भोचक, खोचक आणि वेचक

नीलांबरी's picture
नीलांबरी in जनातलं, मनातलं
17 Apr 2011 - 6:59 pm

आयुष्यात अनेक प्रकारचे मनुष्यस्वभावाचे नमुने आपल्याला रोजच भेटत असतात. हसवणारे,फ़सवणारे, चिडवणारे,रडवणारे... एक ना दोन. अनेक प्रकार. पण या सार्‍यात भोचक माणसांची एक वेगळीच गंमत असते. त्यांचा रागही येतो, अन कधीकधी हसूही येतं. भोचक म्हटल्यावर मला खूप वर्षांपूर्वीचा एक मजेशीर प्रसंग आठवला.

सकाळची वेळ होती. आम्हा बहिणींची कॉलेजला जायची घाई सुरू होती. बाबा सुद्धा कोर्टात निघायच्या तयारीत होते. तोच गावाकडचा एक वृद्ध माणूस आपली केस घेऊन आला. वयाने बराच असावा. बाबांनी आईला चहा पाठवायला सांगितले. बाबांच्या ऑफ़िसच्या दारातून त्याला घरातले थोडेफ़ार दिसत होते.
जरा सावरून बसत, त्याने प्रश्न केला,
'सार्‍या लेकीच का जी वकीलसायेब? पोरगा न्हाई तुमाला?'

'नाही.' बाबांचे डोळे त्याच्या कागदपत्रांमधे.

'जरा बोलू का जी?' खाजगी आवाजात विचारून, तो बाबांच्या फ़िरत्या खुर्चीजवळ सरकला.

'अजून एक लगीन करून टाका. व्हईल पोरगं....'

आईने आतमधे गाळणी खाड खाड वाजवून आपला राग व्यक्त केला. आम्ही मुली खुसुखुसु हसायला लागलो.

हसू न आवरल्याने बाबाही काही तरी निमित्त काढून आत आले.
'जा घेऊन हा चहा तुम्हीच...' आई वैतागली.

'अग, आता कोणी सांगितल्याने मी या वयात दुसरं लग्न करणार आहे का? तू तरी कमालच करतेस.'

आमच्या सार्‍यांच्या हास्याचा एकत्रित स्फ़ोट झाला.

आता बाबांना मुलगा आहे की नाही, यात पडायची त्या माणसाला काहीच गरज नव्हती. त्यातून दुसर्‍या लग्नाचा भोचक सल्ला देऊनही तो मोकळा झाला.

तर असे हे भोचक लोक. सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात अन त्यावर फ़ुकट सल्ले दिलेच पाहिजेत हा त्यांचा आग्रह.

अशीच एक आणखी व्यक्ती. माझे बाबा खूप आजारी असताना मी मुलांना घेऊन काही काळ भारतात गेले होते. तेव्हा या व्यक्तीला जेवायला बोलावले होते. पहिला घास घेतला, अन या नमुन्याचा प्रश्न.

'आता तुम्ही मुली सासरी गेलात. बाबाही आजारी असल्याने वकिली बंदच. मग आईबाबांचा चरितार्थ कसा चालतो?'

'वकिली बंद असली तरी त्यांच्या इतक्या वर्षांच्या गुंतवणुकी, बचत वगैरे नाही का? '
मी रागावर कसाबसा संयम ठेवीत उत्तर दिले.

'पण तेवढ्याने होतं त्यांचं?' पुन्हा चोंबडा प्रतिप्रश्न.

(जणू काही मी नाही म्हटले तर ती व्यक्ती 'मी या महिन्यापासून मनीऑर्डर पाठवीत जाईन' असेच म्हणणार होती.)

आईने मला 'दुर्लक्ष कर' असे डोळ्यांनीच दटावून सांगितले म्हणून बरे झाले.
तर असे हे मनुष्यप्राणी.

माझी बहीण मेरिटमधे आली तेव्हाही 'मुलींना काय करायचंय शिकवून? शेवटी चुलीतच आयुष्य जायचं. त्यापेक्षा लग्न करून टाका लवकर.'
असा भोचक शेरा एका नात्यातल्या बाईंनी मारला होता.(अशा लोकांना नात्यातले म्हणणे ही देखील शिक्षाच. नाही का?)

भोचकसारखेच त्रासदायक, किंबहुना अधिकच तापदायक लोक म्हणजे खोचक. सार्‍या जगाशी यांचे भांडण असल्यासारखे, जणूकाही सर्व लोकांवर सूड उगवायचा असल्याप्रमाणे हे लोक सतत खवचटच बोलत असतात. खरेतर ही कोण्या एका गावाची मक्तेदारी मुळीच नव्हे. या प्रकारचे लोक भूतलावर सगळीकडे सापडतील अशी माझी खात्री आहे.

खोचक लोक हे भोचकपेक्षाही वाईट असे माझे मत आहे. भोचक लोक हे कधीकधी निरागसपणे प्रश्न विचारून जातात. त्यांच्या डोक्यात दुसर्‍याला दुखावण्याचा हेतू असेलच असे नाही. पण खोचक लोकांचा हेतूच मुळी लोकांच्या मनाला त्रास देणे हा असतो. खवचट हे या लोकांचे दुसरे नामाभिधान.दुसर्‍याला बारीक चिमटे काढणारे शब्द वापरणे यात या प्रकारच्या लोकांना कसला आनंद मिळतो तेच जाणे.
आमच्या बाजूला रहाणार्‍या एका काकूंना आमच्या घरात कुठलीही नवी वस्तू आली की 'सेलमधे घेतली वाटतं?' असे विचारायची वाईट्ट खोड होती. अन हा प्रश्न विचारताना त्यांच्या चेहर्‍यावर इतका आढ्यतेचा भाव असे की मला त्यांच्याची बोलावसेही वाटत नसे.

खोचकपणाचा एक विलक्षण नमुना मी लहानपणी बघितलेला आहे.
नागपूरला असताना आम्ही आईबाबांबरोबर एकदा बाजारात गेलो होतो. तिथे आम्हाला एक मामा नावाचे गृहस्थ भेटले. हे मामा बोलायला अतिशय भोचक, खोचक सारेकाही. या कीर्तीमुळे त्यांच्याशी कोणी विशेष बोलतही नसे. बाबा जवळच दुकानात गेलेले. आई आम्हाला घेऊन उभी होती. तेवढ्यात मामांचे आगमन झाले. वय सत्तरीच्या पुढे, हातात काठी अन तोंडात तंबाखूचा तोबरा.

'काय, सार्‍या मुलीच वाटतं?' मामांचा भोचक प्रश्न.
आईने नुसतेच स्मित केले.

'काही कामाच्या नाहीत म्हणजे. विकून टाका चार पैशात...'
कमालीच्या खवचट आवाजात मामा म्हणाले.

हे अत्यंत मूर्खपणाचे उद्गार काढायची मामांना मुळीच गरज नव्हती. पण मामाच ते. मी लहान असल्याने मला या संवादाचा अर्थ कळण्याचे माझे वय नव्हतेच. पण आईचा लाल झालेला चेहरा अन त्यावर तिने शांतपणे विचारलेला प्रश्न अजूनही आठवतो,

'मामा, तुमची आई केवढ्याला विकली होती हो?'

यानंतर आईबाबा दिसले तरी मामा रस्ता बदलत असे.

-समाप्त

समाजलेख

प्रतिक्रिया

प्रदीप's picture

17 Apr 2011 - 7:20 pm | प्रदीप

तुमच्या आईंनी त्या 'मामां'ना विचारलेला प्रश्न!

हेच म्हनते
खोचक लोक म्हनजे खरच डो़क्याला ताप अस्तात
"माझे बाबा एकदा हार्ट अटयाक मुळ आय .सि .यु .मध्ये होते
जवळ कुनि नातेवाइक नाहि ,मि मम्मि आनि भाउ सगळॅ प्रचण्ड घाबर्लेले !
अशातच एक शेजारि त्याना भेटायला आला होता "आय सि यु मधे आला ,वडील ओक्सिजन वर आहेत हे पाहुन
बाहेर येउन म्हनाला " माझे नातेवाइक असेच सिरियस होते हो बिचारे वारले ते ,हार्ट अटयाक म्हनजे जग्न्याचि शक्यता फार कमि अस्ते हो !
आधिच मम्मि एतकि घाबर्लेलि २ दिवसापासुन सगळॅ भयानक टेन्स ,आनि त्यात हा नालायक अस म्हनाला
"माझ्या भावाचा राग अनावर झाला होता तो म्हनाला काका या आता आराम करु द्या त्याना "
त्यान्च्या बरोबर आलेल्या एकाला म्हनाला याना घेउन जा काका
नाहितर सिलेण्डर्र च घालिन यान्च्या डोकयात !

टारझन's picture

18 Apr 2011 - 1:04 pm | टारझन

१. तुम्ही भारतात " जातात " म्हणजे भारता बाहेरुन लिहीताहात
२. तुमची बहिन अतिशय हुशार असुन मेरिट वगैरे मधे येते .
३. तुमच्या आईची हुशारी दाखवण्यासाठी तुम्ही बळेच एक मामा नावाचे कॅरॅक्टर घुसवुन त्याच्या तोंडुन अशक्य वाक्य घुसवल्या सारखे वाटते .

- टोचन टोचक

नरेशकुमार's picture

17 Apr 2011 - 7:23 pm | नरेशकुमार

'मामा, तुमची आई केवढ्याला विकली होती हो?'

खत्तरन्नाक उत्तर,
असल्या भोचक टोचक खोचक जाचक लाचट हलकट लोकांना जागच्या जागिच, सडेतोड, त्यांचे तोंड फोडुन असेच उत्तर दिले पाहीजे.
आपल्या मातोश्रींना सलाम !

असतात काही नमुने..
लिहायची शैली आवडली.

प्रीत-मोहर's picture

17 Apr 2011 - 7:44 pm | प्रीत-मोहर

मस्तच लेखन

तुमच्या आईचा मामांना केलेला प्रतिप्रश्न आवडला :)

साष्टांगच. मस्त लेख. आणिक ते उत्तर देखील खूप खूप खूप खूऊऊऊउप आवडले. मस्तच. तरी मी म्हणेन कि तुम्च्या आईसाहेबांनी बर्राच संयम दाखविला.. त्या 'मामा' च्या चेहर्यावर वण उमटवले असते तरी कमीच होते.

काय पण लोकांना उत्साह असतो दुसर्‍याच्या भानगडीत पडण्याचा!
विकून टाका काय? :(
मुली असताना हे शेरे मिळतात असे नाही तर मला भाऊ असतानाही बाबांना कोणीतरी म्हणत होतं की एकाच मुलीला हुंडा द्यावा लागणार पण दोन मुलांमुळे दुप्पट आवक आहे. किंवा एक बाई बाबांना म्हणत होत्या की तुमचा 'माल' परदेशी जाण्याजोगा आहे याकडे दुर्लक्ष करू नका आमच्या 'मालाला' चष्मा आहे त्यामुळे काळजी आहे. यामध्ये मुलीला (त्यांच्या असो किंवा दुसर्‍याच्या) माल म्हणत आहेत हे मला अनेक वर्षांनी समजले होते.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Apr 2011 - 5:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>यामध्ये मुलीला (त्यांच्या असो किंवा दुसर्‍याच्या) माल म्हणत आहेत हे मला अनेक वर्षांनी समजले होते.
आमच्या विद्यालयीन आणि महाविद्यालयीन जीवनात हा शब्द खूप म्हणजे खूपच प्रचलित होता (पण वेगळ्या संदर्भात) ;-)

मी-सौरभ's picture

20 Apr 2011 - 8:30 pm | मी-सौरभ

>>तुमचा 'माल' परदेशी जाण्याजोगा आहे
बाई खरचं बोलली की :)

सुनील's picture

18 Apr 2011 - 1:12 am | सुनील

तुमच्या आईंना दंडवत!

लेख छान झालाय.

पंगा's picture

18 Apr 2011 - 2:59 am | पंगा

...दंडवत नेमका कशासाठी, हे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले नाही. (म्हणजे, अशा परिस्थितीत उत्तर द्यायचे झालेच, तर दुसरे नेमके कोणते पर्यायी उत्तर देणे शक्य असते?)

परंतु, उत्तर देणे किंवा न देणे या दोन पर्यायांपैकी पहिल्या पर्यायाच्या निवडीबद्दल (थोडक्यात, सशाच्या अहिंसेऐवजी वाघाची हिंसा दाखवण्याबद्दल) दंडवत असल्यास कदाचित समजू शकतो.

सुनील's picture

18 Apr 2011 - 3:37 am | सुनील

गप्प बसण्यापेक्षा उत्तर दिले याबद्दल दंडवत. ह्या परिस्थित पर्यायी उत्तर म्हणजे थोबाड रंगवणे असेही असू शकले असते. परंतु, तो पर्याय फारसा परिणामकारक ठरला नसता. शिवाय सार्वजनिक ठिकाणे असे काही घडल्यास त्याचा (इतरांकडून) विपरीत अर्थ काढला जाण्याचीही शक्यता होती.

थोडक्यात -

पर्याय १ - गप्प बसणे - परिणामकारकता शून्य.
पर्याय २ - मुस्कटात मारणे - परिणामकारकता मर्यादित.
पर्याय ३ - दिलेले उत्तर - परिणामकारकता पुष्कळ (जी नंतर दिसलीच!)

ह्या परिस्थित पर्यायी उत्तर म्हणजे थोबाड रंगवणे असेही असू शकले असते. परंतु, तो पर्याय फारसा परिणामकारक ठरला नसता.

शिवाय, (१) नंतर हात साबणाने स्वच्छ धुण्याचे कष्ट घ्यावे लागले असते, अधिक (२) त्या व्यक्तीला गरजेपेक्षा अधिक महत्त्व दिले गेले असते, हे विसरलात काय? (याव्यतिरिक्त यूज़ ऑफ़ एक्सेसिव फ़ोर्स, या पर्यायात 'क्लास' नसणे वगैरे मुद्दे सोडून देऊ.)

त्यामुळे हा पर्याय पूर्णपणे बाद.

मग पर्याय उरतात दोनच. (१) उत्तर न देणे, किंवा (२) उत्तर देणे.

उत्तर न देणे हे दोन कारणांमुळे घडू शकते. (१) उत्तर देता न आल्याने (थोडक्यात, दुबळेपणामुळे), किंवा (२) उत्तर देता येत असूनही, उत्तर देऊन असल्या फालतू माणसाला महत्त्व देण्याची इच्छा नसल्याने. (थोडक्यात, पूर्णपणे दुर्लक्ष करावेसे वाटल्याने - किंवा, ज्याला मिपाच्या भाषेत 'फाट्यावर मारणे' म्हणतात, ते करावेसे वाटल्याने. याकरिता प्रचंड आत्मविश्वास अधिक मनोधैर्य आवश्यक असावे.)

आणि उत्तर द्यावेसेच वाटले, तर दिलेल्या उत्तराइतके चपखल उत्तर दुसरे नसावे. (किंवा, दुसरे कोणते उत्तर शक्य तरी आहे काय, याबद्दल शंका आहे.) अर्थात, असे उत्तर देता येण्याकरिताही मनोधैर्य आवश्यक असावेच.

आता (१) योग्य कारणाकरिता उत्तर न देणे, आणि (२) उत्तर देणे, हे दोन्ही पर्याय आपापल्या परीने योग्यच असावेत. त्यांत डावेउजवे करण्याचा प्रश्न नाही. एखाद्या व्यक्तीने अशा प्रसंगी या दोहोंपैकी कोणताही पर्याय निवडला, तरी तो समर्थनीय आहेच. त्याबद्दल वाद नाही. परंतु यांपैकी कोणताही पर्याय अवलंबण्याकरिता धैर्य किंवा हिंमत असणे आवश्यक आहे, हे ओघाने आले.

आता, हिंमत ही एखादी हिंमतवान व्यक्ती दाखवू शकते, तशीच वेळप्रसंगी एखादी दुबळी किंवा धैर्यहीन व्यक्तीही दाखवू शकतेच. मात्र हिंमतवान व्यक्तीने हिंमत दाखवल्यास त्या हिमतीचे कौतुक नसते. अशा व्यक्तीत ती हिंमत, ते धैर्य अध्याहृतच असते. उलट एखाद्या दुबळ्या, धैर्यहीन व्यक्तीने असे धैर्य दाखवल्यास ती हिंमत कौतुकास पात्र ठरते. (उदाहरणार्थ, उद्या एखाद्या अस्थिदंत विमा एजंटाने असे उत्तर दिल्यास त्याच्या धैर्याचे आपण कौतुक करणार नाही. कारण अशा व्यक्तीकडून अशा धैर्याची अपेक्षा आहेच. त्यात विशेष असे काही नाही.)

त्यामुळे, अशा धैर्याबद्दल कौतुक करताना, त्यात मूळच्या दुबळेपणाचे गृहीतक अभावितपणे दडत तर नाही ना, अशी एक शंका मनाला चाटून गेली, इतकेच. (कोण जाणे, कदाचित प्रसंगातल्या उत्सवमूर्तीचे सेल्फ़-पर्सेप्शन इतके वाईट नसावे. आणि तसे ते नसल्यास, असे कौतुक हे अस्थानी आहे, आणि कदाचित त्या व्यक्तीकरिता अन्याय्य आहे, असेही वाटून गेले.)

बाकी, चपखल उत्तराबाबत दाद आहेच.

पुर्वी कुठेतरी वाचल्या सारखं वाटतय.
असल्य लोचटांचे गाजरासरखे मोडुन तिथेल्या तिथे (शाब्दिक) तुकडे करावेत.

छान लेख. तुमच्या आईने दिलेले संयमीत उत्तर मस्तच.
बाकी असे लोक असतात त्यांच्याकडे जमेल तेंव्हा दुर्लक्ष करावे किंवा फटाफटा बोलुन मोकळे व्हावे. उगाच डोक्याला ताप !!

स्वत:च्या लेकरालाच माल म्हणणारी आई म्हणजे थोरच म्हणायची!!
बाकी असे लोक म्हणजे दुसर्‍याच्या उन्नतीवर जळणारे अन स्वतः काही कर्तुत्व नसलेलेच असतात असा अनुभव आहे.

पिवळा डांबिस's picture

18 Apr 2011 - 10:25 am | पिवळा डांबिस

'मामा, तुमची आई केवढ्याला विकली होती हो?'
क्या बात है!!! जवाब नही!!!!!
तुमच्या आईचे अभिनंदन!!!!
:)

बाकी असे लोक म्हणजे दुसर्‍याच्या उन्नतीवर जळणारे अन स्वतः काही कर्तुत्व नसलेलेच असतात असा अनुभव आहे.
+१!!!!
:)

अमोल केळकर's picture

18 Apr 2011 - 12:21 pm | अमोल केळकर

मस्त लेखन :)

अमोल केळकर

मराठमोळा's picture

18 Apr 2011 - 1:26 pm | मराठमोळा

हमम्म्म्म,
अशा लोकांना तोंड देण्यासाठी मेंटल टफनेस फारच गरजेचा असतो. नाहीतर आपलेच जगणे अशक्य होऊन बसेल. यांच्या बोलण्या-वागण्याचा एखाद्याला प्रचंड राग येऊ शकतो पण हा राग त्याच व्यक्तीचे नुकसान करण्यास कारणीभूत होतो. या लोकांना काही फरक पडत नाही कारण त्यांचा उद्देश सफल झालेला असतो दुसर्‍याला अस्वस्थ झालेल पाहुन.

शक्यतो या लोकांना टाळने हाच प्रभावी उपाय असतो, पण कधी वेळ आलीच तर "ईट का जवाब पत्थरसे" हे धोरण उपयुक्त ठरते.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Apr 2011 - 6:09 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अनुभवाचे बोल म्हणायचे का हे? ;-)

प्राजु's picture

18 Apr 2011 - 8:34 pm | प्राजु

खूप पाहिली आहेत अशी लोकं मी.

लग्नाआधीची गोष्ट. आमच्या नव्या घरी आम्ही रहायला गेलो. तेवा अंगणात, बागेत नुकतीच काही झाडे लावली होती. त्यात बदामाचे झाडही होते.
एकदा असेच एक आजोबा, चालत चालत फाटकासमोरून जाताना , ओळख ना पाळख...मध्येच थांबले आणि फाटकाजवळ येऊन एकदम म्हणाले, "अरे देवा! ह्ये बदामाचं झाड, फार पानं पडतात याची.. खूप कचरा होतो."
मी तिथेच अंगणात काही बाही करत होते, मला रागच आला त्यांचा.."या मग रोज झाडून घ्यायला!" असं म्हणाले. तसे ते एकदम २ पावले मागे सरकले आणि मान हलवत निघून गेले.

अच्छा .. तरीच ते अजुबा आता संपादन कार्यात इंटरेस्ट घेताना दिसत नाहीत होय ... जाताना ... " गोंय .. गोंय " करत गेलेले का गं ते ? ;)

- टीम मावा
( प्यासा , पीत-मोहन ,चाटण चुर्णकर्ते )

लेखन आवडले

लिहित रहा .. वाचत आहे..

शाहरुख's picture

18 Apr 2011 - 9:27 pm | शाहरुख

>>'काही कामाच्या नाहीत म्हणजे. विकून टाका चार पैशात...'

कोणत्या सालची गोष्ट आहे ही ?

दीप्स's picture

19 Apr 2011 - 2:38 pm | दीप्स

तुमच्या आईचा मामांना केलेला प्रतिप्रश्न आवडला

ज्ञानेश...'s picture

19 Apr 2011 - 4:21 pm | ज्ञानेश...

लेख आवडला.
('भोचक' शब्द जरा अस्वस्थ करून गेला. मिपावर या शब्दाला एक वेगळा संदर्भ आहे.)

पहिल्यांदा लेख वाचला तेह्वा हेच आलं मनात...

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Apr 2011 - 7:56 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त हाणला!

लेखन आवडले. तुमची शैली छान आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Apr 2011 - 2:29 am | निनाद मुक्काम प...

@खोचक लोक हे भोचकपेक्षाही वाईट असे माझे मत आहे
सहमत
लेखनशैली व विषय आवडला .