नमस्कार मंडळी,
मागच्या वेळेच्या गणनाट्याच्या अंका प्रमाणेच या विकांतालही आम्ही हजर आहोत!! या खेपेला गणपाशेट बनवणार आहेत तंदूर कोलंबी आणि मी बनवले आहे फ्लर्टीनी. गणपाशेटची पाककृती बघीतल्यावर, खरं सांगतो, अक्षरशः लाळ गळायला लागली. आधीच कोलंबी माझा वीक-पॉईंट आणि त्यात साक्षात तंदूरभट्टीवर..अक्षरशः त्या तंदूरमध्ये जळून कोळसा झाला आमचा. आता इथे उन्हाळा सुरू झाला की पहिली बार्बेक्यू पार्टी गणपाशेटच्या नावाने.
तर अशी आहे तंदूर कोलंबीची पाकृ:
साहित्य:
ताजी कोळंबी.
२ चमचे ताजं घट्ट दही.
१ मोठा चमचा आलं-लसुण पेस्ट.
१ मोठा चमचा तंदुर मसाला.
१ चमचा काश्मिरी लाल तिखट.
१ लहान चमचा हळद.
तेल/बटर
मीठ स्वादानुसार.
लिंबाचा रस.
कृती:
कोळंबी मधला काळा दोरा काढुन टाकावा आणि कोळंबी स्वच्छ धुवून घ्यावी. थोडी हळद,मीठ आणि लिंबाचा रस लावुन ठेवावी.
वरील सर्व मसाले एकत्र करुन कोळंबी त्या मिश्रणात घोळवून घावी. फ्रिज मध्ये ३०-४० मिनिटे मुरत ठेवावी. नंतर बांबुच्या शिगा घेउन त्यात (आकारा नुसार) ३-४ कोळंब्या ओवुन घ्याव्या.
ग्रिल असल्यास ग्रिल वर, नसल्यास नॉन्स्टिक तव्यावर थोड बटर सोडुन त्यात या कोळंब्या दोन्ही बाजुंनी तळुन घ्याव्या.
मग वाट कसली पहाताय करा हात लांब उचला काडी आणि तो खालचा ग्लास चियर्स. ;)
टिप : ग्रीलचा इफेक्ट देण्यासाठी मी सुरी तापवुन वरुन डाग दिले आहेत. त्याने चवीत काही फरक पडत नाही. पदार्थाची चव घेण्यापुर्वी जर डोळ्यांच्या पसंतीची पावती मिळाली की अर्धा किल्ला तिथेच सर होतो म्हणतात ना म्हणुन हा खटाटोप. ;)
गणपा शेटने कळवले की या वेळेला तो तंदूर प्रॉन्स करणार आहे. प्रॉन्स म्हटले की आपल्याला बुवा समुद्र किनारा आठवतो. मस्त पैकी समुद्रकिनारी सुर्यास्त बघतबघत पापलेट फ्राय, प्रॉन्स फ्राय, प्रॉन्सची भजी इ. इ. चा आस्वाद घेताना सोबत तरूणी आणि वारूणी असावी.. आहाहा!! (अशी आमची तरूणपणातली इच्छा होती.. आता काय.. असो!! तुका म्हणे "ठेवीले अनंते तैसेची रहावे..").
अर्थात वारूणी (आणि तरूणी सुध्दा) अशी हवी की तिने साथीदाराच्या रंगात नुसतेच रंगून जावू नये तर रंग अजून खुलवावेत (त्या बाबतीत बाकी आम्ही भलतेच सुदैवी). त्यामुळे यावेळेस कॉकटेल करताना मला बराच विचार करावा लागला. या समुद्र किनार्यावरच्या तरूणी आणि वारूणी यांच्याशी एकाच वेळेस प्रियाराधन करायचे असेल्यामुळे मी यावेळेस एक नवीन कॉकटेल बनवले आहे. थोडक्यात काय एकाच वेळेस एक डोळा भटीणीला आणि एक डोळा भावीणीला घालता आला पाहीजे. या वेळच्या कॉकटेलचे नाव आहे "फ्लर्टीनी". आहे की नाही प्रसंगाला योग्य!! चला तर हिच्याशी फ्लर्ट कसे करायचे ते बघूया:
- १ औंस कॉईनट्रू
- २ औंस व्होडका
- २ औंस अननसाचा रस
- ५ औंस शँपेन
- २ अननसाचे तुकडे
- १ अननसाचा काप आणि १ चेरी सजावटीसाठी
- बर्फ
शेकरमध्ये अननसाचे तुकडे आणि कॉईनट्रू टाकून लाकडी दांड्याने (लाकडी लाटणे वापरणे उत्तम) थोडेसे चेचा. नंतर त्यात बर्फाचे तुकडे, अननसाचा रस आणि व्होडका टाकून एक मिनीटभर शेक करा. आता हे मिश्रण कॉकटेल ग्लासमध्ये गाळून घ्या. त्यावर कडेकडेने शँपेन ओता आणि सजावटीसाठी ठेवलेला अननसाचा काप आणि चेरीने सजवा.
आता भिडवा ओठांना !!!!
मागच्या अंकाच्या वेळेस मला बर्याच जणांनी (आणि जणींनी पण) कळवले होते की नॉन-अल्कॉहोलीक कॉकटेल्स (मॉकटेल्स) पण करा. तर या सर्वांचा मान ठेवून या वेळेस तो उपाय सुध्दा सुचवत आहे. कॉइनट्रूच्या ऐवजी संत्र्याचा रस आणि व्होडकाच्या ऐवजी अर्ध्या लिंबाचा रस वापरा. तसेच शँपेनच्या जागी अॅपल सायडर (किंवा सफरचंदाचा रस) वापरा. झाले की तुमचे मॉकटेल.. मी दोन्हींची चव घेवून पाहीली तर कॉकटेल व्होडकामुळे किंचीतसे कडवट लागत होते.. बाकी सर्व शेम-टू-शेम!!
डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.
धन्यवाद...
प्रतिक्रिया
17 Apr 2011 - 11:32 am | चिंतामणी
गणनाट्य चांगलेच रंगायला लागले आहे.
दुसरा अंक सुद्धा फारच छान.
तुझ्या भाषेत सांगायचे तर "अक्षरशः लाळ गळायला लागली"
आता एकच इच्छा व्यक्त करतो. दोघे मिळून कधी कट्टा ठरवता आणि आमच्यासारख्या भुकेल्या आणि तहानलेल्यांना तृप्त करणार याची वाट बघत आहे.
17 Apr 2011 - 11:37 am | नंदन
शब्द संपले!
18 Apr 2011 - 10:42 am | नगरीनिरंजन
.....
17 Apr 2011 - 11:48 am | सहज
वेळप्रसंगी व्होडका एवजी टकीला चालेल काय? (लगे हाथ जिन, मार्टीनवर देखील निकाल द्या)
बाकी तुम्ही (आम्हा भोळ्या जनतेच्या) महीन्याचे बजेट, डायटची वाट, पेयामधे कपातनिर्णयची इ. वाट लावली आहेत. राजकारणात मोठे नेते व्हायला सगळी पूर्वतयारी झाली की तुमची!!
गणपाशेठ प्रॉन्सवरील ग्रील लाईन्स फोटो शॉप वाटत आहेत की मला चढली आहे? ;-)
18 Apr 2011 - 9:47 pm | नाटक्या
टकिला थोडीशी आंबट असते त्यामुळे त्या बरोबर अननसाचा रस असला तर फारच आंबट चव येईल. टकिला/जिन असलेले कॉकटेल मी पुढच्यावेळेस कधीतरी टंकेन..
17 Apr 2011 - 11:49 am | इरसाल
जबरा...........कोलंबी म्हणजे स्ळूर्प्स स्ळूर्प्स ....................
साहेब कॉकटेल चे फोटो जरा आउट ऑफ फोकस झालेत का ?
18 Apr 2011 - 9:50 pm | नाटक्या
अहो काय सांगू तुम्हाला... दारू पोटात नसली की हात थरथरतो..पाय लटलटतात.. बोलताना ततपप होते.. म्हणून नेहमी कॉकटेल तयार झाले आणि त्याचा एक घोट घेतला की फोटो मस्त येतात..
17 Apr 2011 - 11:53 am | दीविरा
पाक्रु नेहमीप्रमाणेच मस्त :)
एक शंका आहे पण, तुम्ही तव्यात ग्रील केले आहे पण मग कोळंबीला ग्रीलचे मार्क्स कसे आले?
तुमच्या सगळ्याच पाक्रू उत्तम असतातच
पेय प्रकारात मात्र मला आणि घरी सुद्धा रस नाही त्यामुळे त्या बाबतीत काहीच माहित नाही.
दिसतंय छान जे काही आहे ते :)
17 Apr 2011 - 4:12 pm | पियुशा
लाजवाब !
:)
17 Apr 2011 - 4:51 pm | रेवती
दोन्ही पाकृंचे फोटू चांगले दिसतायत.
नाटक्यासाहेबांनी जसा नॉन अल्कोहोलीक पर्याय दिलाय तसा गणपानं तह व्हेजी पर्याय दिला तर आम्हालाही काही प्रयोग करता येइल.
17 Apr 2011 - 4:57 pm | सानिकास्वप्निल
कसली दिसतेय कोलंबी..मला खुप आवडते कोलंबी मस्तच आणी फ्लर्टीनी तर एकदम झकास :)
17 Apr 2011 - 5:13 pm | बहुगुणी
'गणनाट्य': कामातच नव्हे तर नामातही 'गणपा' आणि 'नाटक्या' यांचा कल्पक मिलाप आवडला!
बाकी मॉकटेलचाही समावेश केल्याबद्दल नाटक्याशेठना धन्यवाद! आता गणपाशेठही रेवतीताईंचा आग्रह मनावर घेतील तर दुधात साखर!
[हे दोघे खरंच व्यवसायासाठी एकत्र येऊ शकले, तर असले कौल काढायची गरजच उरणार नाही :-) ]
18 Apr 2011 - 10:37 pm | नाटक्या
गणनाट्य ह्या शब्दाचे संपुर्ण श्रेय शहराजाद (http://www.misalpav.com/user/9660) यांच्या माझ्या खरडवहीतील नोंदीला...
17 Apr 2011 - 6:37 pm | सुनील
झक्कास!
वोडका + शँपेन ही कल्पना अफलातून!
18 Apr 2011 - 12:23 am | प्राजु
खल्लास!! कलिजा खल्लास झाला! :)
सी फूड च्या बाबतीत जरा मंदच आहे मी.. पण ट्राय करेन एकदा.
18 Apr 2011 - 5:23 am | शहराजाद
तंदूर कोलंबी आणि फ्लर्टिनी!
गणनाट्यातल्या दोन्ही नाट्यगणांना आपली मनापासून दाद.
अवांतरः
आता काय? नटवर्य, आपल्या सौभाग्यवती आता तरूण नाहीत असं म्हणताय? अं? अं? आम्ही दीड-दोन महिन्यांपूर्वी बघितल्या तेव्हा तर तरूणच होत्या. असो, कोलंबी- फ्लर्टिनीची प्यार्टी कधी देता सांगा म्हणजे ही चुगली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही विसरून जाऊ. :)
18 Apr 2011 - 5:45 am | Nile
फार त्रास होत असल्याने या मालिकेवर (वाचून) बहिष्कार घालणार आहोत. (हो मग करणार काय, तरूणी सोडाच, असल्या वारूणी सुद्धा आमच्या वाटेला सद्ध्या जायची शक्यता फार नाहीचं ए. कोलंबी वगैरे तर.. असो.!)
18 Apr 2011 - 10:27 am | शिल्पा ब
दोन्ही मस्त..
नाटक्याभाउ, मग घरी कधी येता? :)
18 Apr 2011 - 10:30 am | मराठमोळा
मी हा धागा उघडलाच नाही!!! काहीच पाहिले नाही आणि प्रतिसाद पण दिला नाही.
18 Apr 2011 - 10:31 am | साती
मस्तच. माझ्या सध्याच्या गावात कोलंबी मिळत नाहीत. नाहीतर केला असता हा प्रोग्रॅम.रत्नागिरीला गेल्यावर नक्की करेन.
रेवती तुम्ही बटाटा ,पनीर नाहीतर तासभर मीठ लावून पाणी काढलेली कारली ट्राय करू शकता.
झुक्किनी पण चालेल.
गणपा व नाटक्या यांच्या पुढिल लेखांस शुभेच्छा.
18 Apr 2011 - 10:53 am | स्वाती दिनेश
दुसरा अंकही मस्त जमला आहेच,
'डबल मजा'च्या पुढच्या पाकृंची उत्सुकता वाढते आहे..:)
स्वाती
18 Apr 2011 - 10:58 am | sneharani
दुसरा अंकही मस्तच!!फोटो एकदम मस्त!
येऊ देत पुढचे भाग..!
18 Apr 2011 - 11:06 am | पिवळा डांबिस
हे प्रकर्ण भलतंच जबराट होत चाल्लंय.....
आधीच या गणपाच्या रेसेपीज प्लेबॉय मासिकासारख्या असतात!! (म्हणजे मजकूरापेक्षा फोटोच अधिक प्रेक्षणीय!!)
:)
आणि आता त्याला या नाटक्याची साथ मिळाल्यावर हे प्रकर्ण प्लेबॉयपेक्षा जवळजवळ हस्लर होत चाल्लंय!!! बेअरली लीगल!!!!!
;)
मिपाकरांची देवाक काळजी!!!!
18 Apr 2011 - 1:27 pm | श्रावण मोडक
सहमत!!!
18 Apr 2011 - 11:09 am | विसोबा खेचर
काय बोलू..?!
18 Apr 2011 - 11:33 am | वेदनयन
तंदूर प्रॉन्सचा हाय, वारुणीचा हाय, मग एक तरुणीचा (कोणताबी चालल) फोटो टाकायला काय घेणार शिंच्यांनो?
18 Apr 2011 - 2:03 pm | विशाखा राऊत
एवढेच लिहणार हम्म्म्म्म हम्म्म्म्म्म हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
18 Apr 2011 - 6:35 pm | प्रभो
+१ पिडंकाका...
च्यामारी आता एक वेस्टकोस्ट आणी आफ्रिका टूर करावी लागणार....
18 Apr 2011 - 7:03 pm | परिकथेतील राजकुमार
__/\__ ज ह ब र्या !!
आता एक व्हेज डिश + कॉकटेल / मॉकटेल चा अंक हवा.
18 Apr 2011 - 10:13 pm | स्मिता.
तंदूर प्रॉन्स आणि फ्लर्टीनी, दोन्ही आवडले.
'गणनाट्य' हे कॉम्बिनेशन लईच भारी झालंय. पुढच्या अंकांची वाट बघतेय.
12 Aug 2011 - 2:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ओ गणपा भाऊ आणि नाटक्या काका, या मालिकेतला पुढचा भाग कधी येणार ??
12 Aug 2011 - 2:46 pm | गणपा
नाटक्याशेट अंमळ कार्यमग्न आहेत सध्या.
12 Aug 2011 - 2:53 pm | चिंतामणी
ऑलरेडी चार महीने उलटले आहेत.
अजून पुढे किती?????????