उन पाउस

आनंदयात्री's picture
आनंदयात्री in जनातलं, मनातलं
15 May 2008 - 6:39 pm

कधीतरी कुठेतरी वाचलेल्या इंग्रजी कथेचा मिपाकरांसाठी हा स्वैर अनुवाद ...

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरनं निघालेली इंद्रायणी एक्सप्रेस यथावकाश मुंबईचा कोलाहल सोडुन सह्याद्रीच्या कुशीत शिरली. गार मोकळ्या वार्‍याने प्रवासी छान सुखावले, कुणी मासिकं-वर्तमानपत्र वाचु लागले तर कुणी बसल्या बसल्या पेंगु लागले. गाडी अगदी सगळ्या प्रकारचे-वयाचे लोक पोटात घेउन धावत होती, तरीही बहुतांश प्रवासी नोकरदार वर्ग किंवा महाविद्यालयीन तरुण तरुणी होते.

त्या कंपार्टमेंटमधे खिडकीजवळ साधारण साठीचा एक शिडशिडीत वयस्क गृहस्थ त्याच्या जवळपास तिशीच्या मुलाबरोबर बसला होता. म्हातारा मोठा टापटिप होता, चेक्स चा हाफ शर्ट व्यवस्थित ईन केलेला डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा वयाला साजेसा संथपणा असा मोठा ऐटीत बसला होता. पोरगा मजेत पण किंचीत बालिश नवथरपणे खिडकीतुन बाहेर बघत बसला होता.

पावसाळ्याचे दिवस होते. जशी गाडी लोणावळा-खंडाळा परिसराच्या नयनरम्य निसर्गाने नटलेल्या परिसरातुन जाउ लागली तसा त्या तिशीच्या पोराचा उत्साह ओसंडुन वाहु लागला, डोंगर दर्‍या, जागोजागी वहाणारे लहान मोठे धबधबे अन निसर्गाची हिरवीकंच दौलत पाहुन तो हरखुन मोहरुन गेला.

"बाबा .. ओ बाबा .. ऐका ना .. ते काय हातात धरुन बघताय तुम्ही .. इकडे बघा ! .. ही कशी झाडं सगळी मागे पळतात बघा ना ! हिरवा रंग किती सुंदर आहे नं .. अस वाट्टय इथच खाली उतरुन नुसते हे डोंगर दर्‍या बघत बसावेत ... नाही ?"
हे ऐकता ऐकता बाप सुद्धा हातातला पेपर ठेवुन, पोराबरोबर बाहेरची सिनरी पहाण्यात रमला.

आजुबाजुच्या लोकांना त्याचे असे वागणे विचित्र वाटायला लागले. प्रत्येकजण चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहुन आपल्या बरोबरच्या सहप्रवास्याबरोबर त्याच्याबद्दल काही ना काही खुसफुसत बोलायला लागला.

"हा येडा दिसतोय !" समोरच बसलेला अनुप त्याच्या नववधुला म्हणाला.

इतक्यात पावसाला सुरुवात झाली अन पावसाचे तुषार आत बसलेल्या प्रवास्यांवर खिडकीतुन पडायला लागले. थोडे उन थोडा पाउस असे मोठे विहंगम दृष्य पाहुन तिशीच्या पोराच्या आनंदाला पारावार उरला नाही, ताठ होउन भान विसरुन तो पावसाला पहात होता. अत्यानंदाने त्याने दोन्ही हातांनी गजांना घट्ट धरुन ठेवले होते. भावनातिरेकाने तो शहारला, त्याच्या हातावरची लव उभी राहिली, त्यावरच्या चकाकणार्‍या पाण्याच्या थेंबांचे डवरुन उठलेले मोती पहावे का बाहेर सुर्यास्त होतांना ढगांच्या कडांवर विसावलेले इंद्रधनुष्य पहावे अश्या विचारात तो बेभानपणे आलटुन पालटुन दोन्ही दृष्य नजरेत साठवुन घेत होता.

इकडे अनुपची वधु तिचा नवा ड्रेस पावसाच्या थेंबांनी खराब होत होता म्हणुन वैतागली होती. तिने एक रागिट कटाक्ष अनुपकडे टाकला.

अनुप शेवटी वैतागुन म्हणाला,
"अहो काका, पाउस पडतोय हे दिसत नाही का तुम्हाला ? तुमच्या मुलाला बरे वाटत नसेल तर त्याला वेड्यांच्या हॉस्पिटलात नेउन टाका ना ! प्लिज अजुन त्रास नका देउ आम्हाला !"

म्हातारा थोडासा पुढे झुकला अन हळु आवाजात म्हणाला,
"श्श्श .. ! "
"आत्त्ता आम्ही हॉस्पिटल मधुनच परत येतोय, माझ्या मुलाला सकाळीच डिस्चार्ज मिळालाय, तो जन्मांध होता, मागच्या आठवड्यापासुन तो पाहु शकतोय, हा निसर्ग हा उन पावसाचा खेळ त्याच्या डोळ्यांना नवा आहे हो ..... प्लिज आम्हाला माफ करा."

तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

राजे's picture

15 May 2008 - 6:43 pm | राजे (not verified)

वा !
काय कथा आहे हो....
मस्त.

छायाचित्र देखील मस्त.

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

यशोधरा's picture

15 May 2008 - 6:49 pm | यशोधरा

एकदम मस्त गोष्ट! मस्तच लिहिलय... अनुवाद एकदम जमलाय
एखादी गोष्ट आपल्याकडे नसल्याशिवाय त्याचं महत्व नाही कळत, नाही का?

शितल's picture

15 May 2008 - 6:51 pm | शितल

मस्तच,

"आत्त्ता आम्ही हॉस्पिटल मधुनच परत येतोय, माझ्या मुलाला सकाळीच डिस्चार्ज मिळालाय, तो जन्मांध होता, मागच्या आठवड्यापासुन तो पाहु शकतोय, हा निसर्ग हा उन पावसाचा खेळ त्याच्या डोळ्यांना नवा आहे हो ..... प्लिज आम्हाला माफ करा."

तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता.

एकदम हदयस्पर्शी, लिखाण.
कथेच्या शेवटी हा उलघडा.
मान गये आपको.
इ॑द्रधन्युशचा फोटो ही छान.

आनंद's picture

15 May 2008 - 7:03 pm | आनंद

कथा खुपच छान आहे.
एक शंका आहे, इंद्रायणी एक्सप्रेस तर सकाळी निघते ना मुंबई वरुन मग सुर्यास्त कसा काय बघीतला त्याने. ह.घ्या.

डॉ.प्रसाद दाढे's picture

16 May 2008 - 8:18 am | डॉ.प्रसाद दाढे

उत्तम लघुकथा.. चा॑गली जमली आहे..आणखी येऊ द्या..
एक शंका आहे, इंद्रायणी एक्सप्रेस तर सकाळी निघते ना मुंबई वरुन मग सुर्यास्त कसा काय बघीतला त्याने.
काय भडकमकरसरा॑चे विद्यार्थी काय..? :) ता॑त्रिकदृष्ट्या मुद्दा बरोबर आहे.. सि॑हगड कि॑वा कोणार्क वा कन्याकुमारी एक्सप्रेस म्हणायला हवे होते

पल्लवी's picture

15 May 2008 - 7:05 pm | पल्लवी

जमलं..जमलं... अगदी फर्मास जमलं !! :)

वेदश्री's picture

15 May 2008 - 8:08 pm | वेदश्री

अनुवादासाठी केलेल्या कथानिवडीपासून ते ती स्वैरपणे अनुवादीत करताना वापरलेल्या सुयोग्य अर्थछटायुक्त शब्दांपर्यंत.. सगळंच खूप आवडलं. पुलेमशु ( पुढील लेखनास मनापासून शुभेच्छा ).

का कोण जाणे पण आनंदयात्री या सदस्यनावाला जागलात, असे वाटले.

वरदा's picture

15 May 2008 - 8:17 pm | वरदा

एकदम हदयस्पर्शी, लिखाण.

हेच म्हणते...
इंद्रधनुष्य सुंदर....

मदनबाण's picture

16 May 2008 - 5:10 am | मदनबाण

अगदी हेच म्हणतो.....

मदनबाण.....

चतुरंग's picture

15 May 2008 - 8:19 pm | चतुरंग

कथेला दिलेली कलाटणी एकदम भानावर आणणारी. वेगळ्या बाजाचे लिखाण.

चतुरंग

मन's picture

15 May 2008 - 8:27 pm | मन

अनुवाद जमलाय.
ही कथा मुळ आंग्ल भाषेत वाचलिए.
पण अनुवादातही तुम्ही तोच टवटवीत पणा ठेवलाय.
विचार अगदि बरोब्बर पोचतो यातुन मुळ कथे प्रमाणेच.

एक अत्यंत यशस्वी अनुवाद!

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2008 - 8:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है, सेठ !!! कथेची कलाटणी, एकदम सही. स्वैर अनुवाद खूपच आवडला.
चित्रही कथेला पुरक असेच आहे. असेच लेखन येऊ दे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत's picture

15 May 2008 - 8:40 pm | मुक्तसुनीत

गोष्ट जमली आहे यात शंका नाही. प्रत्येक दिवस हा दृष्टी येण्याचा पहिला दिवस असल्यासारखा जगणे हा संदेश परिणामकारकपणे पोचविणारी कथा.

कथेच्या या तात्पर्यात माझ्या अल्पमतीप्रमाणे मला एक छोटीशी गोष्ट वाढवावीशी वाटते आहे. प्रत्येक दिवस हा दृष्टी/जगण्याची संधी मिळण्याचा पहिला दिवस आहे या उत्साहाइतकेच महत्त्वाचे आहे - प्रत्येक दिवस हा दृष्टी/जगण्याची संधी उपलब्ध असण्याचा शेवटचा दिवस असल्यासारखे जगणेसुद्धा ! आजूबाजूची माणसे , आपले आप्तस्वकीय , कुटुंबीय , आपले आवडते छंद या सगळ्यांचा सहवास आज मिळतो आहे तोवर त्याचा आनंद घ्या आणि त्याना आनंद द्या. कुणास ठाऊक , उद्या आपली गाडी अशा अंधार्‍या बोगद्यात शिरायची ज्याला शेवट नाही !

ब्रिटिश टिंग्या's picture

15 May 2008 - 8:56 pm | ब्रिटिश टिंग्या

क्या बात है!

तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता.
सहीच!

(बर्‍याच दिवसांनी) टिंग्या :)

ईश्वरी's picture

15 May 2008 - 9:48 pm | ईश्वरी

मस्त लिहीलीत गोष्ट. ह्रदयाला भिडणारी.
ईश्वरी

रामदास's picture

15 May 2008 - 9:59 pm | रामदास

उद्या आपली गाडी अशा अंधार्‍या बोगद्यात शिरायची ज्याला शेवट नाही !

» एका वाक्यात डोळे उघडलेस रे बाबा.

आंबोळी's picture

15 May 2008 - 10:08 pm | आंबोळी

मानगये... सुंदर लिहिलयस.... शॉर्ट स्टोरीचा बाज , कथाबीज , मांडणी आणि शेवटचा धक्का फक्कड जमलय. विशेषतः शेवटचा धक्का अप्रतिम..... मजा आली.
अश्याच शॉर्ट स्टोरी लिहीत जा. क्रमशः च्या गर्दीत अशी गोष्ट म्हंजे जेवताना मधेच लसणाची किंवा सुकटाचे चटणी तोंडी लावायला मिळाल्यासारखे आहे.
(सुकवलेल्या प्रथमावतारावर विशेष प्रेम असणारा) आंबोळी

सहज's picture

16 May 2008 - 6:33 am | सहज

सुंदर कथा, सुरेख अनुवाद!!

आवडले.

सहज's picture

16 May 2008 - 6:33 am | सहज

सुंदर कथा, सुरेख अनुवाद!!

आवडले.

विसोबा खेचर's picture

16 May 2008 - 8:09 am | विसोबा खेचर

अच्छे!

कथा आणि अनुवाद दोन्हीही छान रे यात्री!

तात्या.

ऋचा's picture

16 May 2008 - 8:59 am | ऋचा

मस्तच!!!!!!!!!

भाग्यश्री's picture

16 May 2008 - 9:07 am | भाग्यश्री

काही दिवसांपूर्वीच ही ओरीजीनल मेल वाचली होती.. तेव्हा पण आवडली.. आणि आत्ताचा अनुवाद पण खूप आवडला..

"इतक्यात पावसाला सुरुवात झाली अन पावसाचे तुषार आत बसलेल्या प्रवास्यांवर खिडकीतुन पडायला लागले. थोडे उन थोडा पाउस असे मोठे विहंगम दृष्य पाहुन तिशीच्या पोराच्या आनंदाला पारावार उरला नाही, ताठ होउन भान विसरुन तो पावसाला पहात होता. अत्यानंदाने त्याने दोन्ही हातांनी गजांना घट्ट धरुन ठेवले होते. भावनातिरेकाने तो शहारला, त्याच्या हातावरची लव उभी राहिली, त्यावरच्या चकाकणार्‍या पाण्याच्या थेंबांचे डवरुन उठलेले मोती पहावे का बाहेर सुर्यास्त होतांना ढगांच्या कडांवर विसावलेले इंद्रधनुष्य पहावे अश्या विचारात तो बेभानपणे आलटुन पालटुन दोन्ही दृष्य नजरेत साठवुन घेत होता"

हा परिच्छेद सगळ्यात जास्त आवडला.. मस्त केलंय वर्णन!

मनस्वी's picture

16 May 2008 - 11:35 am | मनस्वी

काही दिवसांपूर्वीच ही ओरीजीनल मेल वाचली होती.. तेव्हा पण आवडली.. आणि आत्ताचा अनुवाद पण खूप आवडला..

एखादी गोष्ट आपल्याकडे नसल्याशिवाय त्याचं महत्व नाही कळत, नाही का?

प्राजु's picture

17 May 2008 - 5:30 pm | प्राजु

काही दिवसांपूर्वीच ही ओरीजीनल मेल वाचली होती.. तेव्हा पण आवडली.. आणि आत्ताचा अनुवाद पण खूप आवडला..

मी ही वाचली होती ओरिजिनल मेल... :)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धमाल मुलगा's picture

16 May 2008 - 12:05 pm | धमाल मुलगा

अस वाट्टय इथच खाली उतरुन नुसते हे डोंगर दर्‍या बघत बसावेत ... नाही ?"
हे ऐकता ऐकता बाप सुद्धा हातातला पेपर ठेवुन, पोराबरोबर बाहेरची सिनरी पहाण्यात रमला.

:)

तो जन्मांध होता, मागच्या आठवड्यापासुन तो पाहु शकतोय, हा निसर्ग हा उन पावसाचा खेळ त्याच्या डोळ्यांना नवा आहे हो ..... प्लिज आम्हाला माफ करा."

तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता.

क्या बात है !

आनंदयात्रीसाहेब,
बाकी हा लघुकथांचा प्रांत म्हणजे तुमचा हक्काचा :)
शेवटच्या परिच्छेदात कथेला झर्रकन कलाटणी देण्याची तुमची शैली आम्हाला खुप आवडते. अनुवादासाठी निवडलेली कथाही ह्याच जातकुळीतली. सुंदर!

अवांतरः कौसरबी आणि अब्दुलच्या कथेची आतूरतेने वाट पाहतो आहे. येऊद्या लवकर :)

- (प्रभावित) ध मा ल.

स्वाती दिनेश's picture

16 May 2008 - 1:26 pm | स्वाती दिनेश

सुरेख कथा,अनुवाद सहज जमला आहे..आवडली!
स्वाती

डोमकावळा's picture

16 May 2008 - 1:52 pm | डोमकावळा

सुरेखच....

लेखन फारच प्रभावी आहे....

झंप्या's picture

17 May 2008 - 7:11 am | झंप्या

प्रेमभंगा शिवाय बाकीच्याही विषयात लिहू शकतोस म्हणायचं की! :)

देवदत्त's picture

17 May 2008 - 1:19 pm | देवदत्त

छान कथा. आणि छायाचित्रही. :)

आनंदयात्री's picture

19 May 2008 - 10:54 am | आनंदयात्री

केलेल्या कौतुकाबद्दल, दिलेल्या दादेबद्दल मनापासुन आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद.

-आनंदयात्री.