अंधार-अधांर------ मग पुर्णपणे निराधार..........
१०० % सहमत.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
खरच
ते अतिशय भकास वातावरण, आणि तसेच उदास चेहरे. रस्त्यातली वर्दळही तशीच. कोणाची दखल न घेता, अलिप्त आणि मख्ख देहबोली घेऊन जगणारी, आपल्या आपल्या आयुष्याचे भार सांभाळणारी अन ओढणारी, दैन्य पांघरलेली गर्दी.
रोज घरी जातांना लागणारी बुधवार पेठ अगदी अशीच, पहावत नाही.
विदारक सत्य..
यशोधरा,तुझा काठावरचा अनुभव इतका अस्वस्थ करून गेला,
(तर तात्या.. तुझी रौशनी किती अस्वस्थ करते रे बाबा..)
लेख उत्तम झाला आहे हेवेसांनल.
स्वाती
ही सत्य परिस्थिती..
इतक्या तरलपणे इथे मांडलीत.. आपले अभिनंदन..
उगाचच एक वाक्य आठवल होत तेह्वा. स्त्री ही क्षणकालची पत्नी अन अनंतकालची माता असते.... किती वेगळ्या अर्थाने ते वाक्य तिथे साकार झाल होत!
हे वाक्य मात्र मन विषण्ण करून गेलं. म्हंटलं तर ज्वलंत सत्य आहे हे...
मी शाळेत असताना, माझ्यापेक्षा वरच्या वर्गात असणारी एक मुलगी म्हणे कोणा बरोबर तरी पळून गेली. आणि या बातमी नंतर काही दिवसांनी असे ऐकले की, त्या नराधमाने तिला विकले. यातले सत्य नक्की काय माहिती नाही.
पण आपला हा लेख वाचून वाटले की, ती मुलगी तिथेच तर नसेल.....
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
हृदयाला हात घालणारे लेखन!
यशेधराजी,
हृदयाला हात घालणारे लेखन! इतक्या तरल विषयावर आपण आपल्या भावना तितक्याच मनमोकळेपाणाने येथे मांडल्यात याचे खरंच कौतुक वाटते!
नक्की कोणाशी भांडत असायच्या कोण जाणे? समोरच्या व्यक्तीशी? नशीबाशी? नियतीशी? दैवाशी?? की देवाशी?? या स्त्रियांना बघणे, त्यांच निरीक्षण करणे हा एक कडवट अनुभव होता माझ्यासाठी.
मीही या अनुभवाला अगदी जवळून सामोरा गेलो आहे. माझी जवळजवळ उठबसच या मंडळीत असायची. अगदी रोजच्या रोज! रोज एक नवा अनुभव, रोज एक नवं दैन्य पाहायला मिळायचं!
आणि रस्त्यालगतच बागडणारी या माउल्यांची लहान मुल?? त्यांच्या आठवणी आजही मला अस्वस्थ करतात!! त्या निरागस, निर्व्याज लहानग्यांना रस्त्यावर अजाणता बागडताना पाहून खर तर मला उदास, अस्वस्थ व्हायला झाल…। काय भविष्य आहे यांच,
अगदी खरं आहे. माझ्या नशिबी काय योग होता पहा, यातल्या एका वेश्येच्या मुलाला त्या रगाड्यातून, नरकातून बाहेर काढून बाहेरच्या सुधिक्षित, सुसंस्कृत जगात आणण्याचं भाग्य मला लाभलं!
असो,
अत्यंत वास्तववादी लेखन! हा लेख वाचून कधी काळी मीही फॉकलंड रोड, फोरास रोड व कामाठीपुर्याच्या १४ गल्ल्या हिंडलो आहे व हे सगळं दैन्य उघड्या डोळ्यानी पाहिलं आहे याची आठवण झाली!
अजून काय लिहू??
आपला,
(रौशनीच्या आठवणीत किंचित उदास!) तात्या.
एक्स मॅनेजर, झमझम देशी दारू बार,
रौशनीच्या चाळी शेजारी,
फोरास रोड, मुंबई.
--
या सगळ्या चिखलात, आमची रौशनी खरंच खूप वेगळी होती, सुसंस्कृत होती!
मनाला विषण्ण करणारा विषय-
यशोधरा, हा विषय अतिशय विषण्ण करणारा . तो मांडल्याबद्दल धन्यवाद. कविता महाजन यांचे भिन्न नावाचे पुस्तक याच विषयाशी निगडित समस्यांवर आहे. त्यातली एक ओळ वाचून पुढे जाण्याकरता अंगात हिम्मत आणावी लागते एवढे विदारक प्रसंग आहेत. नशिबाने, देवाच्या दयेने आपण किती सुरक्षित आणि सुखाचे आयुष्य जगत आहोत याची जाणीव प्रत्येक वेळी मनाला होत असते.
मन विषण्ण
मन विषण्ण करणार लेखन. खरच आपल्या मध्यम्वर्गिय जिवनात आपण किति गुंतुन जातो ना कि त्या पलिकडेहि जग असत याचि आठवणच रहात नाहि. साध्या साध्या गैरसोयि खुप मोठ्या वाटायला लागतात आणि इथे ह्या बिचार्या जिवंतपणि नरकात रहात असत्तात. खुप प्रामाणिकपणे लिहलयस मनाला भिडल अगदि.
डोळ्या॑त
डोळ्या॑त पाणी आल॑ वाचून. हतबलतेची विषण्ण जाणीव करून दिलीत
जिन्हे नाझ है॑ हि॑द पर वोह कहा॑ है॑
दैवाचे भोग
मी सुद्दा बरेच वेळा बसने जाताना (फोर्ट)हे दॄश्य अगदी मन घट्ट करुन पाहीलं आहे ,पाहताना हमखास डोळ्यातुन पाणी येतं.
देवाने ह्यांच्या नशीबी हे भोग का दिले असतील? प्रश्न पडतो आपण त्या स्त्रियांसाठी, मुलांसाठी काही करु शकतो का?
नुकतंच वाचनात नवीन पुस्तक आलं आहे " बारबाला - वैशाली हळ्दनकर" मन हेलावुन टाकणारा अनुभव कथन केला आहे,
लहानपणापासूणच तिच्यावर अत्याचार होतात्,स्वत:च्या सख्ख्या मुलाने सुद्धा आईचा वापर करावा ह्यापे़क्षा भयानक शोकांतिका
काय असावी?
विदारक अनुभव आणि
हृदयस्पर्शी लिखाण
प्रविण पाटकरांच्या 'सति' पुस्तकामधे ह्या 'वस्तीवर' आधारित २ लेख वजा कथा आहेत ('लाल काळोख' आणि 'जगबूड') - अतिशय वास्तववादी चित्रण केले आहे. स्वत: प्रविण पाटकरांचे कामही खूप चांगले आहे ह्या विभागात....
धग
लेखनातून संवेदनशीलता आणि धग दोन्ही जाणवले.
(वाचक)बेसनलाडू
यशोधराजी,
दाहक आणि संवेदनशील लेखन आणि अत्यंत समर्पक शीर्षक!
समाजाचे हे एक भेदक आणि पचवायला अवघड वास्तव असे अलगद पुढे आणून ठेवण्याची विलक्षण किमया आपण केली आहे. धन्यवाद!
चतुरंग
छान लिहीलंत
यशोधरा,
तुम्ही लिहीलेला लेख मन अस्वस्थ करून गेला. छान लिहीलंत, अनुभव चांगल्या शब्दात मांडला.
त्या निरागस, निर्व्याज लहानग्यांना रस्त्यावर अजाणता बागडताना पाहून खर तर मला उदास, अस्वस्थ व्हायला झाल…। काय भविष्य आहे यांच, हा प्रश्न सतत मनत आल्याशिवाय राहिला नाही… यातल्या मुली असतील, त्यांच हे हसू असच कायम राहील?? का आसूंत बदलेल?
खरोखर - काय भविष्य आहे यांच?
ईश्वरी
लेखाला
लेखाला अभिप्राय दिल्याबद्दल आणि आपापले विचारही मांडल्याबद्दल सार्यांचेच आभार. मन विषण्ण करणारा विषय आहे तर खराच... असंही आयुष्य जगतात काहीजण...
कॅमेरा मंगताय.
बाकी "कामाठीपुरा" एकदम डोळे उघडणारा आहे बघा. हे जसे मनाच्या नजरेतून होते, तेच डोळ्यांच्या कॅमेरातून शब्दबद्ध केले तर भारी होईल. इस्टोरी सांगायची फक्त कॅमेराला दिसते तशी. येकदम पिच्चर वगैरे काढता येईल.
विदारक सत्य.
यशोधरा ताई, तुम्ही खुप छान लिहीले आहे, मन अस्वस्थ करते अशा महिला॑ना पाहिल्यावर आणि त्या॑चे रोजचे जगणे म्हणजे नेहमीचे नवे मरण असेच असते, मी एक बातमी वाचली होती की एक वेश्या एडस मुळे मरून पडली होती तीला साधा खा॑दा देण्यासाठी कोणीही पुढे येईना .
पण हे ही तितकेच खरे की त्या आज समाजात आहेत म्हणुन इतर स्त्रीया॑चे आयुष्य भयावह नाही, नाही तर घरातुन बाहेर पडणे ही स्त्रीस शक्य नव्हते.
अगदी खरय
अगदी खरय शीतल. या स्त्रिया समाजात आहेत, म्हणून बाकीच्या स्रिया वाचल्या आहेत हे म्हणणे अगदी पटले....
आणि मला ताई वगैरे म्हणू नको गं.. नुसतं यशोधरा म्हण पाहू....
कदाचित
कदाचित आपल्यापैकी काहीजणांनी हे वाचलही असेल, हा लेख वाचून इतकं अस्वस्थ व्हायला झालं!!! अस्वस्थ हा शब्द देखील तोकडा पडावा अशी वागतात माणसं .....
सीतेच्या जन्मभूमीत घडलेलं क्रौर्य!!
ह्म्म.....
लेख वाचला...........
काय बोलु?
छान म्हणू? भट्टी उत्तम जमलीये म्हणू? जबरदस्त म्हणू?
की अस्वस्थ मनाची हाक ऐकून नुसताच सुन्न बसुन राहू?
आम्ही साले पांढरपेशे. काठावरुन पाण्यात खडे मारणारे...
जाऊ दे...डोकं सुन्न झालं हे मात्र खरं!
तू खुप
तू खुप सुंदर लीहीले आहेस.
अगदी मनापर्यंत पोहोचतय
एक विदारक सत्य पण...............
तुम्ही फारच छान लिहले आहे पण ......
जे पुरुष घरापसुन दुर राहतात त्यान्च्यासाठि याचि गरज आहे म्हणुन सरकार याला कायदेशिर मान्याता देण्याचा विचार करत आहे / होते
याचि गरज आहे अस वाटते का ???????
मी मिपा
(कायम संयमी असणारा)
बापरे
भयंकर ..सुन्न झालेय्..शब्द नाहीयेत माझ्याकडे काहीच बोलायला...
ती बातमीही वाचली मी....किती क्रुर असु शकतात माणसं.....
आठवण
अप्रतिम लेख.
अनिल अवचटांच्या "वस्त्या वेश्यांच्या" या लेखाची आठवण झाली.
राजेश.
मन विष्ण्ण करणारा लेख . . . . .!
यशोधरा,
खुप चांगले लिहायला अनुभव आणि संवेदनशील मन असायला लागते. समाजाचा एक भागच असा नासलेला / सडलेला आहे; हे किती भयानक आहे? ' त्या आहेत म्हणून आपण सुरक्षीत आहोत.' असे म्हणताना ' त्या आपल्याला सुरक्षीत ठेवतात म्हणून आपण त्यांच्यासाठी काहीतरी करुया ' असे वाटते का? का आपणही नुसतेच शब्दांचे बुडबूडें सोडतो?
काही नाही तरी आपण त्यांच्या मुलांसाठी काहीतरी करुया. मुलांचे कल्याण झाले तरी मातेला समाधान वाटते.
कुणी काही मार्गदर्शन करील का? सर्वांनी त्या मुलांचे पुनर्वसन करण्यास सहाय्य केले, आपापल्या परीने, तरी खुप काही होईल. अशा काही संस्था आहेत का? कदाचीत त्या वस्तीत कार्य केलेले तात्या काही मार्गदर्शन करु शकतील. अन्य कुणालाही काही सुचवता येइल.
यशोधरा खरच
यशोधरा
खरच सुन्दर लेख लिहीलायस
तरी अता ती वस्ती बरीच कमी झालेय. पुर्ण बेलासिस रोड आणि सात रस्त्यापर्यंत भरलेला फोरास रोड होता. ही गोष्टही खुप अस्वस्थ करते की कुठे गेली असतील त्या बायका त्यांची ती मुल.
फोर्ट मधे तर काही वर्षांपुर्वी खांबन खांब त्यांचा होता. त्या खांबानाही कित्येक वर्षांच्या किती कहाण्या माहीत असतिल