राडा...? छे छे! संशयकल्लोळ!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
24 Apr 2011 - 7:58 pm

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या काही कलाकारांना पुण्यात धुंद अवस्थेत "मोकळ्या' वातावरणात फिरताना पोलिसांनी पकडलं. त्यांच्याबद्दल पेपरात भरपूर बदनामीकारक बातम्या छापून आल्या. खरंतर चांगल्या घरातल्या, सालस, सज्जन अशा या कलाकारांनी काहीच केलं नव्हतं. त्यांच्या जराशा मोकळेपणाच्या वागण्यानं त्यांच्यावर निष्कारण बालंट आलं होतं, हे त्यांनी स्वतः आणि त्यांच्या पालकांनीही केलेल्या खुलाशांवरून स्पष्ट झालं. प्रत्यक्षात या "ऐतिहासिक' घटनेचे साक्षीदार होण्याचं भाग्य अनेकांच्या नशिबी नव्हतं, पण या कलाकारांचं पाऊल वाकडं पडल्याच्या अफवा कशावरून उठल्या असाव्यात आणि प्रत्यक्षात काय घडलं असावं, याविषयीचे काही अंदाज...

'ग्लोबल वॉर्मिंग'वरचा एक मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या ज्वलंत समस्येकडे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे कलाकार रस्त्यावर उतरले होते. तेदेखील त्या चित्रपटाशी थेट संबंध नसताना, केवळ सामाजिक प्रश्‍नाबद्दलची कळकळ म्हणून! आता "ग्लोबल वॉर्मिंग'चा म्हणजे थोडक्‍यात "जागतिक उकाड्या'चा प्रश्‍न मांडण्यासाठी "रिऍलिस्टिक लुक' द्यावा, म्हणून या घटनेतील काही तारकांनी त्या रात्री तसेच कपडे घातले होते, (किंवा घातले नव्हते!) एवढंच.

सौरभ गांगुलीनं भर स्टेडियममध्ये शर्ट काढून फिरवला, तरी त्याच्या कारकिर्दीत त्याला भारताला वर्ल्ड कप जिंकून देता आला नाही. ते स्वप्न धोनीच्या शिलेदारांनी पूर्ण केलं, तर "सार्वजनिक वस्त्रत्याग' करण्याचं व्रत बॉलिवूडच्या एका मॉडेल-कम-अभिनेत्रीनं (म्हणजे जी अभिनेत्री "कमी' आणि मॉडेल जास्त असते ती!) जाहीर केलं होतं. (त्यामुळंच भारतीय खेळाडू जास्त हिरिरीनं खेळले, असंही म्हणतात!) काही नतद्रष्ट संस्कृतिरक्षकांनी तिला ते प्रत्यक्षात आणू दिलं नाही. आपल्या वचनपूर्तीचं ठिकाण तिने पॅरिसला हलविण्याचं जाहीर केलं, त्यामुळे निदान लाइव्ह कव्हरेज पाहता येईल, या आशेनं अनेक जण टीव्हीला डोळे लावून बसले होते. तो सोहळाही रहित झाला. तिची हुकलेली संधी अल्प प्रमाणात का होईना, आपण पूर्ण करावी, अशी या मराठी तारकांची इच्छा होती. पण हाय रे कर्मा! तिथेही (रसिकांचं) कमनशीब आडवं आलं!

या घटनेतील काही कलाकारांनी "राडा' अशा काहीतरी नावाच्या चित्रपटात काम केलं होतं. चित्रपटाच्या नावावरून त्यांना जे अपेक्षित होतं, ते प्रत्यक्ष पडद्यावर साकारता न आल्याची त्यांना खंत होती. ती त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर चित्रपटाचं नाव सार्थ करून भरून काढली!

"तुला धड मराठी बोलता येत नाही!', "कसले कपडे घालतात आजकालच्या मराठी नट्या', "पार लाज सोडली हो हल्लीच्या पोरींनी,' असे जाहीर टोमणे एका आघाडीच्या मराठी अभिनेत्रीला ऐकावे लागत होते. त्याचा अभिनव निषेध करण्यासाठी तिला याहून अभिनव आंदोलन सुचलं नाही.

पोलिस आयुक्तपदी महिला अधिकारी असतानाही पुण्यात महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे, याकडे पोलिसांचं लक्ष वेधून घेण्यासाठीचा हा उपक्रम होता. त्याअंतर्गत नियोजनानुसार फरसाण-शेव पार्टी करून ते फिरायला बाहेर पडले होते. त्यांच्या बोलण्यावरून कुणीतरी "शेव पार्टी'च्या ऐवजी "रेव्ह पार्टी' असं ऐकलं आणि निष्कारण पोलिसांना फोन केला. दरम्यान, या कलाकारांना कुणीतरी टारगट तरुण छेडत होते, म्हणून त्यांनीही पोलिसांना कळवलं. पोलिसांची "एन्ट्री' आणि पुढे मिळालेली "प्रसिद्धी' हा मात्र त्यांच्या नियोजनाचा भाग नव्हता.

सर्वसामान्य लोक रात्री-अपरात्री "धुंद' झाल्यावर जसे वागतात, त्याहून आपण काही वेगळं केलं नव्हतं, तरीही कलाकार असल्याने आपल्याविरुद्ध मोठी आवई उठली, अशी भावना या कलाकारांच्या मनात आहे. कलाकार म्हणून (निदान अशा प्रसंगी) वेगळी वागणूक देण्यास बंदी घालावी, यासाठी ते आता जनहित याचिका दाखल करणार असल्याचे समजते!

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

धिन्गाना's picture

24 Apr 2011 - 8:10 pm | धिन्गाना

असच वाटत मलासुध्धा.चान्गल्या हेतुने काहि करण्याचि सोयच राहिलि नाहि आताशा.ये जालिम जमाना असाच नतद्रश्ट, दुसर काय हो.

रेवती's picture

25 Apr 2011 - 4:50 am | रेवती

सकाळला हा लेख वाचला होता.
चांगला झालाय.
अशी काही बातमी आली होती हे कालच समजले आणि आज त्यावर तुमचे लेखन वाचायला मिळाले.
तसेही आजकाल मनोरंजन म्हणून काय काय बघावे लागेल सांगता येत नाही.
त्यानिमित्ताने ग्लोबल वॉर्मिंगची वॉर्निंग पुन्हा मिळाली हे काय कमी आहे?;)
अवांतर/झायरात: तुम्ही माझ्या कोणत्याही लेखाला प्रतिसाद देत नाही हे नोटिस केले आहे.;)

Nile's picture

25 Apr 2011 - 5:10 am | Nile

फोटु नसल्याने प्रतिक्रीया देणार नाही. ;-)

बाकी नटीचे किमान नाव तरी सांगा, म्हणजे कुठच्या मराठी शिनेमांना जावे याचा निर्णय करणे सोपे होईल. ;-)

आम्हालाही काही कारणं सुचली होती, पण आधीच सभ्यतेच्या नावाने आमच्या प्रतिसादांवर फिरवायला काही विद्वान लोक नांगर घेउन तयार आहेत म्हणून मोह आवरतो. ;-)

सविता's picture

25 Apr 2011 - 11:42 am | सविता

सई ताम्हणकर

अन्या दातार's picture

25 Apr 2011 - 7:32 am | अन्या दातार

नाईलभौ, तुमाला समदं डीट्टेलमंदी पायजे असेल तर मराठी पेपर वाचा की राव. (आज का आनंद सोडा बघु हातातला.....)

अधिक माहिती/दुव्यांसाठी खवत संपर्क साधा.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Apr 2011 - 12:21 pm | llपुण्याचे पेशवेll

बाकी रात्री ३ वाजता मित्रांबरोबर चक्कर मारायला निघालेल्या भोळ्या तारकेच्या बाकी ३ मैत्रिणींचे नावे मात्र कळली नाहीत. ;) का त्यांचे मिटले?
सकाळमधे लेख आधीच वाचला होता. मस्तं वाटला.

त्यांच्या बोलण्यावरून कुणीतरी "शेव पार्टी'च्या ऐवजी "रेव्ह पार्टी' असं ऐकलं आणि निष्कारण पोलिसांना फोन केला.

हा हा हा ..

चुकुन ही "शेव पार्टी " जिलेट स्पाँसर्ड तर नव्हती ना ? अशी एक शंका चाटुन गेली ..

सई ताम्हणकर आणि समिरा रेड्डी हे दोन पैलवान जबरदस्त मर्द गडी आहेत :)

छोटा डॉन's picture

25 Apr 2011 - 1:46 pm | छोटा डॉन

>>सई ताम्हणकर आणि समिरा रेड्डी हे दोन पैलवान जबरदस्त मर्द गडी आहेत
सईला असे टाकुन बोलल्याबद्दल टार्‍याचा निषेध !

बाकी 'शेव पार्टी' करण्यात आम्हाला काही गैर वाटले नाही, लोकाणा ते चुकुन 'रेव्ह' ऐकु आल्यास त्या बिचार्‍यांनी काय करावे बॉ ;)
तसेच पुण्यात इतका भयंकर उकाडा असल्याने रस्त्यावर हवा खात उभराण्यातही काय वाईट आहे हे मला अजिबात समजले नाही.

- छोटा डॉन

सुहास..'s picture

25 Apr 2011 - 1:42 pm | सुहास..

=)) =)) =))
=))=))
=))

अभिदा लिहीणार असे वाटलेच होते ..आणि चांगलेच शालजोडेतले मारणार हे ही वाटले होते ..मस्त ताशेरे !!

या घटनेतील काही कलाकारांनी "राडा' अशा काहीतरी नावाच्या चित्रपटात काम केलं होतं. चित्रपटाच्या नावावरून त्यांना जे अपेक्षित होतं, ते प्रत्यक्ष पडद्यावर साकारता न आल्याची त्यांना खंत होती. ती त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर चित्रपटाचं नाव सार्थ करून भरून काढली! >>

अवांतर : पिक्चर पाहिल, पिक्चर छान आहे !!

चिंतामणी's picture

27 Apr 2011 - 8:19 am | चिंतामणी

हे अभिजित पेंढारकरर (नाव ईसकाळच्या सौजन्याने) आपणच होय.

प्रिंट मिडीयावर अजून एका मिपाकराने झेंडा लावला.

अभीनंदन.