काही दिवसांपूर्वी नवर्याचा एक मित्र घरी आला होता. अगदी नोकरी लागायच्या सुरुवातीच्या दिवसांपासून त्या दोघांची मैत्री. त्यामुळे इतक्या वर्षांनी भेट झाल्याचा दोघांनाही खूप आनंद झाला होता. साहजिकच सगळ्या जुन्या सवयी, गमतीजमती यांची उजळणी सुरू होती.
' अजूनही सकाळी उठल्यावर अभंगवाणी ऐकायची तुझी सवय कायम आहे का रे?' मित्राचा प्रश्न.
'अरे बाबा, आता नशिबी अभंगवाणी कुठली असणार? आता फ़क्त असते 'अखंडवाणी.'
माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकत नवर्याचे उत्तर.
मित्राला मुळीच हसू आले नाही. हो, विनोदावर हसतात, सत्य गोष्टींचे हसू थोडेच येते?
'आमचे हे किनई, फ़ारच अबोल.....' अशी तक्रार कित्येक पतीपरायण पत्नींची असते. पण मुळातच 'आपल्या सतत बोलण्यामुळे या अभाग्याला आपण बोलायची जराही संधी देत नाही.' हे त्यांच्या गावीही नसते. आमच्या नात्यातल्या एक काकू तर स्वैपाक करताना, काम करताना इतक्या बोलत असत की त्या काकांची मला फ़ार दया येत असे. एकदा मी आईने केलेला काही तरी पदार्थ द्यायला त्यांच्या घरी गेले असताना काका समोर सोफ़्यावर बसले आहेत. अगदी हताश चेहर्याने. अन काकू श्वास घ्यायचीही उसंत न घेता बोलताहेत असे दृश्य माझ्या नजरेस पडले.
'किती मेलं मरायचं या घरात? सतत पसारा.दिवसभर मेली आवराआवरी. कधी वाटतं, निघून जावं हिमालयात....'
'एवढं कुठलं आलंय माझं भाग्य?' काका हळूच पुटपुटले. त्यांच्या दुर्दैवाने ते काकूंना ऐकू गेलेच. अन मग तोंडपट्ट्याला दांडपट्टा हाच शब्द किती समर्पक आहे याचे प्रात्यक्षिकच मला बघायला मिळाले. त्यानंतर चारच दिवसांनी काका घरी आलेले असताना 'मुकी बायको वा बहिरा नवरा यापैकी काहीही एक असले तर संसार सुखाचा असलाच पाहिजे'. हे बाबांना पटवून देत असतानाही ऐकले.
पुरुषांचा कमी बोलण्याचा नि बायकांचा जास्त बोलण्याचा हा 'दैवी गुण' अगदी लहानपणापासून दिसायला लागत असावा. माझा मुलगा शाळेतून घरी आला की एक शब्दही ना बोलता रिमोट घेऊन सोफ़्यावर स्थानापन्न होणार, तर मुलगी अगदी बस स्टॉप पासूनच 'आज शाळेत काय झाले,टीचर काय म्हणाली, मैत्रिणी काय म्हणाल्या या सार्यांचे रेकॉर्डेड समालोचन ऐकवीत येते. बरे ते झाल्यावरही गप्प बसेल म्हणता? नाव नको. कधीकधी तर तिच्या अखंड बोलण्याने...बोलणे हा सभ्य शब्द झाला, 'बडबड' म्हणणे जास्त समर्पक होईल... वैतागून मी थोडेही रागावले की नवरा..
'जाऊ दे ग. शेवटी मुलीची जात आहे ती...' असे एका दगडात दोन पक्षी मारतो.
माझ्या एका आतेबहिणीच्या सासूबाई अशाच. बोलणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे सतत बोलत असतात. मी सगळ्या नातेवाईकांना फ़ोन करते, अगदी आवर्जून. पण त्यांना फोन करायला कचरते. आता एका स्त्री शी बोलायला दुसरी स्त्रीच घाबरते, यात पहिली स्त्री बोलण्यात किती 'पावरबाज 'असली पाहिजे हे सूज्ञांनी ध्यानी घ्यावे. तर एकदा त्यांचाच फ़ोन आला. माझ्या सुदैवाने नि नवर्याच्या दुर्दैवाने मी तेव्हा स्वैपाकात व्यस्त असल्याने फोन त्यानेच घेतला. नंतर तासभर उलटला, माझा स्वैपाक उरकला, मुलांना खाऊ घालून गाई गाई झाली तरी नवरा जेवायला यायचे चिन्ह दिसेना म्हणून मी त्याला बोलवायला गेले तर नुकताच फोन संपवून तो सोफ़्यावर बसून घाम पुसत होता.
'अहो, किती वेळचे बोलताय? जेवायचं नाही का?...'
'बोलतोय कुठला ग? ऐकतोय...एस. टी. डी. वर एवढं बोलणं म्हणजे....'
'असू द्या हो.फोन त्यांनीच केला होता ना?'
(दुसरा कितीही उद्वेगाच्या मनस्थितीत असताना हे सुचणे हे माझ्या पुणे शहराशी वर्षभर आलेल्या संबंधाचे लक्षण.)
मध्यंतरी एका कुठल्याशा पुस्तकात वाचले होते की 'पुरुषांची दिवसभराची शब्दमर्यादा पाच हजार शब्द असते तर स्त्री ची पन्नास हजार शब्द. त्यातही हे पाच हजार शब्द तो ऑफ़िसमधेच खर्च करून टाकतो म्हणे. म्हणजे विचारायलाच नको.
आता जन्माला घालतानाच असा कोटा ठरवून देवाने पाठवले असले, तर आम्हा बायकांना उगाच वाचाळ, बडबड्या इ.इ. विशेषणे लावणे हा अन्याय नाही का? तुम्हीच सांगा बरे.
समाप्त.
प्रतिक्रिया
17 Apr 2011 - 7:33 pm | नरेशकुमार
माझ्या बाबतीत असे होत नाही. घरी आल्यावर मनमुराद संवाद होत असतो.
मी काय असे विशेषणे वगेरे काही लावत नाही.
दुसर्या कोणी असे लाऊ पन नये. असे करने चांगले नाही.
घरातल्या बायका म्हणजे लक्ष्मी.
17 Apr 2011 - 8:34 pm | अन्या दातार
>>घरातल्या बायका म्हणजे लक्ष्मी.
नक्की किती बायका हो तुमास्नी??? ;) अन जाता जाता, बायका हे अनेकवचन झाले, मग लक्ष्मीचे लक्ष्म्या असे होते का??? (कृ. ह.च घेणे!)
18 Apr 2011 - 8:41 am | नरेशकुमार
चालायचं, इथं मिपावर सगळ्यांना सगळं हलकंच घ्याव लागतं, न घेउन जानार कुठं ?
'बायका' म्हनजे केवळ बायको/पत्नी नव्हे,
आई, बहिण, मुलगी, आजी (असेल तर). त्या सगळ्या मिळुन घरात लक्ष्मिचा वास घडवुन आनतात.
हॅ हॅ हॅ
17 Apr 2011 - 7:43 pm | विंजिनेर
हा हा हा... पण हे सार्वत्रिक आणि पूर्वापार आहे हां.
जपानी चित्रलिपीत 'स्त्री' शब्दाला चे चिन्ह जे असते ते तीनवेळा काढले की जे चिन्ह होते त्याचा अर्थ आहे "गोंधळ" !!
17 Apr 2011 - 8:43 pm | निनाव
एक स्त्री असून , ह्याची कबूली केली, ह्या धाडसा बद्दल तुम्हाला १०/१०.
लेख कमालीचा सुंदर आहे. :) 'समाप्त' हा शब्द खूप आवडला :).
17 Apr 2011 - 9:20 pm | रमताराम
'समाप्त' हा शब्द खूप आवडला
निरीक्षण आवडले.
17 Apr 2011 - 11:11 pm | रेवती
लेखन आवडले.
आधीच प्रतिसाद दिला असता पण अखंड बोलत बसल्याने विसरून गेले.;)
18 Apr 2011 - 12:32 am | निशदे
अजून जास्त लिहायला हवे असते.......(बोलायला जमते तर मग हे काही अवघड नाही) ;)
लेख आवडला.......
18 Apr 2011 - 12:37 am | प्राजु
हम्म चालायचंच!! आहे आता असं काय करणार??
लेख आवडला.
18 Apr 2011 - 1:38 am | भडकमकर मास्तर
लेख मस्त..
एका दगडात दोन पक्षी छान...
:थोडेसेच अवांतर : आकाशवाणीवर मी लहान असताना एक ऐकलेली विनोदी श्रुतिका आठवते...पात्रे दोनच... त्यात बायकोचा बडबडीमुळे जीवनाला कंटाळून एक नि:शब्दे नावाचा माणूस आत्महत्येचा प्रयत्न करून इस्पितळात दाखल होतो, तिथे त्याला प्रचंड बडबडी नर्स भेटते... ती सतत इतकी जास्त बोलते की तो शेवटी " हिच्या तुलनेत माझी बायको मुकीच म्हटली पाहिजे" असे म्हणून खिडकीतून उडी मारून घरी पळून जातो... आणि तिचा शेवटचे वाक्य " शी बै, नि:शब्दे..एवढी गंमत न ऐकताच गेले"
18 Apr 2011 - 1:50 am | गणपा
नो वंडर इथे मिपावर पुरुष आयडी (दाबलेली वाफ मोकळी करत) चार ओळींच्या धाग्यालाही वीत-वीतभर प्रतिसाद देतात. (स्त्री आयडिंकडुन असले प्रकार माझ्या तरी बघण्यात आलेले नाहीत.) ;)
मुक्तक मस्त रंगवलय. आवडेश आणि पटेश.
18 Apr 2011 - 9:42 am | प्यारे१
>>>>(दाबलेली वाफ मोकळी करत)
याला समानार्थी काय रे गणपाभौ?????
18 Apr 2011 - 6:21 pm | असुर
समानार्थी शब्द!!!
दाबलेली वाफ मोकळी करत = फॉक्कन!!! (कॉरा: आंनंदयात्री) ;-)
--असुर
18 Apr 2011 - 1:52 am | रमणरमा
छान !
--------
If You Don't Have Anything Nice to Say, Don't Say Anything At All -हे सगळ्या बायकाना शिकवल तर कितीतरी भांडणतन्टे सुरू होण्या आधीच संपतील ना!
:)
18 Apr 2011 - 11:09 am | वेदनयन
नीलांबरीतै ने गेल्या दोन दिवसात तिन लेख पाडल्यावर अजुन कसला पुरावा हवा.
ह.घे.हे.सां.न.ल.
18 Apr 2011 - 12:28 pm | sagarparadkar
>> 'अहो, किती वेळचे बोलताय? जेवायचं नाही का?...'
'बोलतोय कुठला ग? ऐकतोय...एस. टी. डी. वर एवढं बोलणं म्हणजे....'
'असू द्या हो.फोन त्यांनीच केला होता ना?' <<
हे वाचून मला माझ्या एक मामाची आठवण झाली. तोसुद्धा कोणत्याही विषयावरील संभाषणाचा प्रवाह हळूच त्याच्या मुलांच्या कौतुकांकावर आणत असे. आणि मग तिथून पुढे मग एक कंटाळवाणे 'आम्हाला पहा आणि फुलं वहा' प्रकारचे निरुपण सुरू करत असे.
मग नातेवाईक अनिच्छेने का होईना पण ते कौतुक ऐकत बसत.
एकदा त्याने फोन केल्यावर तो मीच घेतला. आणि त्याच्या संभाषणाचे एकूण वळण लक्षात येताच बराच वेळ तसाच खाली ठेवून दिला आणि माझ्या कामाला सुरुवात केली. बहुतेक दोन / तीन वेळा 'हॅलो हॅलो' करून सुद्धा काहीच प्रतिसाद येत नाही हे कळल्यावर त्याने आपलं पुत्रकौतुक आवरतं घेतलं असावं. मग काही वेळाने मी फोन परत कानाला लावला आणि त्याला म्हणलो 'झालं का तुझं बोलणं?' तसा तो खूपच वरमला. परत त्याने कधीही फोन केला किंवा भेटला तरी मूळ मुद्दा सोडून कधीही भरकटला नाही (निदान आमच्यापैकी कुणाशी बोलताना तरी :) )