माउली
अपरिचित बंधुत्व त्या दोघांचे
अनाकलनीय खेळ त्या नियतीचे
अपरंपार हाल मात्र त्या माउलीचे
भय दाटे हृदयी त्या अंतिम युद्धाचे
ते दोघे आज सामोरे ठाकले
मातेचे काळीज विद्ध जाहले
एकाच हृदयीचे दोन ठोके 'चुकले'
अन् जन्माचे वैरी जाहले
एक अंश त्या अविनाशी तेजाचा
दुजा तो प्राणसखा त्या मनमोहनाचा
सुदैवी मातेवर कैसा फेरा हा दुर्दैवाचा
आपल्याच पिल्लांमध्ये डावे-उजवे करण्याचा
तेज:पुंज कवचकुंडलांचा धनी तो
सदा सोसतो अपमानांचे आघात तो
कौन्तेय असूनही जगाला राधेय तो
राधेच्या सौभाग्याचा कुंतीला हेवा वाटतो
तरीही जपले अन् साधले दुज्याचेच हित तिने
मागितले दुज्यासाठीच अभयदान तिने
ठरवले खुशाल दोषी तिला या जगाने
पचवले तिने घाव किती खिन्न मनाने
सुतापुत्रावरील अन्याय उल्लेखीला सर्वांनी
पार्थाचे गुणवर्णन सदा गायिले सर्वांनी
मुरलीधरालाही पूजिले सर्वकाळ सर्वांनी
त्या माउलीचे दु:ख कां न जाणिले सर्वांनी?
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१४/०३/२०११)
प्रतिक्रिया
14 Mar 2011 - 10:59 pm | गणेशा
कविता आवडली ..
राजमातेच्या पडद्यामागील आई छान दाखविली आहे