कधी चांदण्याला तुझी आस होती
कधी श्रावणाला तुझे ध्यास होते
मला मात्र जन्मांतरी सोबतीला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
निजेच्या क्षणी जोजवाया मनाला
तुझे शब्द होते, तुझे सूर होते
पहाटे जशी जाग आली, उशाला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
गळा हुंदका दाटता सावराया
तुझा स्पर्श होता, तुझे हास्य होते
जरा एकटे वाटता साथ द्याया
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
फुलांना तजेला, कळ्यांच्या खळ्यांना
हसू वाटणारा तुझा गंध होता
झर्याला खळाळून लोभावणारे
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
समेला जशी दाद उस्फूर्त यावी
तसा या जिवाला तुझा छंद होता
दिली साथ आयुष्यगीतास ज्यांनी,
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
प्रतिक्रिया
16 May 2011 - 10:35 pm | भवानी तीर्थंकर
मी कविता फारशा वाचत नाही. पण ही वाचली आणि आवडली. विशेषतः पहिले आणि चौथे कडवे आवडले. याचं गाणंही होऊ शकतंय. :)
16 May 2011 - 10:36 pm | मेघवेडा
काव्याच्या समेला "वा! क्या बात है!" अशी उस्फूर्त दाद आलीच!
मस्तच झालंय! :)
18 May 2011 - 10:26 am | धनंजय
पुन्हा वाचावीशी कविता.
सर्व संदर्भ/उपमा/रूपके समजलेली नाहीत,* पण पुन्हा वाचून समजण्याचा प्रयत्न करण्यासारखी.
(*उदाहरणार्थ : श्रावणाला ध्यास असण्याची कल्पना पारंपरिक किंवा नवीन शब्दचित्र असल्यास समजलेले नाही. आषाढाला पावसाचा ध्यास लागला असू शकतो. पण उन-पाऊस खेळणार्या अल्लड श्रावणाविषयी कसलाही ध्यास कळायला कठिण जातो. आणि श्रावणाचा तो ध्यास हा मानदंड घेऊन त्यापेक्षा "माझ्या सोबतीला तू" हा स्वप्नवत् भास वर्णलेला आहे... म्हणून श्रावणाचा ध्यास मनापासून समजणे गरजेचे आहे. वगैरे. त्यामानाने "चांदण्याला आस" हे पारंपरिक शब्दचित्र असल्यामुळे समजून घेता येते.)
19 May 2011 - 4:33 am | मदनबाण
फुलांना तजेला, कळ्यांच्या खळ्यांना
हसू वाटणारा तुझा गंध होता
झर्याला खळाळून लोभावणारे
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
सुंदर... :)
19 May 2011 - 4:50 am | दत्ता काळे
पुन्हा पुन्हा वाचली.
निजेच्या क्षणी जोजवाया मनाला
तुझे शब्द होते, तुझे सूर होते
पहाटे जशी जाग आली, उशाला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते.
.. हे कडवं विशेषकरून आवडलं.
19 May 2011 - 10:44 am | राघव
अस्सेच म्हणतो.
हेच कडवे विशेष आवडले! :)
राघव
20 May 2011 - 7:20 am | अज्ञातकुल
लय, ताल, शब्द सारंच लाघवी. :)
24 May 2011 - 3:51 am | चित्रा
क्रान्ति यांची कविता आली की आवर्जून वाचावीशी वाटते.
काही कडवी विशेष आवडली.
24 May 2011 - 10:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समेला जशी दाद उस्फूर्त यावी
तसा या जिवाला तुझा छंद होता
दिली साथ आयुष्यगीतास ज्यांनी,
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
और भी आने दो.
-दिलीप बिरुटे
24 May 2011 - 10:22 am | मृत्युन्जय
खरेच मस्त जमली आहे. एरवी आम्ही काव्यकृतींकडे फारसे वळत नाही. पण ही सहज म्हणुन वाचली आणि भावली.