मायेची सावली

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
5 May 2011 - 7:48 pm

ल हानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्याचं एक विशेष आकर्षण असायचं. आंब्या-फणसाचा यथेच्छ आस्वाद, नदीतली आंघोळ, मनसोक्त भटकंती आणि आजीचं प्रेम!
आमच्या लहानपणी सुटीत कुलू-मनाली, नैनिताल-दार्जिलिंग, गीर-कान्हा, गेला बाजार महाबळेश्‍वर, असं कुठे फिरायला जाण्याची पद्धत नव्हती. किंबहुना, तसा विचारही कधी मनात यायचा नाही. पर्यटन म्हणजे लग्ना-मुंजीच्या निमित्तानं मुंबई-पुणे किंवा कोल्हापूरला केलेला दौरा. येता-जाता कुणाची गाडी असेल किंवा अगदीच सोयीचं असेल, तर एखाद्या ठिकाणाचं दर्शन. किंवा आईवडिलांबरोबर भावासाठी नवससायास करण्यासाठी केलेली गाणगापूर, त्र्यंबकेश्‍वर किंवा नृसिंहवाडी वगैरे ठिकाणांची वारी. बास! आमच्या लहानपणीचं पर्यटन हे एवढंच.
आजोळी जायला मात्र बंदी नव्हती. सुटी लागली, की कधी एकदा आजोळी जातो असं होऊन जायचं. माझं आजोळ म्हणजे शिपोशी. रत्नागिरीपासून अगदी 48 किलोमीटर म्हणजे दीड तासाचा एश्‍टीचा प्रवास. संध्याकाळची चारची गाडी पावणेपाचला सुटायची आणि साडेसहापर्यंत वाकड्या फणसावर पोचायची. शिपोशी गावाच्या स्टॉपला "वाकडा फणस' असं नाव आहे. तिथे पूर्वी एक वाकडं झालेलं फणसाचं झाड होतं म्हणे. त्यावरून त्या स्टॉपला नाव पडलं, वाकडा फणस. शिपोशी गावाचे तीन-चार स्टॉप आहेत, त्यामुळं नेमका स्टॉप करण्यासाठी हेच नाव प्रचलित झालं. या वाकड्या फणसावरून चालत घरी जायला वीसेक मिनिटांचं अंतर. छोट्याशा टेकाडावरून वाट काढत जायला मजा यायची. संध्याकाळी गुरं घराकडे परतीच्या मार्गाला लागलेली असायची, माणसं शेतातून घरी निघालेली असायची. आजोळाच्या ओढीनं झपाझप पावलं पडायची.
नदीच्या पायऱ्या उतरू लागलो, की समोरच्या मामाच्या घरची मंडळी नेमकं कोण आलंय, याचा अंदाज घेऊ लागायची. तेव्हा शिपोशीत काय, रत्नागिरीत पण आमच्या घरी फोन नव्हता. आजोळी जायचं म्हणजे जायच्या आदल्या दिवशी फोन, निघाल्यावर फोन, बसमध्ये बसल्यावर फोन, उतरायच्या आधी फोन, असे काही प्रकार नव्हते. मी आजोळाच्या अंगणात जाऊन उभा राहिलो, की हा मुक्कामाला आलाय, हे त्यांना समजायचं. घरी गेल्यावर आजी गूळ आणि पाण्याचा तांब्या देऊन स्वागत करायची. रात्रीची जेवणं लवकर म्हणजे आठच्या दरम्यानच व्हायची. आजीनं चुलीवर एका मोठ्या तपेल्यात मस्त भात शिजवलेला असायचा. त्याच्या वासानंच कधी एकदा जेवतोय असं झालेलं असायचं. केळीच्या पानावर मावेल एवढा भात आणि घरचा कढीपत्ता घातलेली आमटी, जोडीला सुकांबाचं लोणचं, असा बेत असायचा. पोळी वगैरे पक्वान्नाचा बेत क्वचितच असायचा. त्यामुळं पहिला भात झाल्यावर पुन्हा भात ओरपायचा!
सकाळी आम्ही निवातं आठ साडेआठपर्यंत उठायचो. आजी सकाळी पाच वाजताच उठून कामाला लागलेली असायची. आंब्याचे दिवस असले, की तिची धावपळ काही विचारूच नका! सकाळी उठून रस आटवा, साटं घाला, फणस तयार असेल तर त्याचा रस काढून सांदणं करा, कधी घावने-पातोळे करा, असे तिचे उद्योग सुरू असायचे. आम्ही तोंड वगैरे धुवून चहा घेऊन तरतरीत होईपर्यंत ती गरमागरम नाश्‍ता खाण्यासाठी हाक मारायची. नाश्‍त्यालाही तिनं मोठ्या पातेल्यात गरम मऊ भात केलेला असायचा. कधी रात्रीच्या उरलेल्या भाताला फोडणी घातलेली असायची. नाहीतर कधी फणसावरच भागवलं जायचं. फणसाची उस्तवारी मात्र मामाकडे असायची.
दुपारी साडेबारापर्यंत आजीची सांदणं, आमटीभात, वगैरे स्वयंपाक तयार असायचाच, पण मधल्या काळात ती रस काढून ठेवायची, रस आटवून त्याची साटं घालायची, आधीची साटं परतून कडकडीत उन्हात वाळत घालायची. कधीकधी पापड-फेण्यांचा घाट असेल, तर तेही मधल्या काळात फटाफट उरकायची. आजीला कधी फार दमलेलं आम्ही बघितलं नाही. बघावं तेव्हा पाठीत वाकून तिची स्वयंपाकघरात काहितरी खुडबूड सुरू असायची. मध्येच "हाया..' म्हणून दोन मिनिटं पाठ सरळ करून विश्रांती घ्यायची, की पुन्हा कामाला जुंपून घ्यायला तयार!
दुपारी मात्र थोडा वेळ आजी आराम करायची. शिपोशीच्या जुन्या घरात स्वयंपाकघर आणि माजघराच्या मध्ये तिची खाट होती. त्यावर ती आराम करायची. दुपारी झोपणं ही तेव्हा आम्हाला शिक्षा वाटायची. मग आम्ही गोठ्यात नाहीतर आंब्याखाली जाऊन पत्ते खेळत बसायचो. कधी आंबे गोळा करण्याची स्पर्धा लावायतो, तर कधी नुसत्याच भेंड्या रंगायच्या. चारला पुन्हा चहासाठी आजीची हाक यायची. संध्याकाळी मात्र आजीकडे काही खायला मिळत नसे. मग त्या वेळेत आम्ही डोंगरावरच्या भागात (वाड्याकडे) करवंदं ओरपायला उधळायचो. नाहीतर हिरेजी नावाच्या भागात जांभळं शोधायला पळायचो. नाहीतर नदीच्या पलीकडे काळ्या वाळूत खेळत बसायचो.
रात्री अंधार झाल्यावर आजोळीच्या शिरस्त्याप्रमाणे शुभंकरोती वगैरे म्हणावी लागायची. मग थोडा वेळ टाइमपास झाला, की आठ वाजता पुन्हा जेवणं तयारी असायची!
कार्तिक महिन्यातल्या उत्सवाचा काळ असला, की जेवणं लवकर करून देवळात कार्यक्रमांसाठी जावं लागत असे. आजी तिची तब्येत सांभाळून रात्रीची कीर्तनं आणि भोवत्या पाहायला येत असे. अलिकडे मात्र तिला फार जागरण झेपत नव्हतं. मग ती घरीच थांबे. कीर्तन ऐकताना आम्ही कीर्तनकार बुवांच्या पुढ्यात बसून पेंगत असू आणि ती देवळाच्या मागच्या बाजूला पेंगत बसे. कधीकधी तिथेच डुलकीही काढत असे. पहाटे तीन-चारला कधीतरी आम्ही घरी यायचो, तेव्हा तीदेखील आमच्यासोबत येई. कधीकधी एकटी किंवा मामाबरोबर पुढे निघून येई. जागरणामुळं आम्ही दुपारी बारा-एकला उठत असू, पण तिची मात्र सकाळी पाचला उठून लढाई सुरू झालेली असे!
शिपोशीला दोन खोल्या भरून आंबे काढून ठेवलेले असत. "मनसोक्त खा रे पोरांनो,' अशा सूचना ती दिवसातून किमान चार वेळा देत असे. मध्येच स्वतः खोलीत गेली, तर दोन चांगले अस्सल पायरी किंवा हापूसचे आंबे आणून हातात देत असे. ठेचलेल्या, पडलेल्या आंब्यांचे काप काढून ती ताटं आमच्यासमोर आणून ठेवत असे. आंब्याचे तर एवढे पदार्थ तिला येत, की त्यांच्या रेसिपी ती कशी लक्षात ठेवते आणि एवढं करते तरी कधी, असा प्रश्‍न पडावा. मुरांबा, गुळांबा, साखरांबा, कोयाडं, तक्कू, रायतं, उकडांबा, मोरावळा, आंब्याचं साट, फणसाचं साट, सांदणं, दशम्या, सुकवलेले गरे, सुकवलेल्या आंब्याच्या फोडी, सुकांबाचं लोणचं. मोहरीचं लोणचं, कैरीचं पन्हं...सत्राशे साठ प्रकार. शिवाय एवढं करून आणि तिथे खायला घालून तिचं समाधान होत नसे. आम्ही शिपोशीहून निघताना सोबत कायकाय प्रकार बांधून देई. घरात जास्त चर्चा नको, म्हणून हळूच डब्यातून दोन-चार साटं काढून आमच्या पिशवीत भरून ठेवी. वर कुणाला सांगू नको, असा हलका दम असे.
आजीनं आम्हाला श्‍लोक, परवचा वगैरे कधी शिकवल्याचं आठवत नाही. ती शाळेतही गेली नव्हती बहुधा. आजोबा खूप लवकर गेले. त्यामुळं आम्ही त्यांना बघितलेलंही नाही. आजी मात्र कधी उदास, निराश दिसली नाही. आजीनं आम्हाला रात्री कधी गोष्टीही सांगितल्या नाहीत. तो तिचा प्रांत नव्हता. पण स्वयंपाक आणि घराचं व्यवस्थापन, यात तिचा हात कुणी धरू शकत नव्हतं. मामाकडे गुरं असताना अध्येमध्ये दूध काढण्याचं आणि वैरण टाकण्याचं कामही ती करायची.
गेल्या वर्षी गणपतीत गाडी घेऊन रत्नागिरीहून पुण्याला येताना शिपोशीला काही वेळ गेलो होतो. त्या वेळी हातात डिजिटल कॅमेरा होता म्हणून आजीचं शूटिंग केलं, फोटो काढला. तिला ते लगेच पाहायला दिल्यावर तिला फार अप्रूप वाटलं होतं. दोन महिन्यांपूर्वी सहज फोन केला, तेव्हा तिच्याशी बोलणंही झालं होतं. त्यानंतर काही दिवसांतच ती आजारी पडली. गेल्या महिन्यात तातडीनं तिला भेटून आलो. जागेवर होती, पण चांगली शुद्धीत होती. घावने पातोळे करून घालणारेस ना, अशी तिची चेष्टाही आम्ही केली. पण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, हे स्पष्ट दिसत होतं. या आजारातून ती वर येणं अवघड होतं. तिला अशा प्रकारे झोपून राहिलेलं आम्ही कधीच पाहिलं नव्हतं. कंबर दुखत असताना पाठीला पट्टा लावून, ढोपरं दुखली की ढोपराला चिंध्या बांधून आणि डोक्‍यावर पट्ट्या ठेवून ती कामं करत राहायची. निवांत बसणं तिच्या रक्तातच नव्हतं. शेवटच्या आजारपणातही नैसर्गिक विधीसाठी ती जोर करून उठायची. स्वतः जाऊन यायची. "तुम्ही सगळी आलात, नि मी इथे अंथरूणावर पडलेय,' अशी खंत तिनं बोलून दाखवली, तेव्हा हसावं की रडावं कळत नव्हतं.
आजीचं वय झालं होतं. आणखी कष्ट उपसण्याची ताकद तिच्यात उरली नव्हती. तिचा आयुष्यातला शेर संपला होता. जन्माला आलेला माणूस कधीतरी जाणार, हेही स्पष्टच होतं. तरीही आम्हाला ती हवी होती. आजोळी गेल्यावर गोडधोड खाऊ घालण्यासाठी, भरपूर माया करण्यासाठी, "आजी' नावाचं रसायन काय असतं, हे आमच्या मुलांना, नातवंडांना दाखवण्यासाठी! आता कुठे बघायला मिळणार त्यांना आणि आम्हालाही अशी "आजी'? संग्रहालयात तरी मिळेल?

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

कौशी's picture

5 May 2011 - 9:57 pm | कौशी

खरच आजीची माया काही वेगळीच असते..
आजीचा फोटो बघायला आवडेल.

लेखन आवडलं.
जवळजवळ सगळ्या मे महिन्याच्या सुट्ट्या कोकणात घालवल्यामुळे सगळं वर्णन जवळचं वाटलं.
मी माझ्या दोन्ही आज्ज्यांच्याजवळच लहानाची मोठी झाल्यानं मला घरी सगळेजण आजीबाईच म्हणतात.;)
आता मिपावरही माझी काही नातवंडे आहेत.;)

असुर's picture

6 May 2011 - 4:08 am | असुर

आजी,
मी आलो गं! भूक लागलीये, पटकन काहीतरी खायला दे. :-)

--असुर

सूड's picture

6 May 2011 - 2:43 pm | सूड

हेच मी म्हणालो तर रेवती आज्जी काय म्हणतील याचा विचार करतोय !! ;)

५० फक्त's picture

5 May 2011 - 11:11 pm | ५० फक्त

मस्त मस्त रे अभिजित, माझं राहिलं रे आजोळ अनुभवयाचं, माश्रीमगांची क्रुपा अजुन काय ?

''आता मिपावरही माझी काही नातवंडे आहेत.'' - होय होय रेवती आजी एकदम बरोबर आणि त्यांची लग्नं पण व्हायची आहेत होय ना ?

स्मिता.'s picture

5 May 2011 - 11:34 pm | स्मिता.

खूपच छान लिहिलंय. शेवट हळवा करून गेला.

आजीची फार फार आठवण येतेय!!
आई, आत्या, मावश्या, मोठ्या बहीणी वगैरे सगळ्या खूप प्रेमळ आणि मायाळू असल्या तरीही आजीची माया आजीच लावू जाणे. तिची सर बाकी कुणाला नाही!

--असुर

प्रचेतस's picture

6 May 2011 - 9:26 am | प्रचेतस

आजीच्या मायेच्या सावलीबरोबरच कोकणातील वर्णनही सुरेख.

किसन शिंदे's picture

6 May 2011 - 2:51 pm | किसन शिंदे

मस्त लिहलयं...
सुदैवाने माझ्या दोन्ही आज्या अजुन आहेत त्यामुळे त्या बाबतीत तरी मी नशीबवानचं आहे.

योगप्रभू's picture

6 May 2011 - 3:18 pm | योगप्रभू

अभिजित,
प्रतिक्रिया काहीच देत नाही. तुझ्या सुंदर ललित लेखनातून बाहेर पडावसंच वाटत नाहीय.

असंच छान लिही मित्रा.

-तुझा एकेकाळचा सहकारी-
योगप्रभू

मुलूखावेगळी's picture

6 May 2011 - 11:11 pm | मुलूखावेगळी

खुपच सुरेख लेख.
मला माझी आजी आठवली.

मुलूखावेगळी's picture

6 May 2011 - 11:11 pm | मुलूखावेगळी

खुपच सुरेख लेख.
मला माझी आजी आठवली.

मुलूखावेगळी's picture

6 May 2011 - 11:11 pm | मुलूखावेगळी

खुपच सुरेख लेख.
मला माझी आजी आठवली.

मुलूखावेगळी's picture

6 May 2011 - 11:11 pm | मुलूखावेगळी

खुपच सुरेख लेख.
मला माझी आजी आठवली.

माझीही शॅम्पेन's picture

6 May 2011 - 11:53 pm | माझीही शॅम्पेन

लेख छान निशब्द झालो !

अवांतर : - मला पण माझी आजी चार वेळा आठवली :)

आपला अभिजित's picture

7 May 2011 - 12:26 am | आपला अभिजित

आजी-आजोबांविषयी लिहिताना माझा कळफलक जास्तच हळवा होत असावा. असो. प्रतिसादांबद्दल धन्यवाद. मी माझ्या आजोळी केलेल्या गमतीजमतींबद्दल खूपच कमी लिहिले आहे. अजून बरीच धमाल करायचो आम्ही. त्याबद्दल पुन्हा कधीतरी...