जुन्या विश्वचषकाच्या आठवणी-भाग १

Primary tabs

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in क्रिडा जगत
19 Feb 2011 - 5:32 pm

जुन्या विश्वचषकाच्या आठवणी-भाग १
भारताने यशाच्या जबड्यातून पराजय ’खेचून’ आणला त्याची ’चित्तरकथा’
पराजय समोर उभा असताना जोरदार लढा देऊन विजयश्री खेचून आणण्याच्या पराक्रमाचे इंग्रजीत "They clenched victory from the jaws of a sure defeat"! असे वर्णन केले जाते. पण भारताने या सामन्यात जणू Reverse swing चा प्रयोग केला. जयमाला घेऊन यश ठीक समोर उभे असताना भारताने यशाच्या जबड्यातून पराजयाला जणू ’खेचून’ आणले!

१९९९च्या विश्वचषक स्पर्धेच्या या सामन्यात (एकदिवशीय सामना क्र. १४५०) भारताची गाठ झिंबाब्वेशी होती. तेंव्हाही तो संघ असा मातबर नव्हताच. पण आश्चर्याचे धक्के देण्याची क्षमता मात्र त्यांच्यात होती (तशी ती आजही आहे!). तसे पाहिले तर एकदिवशीय सामन्यात जो संघ त्या विशिष्ट दिवशी जास्त चांगला खेळेल तो विजयी असेच समीकरण असते.
महम्मद अझारुद्दिनच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या आपल्या संघात खालील इतर खेळाडू होते:
सौरव गांगुली, सदागोपन रमेश, राहुल द्रवीड, अजय जडेजा, रॉबिन सिंग, अजित आगरकर, नयन मोंगिया, जवागळ श्रीनाथ, अनिल कुंबळे आणि व्यंकटेश प्रसाद
(सचिनचे वडील वारल्यामुळे तो मुंबईला गेला होता त्यामुळे या सामन्यात त्याच्या जागी रमेश खेळला होता)
अ‍ॅलिस्टर कँपबेलच्या नेतृत्वा खाली खेळणार्‍या झिंबाब्वेच्या संघात खालील इतर खेळाडू होते:
नील जॉन्सन, ग्रँट फ्लॉवर, पॉल स्ट्रांग, मरे गुडविन, अँडी फ्लॉवर, गाय व्हिट्टाल, स्टुअर्ट कार्लाईल, हीथ स्ट्रीक, एड्डो ब्रांड्स, हेन्री ओलोंगा
लीस्टर येथे झालेला हा अटीतटीचा सामना उत्साहपूर्ण कोलाहल करणार्‍या प्रेक्षकांनी पाहिला.
भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचे ठरविले आणि झिंबाब्वेला फलंदाजी करायला पाचारण केले. सुरुवात जरा संथपणेच झाली. पण अ‍ॅलिस्टर कँपबेल आणि अँडी फ्लॉवर एकत्र आले तेंव्हां धावांना गती मिळाली. पण भारताने झिंबाब्वेच्या एकंदर धावापैकी २० टक्के धावा (५१) चक्क अवांतर म्हणून धावा दिल्या. तसे पाहिले तर झिंबाब्वेनेसुद्धा औदार्य दाखवत ३९ धावा अवांतर या नात्याने दिल्या! त्या सामन्यात दिल्या गेलेल्या ९० अवांतर धावा हा विश्वचषक स्पर्धेत झालेला नवा विक्रम होता. (दुर्दैवाने तो विश्वविक्रम चोवीस तासही टिकला नाहीं कारण दुसर्‍याच दिवशी तो मोडला गेला!)
झिंबाब्वेने त्यांच्या डावात २५२ धावा केल्या व त्यात त्यांचे ९ फलंदाज बाद झाले. सर्वात जास्त धावा केल्या अँडी फ्लॉवरने (८५ चेंडूंत ६८, धावगती-strike rate-८०), तर कप्तान कँपबेलने २९ चेंडूंत २४ धावा (धावगती-८३). ग्रँट फ्लॉवर आणि गुडविन यांनी ’टुकूटुकू’ खेळत अनुक्रमे ८९ चेंडूंत ४५ आणि ४० चेंडूंत १७ धावा केल्या. (धावगती अनुक्रमे फक्त ५० आणि ४२).
गोलंदाजीत श्रीनाथ, प्रसाद आणि कुंबळे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले तर आगरकर, गांगुली आणि जडेजा यांनी १-१ बळी घेतला.
षटके टाकण्याचा वेग कमी असल्यामुळे भारताला चार षटकांचा दंड केला गेला. जणू व्याह्यानं घोडंच आणलं!
भारताने फलंदाजीला सुरुवात केली आणि गांगुली, द्रवीड आणि अझारुद्दिन पटापट बाद झाले (५६/३). पण नंतर रमेश (७७ चेंडूंत ५५/७१) आणि जडेजा (७६ चेंडूंत ४३/५७) यांनी ९५ धावांची भागीदारी केली. १५५ वर रमेश तर १७४ वर जडेजा बाद झाला. रॉबिन सिंग (४७ चेंडूंत ३५/७४) आणि नयन मोंगिया (४७ चेंडूंत ३५/११६) यांनी ७४ धावांची भागीदारी करून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून उभे केले. १० चेंडूत फक्त ७ धावा करायच्या होत्या पण श्रीनाथ आणि व्यंकटेश त्या काढू शकले नाहींत ओलोंगाला ३ बळी मिळाले व भारताचा डाव ३ धावा कमी पडून २४९ धावांवर संपला.
दुसर्‍या दिवशी वाचलेली बातमी बातमी मात्र कायमची लक्षात राहिली "भारताने विजयश्रीच्या जबड्यातून पराभव खेचून आणला!"
ऋणनिर्देशः माझे सहकारी श्री. नाफडे यांची आकडे पुरवण्यात बहुमोल मदत झालेली आहे.

क्रिकेट

प्रतिक्रिया

निखिल देशपांडे's picture

19 Feb 2011 - 6:07 pm | निखिल देशपांडे

एक कटु आठवण..

टारझन's picture

19 Feb 2011 - 6:13 pm | टारझन

काय पण टाईम णिवडलाय ?

चिंतामणी's picture

19 Feb 2011 - 6:14 pm | चिंतामणी

जास्त काही लिहीत नाही.

भाग २ लौकर येउ द्या.