श्री. पंगुशेठ यांचा लेख वाचला आणि एक जुनी आठवण जागी झाली. त्यावेळी बराह, श्रीलिपी वगैरे उपलब्ध नव्हते. त्यामुळे पुण्याहून अमेरिकेतल्या आपल्या लाडक्या लेकीला ई-मेल पाठवतांना आईला इंग्रजीशिवाय पर्याय नव्हता. आणि हे माध्यम भावना, तळमळ कळवण्यास तसे निरुपयोगीच. मी एक सोपा उपाय सुचवला होता. एक साधा स्कॅनर घ्या, कागदावर स्वहस्ताने खरडलेले पत्र स्कॅन करा व द्या पाठवून. निदान दोघींनी तो मानला व त्याचा इतका उपयोग झाल्याचे दिसून आले की त्यांच्या मैत्रिणी घरी पत्र लिहावयाच्या व यांच्याकडे येऊन, ते स्कॅन करून, आपापल्या मुलींना "पत्र" पाठवावयाच्या. स्वत: हाताने लिहलेल्या मराठी पत्राची जागा परकीय भाषेतील टंकलिखित "डॉक्युमेंट" थोडेच घेऊ शकणार आहे ? असो. आजचा विषय हा नव्हे.
हाताने लिहण्याची सवय नाहिशी होऊं लागली तसे हस्ताक्षर बिघडले हा एकच तोटा झाला नाही. आणखी एक मौल्यवान ठेवा दुर्लक्षित होऊं लागला. "पत्र लिहणे". प्रत्येकाच्या खिशात (किंवा कानावर!) मोबाईल असल्याने दूरस्थ मित्राला किंवा नातेवाईकाला पत्र लिहण्याऐवजी फोन करणे सोपे झाले. अगदी भेटला नाहीच तर sms करा. आता sms म्हणजे पत्र नव्हे हे कोणीही मान्य करेल. पण तरीही पत्रे लिहली जात नाहित हे खरेच. फोनवर बोलणे वा sms धाडणे ही अल्पकाल टिकणारी घटना आहे. आता आहे,थोड्या वेळाने नाही. पत्राचे तसे नाही. दोन ओळींची चिठ्ठीही काही वर्षांनी तुम्हाला भूतकालाची सफर घडवून आणू शकते. डोळे किंचित ओले करणे वा ओठावर अस्फूट हास्य आणणे तिला शक्य असते. ही ठेव मोलाची आहे हेच आजकाल कळेनासे झाले आहे कां ? ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात "ह्या हृदयाचे त्या हृदयात घाळणे" हे पत्राचे काम. आज याची गरजच राहिली नाही कां ? पन्नासेक वर्षांपूर्वी मोटे दांपत्याने अपार कष्टाने निरनिराळ्या लेखकांनी, राजकारण्यांनी, कलाकारांनी लिहलेली पत्रे जमवून " विश्रब्ध शारदा" हे दोन खंड प्रसिद्ध केले. आपापल्या क्षेत्रातील ह्या दिग्गज व्यक्ती, ह्यांच्याकडे पहावयाचे म्हणजे आपली टोपी पडते. पण त्यांची पत्रे वाचली म्हणजे जरा जवळीक निर्माण होते. गीतारहस्य वाचून लोकमान्य दूरच रहातात पण त्यांनी लिहलेली पत्रे वाचली म्हणजे वाटते ते कितीही थोर असले तरी त्यांच्या - माझ्यात काही तरी, थोडे का होईना साम्य आहे. आपुलकी निर्माण करावयास ही भावना पुरेसी होते.
तर अशी ही पत्रकला. शब्द भावना व्यक्त करावयास पुरे पडतात असे नाही. पण काही वेळा, जेव्हा बोलणे शक्यच नसते तेव्हा, पत्र हे या भावना व्यक्त करावयास उपयोगी पडतात. लिहलेले शब्द, आणि बर्याच वेळी न लिहलेले शब्द, हा आशय वाचणार्यापर्यंत नेऊन पोचवतात. फुलाचा सुगंध तुम्हाला पकडता येत नाही, पण तो जाणवतो, तुमच्या भोवती रुंजी घालत रहातो, तसे.
आज दोन पत्रे देत आहे. पन्नास एक वर्षांपूर्वी लिहलेली. एक पत्र आहे, दुसरे एका पत्राचे उत्तर. गोडी कळावयास थोडे भूतकालात जावयास पाहिजे. त्यावेळची मध्यमवर्गीय तरुण स्त्री कशी किंचित बंधनात होती याची कल्पना केलीत तर वर सांगितल्याप्रमाणे लिहलेल्या-न लिहलेल्या शब्दांचे सामर्थ्य आपणास मुग्ध करेल. दोन्हीही कविता श्री. पद्मा यांच्या आहेत. ..आकाशवेडी.. १९६८.
(१)
पत्र पत्रासारखेंच
पण त्यांतहि
काना-मात्रा-वेलांटीची ऐट गुंतवणारी,
अक्षरांचा उभट गोलपणा आश्वासन देणारा,
सु्टेपणांत थोडी बेपर्वाई,
कांहीसा मोकळेपणा ;
प्रथम सप्रेम नमस्कारच
पण उपचार वगळणारा, "स"ला सार्थ करणारा ;
विरामचिन्हें-अविरामचिन्हें
बरेंचसें झाकणारीं;
तुटक तुटक सांगणारीं;
शेवटी लोभ असावा या विनंतींतहि
"असावाच"चा आर्जवीपणा
आणि आग्रह: जाणत्यालाच समजणारा.
पत्र पत्रासारखेंच
पण .... त्यांतहि---
(२)
सप्रेम प्रणाम
विनंति विशेष ;
पुढे लिहावया
उरला न श्वास.
विनंति विशेष ...
मधे पत्र कोरें !
कोर्यांत अव्यक्त
रामायण सारें.
लोभ असावा,हें
इतुकें शेवटी --
इतुकेंच --- थांबे
हात सहीसाठी :
..जाणो वाचणारा
जाणेल का पण ?
व्यथेत कापलें
सहीचें वळण.
शरद
प्रतिक्रिया
6 Mar 2011 - 1:44 pm | पैसा
अगदी नेमकं लिहिलंय.
मितानच्या एका सुंदर लेखाची आठवण झाली. ज्यांनी वाचला नसेल त्यांच्यासाठी....
http://www.misalpav.com/node/15152
7 Mar 2011 - 5:56 am | चित्रा
अतिशय छान लिहीले आहे. कविताही फार छान.
6 Mar 2011 - 2:34 pm | निवेदिता-ताई
लेख खूप आवडला...अगदी बरोबर आहे हल्ली या मोबाईल आणी नेट मुळे या मौल्यवान गोष्टीकडे
आपले दुर्लक्ष होत आहे....
6 Mar 2011 - 3:46 pm | पिंगू
सहज लेख आणि काही तरी मुकलोय ही भावना दाटून आली..
- पिंगू
6 Mar 2011 - 9:13 pm | मितान
सुंदर लेख !
कवितांबद्दल काय बोलू ! धन्यवाद !
पत्रकला हा शब्दही किती नेमका आलाय !
खूप आवडले. :)
6 Mar 2011 - 9:23 pm | कलंत्री
१०० वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर भारतीयांचे एक वैशिष्ठे लक्षात येते की त्या काळातील सर्वच अग्रगण्य लोकांना पत्र लिहिण्याचे वेडच होते असे म्हणा तर...
गांधी, नेहरु, सावरकर, वल्लभभाई इत्यादी इत्यादी. मला तर इतके आश्चर्य वाटते की नेहरु आणि पटेल यांच्या पत्राचे अक्षरशा खंडच असावेत.
पत्रातील जिव्हाळा, ममत्व आणि आपले मत यथार्थपणे मांडता येण्याची सोय ही वैशिष्ठे काळाच्या ओघात नाहिसी होतील अथवा नष्ट तरी होतील.
शेवटी काळ आपल्या पोतडीतून अनेक गोष्टी काढत असतो अथवा अनेक गोष्टी नष्टही करत असतो हेच खरे.
7 Mar 2011 - 2:33 am | विनायक बेलापुरे
छान लिहिलाय लेख.
रोजच्या शंभर एक ईमेलला उत्तरे लिहून कंटाळा येतो, पण कित्येक वर्षात हाताने लिहून पत्र पाठवल्याचे आठवतच नाहीये.:(
7 Mar 2011 - 12:37 pm | वपाडाव
शरद राव,
आमच्या काही मित्रांनी १२वीला घर सोडले आणी शिक्षणसाठी ही मंडळी इतरत्र गेली.
त्यावेळी सर्वांनी ठरविले होते, दर महिन्याला एकेकाने एकेकाला पत्र लिहावयाचे.
ही मोहीम २००३-०४ पर्यंत राबविली. पण नंतर मोबाईल्सचा सुळसुळाट झाल्याने हे मागे पडले.
आठवण केल्याबद्दल धन्स.
उपक्रम पुन्हा सुरु करावा असं म्हंतोय.
7 Mar 2011 - 1:07 pm | यशोधरा
मस्त लेख. खरंच, नेट, मोबाईल्सचा सुळसुळात नव्हता तेह्वा पत्रलेखन व्हायचे. आता सगळेच इंस्टंट.
7 Mar 2011 - 1:54 pm | अमोल केळकर
सुंदर लेख. आवडला
अमोल केळकर
7 Mar 2011 - 7:05 pm | गणेशा
अतिशय छान लेख...
पण खेदाने हे नमुद करावे लागते आहे की पत्र लिहिणे खरोखरच आता लयास गेले आहे.
मधेय असेच व. पु. काळेंचे 'प्लेझर बॉक्स' वाचताना सेम गोष्टी लक्षात आल्या होत्या. पण खरेच ही बहुमोल वाट आता ई मेल आणि मोबाईलच्या महामार्गामुळे पुसली गेली आहे
17 Mar 2017 - 8:55 am | १००मित्र
केवळ अप्रतीम